आज निवृत्तीला दोन महिने पूर्ण झाले. तसं नवीन डायरीमध्ये पहिलंच वाक्य निवृत्तीचं लिहायला कारण म्हणजे ती एकच गोष्ट सद्ध्या मोठी वाटतेय. निवृत्त झालो म्हणजे मोकळं, रिकामं झालो आणि हेच कारण ठरलं डायरी लिहायला. दिवसभर खूप रिकामटेकडं वाटतं. तसं निवृत्ती मिळाल्या मिळाल्या रिकामं वाटू नये म्हणून बरेच उद्योग केले. मॉर्निंग वॉक, ग्रंथालय, मित्रांच्या घरी जाणं, गप्पा मारणं, मग इविनिंग वॉकदेखील करुन पाहिला. पण नवीन वर्षाच्या संकल्पासारखं सगळं उत्साहापोटी चालू झालं अन् पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या कंटाळामुळे मोडकळीसही आलं. म्हटलं आता आराम करायला मिळतोच आहे, मग संधी का सोडावी? आयुष्यभर एवढी पायपीट केली, आता पुन्हा नियमितपणाचं बंधन का ठेवावं? पण काहीच करायचं नाही असाही याचा अर्थ नाही बरं का. बेधुंद म्हणजे काही सतत झोपून, आळशी राहणं नाही. बेधुंद म्हणजे आपल्याला हवं तसं जगणं, हवं तसं राहणं, हवं ते करणं, हवं तिथे जाणं; नोकरीच्या धावपळीत असं मनासारखं जगताच आलं नाही. म्हणून आता मी ठरवलंय, उरलंय ते फक्त माझं आयुष्य आहे, आणि मी ते हवं तसं जगणार आहे. पण असं असतानाही कधी कधी फार रिकामटेकडं वाटतं. मग एकट्याने फार आठवणी जाग्या होतात. बालपणीच्या, तरुणपणीच्या, सगळ्याच आठवणी अशा डोळ्यांसमोर येतात. म्हटलं लिहायला घेतलं तर आठवणींचा संग्रह प्रत्यक्ष समोर राहील आणि ते लिहतानाही तेवढाच विरंगुळा! तसंही कोणीतरी म्हटलंच आहे, "Great Stories Happen To Those Who Can Tell Them." आता स्वत:च स्वत:ला आपल्या गोष्टी सांगण्यातही काय गंमत आहे, बघुच.
सुरवात कुठून करु या विचारात होतो, आणि आमच्या श्रीमती समोर आल्या. पण सुरवात अन् शेवट दोन्हीही त्यांच्यानेच होतो असंच वाटू लागलंय आता मला. कारण आज माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तीच आहे माझ्यासाठी, माझ्या हक्काची मैत्रिण. खरं तर हे सारं मला हल्लीच समजू लागलंय. याआधी कधी कोणी आपल्या आणि स्वत:च्याही शेवटापर्यंत साथ करील याचा विचारही नव्हता, तो करायला वेळही नव्हता. कारण मी कोणी फार विचारवंत लेखक किंवा तत्वज्ञही नाही. साध्या मिलमध्ये काम करणारा कर्मचारी मी. शिकत असतानाही अभ्यासाच्या बाहेर कधी विचार केला नाही. पण निवृत्तीनंतर फार प्रगल्भ विचारवंत असल्याचा किंवा तसा आव आणल्याचा मला भास होतो. रिकामं असल्यावर मन कसं सगळ्याच गोष्टींचा फार खोल आणि निरागस विचार करतं. त्यादिवशीही तसंच झालं; काही नव्हतं म्हणून मुद्दाम हालचाल करण्यासाठी आमचं जुनं कपाट उघडलं. फार धूळ साचली होती सगळ्यावरच. फाईल्स, पुस्तकं, फोटो अल्बम, सारं काही कपड्यानं झाडत, एक एक चाळत बसलो होतो. बसलो त्या ठिकाणी अवती-भवती सगळी अडगळ तशीच जमा होती. तरी ती साफ करण्याची मला गरज वाटली नाही. पहिले सगळ्या फाईल्स चाळून पाहिल्या ते कोणती एखादी जमीन राहिलीय का प्रॉपर्टीमध्ये तेच तपासायला. आयुष्याच्या उत्तरार्धातही किती लोभ असावा माणसाला! हे कळत असुनही मन काही वळलं नाही. शेवटी फाईल्सच संपल्या. मग फोटो अल्बम्स पुस्तकांपेक्षा कमी होते म्हणून ते घेतले. पहिल्या अल्बममध्ये माझ्या मिलच्या मित्रांसोबतचे फोटो होते. सगळे ब्लॅक अॅंड व्हाईट असल्याने दिसत नव्हते ते फारसे. पण बर्याच जणांना ओळखले मी. ते फोटो एकविरा आणि जेजुरीचे होते. तेव्हा कामाची जागा म्हणून देवदर्शन आणि आता तेव्हाचं वय राहिलं नाही म्हणून देवदर्शन.
