Friday 28 July 2017

चेहरा

तुझ्या शहरात येते,
खूप खूप नट्टापट्टा करून
लिपस्टिक, काजळ, झुमके...
रिक्षात बसले की स्कार्फ गुंडाळते तोंडाला
गॉगल लावते डोळ्यांना
इमारतीखाली रिटायर्ड म्हातारे बसलेले असतात
गॉगलमधूनच पाहते त्यांना,
मला वरून खालून ताडताना
एखादी बाई येते समोरून बघत बघतच
स्कार्फच्या आतला चेहरा पाहायचा असतो तिला
मी मात्र रोजचीच वाट असल्यागत चालते नाकासमोर
उगाच मोबाइल कानाला लावते
आवाज तेवढा काढत नाही
प्रत्येक मजल्यावर
दरवाजे बंद असल्याचं बघून घेते पटकन
तू दरवाजा उघडाच ठेवलेला असतोस
माझी वाट बघत
काही बोलण्याआधी येऊन दरवाजा लावून घेतोस
मीही शांत बसते मोठमोठे श्वास घेत
पाणी आणतोस काही न विचारता
मी स्कार्फ, गॉगल काढून
तुझ्या मिठीत पुन्हा चेहरा लपवते
जणू दाखवायचाच नसतोे आता तो कोणाला...

Thursday 27 July 2017

बुरख्यातील लिपस्टिक वाली स्वप्नं

     काल Lipstick Under My Burkha पाहिला. अजुनही डोळ्यासमोर आहे तोच सिनेमा. काही केल्या जात नाहिये. म्हणून सांगावंसं वाटतंय काहीतरी.

     कसं होतं ना, गरजा अगदी थोड्या थोडक्या असतात. एक गरज पूर्ण झाली की दुसरी डोकावते खरी. पण एखादी गरज पूर्ण होतच नसेल, तर त्या गरजेचं रुपांतर स्वप्नात होतं. प्रेम, सहवास ही गरज आहे, हे न कळलेल्या किंवा ते विसरलेल्या आपल्या समाजाला आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. प्रेम जशी भावनिक गरज आहे, तसा सहवासही गरजेचा आहेच. तो पुरुषाला हवासा वाटो वा स्त्रीला, तो विदुरांना वाटो वा विधवेला. तो कपडे न काढता नुसतं intercourse पुरता मर्यादित नसून एकमेकांविषयी आदराचा, प्रेमाचा विषय आहे. तो फक्त समवयीन नव्हे, तर पौगंडावस्थेपासून वृद्धापकालापर्यंत हवाहवासा वाटणारा विषय आहे. सहवास हवासा वाटणं नैसर्गिक आहे. या अगदी साध्या विषयावर बोलणं सुद्धा आजकाल sensitive वगैरे झालंय, हीच खरी खंत आहे. आणि ही खंत दिग्दर्शिका अलंक्रीता श्रीवास्तवने अगदी योग्यरित्या मांडली आहे. चित्रपटाचा बोलपट होऊ न देता, बाळबोध होऊ न देता कथा सांगितली आहे. त्यामुळे ती Convincing the convinced वाटत नाही. उलट आपल्यात असलेला राक्षसी समाजच आपल्याला जाणवतो, आणि आपण त्यावर विचार करतो.

     सगळ्या पुरुषांनी पाहावा असा सिनेमा आहे वगैरे समीक्षक म्हणतायंत खरं. पण मी theater मध्ये पाहिलेलं दृश्य फार वेगळं होतं. सगळ्या couplesनी रिकामा theater पाहून कोपरे गाठले होते. काय बोलणार आता. असो. या सिनेमाची गरज होती खरी. पण कोण पाहिल, कोणाला कळेल आणि मुळात कोणाला पचनी पडेल कुणास ठाऊक. पण माझ्या मैत्रिणींनी नक्की पाहा हा सिनेमा.. आपल्या बुरख्यातील लिपस्टिक वाली स्वप्नं घेऊन.

