Tuesday 26 September 2017

नदी प्रवाही राहण्यासाठीचा संघर्ष



आशयघन सिनेमा, आशयघन  सिनेमा, अशा बोंबा आजकाल ऐकू येत आहेत. 'अमुक तमुक चित्रपटानंतर मराठी सिनेमाने कात टाकली' असे लेखही प्रसिद्ध होत आहेत. पण खरं तर वर्षाच्या ३६५ दिवसांत दोन-चार सिनेमे लक्षात राहण्यासारखे बनतात, त्यातील किती सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालतात, आणि चालणारे खरंच तेवढ्या लायकीचे असतात का हा प्रश्न वेगळा. पण या गर्दीत पून्हा एकदा संदीप सावंत खऱ्या अर्थाने संजीवनी घेऊन आले आहेत, ते 'नदी वाहते'च्या रूपाने.

'श्वास'नंतर जवळपास दहा वर्षे संदीप सावंत यांनी वाट पाहायला लावली, हि जरी तक्रार असली तरी त्यांचा नवीन सिनेमा 'नदी वाहते' सारखा असेल तर त्यांना तेही माफ. कारण खरंच, या सिनेमाची नितांत गरज आज महाराष्ट्राला आहे. आज कित्येक शेतकरी पाण्याची व्यवस्था नसल्याने शेती करू शकत नाहीयेत, जे करतायत ते सावकाराच्या ओझ्याखाली दाबले गेले आहेत, आणि जे पर्याय शोधू शकत नाहीत, ते शेवटी आत्महत्या करत आहेत. पण आपल्या संकटांवर आपणच मार्ग काढावा लागतो असं म्हणतात. शेतीही अशा मार्गांनीच पुढे जाते. त्यामुळे इथे कोणतंच 'काम थांबवण्याचं' आंदोलन नाही. इथे आहे तो प्रयत्न, नदीला वाचवण्याचा... नदीला वाहतं ठेवण्याचा... या प्रयत्नात मलाही हात द्यावासा वाटतो. मलाही नदीचं पाणी तिच्या आजूबाजूच्या मातीत, झाडांत जिरवावंसं वाटतं. प्रचंड आत्मविश्वास देणारा हा सिनेमा प्रत्येक माणसाने पाहावा असं मला वाटतं.

संदीप सावंत यांनी पुन्हा एकदा वास्तववादी चित्रण केल्याने कुठेच आव आणलेला दिसत नाही. नाहीतर अशा विषयांच्या चित्रपटांत उसन्या अवसनाची प्रचंड भर असते. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी समजून उमजून अभिनय केला आहे.

पण या सगळ्यात लक्षात राहते ती नदी. ती ज्या ज्या सिनमध्ये येते, ती प्रत्येक फ्रेम सुंदर होते. याचं श्रेय नक्कीच cinematographer ला आहे. नदी आणि तिच्या आसपासच्या परिसराचा, कोकणातील त्या गावाचा सुंदर देखावाच कॅमेरातून मांडला आहे. सोबत या नदीला जिवंत केलंय ते तिच्या आवाजाने.. खरं तर खळखळाट दिला म्हणजे नदी ऐकू आली असं आपल्याला वाटतं. पण नदीच्या तवंगांना दिलेल्या आवाजातून काहीतरी वेगळंच मिळून जातं. तो नदीचा आवाज असतो, आतला आवाज. तिच्या वाट्याला किती पूर आले असावे, किती वेळा ती कोरडी पडली असावी, पण तरीही न हरता ती अजूनही वाहते आहे.. या वाहण्याचा खळखळाट काही निराळाच... जमिनीवरची माणसं आपल्यासोबत काय करतायत ते तिला कळत असावं. पण तरीही ती शांतच आहे.. ती वाहतेच आहे.. तिलाही ठाऊक असावं, तिचा कोणीतरी कुठेतरी वापर नक्कीच करत आहे, त्यांच्यासाठी ती वाहते आहे.

नदीच्या पाण्याचा वापर कसा, किती करावा हे सगळं शिकण्याची आता वेळ आली आहे. आणि हे सगळं शिक्षण घेण्याची प्रेरणा आपल्याला 'नदी वाहते' मधून मिळते. म्हणूनच प्रचंड गरज आहे या चित्रपटाची. सिनेमागृहातून बाहेर आले तेव्हा मला गो. नि. दांडेकरांची 'लक्ष्मीसेतू' हि दीर्घकथा आठवली. अगदी असेच, शेतीसाठी, नदीच्या प्रवाहासाठी धडपडणारे लोक डोळ्यांसमोर आले होते. आणि त्यात मीही एक असावी असंही वाटत होतं. कारण हा मानवाच्या जगण्याचा संघर्ष आहे, जो युगानुयुगे चालत आला आहे. बदलत्या परिस्थितीमुळे तो माणसाला कळत नसला तरी निसर्गाला ते कळतं, पण आता निसर्गाच्या हातातही काही उरलं नाहीये असं दिसतंय. त्यामुळे माणसानेच पाऊल उचलायला हवं असा संदेश देणारा 'नदी वाहते' नक्की पहा.