Friday 3 June 2016

प्रवास

    रात्रीचे बारा वाजले होते. तो अजुनही गाडी चालवत होता. तो म्हणजे असेल 40-42 वर्षांचा. पण त्या सरलेल्या वर्षांचा फरकच काय पडतोय. वर्ष सरण्यासाठीच असतात, आपण फक्त काम करत राहायचं, गाडी चालवत राहायचं. जीवनाची गाडी शेवटी स्मशानाजवळच थांबते. ना त्या गाडीचा नंबर कोणला सापडतो, ना त्यातला माणूस. असेच काहीसे विचार करत तो नेहमी गाडी चालवत असावा. 15-16 वर्ष झाली असावीत. आवडती गाणी ऐकत.. आपल्याच प्रवाहात... आताही गाणीच चालू होती. आणि त्याची झोपसुद्धा ती गाणीच आवरत होती. प्रवासी तर केव्हाच झोपले होते. गाडी गच्च भरली होती. तवेरा होती ती. त्यात 5-6 बायका, त्यांची 5-6 मुलं आणि बाजुला एक कर्ता पुरुष आणि त्याचा 10-12 वर्षांचा मुलगा. जेजुरीहून नाशिकला परतत होते ते सगळे. तोही नाशकातल्या कोणत्यातरी उपनगरातला... गावातलाच म्हणा. कसाबसा आपली झोप आवरत होता. शक्य होईल तितक्या वेगात पण सावधपणे तो पुढे जातच होता. कधी एकदा डोळे बंद करून शांतपणे झोपतोय असं झालं होतं त्यालाही.
     शेवटी एकदाचं गाव आलंच आणि एवढ्या मरगळलेल्या प्रवासातून सुटका झाली होती एकदाची. दाराजवळ गाडी लावली आणि दार ठोकलं. बायकोने झोपेतच ते उघडलं आणि पुन्हा अंथरूणावर पडलीही. ती आणि मुलं उठतील म्हणून लाईट नाही लावली त्याने. त्या दोन खोल्यांच्या घरात सगळ्या सुविधा केल्या होत्या त्याने. बेड, टीव्ही, होम थेटर आणि मुलं आजारी पडू नयेत म्हणून वॉटर प्युरीफायरसुद्धा होतं. तरी त्या अंधारात रंग निघालेल्या त्या भिंती भूक आणि झोपेमुळे भकासच वाटत होत्या त्याला. तो स्वयंपाकघरात गेला, जेवायला खिचडी भातच होता. त्या गावात खिचडी भातच सगळ्यांचा आवडीचा असला तरी आता त्यालाही कंटाळा आला होता त्याचा. हंड्यातून पाणी घेतलं आणि तेच चांगले 3 ग्लास प्यायला. अंथरूणात जाऊन झोपण्याआधी घड्याळात पाहायला विसरला नाही तो. दिड वाजला होता तेव्हा. पडल्या पडल्याच झोप लागली.
पण घड्याळाचे काटे असे फिरले, जसं त्याचं संपूर्ण आयुष्यही फिरलं नसावं. दारावर जोरजोरात ठोके द्यायचे आवाज येऊ लागले अन् त्याला जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं, साडे चार वाजले होते. उठून दार उघडलं. झोपेतच... दारावरचा माणूस बोलू लागला, "आरे काय लेका.. अजून झोपलायस. फोन करून थकून गेलो ना मी. चल, कसार्याला जायचंय."
"नाय पण ते शाळेवर पण जायचंय ना..."
"बारा वाजताय ना शाळा.. चल सोडून लगेच यायचंय. दहा वाजतायत यायला चल.. चल सगळे पैसे आताच देतोय.."
     तो वैतागतच आत गेला आणि पाण्याच्या ओंजळा जोरजोरात तोंडावर मारू लागला. वैतागतच गाडी काढली आणि पुन्हा त्याच प्रवासाला सुरवात केली. तोच प्रवास ज्यात पुन्हा बायका-मुलांची कटकट, सततची कुजबूज, नको तेवढा लोकांचा उत्साह, कर्त्याचा धाक, आणि सोबत प्रवाशांना आवडणारी धांगडधिंग्यातली गाणी. हा सगळा वैतागवाणा प्रवास करून एकदाचं त्याने प्रवाशांना सोडलं आणि एका टपरीवर शांतपणे चहा पिऊन, एकटाच, त्याच्याच सुखात, त्याच्याच रंगात, पण बाराच्या आधी पोहोचण्याच्या घाईत घरी आला.