Sunday 23 July 2017

नशा

     'दिग्या दारू पितो, दिग्या सिगरेट ओढतो, दिग्या मारामारी करतो, पण दिग्या नीच नाहीये रे' या डायलॉगला साजेसा मी. प्रचंड दुष्कर्मी, पण तुम्हाला आवडतोच. कारण तुमची शासकीय, राजकीय कामं करून देणारा, तुम्हाला भाव देणारा एकमेव माणूस मी. मागून कितीही व्यसनी, आईचे पैसे खाणारा वगैरे म्हणाल, पण मागूनच. अन् तेवढंच. हो मी प्रचंड व्यसनी आहे. दारू, सिगारेट, चरस, गांजा, नाव घ्याल ती नशा केलीय, करतोय. नुसती नशा नाही. मुंबईत जेवढे ड्रग्सचे अड्डे आहेत, सगळे माहितेयत मला. त्यांचे भाव, त्यांच्याशी कसा भाव करायचा, सगळं असं सहज येतं मला. या नशेसाठी नोकरीवर जगलो नाही. आईचा एकुलता मुलगा मी. परिस्थिती सुद्धा तशी चांगलीच. माझ्यासाठीच राखून ठेवलेलं सगळं. वापरले ते पैसे. त्यात काय. लोकांच्या घरात जाऊन चोरी तर करत नाही. स्वतःच्या पैशाने नशा करतो. जुगार खेळतो. जगण्याला डावात लावतो. नशा हवीच जगायला. लोकांना पैशाची, स्टेटसची असते, मला जगण्याची नशा आहे. नाही हे सगळं नैराश्यातून किंवा प्रेमभंगातून वगैरे आलं नाहीये. मी असाच आहे. खुप मुली फिरवल्या. मुंबईतून आणि अंगावरून सुद्धा. पण कधी प्रेम ओवाळून टाकणारीला हात सुद्धा लावला नाही. का लावायचा? इथे जगणं committed नाही. मुलींना कुठून commitment द्यायची? अंग चोळून घेण्यासाठी ज्या आल्या त्यांना तेवढं अंगावर घेतलं. इतकं माहित असूनही माझ्या बहिणींनी कधी बाईलवेडा म्हणून दूर नाही केलं. परपुरुषासारखी वागणूक नाही दिली. त्याही सख्ख्या नव्हे, इतर नात्यातल्याच. त्यांनाही माझी मुलींची कन्सेप्ट कळली असावी. आईला तेवढी ती समजली नाही. तिने 'लफडं' असणाऱ्या सगळ्या पोरींना लग्नासाठी विचारलं. सगळ्या 'तसं काही नाही' म्हणून अपेक्षेप्रमाणे मोकळ्या झाल्या. मोकळ्याच व्हायला यायच्या त्या माझ्याकडे. असो.  शेवटी एक गावची मुलगी बांधलीच गळ्यात. पण एका शरीराशिवाय काहीच मिळालं नाही. ना मला, ना तिला. काही दिवसांपूर्वी ती काही महिन्यांची प्रेग्नंन्ट असताना त्रास झाला. रक्ताळलेल्या मांसाचा गोळा हातात घेतला डॉक्टरने. घाण. घाण नुसती. रक्त. ती कशीबशी वाचली. ते माझं दुर्दैव पाहिल्यानंतर एक घोट जात नव्हता घशात. आजही वचार करतो या नशेचा. आपलाही असा चेंदामेंदा तर होणार नाही ना? श्या. हवेशिवाय काही जात नाही नाकात.

     सगळे म्हणतात, 'बापावर गेलायंस'. मला आता आठवतही नाहीये तो. पण वाटतं, मी जन्मलो ते बरंच झालं. सुखासुखी गेला तो त्याच्या नशेत. हा जीवनाचा चेंदामेंदा घेऊन कुठे जाणार होता तो तरी?

Friday 21 July 2017

कोथळीगड (Kothaligad)

     कोथळीगड हा शिवकालीन किल्ला कर्जतपासून साधारण २१ किलोमीटरवर, पेठ या गावात आहे. पेठ गावामुळे त्याला 'पेठचा किल्ला' असेही म्हटले जाते. गावापाशी गेल्यावर खरं तर तो दिसतही नाही. त्यासाठी सुमारे १५०० फूट डोंगर चढावा लागतो. पण एकदा का त्याचं दर्शन झालं, की त्याचा सुळका सतत खुणावत राहतो.

     कोथळीगडाच्या  पायथ्यापासून ते अगदी शिखरापर्यंत माणसाच्या बुद्धीची, कल्पकतेची आणि कलेची आपण साक्ष घेतो. पायथ्याच्या गावातल्या घरांपासूनच याची सुरुवात होते. पायथ्याच्या गावात लाल विटांची, मातीने चोपून तयार केलेली घरे, त्याच्या आडोशाला ठेवलेली मोठाली चाकं, अंगणात खेळणारी मुलं आणि दारातून आपल्याला पाहून 'लिंबूपाणी, पोहे, काही घेणार का ताई?' म्हणून विचारणाऱ्या मावशी. हे असं दृश्य डोळ्यांत तरळत राहतं नुसतं. इथल्या एका तरी मावशीच्या घरी लिंबूपाणी, चहा, पोहे, अशी न्याहारी नक्की करावी. पुढे गड चढायला घ्यावा. एकावर एक आलेले दगड पायऱ्याच बनवून देतात. एका ठिकाणी तर मोठ्या, तिरप्या दगडावर लहानशा पायऱ्या कोरलेल्या दिसतात. सुळक्यावरच्या पायऱ्यांचा हा नमुनाच जणु!


     यामुळे सुळक्याकडे जाण्याचं आकर्षण तीव्र होतं आणि त्या पाषाणयुगातून जायची मजा वाढते. शेवटी एकदाचा सुळका येतो आणि गुहेच्या पोटातल्या भल्यामोठ्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांवाटे शिखरावर जाण्याआधी सुळक्याचा भोवतालचा परिसरही पाहून घ्यावा. सुळक्याच्या खाली डावीकडे दोन मोठमोठी कोठारे आहेत. या दगडात कोरलेली ही धान्य कोठारे किंवा त्यातलं एखादं दारू कोठार असावं. सुळक्याच्या उजवीकडेही असेच, पण बंदिस्त अशी कोठारे आहेत. यातील पहिलं पाण्याचं टाकं असावं. पुढच्या दोन कोठारांत बंदुखा, बाण, होक ठेवत असावेत. शेवटची कोठारे सर्वांत मोठी आणि इतरांपासून दूर आहेत. त्यात दारूगोळा ठेवत असावेत. या कोठारांतील भिंतींना आणि तळालाही चुना थोपलेला आहे. तो आजही सक्षम आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित 'आज्ञापत्रात' असल्याप्रमाणे तळघरात, म्हणजे जास्तीत जास्त खोल खणलेल्या आणि किल्ल्याच्या इतर इमारतींपासून दूरच्या कोठारात दारूगोळा ठेवणे योग्य आहे. तसेच, बाण, होक अशी हत्यारे मध्यघरात ठेवावी. या शास्त्राप्रमाणेच बनवलेली ही शस्त्रकोठारे आहेत. बरं ह्यातलं एखादं कोठार वगळता सगळी कोठारे सुरक्षित आहेत. यावरून कोथळीगडाच्या सुरक्षिततेचा अंदाज येतो.


     पण उजवीकडच्या कोठारांकडे जाणारी वाट फार चिंचोळी असल्याने तिथून हत्यारे कसे नेत असावेत हा प्रश्न पडतो. कारण त्या चिंचोळ्या वाटेने दोन्ही किंवा एका हातातही अवजड सामान नेणं जिकीरीचं आहे. कदाचित तिथली जमीन, कडा खचून कोसळला असावा. जाणकारांनी पाहून याचा निष्कर्ष काढावा.

