Friday 30 October 2015

हसु की रडू?

     अनेकदा आपल्या जीवनात नक्की काय react व्हावं हेच कळत नाही.  म्हणजे नक्की हसावं की रडावं की नुसतंच पाहून पुढं जावं?  नाही नाही, मी आपले मित्र व शत्रू मरणाच्या दाढेत आहेत आणि मित्रासाठी रडावं की शत्रू मरतोय म्हणून हसावं अशा घोर परिस्थितींबद्दल बोलत नाहीये.  आणि बायको आणि आईच्या भांडणात अडकलेल्या पुरुषाची विनोदी स्थितीसुद्धा मांडत नाहीये.  मला बोलायचंय आयुष्यातल्या अगदी छोट्या पण महत्वाच्या किंवा मोठ्या होऊ शकणार्या गोष्टींबद्दल.
     नाही म्हटलं तरी रोजच असे महारथी भेटतात ज्यांच्या महानतेवर काय बरं बोलावं, काय बरं react करावं, हेच कळत नाही मला.  सर्वात पहिले सांगायचं झालं तर कधी कधी असे काही विनोदवीर भेटतात, ज्यांचे विनोद एकतर माझ्यासारख्या साध्या भोळ्या, पुलंचे विनोद follow करणार्या मुलीला समजण्यापलीकडे असतात, नाहीतर त्यांच्या विनोदावर फक्त रडावसं वाटतं (किंवा कदाचित तो माणूसच समजण्यापलीकडे असावा!) असो माझ्या भाषेत त्या विनोदांना पानचट असं अगदी अदबीनं म्हणतात, पण जमाना त्यांचा आहे, म्हणून तेवढ्याच अदबीनं त्यांना PJ असं म्हणतात.  बरं तशी आता Whats App मुळे सोयीस्कर अशी सोयही झालीय म्हणा त्या jokes वर react व्हायची.  Whats App ने "डोळ्यांत पाणी आणून दात बाहेर काढणारा" हा emoji माझ्यासारख्या सोशिक मुलीलाच दिलाय असं माझं ठाम मत आहे.  कदाचित Whats App वाले सुद्धा या हसु की रडू या प्रश्नाने केव्हातरी छळले गेले असावेत.  बरं ह्या हसण्याच्या emoji वरुन आठवलं, आजकाल हसण्यालाही शब्द आलेत! नाही ते हाहाहा किंवा हीहीही नाहीत आणि खिखिखि सुद्धा नाहीत.  LOL, ROFL, LMAO असे काहीतरी ते शब्द आहेत.  म्हणजे आजच्या shortcut च्या जमान्यात "मी हसतेय" एवढं म्हटलं की झालं.  मग माझ्यासारख्या गावंढळ मुलीने दात बाहेर काढून हसायचं तरी केव्हा?  हे हसणं असंच असेल तर चित्रपटातल्या villain ने "हा हा हा" करण्याऐवजी "L O L" असं जोरात म्हटलं तरी पुरे.  villain चंच काय आपले हिरो तर हिरोईनच्या हसण्याच्याच अदांवर जास्त फिदा असतात.  मग हेमा मालिनीने "हूंहूंहूं" च्या ऐवजी ROFL बोलून मोकळी झाली तर धर्मेंद्र तिथून पळालाच म्हणून समजा.  मग ह्यांच्या विनोदांवर (?) आणि हसण्यावर (?) LOLAवं की रडावं तेच कळत नाही.
     कधी कधी असे काही लोक भेटतात ज्यांचं व्यक्तिमत्व पहिले तर महाभारतातल्या गुरू द्रोणांचा मुलगा अश्वत्थामा किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णासारखं वाटतं.  कारण त्यांचं बोलणं, त्यांचा उपदेश, त्यांची sympathy सारं काही अमृतासारखी गोड वाटते.  पण खरं तर त्यांना सर्वकाही माहीत असतं (असं त्यांना वाटतं.)  श्रीकृष्णासारखं फक्त डोळ्यांत पाहून त्यांना व्यक्तीचं मन कळतं (हेही त्यांनाच वाटतं.)  आणि म्हणून ते लोकांना जीवन कसं सुंदर करता येईल, problems कसे सोडवता येतील याचे sympathyful धडे देतात आणि अगदी तसेच धडे ते ज्याच्यामुळे किंवा ज्याच्यासोबत problems चालू आहेत त्यांनाही देतात.  आणि त्या पवित्र कार्याला ते भगवद्गीतेची उपमा देतात!  कोणत्या मुहुर्तावर श्रीकृष्णाने अर्जुनासोबत दुर्योधनालाही युद्धात सल्ले दिले होते?  या अशांना आदराने नारद आणि मनात चोमड्या बोलून मी मोकळी होते.  या नारदांच्या अज्ञानावर खरंच हसावं की त्याच अज्ञानाची कीव करावी हेच कळत नाही.  आणि मग प्रश्न कायम राहतोच, हसू की रडू?  नारायण नारायण!
     तशी ही माझी फार सात्विक आणि केविलवाणी problems आहेत.  पण जगाच्या प्रत्येक कोपर्यात अशी काही माणसं असतात जी सतत problems नी ग्रासलेली असतात.  काहींना mercedes मध्ये जरी बसवलं तरी आपल्याकडे BMW नाही म्हणून ते रडतात; तर काही जण आपल्याकडे काहीच नसताना एवढा confidence कमवतात की त्या confidence ने आजच BMW आणतील किंवा BMW सकट सलमान खानला तरी आणतील.  काही जण इतरांना पाहून आपले problems ठरवतात, तर काही जण इतरांचे problems एवढे कमी का म्हणून स्वत: problems ओढावून घेतात.  भारतात इलेक्शनच्या वेळेला एकीकडे problems चा महापूर असतो, तर आमचा नेता किती छान म्हणून दुसरीकडे पाच वर्षांच्या रस्ते, पाणी, वीज या problems ना काना डोळा करून नवीन wifi चा problem कसा दूर केला म्हणत कुरवाळत असतात.
     असो... तर ह्या लोकांच्या अशा अत्यंत गहन problems वर तसाही काही उपाय नाही आणि माझ्या प्रश्नाचंही माझ्याकडे उत्तर नाही...

Sunday 4 October 2015

यादों का सफर

     काही दिवसांपूर्वी शाळेतल्या एका मित्राशी बोलत होते.  बोलत होते म्हणजे आजकालचं Digital Talk (चॅटींग हो!).  दहावीत आमचा वर्ग एवढा बेशिस्त(?) होता की टिचरांना एक मुलगा-एक मुलगी असं शिक्षा(?) म्हणून बसवावं लागलं होतं.  तर हा निखिल माझ्या बाजुला बसायचा.  निखिल आणि मी म्हणजे "मोटु और पतलु की जोडी" (याचा अर्थ तर तुम्हाला कळालाच असेल).  या जोडीसारखीच आम्ही खुप गप्पा मारायचो.  आणि दहावी म्हटलं तर आमचं वय असावं जेमतेम 15-16 वर्ष.  या कोवळ्या वयात जे काही घडतं, जेवढे काही मित्र बनतात, ते नेहमीच लक्षात राहतात.  म्हणुनच त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा मला नेहमीच लक्षात राहिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही अजूनही खुप चांगले मित्र आहोत.
     तर बोलता बोलता निखिल म्हणाला,
     "खुप दिवसांपासुन एक विचारायचं होतं.  विचारु का?"
म्हटलं विचार.
     "तु मला अजुन सांगितलं नाहीस, तु त्या दिवशी का रडत होतीस? तुला आता आठवत असेल की नाही माहीत नाही."
     आइंSSSग...  मला खुप हसु आलं.  कारणही तसंच होतं ना.  काय झालेलं, आमचा कॅम्प जाणार होता आणि सगळे जण Mobile Phones आणणार होते फोटो काढायला.  तर मीही ताईकडे मागत होते Mobile.  पण तिने सरळ "नाही"ची पाटी घेऊन तोंडासमोर ठेवली.  आईला सुद्धा पटवायचा प्रयत्न केला, पण त्यानेही काही झालं नाही.  मग सकाळ सकाळ वाद घालून तशीच शाळेत गेले आणि रडत बसले आणि ते फक्त निखिललाच कळालं, कारण मधल्या सुट्टीपर्यंत वातावरण नॅार्मल झालंही होतं.  किती बालिश होते मी.  एका फोनसाठी एवढं रडले.  हो अन् मग "कॅम्पला Mobile Phone आणायचा नाही.  जप्त केला जाईल!" अशी सूचनाही नंतर आलीच म्हणा.  पण तेव्हा Mobile च्या त्या fascination मुळे बरंच वाईट वाटून घेतलं होतं मी.
     आणि अजुन एक सांगायची गोष्ट म्हणजे, निखिलला अजुनही हे आठवतंय.  वा!  मला तर त्याने आठवण करून दिली तेव्हा आठवलं.  आणि दुसरं म्हणजे त्याला अजुनही आधी एवढीच Curiosity आहे, की "लोक असं का करतायंत" हे जाणून घ्यायची.  मस्तच.  नाहीतर मला "लोकांना काय करायचंय ते करुदे" हे म्हणण्या इतपत सगळ्याचा वैताग आलाय.
     अचानक समोर आलेला तो किस्सा पहिले तर खुप हसायला लावतो, पण विचार केला तर तेव्हाच्या त्या परिस्थितीची जाणीवही करुन देतो.  आणि आजच्या परिस्थितीला जोडून पाहिलं तर ते क्षण आपल्यासाठी किती महत्वाचे होते हेही तेव्हाच कळतं. कारण त्यातून  आपल्याला अनुभव मिळालेला असतो.  आणि खरं सांगायचं झालं तर अनुभवातूनच आपण खरे शिकतो.  माझ्यासाठी तर ट्रेनमध्ये टी.सी.ने Without Ticket पकडलं तोही खतरनाक अनुभव होता.  यातून सर्वात चांगला एक बदल झाला तो म्हणजे आता मी कधीच Without Ticket प्रवास करत नाही आणि दुसरं म्हणजे मी किती छान Acting करू शकते आणि किती चांगल्या गोष्टी On The Spot बनवू शकते हेही कळालं.  कदाचित म्हणूनच आता BMM करतेय मी.  पण खरंच यादों का एक सफर करना तो बनता है,  क्योंकी यादों का ये सफर बडा सुहाना है.