     घराच्या अंगणातच बायकोने टपरीवजा दुकान बांधलं होतं. शिलाईचं. तो गेला तेव्हा ती शिलाईच करत बसली होती. ब्लाऊज कापत होती बहुतेक. तिच्याकडे एक नजर टाकून तो घरात गेला. मुलं मस्ती करत होती बेडवर. WWF चालु होतं. एकाला जरी लागलं तरी गोंगाट पसरत होता. ते सारं बघून त्याने दोघांनाही बाहेर खेळायला हाकललं. आणि बेडवर झोपून घेतलं.
     तो गाढ झोपेत जातो न जातो, इतक्यात दोन मुलं घरात आली, आणि दोन जण दारातूनच लपून बघत होती. शाळेचा युनिफॉर्म घातलेली ती मुलं 'काका काका' म्हणत त्याला उठवत होती. तो पुन्हा तोंड धुवून बाहेर निघाला. सोबत त्याची मुलंही निघाली. पावणे बारा वाजले होते. शाळेची वेळ होती ती.
     आता पुन्हा गाडी गच्च भरली होती. लहान-लहान मुलांनी. छोट्यांची खूप सारी किलबिल आणि त्याची जुनी गाणी. कदाचित हीच काही मिनिटं सुखद असावीत त्याच्यासाठी. म्हणून तर ह्या प्रवासाला तो वैतागत नव्हता कधीच. पण रस्ता फार मोठा नव्हता. तो लगेच पोहोचला आणि सगळ्यांना उतरवलं.
     शाळेवरूनच तो न्हाव्याकडे गेला. दाढी केली आणि जरा डोक्याची मालिशही करून घेतली. मग घरी येऊन जेवून पुन्हा बेडवर लवंडला. बायको अजुनही शिलाईचं कामच करत होती. तिच्या मशिनचा आवाज सतत त्रास देत होता. एवढ्या आवाजाने तो कूसच बदलू शकत होता, झोप काही येणार नव्हती.
     झोपूनच तो ओरडला, "ए... बंद कर त्ये."
आवाज दोन क्षण बंद झाला आणि पुन्हा चालु झाला. पुन्हा कूस बदलू लागला तो. शेवटी वैतागून दारावर गेला आणि पून्हा बोलू लागला, "अय... डोक्यात फरक पडून राहलाय का गं तुझ्या... एकदा सांगून कळत नाय काय... हे बंद कर अन् डोकं दाबायला ये माझं. ठनकतंय कालपास्नं."
     "हो, तुम्ही दूनिया फिरा अन् डोकं दाबून देतेय मी. अन् इथं ह्ये ब्लाऊजं माझा बाप शिवनारे."
     "ए जास्ती तोंड चालवू नकोस.."
     "आधी घर चालवा नीट. मग बसतेय मी गप्प."
     तो रागातच पून्हा झोपायला गेला. कशीबशी झोप लागली, पण नशीब काही आज त्याला झोपू देणार नव्हतं. काही वेळाने बायकोने उठवलंच. कोणीतरी गाडीभाड्यासाठी आलं होतं. दूर नागपूरला जायचं होतं. दोघं जण होते. पून्हा गाडीभाडं, पून्हा गाडी प्रवास...
     "आताच निघायचंय?", त्याने विचारलं.
     "हा अंघोळ बिंघोळ करून ये. तोवर आम्ही पण आवरतो."
     "नाय ते शाळेवर पण जायचंय ना. पोरांना आणायचंय."
     "शाळेवर.... मंग्या जाईल की. (मंग्याकडे बघून) सुमो जा घेऊन तुझी."
     "जाईन की", मंग्याने होकार दिला.
