Monday 28 January 2019

सप्तरंगी गोष्ट


काही दिवसांपूर्वी जुनून फाऊंडेशनच्या सप्तरंग या कार्यक्रमासाठी गेले होते. यात कला, विज्ञान, इत्यादी विविध विषयांवरील उपक्रमांचे आयोजन होते. त्यात मी volunteer करण्यासाठी विचारणा केली. स्वागत झालं. वाडामधील गारगावच्या एका आश्रमशाळेत हा उपक्रम होता. यामध्ये आपण काय करावं, हा प्रश्न समोर आला. आपण कधी अशा शाळेत गेलो नाही, लहान मुलांना शिकवायला तर नाहीच नाही. पण मग विचार केला, आपण लहानपणी असं अभ्यासाव्यतिरिक्त फार गोष्टींचा विचार करायचो. पण परीक्षेत फक्त प्रश्नांची उत्तरं तेवढी लिहली. अगदी नववी-दहावीत निबंध लिहायचे, व्यवस्थित, पाठ न करता. पण तेही परीक्षेत. लहानपणी परीक्षेत आपण पाठ केलेलंच लिहितो. आपलं, आपल्याला समजलेलं, आपल्या भाषेतून असं काहीच लिहित नाही. या मुलांसोबत असं व्हायला नको. पण पाचवी-सहावीच्या मुलांना, ज्यांना लिहीण्याची फार सवय नाही, असे मुलं काय लिहितील? उत्तर होतं, गोष्ट. मुलांना गोष्टी आवडतात, कारण त्यांना ती लगेच समजतात. त्यांना जर ते समजत असेल, तर ते लिहायला किंवा निदान सांगायला तरी नक्कीच आवडेल. ठरलं. त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या पात्रांची एकच गोष्ट बनवायची. त्यांना ती मजेशीररित्या सांगायची. ती कशी बनली ते सांगायचं आणि त्यांना स्वतःची गोष्ट तयार करायला सांगायचं. हे असं ढोबळमानाने ठरवून मी निघाले.

प्रचंड लाजरीबुजरी मुलं. पण त्यांना बोलतं करणं भाग होतं. मग त्यांची आवड विचारणं, आपल्या गोष्टीत त्यांच्या आवडीचे पात्र टाकणं, गोष्ट सांगताना मध्येच प्रश्न विचारणं, असं चालू ठेवलं. मग माझी गोष्ट कशी आयत्या वेळी तयार झाली हे पटवून देणं, आणि तुम्हीही कशी ती बनवू शकता हा विश्वास देणं ही कसरतच होती. अधिकाधिक प्रयत्न करून यातसुद्धा निपुण होणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. पण निदान त्यांना त्यांची स्वतःची गोष्ट तयार करायची आहे हे कळणंही पुरे आहे. मग आपण मदत करूच शकतो की.
वर्गात काही गट बनवून त्यांना आपसांत चर्चा करायला सांगितली. ते प्रथम एकमेकांशी बोलणं गरजेचं होतं. आपल्या मित्रांसमोर आपण बाता मारतोच की. तेच करायचं होतं. एकमेकांशी बोलून, सगळ्यांची मिळून एक गोष्ट तयार करायची. काही मुलींनी मिळून तर स्वतःच्या गटाचं नामकरण सुद्धा केलं – सावित्री ग्रुप’! कोणाचीही मदत न घेता त्या मुलींनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अशी स्वतःची ओळख निर्माण करणं सुद्धा महत्त्वाचं असतंच. आत्मविश्वासाचं हे प्रतिक अंधारात येणाऱ्या आशेच्या किरणाहून कमी नव्हतं.
अनेकांनी प्राणी आणि जंगल आपल्या गोष्टीत घेतले, तर काहींनी चक्क भूताची गोष्ट लिहली. मुलांची कल्पनाशक्ती ही अशी मिश्र असते. एकीकडे कुत्रा, कावळा, बैल अशा नेहमी दिसणाऱ्या प्राणी-पक्षांची गोष्ट, आणि दुसरीकडे फक्त एकीव, मजा म्हणून सांगायची गोष्ट. गोष्टींचे वेगवेगळे प्रकार त्यांनीच शोधून दिले.

काहींनी तर बाहुबली नारळाच्या झाडावरून महालात शिरतो, अशा लहानशा बारकाव्यांसह आणि मध्ये येणाऱ्या सगळ्या गाण्यांसह बाहुबली – २ ची गोष्ट अतिशय कौतुकास्पद लिहली. चित्रपटांचा प्रभाव इतका आहे की बाहुबलीच काय, सैराट सुद्धा लिहला एकाने. पण या सैराटमध्ये आर्ची आणि परशा पळून जात नाहीत. ते खूप शिकतात. परशा इंजिनीअर होतो. आर्चीच्या बाबांकडे लग्नाची मागणी घालतो, ते नकार देतात. मग लंगड्या बाबांना समजावतो. पण ते ऐकत नाहीत. एकदा प्रिन्स दादा सल्याच्या बहिणीशी लग्न करून तिला घेऊन येतो. तेव्हा आर्चीच्या बाबांना त्यांची चूक कळते, आणि ते दोघांचे लग्न लावून देतात. बरं हे मी त्यांना विचारून, त्यांच्याकडूनच ऐकलं आहे. पण त्यात त्यांनी आर्ची आणि परशा शेतात फिरायला जातात, सल्या अन् लंगड्या त्यांना मदत करतात, हे काही सोडलं नाही. ते आवर्जून सांगितलं. तरीही प्रचंड आत्मज्ञान देणारी आहे ही त्यांची गोष्ट. योग्य-अयोग्य कळण्याइतपत ही मुलं वास्तवाशी जोडले गेले आहेत का हा प्रश्न पडतो.

सप्तरंगमध्ये story creating चा उपक्रम घेण्याचं सार्थक झालं ते एका वेगळ्या गोष्टीमुळे. गारगावच्या त्या आश्रमशाळेत सगळे विद्यार्थी शाळेच्याच वसतीगृहत राहतात. त्यामुळे अर्थात घरी जाणं फार कमी होतं. पण घरच्यांवरचं प्रेम आणि शिकण्याची जिद्द जबर आहे. पाचवीतल्या शुभांगीने लिहलेली गोष्ट मनाला भिडली आणि आपण हे कार्य असंच नेहमी करण्याची प्रेरणा मिळाली. ती गोष्ट जशीच्या तशी पुढे देत आहे.

शेतकऱ्याची गोष्ट

एक होता शेतकरी. तो शेतकरी शेतात खूप कष्ट करायचा. त्या शेतकरीची बायको होती. त्या शेतकरीला एक मुलगी होती. त्या मुलीला शेतकरी शाळेत पाठवायचा. कष्ट करायचा. कष्ट करून त्या मुलीला शेतकरी घेवून जायचा आणि ती मुलगी खूप शिकली, आणि ती मुलगी खूप खूप शिकली. आणि मोठं शिक्षण केलं. आणि ती इंजीनियर झाली. ती घरी कधी कधी यायची. तिच्या गावातल्यांना सांभाळायची आणि आई बाबांना पण सांभाळायची. त्या मुलीचे आई बाबा खूप खूश झाले.


माणसाच्या पोटाची भूक शमत नसली तरी पोटातलं ओठावर आणायची भूक प्रचंड असते. माणसाच्या मनातलं ऐकावं वाटतं खूप. ही न शमणारी भूक निदान समाधान देते, बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोघांनाही.