Thursday 11 May 2017

गॉडफादर

     मारियो पुझो यांची रवींद्र गुर्जर अनुवादित 'गॉडफादर' ही कादंबरी न्यूयॉर्कमधील माफिया गँगच्या एका नेत्यावर आधारित आहे. त्या नेत्याचं नाव आहे, 'व्हिटो कॉर्लिऑन', ज्याला 'डॉन कॉर्लिऑन' म्हणूनही ओळखलं जातं. या कादंबरीची सुरुवात डॉनच्या मुलीच्या लग्नसोहळ्यापासून होते. त्यात म्हातारा होत चाललेला डॉन काहीसा हतबल दिसतो. कारण, त्याला त्याच्या फॅमिलीचा, उद्योगाचा उत्तराधिकारी अजुन आपल्या तीनही मुलांत सापडला नाहीये. अशा थकलेल्या, पण अनुभवी व्यक्तीच्या हालचाली अचूक टिपून लेखकाने सुरुवातीला निराश न करता गॉडफादर समोर आणला आहे. त्यामुळे कोणत्याही कामगिरीशिवायही हा डॉन ताकदवान वाटतो. हळूहळू त्याचे अनुभव लेखक सांगत जातो, तसतसा डॉन अजुन आकर्षक वाटतो.
     बरं आता तुम्ही म्हणाल की माफिया गँगच्या नेत्याला 'गॉडफादर'सारखी पदवी का? तर ते लेखक सुरुवातीला सुचवतोच. अनेक दुर्बल, दुर्लभ लोकांना मदत आणि मैत्रीचं आश्वासन दिल्याने त्याला लोक 'गॉडफादर' म्हणवू लागले होते. पण सोबतच, लेखक असंही सांगतो, की 'माफिया' या शब्दाचा मूळ अर्थ 'आश्रयस्थान' असा आहे. शेकडो वर्षे इटली देशातील जनतेला भरडणाऱ्या जुलमी राज्यकर्त्यांविरुद्ध लढा देण्यासाठी निर्माण झालेल्या गुप्त संघटनेला ते नाव पडलं. आणि गंमत म्हणजे इथे डॉन कॉर्लिऑन हा इटालियन आहे.
 न्यूयॉर्कमधील पाचही माफिया फॅमिलीज् या इटालियन आहेत हे विशेष. पण गॉडफादर नेहमीच 'माफिया' या नावाला जागतो. इटलीत या माफियांनाच त्या वेळी गॉडफादर म्हटलं गेलं होतं. राज्यकर्त्यांचे सगळेच शासन या गॉडफादरला मान्य नाहीत. कोणाला गरज पडल्यास तो शासनातही हस्तक्षेप करतो. या मदतीच्या मोबदल्यात त्याला फक्त मैत्रीची अपेक्षा असते. त्याच्या मते, माणसाने नेहमीच एकमेकांच्या मदतीत, मैत्रीत राहायला हवे. उद्योग वाढवल्याने वेळोवेळी या मैत्रीचा फायदाही तो करून घेत होता. स्वार्थ असणं तेवढं वाईट नव्हतं.
     शांत, समर्पक असं हे व्यक्तीमत्व जेव्हा अडचणीत येतं, तेव्हा त्याच्या क्लृप्त्या, युक्तीवाद आणि शांत वाटाघाटीतलं त्याचं संभाषण कौशल्य अप्रतिम आहे. मोजकंच, मुद्द्याचं पण समोरच्याला प्रभावित करूनच सोडेल असं त्याचं बोलणं आहे. ते वाचतानाही मनात गुंजतं. सोबतच, त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या मुलाकडे सत्ता आल्यावर संतापाच्या भरात सुरु झालेलं युद्ध चित्तवेधक आहे. कारण आपण हत्ती, घोडे, तोफा आणि तलवारींचं युद्ध नेहमीच वाचतो. पण माफियांच्या उद्योगधंद्यांतील युक्तीने आणि लहान पिस्तुलांनी झालेलं युद्ध फारच कमी वाचायला मिळतात. त्या उद्योगांत जुगार आणि तेल उद्योग महत्त्वाचे. ते दोन्ही बंद पाडायला किंवा आक्रमण करायला युक्तीचीच जास्त गरज भासते. ते वीसाव्या शतकातील युद्ध असल्याने दोन्ही महायुद्धांचा यावर परिणाम आहे. पोलिसांची भीती आहे. कायद्याचा कचाटा आहे. या सगळ्यातून मार्ग काढून आणि कधी कधी मार्ग तुडवून युद्धात लढलं जातं, समोरच्याला खेळवलं जातं. पैसे किंवा उद्योगांसाठी नव्हे, तर सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी हे युद्ध. मायकेल कॉर्लिऑनच्या मते, बिझनेस हेच एक कारण नसतं युद्धाचं. युद्ध ही नेहमीच व्यक्तीगत असतात. हे वेळोवेळी कळतंच.
     काम कोणतंही असो, माणूस जपणं ही परंपरा सगळ्याच क्षेत्रात उपयोगी ठरते. म्हणूनच कादंबरीत गॉडफादरच्या सामर्थ्याचं जेवढं कौतुक केलंय, तेवढीच त्याच्या अवतीभवतीच्या माणसांची काळजी घेतली गेलीय. त्या माणसाने गॉडफादरच्या आयुष्यात येण्याआधीचा आणि नंतरचा काळ, स्वभाव लेखकाने योग्य वेळी सांगितला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आणि त्या परिस्थितीलाही योग्य न्याय मिळाला आहे. तसेच, एक सामान्य, शांत व्यक्ती व्हिटो कॉर्लिऑन हा डॉन कॉर्लिऑन कसा झाला, हा त्याचा प्रवासही इटलीच्या माफियांना शोभेल असाच झाला आहे. पण त्या प्रवासाचं आश्चर्य न मानता तो निर्वकारपणे पुढे जात राहिला आहे.
     कालांतराने अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीत माफियांचा झालेला हस्तक्षेपही दिसतो. त्यात गॉडफादर निश्चित कारणास्तव डोकं खुपसतो इतकंच. बरं चित्रपट क्षेत्राची पार्श्वभूमी दाखवताना त्यातील अंतर्गत राजकारण आणि ग्लॅमरला भूललेले लोक, हे सारं आलंच. पण यात कथेची चित्रपटासारखी मांडणी इकडे तिकडे केल्याने जरा भटकायला होतं. मागचं आठवणीत असेल तर पुढची कथा कळते.
     पण खंत एकाच गोष्टीची वाटते, तिथल्या परंपरेनुसार सगळ्याच क्षेत्रात वासनेला दिलेलं एवढं महत्व आणि तेवढ्यापुरताच महिलांचा केलेला वापर! अर्थात वीसाव्या शतकात अमेरिकेतही पुरुषप्रधान संस्कृती होती. तीही इतकी बळकट की लेखकही त्यातून सुटू शकले नाही.
     एकंदरीत, अमेरिकेमधील एकोणीस आणि वीसाव्या शतकातील माफिया आणि उद्योगधंद्यांच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच उपयोगी ठरते. प्रत्येक पुस्तक जसं काही ना काही देत असतं, तसंच गॉडफादरचं संभाषण कौशल्य, नीतीमत्ता आणि युक्तीवाद नक्कीच शिकण्यासारखा आहे.