     अंघोळ वेगैरे करून, चहा पिऊन त्याने गाडी काढली, तेव्हा 2 वाजले असावेत. पुन्हा तोच प्रवास. गच्च भरलाली गाडी. त्रासदायक कुजबूज, कटकट, भांडण. या सगळ्यातच रात्र झाली. थोडंसं चहापाणी आणि जेवणही झालं होतं. गाडीतले सगळेच झोपले होते. नागपूर काही अजून गाठता आलं नव्हतं. पण जेवणामुळे झोपही आवरत नव्हती. पण झोपू शकत नव्हता. डोळे सताड उघडे ठेवायचेच होते. म्हणून नुसती गाणी ऐकत कशीबशी झोप आवरली होती त्याने. आला रस्ता मागे टाकत होता. सतत थंड पाणी पित होता. वार्यामुळे झोप लागते म्हणून काचही अर्धी बंद केली होती. पण कोणताच उपाय मार्गी लागेना. झोप महत्वाची होतीच, पण भाडं सुद्धा पोहोचवायचं होतं. आता चहा शोधू लागला तो. तशी मागे बरीच दुकानं लागून गेली, पण तेव्हा हे लक्षात आलं नाही त्याच्या. आणि रात्रीच्या 2-3 वाजता टपरी मिळणं शक्यही नव्हतं फार. आता रस्त्याच्या कडेला नुसतीच झाडं झुडपं लागत होती. तीही सुकलेलीच. त्याला अजुनच भकास वाटू लागलं. अजूनच झोप येऊ लागली. मध्येच एकाची आरोळी आली, झोपेच्या आवाजातच.. "आवाज बंद कर रे टेपचा..." त्याने मुकाट्याने आधीच कमी असलेला आवाज अजुन कमी केला. पण त्याला ऐकू येईल असाही ठेवला.
     आजुबाजुला शेत आणि भकास वाटणारी सागाची झाडं, अशा रस्त्याने तो टपरी शोधत होता. समोर उजव्या बाजुला लहानशा ठिपक्याएवढी वीज चमकताना दिसली. पुढे जाता जाता ती टपरी आहे असं समजलं. त्याने डाव्या बाजुला गाडी लावली. टपरीच्या समोरच. रस्ता ओलांडून टपरीजवळ गेला. चहासाठी विचारलं, पण 'नाहीये' असं उत्तर मिळालं. तो खुप वैतागला. शेवटी तिकडची पाण्याची बाटली घेतली आणि ती पूर्णच तोंडावर ओतली. तीही संपली तेव्हा रागाने फेकून दिली आणि तसाच बसला खाली. गुडघ्यात तोंड खुपसून. टपरीमधला माणूस बाहेर आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने लगेच हात झटकला आणि तसाच उठून एकच क्षण त्याच्याशी नजर मिळवून टपरीच्या बाजूने, मागे शेतात पळत सुटला. झोप न आवरलेल्या, डोळे आत, लाल झालेल्या त्याला पळताना काय काय सुचत असावं, काय काय दिसत असावं... आजचा दिवस, आजचा प्रवास की जीवनभर चालवलेली दुःखांची गाडी... त्या कर्कश गाण्यांसोबत, त्या शांत कहाण्यांसोबत चालवत आलेली जीवनाची गाडी...
     पळता पळता तिथे एक जागा त्याला दिसली. पत्र्यांचं छप्परच होतं एका मोठ्या सिमेंटच्या ओट्यावर. बाकी सगळं मोकळंच. गावात नव्हतं ते, पण झोपण्यालायक नक्कीच होतं. तो पळतच गेला आणि त्या ओट्यावर पडल्या पडल्याच झोपला.
     सकाळ झाली, एक माणूस तिथे आला. तो अजुनही तिथेच झोपला होता. त्या माणसाने त्याला उठवायला म्हणून हलवलं. पण तो काही उठेना. मग नस आणि श्वास तपासले. एक सुस्कारा सोडला आणि बाजुच्या सरणावर नेऊन त्याला अग्नी दिला. स्मशानभुमी होती ती.
     प्रवास संपला होता... जीवनभरच्या मरणाकडून सरणाकडचा हा प्रवास आता पूर्ण झाला होता.