     गुहेच्या डावीकडे एक लेणी आहे. ही नक्कीच शिवपूर्वकालीन असावी. लेणीत मुख्य अशा चार खोल्या आहेत. पण शेवटच्या दोन खोल्यांत वटवाघुळांनी आपले घर केल्याने तेथे जाता येत नाही. बाहेरच्या मुख्य खोलीत आधारासाठी चार खांब आहेत. यांवर कलात्मक अशी चित्रे कोरली आहेत. पण बाजुच्या खिडक्यांतून येणारा पाऊसवारा सहन करून ती भग्न झाली आहेत. खांबाच्या सर्वांत वर दक्षिण भारतातील राक्षसाच्या मुखवट्यासारखा चेहरा चितारला आहे. याचा हेतू नक्कीच वाईट नजरेपासून सुरक्षा मिळावी हा आहे. त्याखालील सुंदर रेखीव नक्षी आगीच्या ज्वालांसारखी वाटते मला. त्याखाली भग्नावस्थेतील एक चित्र आहे. त्यात दोन नर्तकी आणि दोन वादक असावेत असं वाटतं. त्यातल्या एका वादकाच्या हातात ढोलकी तर एकाच्या हातात डफली असावी. या चित्राला लागूनच खांबाच्या कोपऱ्यातील रचनेत दोन्हीकडे एक-एक नर्तिका आहेत. त्याखाली मोरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याची लहानशी नक्षी आहे. त्याखाली एक नर्तिका असावी अशा महिलेची भग्न झालेली, पण आकाराने मोठी कलाकृती आहे. प्रत्येक खांबावर अशी सारखीच चित्रे व नक्षी आहे. आणि यावरून इथे राहणाऱ्या लोकांत संगीत व नृत्यास महत्वाचं स्थान असावं असं वाटतं. हा त्यांचा व्यवसायही असू शकेल. प्रवेशद्वरावर मध्यभागी एक चित्र आहे, पण ते इतकं भग्न झालंय, की ते चित्र नक्की कोणाचं, कसलं आहे याचा अंदाजही येत नाही. उजवीकडे मोठा कठडा असून त्याच्या भिंतीवर काही चौकोनी खिडक्या दिसतात. ती माळ्यासारखी सामान ठेवण्यापुरती जागा असावी असं वाटतं. पण त्यातही वटवाघुळ असल्याने, ऑक्सिजन कमी असल्याने आत जाणं टाळलंच जातं. खांबांकडची, बाहेरची भिंत ही विटांची आहे. ती कदाचित लेणी बांधल्या नंतर, किंवा शिवकाळात बांधली असावी. पाऊसवारा आत येऊ नये व खांबांतील चित्रांच्या सुरक्षेसाठी ती बांधली गेली असावी. पण तीही आता काहीशी ढासळली आहे.


     लेण्याच्या आत जाण्याआधी  एक ग्रामदेवतेचं किंवा कदाचित विठ्ठल रखुमाईचं लहानसं मंदिर आहे. मुर्ती पाहून वाटते, की त्या काळात कादाचित देवांची संकल्पना फार खोलवर रुजली नसावी. पण एकविसाव्या शतकातल्या माणसाने मंदिराबाहेर 'महिलांनी आत प्रवेश करू नये' असं का लिहलं असावं, याचं उत्तर काही मिळत नाही.

     लेणी पाहून मग पायऱ्या चढायला घ्याव्या. मोठमोठ्या पायऱ्या प्रचंड थकवतात. एक पायरी दिड फूट तरी असावी. गुहेत उजवीकडेही लहान पायऱ्या आहेत. पण त्या सरळ कड्यावर आणून सोडतात. त्यामुळे तिथल्या तुटलेल्या दगडांना पाहून तिथे काहीतरी असावं असं राहून राहून वाटतं. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलं की उसंत मिळते. या प्रवेशद्वाराबाहेर शरभ या प्राण्याचं चित्रं दगडात कोरलं आहे. बाजुलाच गजमुखही आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजुला एक-एक आडव्या, मोठ्या खोबणी आहेत. त्यांचा रक्षकांना तलवारी, बाण ठेवायला वापर होत असावा. 

     पुढच्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण शिखरावर पोहोचतो. समोरच लहान झाडाझुडपांच्या सावलीत असलेलं पाण्याचं टाकं दिसतं. पाणी आजही पिण्यायोग्य आहे हे महत्वाचं. पुढे कडेला गेल्यावर डावीकडे एक दगड ठेवला आहे. कदाचित तटबंदीचा किंवा इतर बांधकामातला हा उरलेला एकमेव दगड असावा. तिथून खाली पाहिलं तर एक वाट समोरच्या डोंगराला, किंबहूना डोंगररांगेला जाऊन मिळते. या डोंगररांगेच्या डावीकडे गेल्यास वाजंत्री घाट आणि  पुढे भीमाशंकर डोंगररांग मिळते. बरं त्याच रांगेत पुढे गेल्यास पदरगड दिसतो आणि पलीकडे भीमाशंकरचा डोंगर. याच वाटेने कोथळीगड या समृद्ध शस्त्रागावरून शस्त्रसाठ्याची ने-आण कशी होत असावी, हे प्रत्यक्ष अनुभवण्यास ही भटकंती खरंच रोमांचकारी असेल. हा साराच रोमांच मनात साठवून, इथे निवांत बसल्यावर गवताच्या पात्यांवरून भिरभिरणारे बहुरंगी, बहुप्रकारचे फुलपाखरू पाहिले ना, की या जागेची, इथल्या पराक्रमाची साक्ष मिळते. तुफानी वाऱ्यातही जगणारे हे फुलपाखरू आपल्यालाही तुफानात जगायला शिकवतात.