एक अजुनही टिकून असलेला, आणि इतरांपेक्षा बरा वाटणारा अल्बम हाती आला. पहिलंच पान उघडलं तर मी आणि आमचं कुटूंब - लग्न लागताना. पहिलं लक्ष गेलं ते स्वतःकडेच. कारण कुठे का असेना, आपण कसे दिसतो हे पाहण्याचा मोह कोणत्याच वयात दूर ठेवता येत नाही. असो, तर पाहताना कळालं, किती बारीक होतो मी तेव्हा. अठरा - एकोणीसचा असेन, तेव्हा लग्न लावलेलं माझं. का? तर जबाबदारी अंगावर घ्यावी म्हणून. आताच्या काळात तर या वयात मुलींचंही लग्न करू देत नाहीत. का करावं? त्या काळी शिक्षणाची वर्षे फार नव्हती, पण आता आपल्याला हवं तसं, हवं तिथे, अगदी परदेशातही शिक्षणाची संधी मिळते; मग ते सोडून जबाबदारीच्या नावाखाली का कोणी लग्न करावं? मी केलं, पण माझ्या मुलामुलींना मी योग्य तसं शिक्षण दिलं म्हणून फार समाधानी वाटलं मला त्या क्षणी. अन् तेवढ्यात नजर गेली ती मान खाली घालून, कोवळ्या, बारीक हातात जाड वरमाळा धरून असलेल्या आमच्या श्रीमतींकडे. पंधरा - सोळा वर्षांची ती नाजूक कळीसारखीच भासली मला. ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो असला तरी चेहर्यावरचे भीतीचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते. तरी मी लाईट लावायला म्हणून उठलो आणि उठता उठता कमरेत कळ आली, तशी तिला हाक मारली. त्या वेदनेतच तिच्या सवयीची जाणीवही पहिल्यांदाच झाली अन् स्मित उमटले. तिच्या सोळाव्या वर्षांपासून अन् माझ्या एकोणीसाव्या वर्षांपासून दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती. मी कामावरून येणार, ती एका हाताने माझी बॅग घेणार आणि दुसर्या हाताने पाण्याचा ग्लास पुढे करणार. हा एक कधीही न बदलणारा नाटकीय scene नेहमीच न चुकता आमच्याकडे चालत असे. माझ्या प्रत्येक कामाला, नवीन गोष्टीसाठी प्रोत्साहन देणं, काही फारच चुकत असेल तर एकांतात समजावून सांगणं - जे मी फारसं ऐकत नसे, आणि तरीही माझ्या प्रत्येक अडचणीत मदत, प्रत्येक हाकेला ओ देणं कधी सुटलं नाही.
उठलो आणि लाईट चालू करायला आणि ती समोर यायला एकच क्षण गेला. फोटोमध्ये दिसत होती तशीच नाजूक, रेखीव... अजुनही तशीच. क्षणभर डोळे दिपून गेले. पण ते क्षणभरच. म्हातारा झालो असलो, निवृत्त झालो असलो तरी मनातलं चेहर्यावर आणून न देण्याचा मूळ स्वभाव पुन्हा जागा झाला.
"अहो काय झालं? हाक का मारली?"
"तुला ऐकू गेली?"
"हो म्हणून तर आलेय ना. आणि हे काय, किती पसारा केलाय. का ते कपाट उघडलं? किती धूळ आहे यात."
स्वारी लगेच सगळं सामान उचलून आत ठेवायला लागली. पण मी अजुनही फोटो आणि प्रत्यक्ष हीचं रूप पाहण्यात शुद्ध हरवली होती. अन् नकळत शब्द फूटु लागले - 'किती करतेस गं माझ्यासाठी. अर्ध्याहून जास्त आयुष्य माझ्यासोबतच गेलं तुझं. मी आणि मुलं. बास ना आता. हे बघ, आपण आपल्या लग्नाचा अल्बम बघू.' तिला ओढतच खाली बसवलं. तिच्या चेहर्यावर आनंद आणि लाजेची छटा पाहण्यासारखी होती. पुढच्या, मोठ्या मुलाच्या बारश्याच्या वेळच्या फोटोमध्ये होती, अगदी तशीच. प्रत्येक फोटो वेगवेगळ्या आठवणींचा, अन् आनंदाचा. त्यातही तिला आनंद तो मी तिला हे फोटो दाखवतोय त्याचा. खरंच, पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात हे आता, अर्ध - अधिक आयुष्य संपल्यावर कळतंय. पण अजुन आयुष्य उरलंय अन् ते आपण तिच्यासोबत जगणार आहोत याचा आनंद मोठा.