Thursday 20 July 2017

रायगडावरील स्तंभ

रायगडावर राजवाड्याच्या बाजूला अंगणाएवढी जागा सोडून तीन मजली निमुळत्या खिडक्यांचा एक स्तंभ आहे. पुढे बालेकिल्ल्याच्या भिंतीला टेकून अजून दोन स्तंभ आहेत. त्यांच्या दगड आणि नक्षीकामावरून ते शिवपूर्वकलीन असल्याचं दर्शवतात. स्तंभाच्या मधोमध कारंजे असण्याचीही खूण मिळते.

संध्याकाळी गडाचा लवाजमा आटोपून वृंदावनजवळ दिवा ठेवून महाराणीसाहेब याच प्रांगणात आपल्या सहचारिणींसमवेत शतपावली करत असाव्यात. मग केव्हातरी या अष्टकोनी स्तंभावर जात असाव्यात. तिथली कारंजं खोबणीतल्या दिव्यांच्या प्रकाशात मिणमिणत असावीत. एका खिडकीचा पडदा सारून त्या निवांत बसून मनाचे पडदे उघडत असाव्यात.

संध्याकाळच्या सूर्यकिरण आणि मेघांच्या खेळात त्यांना आपलं खेळकर बालपण आठवत असावं. कधी आई आठवत असावी, वडील आठवत असावे, तर कधी लग्नानंतरची माँसाहेबांची प्रेमळ माया आठवत असावी. लग्न झाल्यावर आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेसारखीच ढगांनी भरलेल्या आभाळाची जाणीव होत असावी. कधी मोहिमेवर गेलेल्या स्वारींची वाट पाहणारी सांज कोरडी होत असावी. कधी या रायगडासारख्या अभेद्य सम्राज्यावर सावटाचं आभाळ असावं, तर कधी लढाई जिंकून आलेल्या राजांचं स्वागतोत्सुक आभाळ असावं. बाळराजेंना खेळवणारं, खळाळणारं आभाळ असावं, तर कधी मुलांना लढाईचे धडे घेताना पाहणारं लढाऊ आभाळ असावं. राज्याभिषेकाला वैभवाचं, स्वातंत्र्याचं, मोकळं आभाळ असावं, तर नजरकैदेत असताना आभाळालाच कैद करावंसं वाटलं असावं. असे एक ना अनेक आभाळ नजरेवरून फिरवून, गंगासागर तलावातील सौम्य तवंगांना पाहत मनातील तवंग रिझवून त्या राजवाड्यात जात असाव्यात,
उद्याच्या आभाळात लढण्यासाठी...

फोटो - सौमित्र सुनिल देसाई

आभाळ

मातीच्या गल्ल्यात साठवलेल्या
हजारोच्या नोटा,
भरपूर वाटणारी चिल्लर,
दोन-तीन विद्रोही वगैरे कवितांची पुस्तकं,
एक पाण्याची बाटली, चप्पल, ब्रश
एका बॅगेत.

दहा वर्ष,
दहा महिने,
दहा दिवस,
किंवा
दहा तासच पुरेल इतका राग,
अपमान, चेष्टा
आणि
आयुष्यभर पुरतील इतके विचार, घुसमट.

हवी नको ती नाती,
त्यांच्यातलं राजकारण
त्यांच्यातला समाज
समाजाचं सुख
समाजाचं दुःख
समाजाचा मान
समाजाचा राग
समाजाची कीव
समाजाची येडझवी रीत
सगळं घेऊनही हिशोब लागत नाहीये,
काहीतरी राहतंय.

घर वाटणाऱ्या त्या भिंती,
त्या भिंतींमधून दिसणारं,
खेचणारं ते आभाळ...

ना वाट दिसतेय ना शेवटचं शिखर..
पुनवेच्या रात्रीही किर्र अंधार येतो समोर..
आभाळात शिरायचंय तर
आभाळही दिसत नाहीये आता...