Wednesday 26 June 2019

Rebel With No Cause


कबीर सिंग चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. ट्रेलर पाहिला. नेहमीच्या टिपिकल बॉलीवुड मुव्हीसारखा वाटला, फक्त टेक्निकली चांगला. स्टोरी आणि त्याच्या प्रेसेंटेशनवर प्रश्न होतायंत सगळीकडून, म्हणून म्हटलं याचा ओरिजिनल सिनेमा पाहू. तसंही दोन्हींचा दिग्दर्शक एकच आहे. सो, अर्जुन रेड्डी पाहिला.

अर्जुन रेड्डीबद्दल बोलण्याआधी सिनेमा या माध्यमाबद्दल बोलेन. एक तर सिनेमा हे माध्यम वास्तवाशी निगडीत असतं हे मान्य करावंच लागेल. परिणामी वास्तवाचा माध्यमांवर, आणि माध्यमांचा लोकांवर प्रभाव पडतो. कोणतंही माध्यम जे तुम्हाला एखादी कथा सांगण्याचं प्रयत्न करतं ते काल्पनिक असूच शकत नाही. तुम्ही कथा बनवता ते वास्तव पाहून, मग त्याला मोल्ड करणं वगैरे नंतरची बाजू. पुस्तक असू द्या, चित्रपट असू द्या, कार्टून्स किंवा अगदी जाहिराती. तुम्ही एक तर सत्य सांगता, किंवा आपलं खोटं कन्विन्स करण्याचा प्रयत्न करता. आणि हे कन्विन्स करणंच आता बहुतेक सिनेमांत दिसतंय. अर्जुन रेड्डीचा दिग्दर्शक स्वतः म्हणतो, की ही माझी कथा आहे! मग अर्थात ही कथा, हा चित्रपट त्याची बाजू कन्विन्स करण्यासाठी बनवला आहे, असंच समजावं लागेल. असो. मी चित्रपट पाहिला, ते इतका गोंधळ का सुरु आहे हे पाहण्यासाठी.

चित्रपटाची सुरुवातच अर्जुनच्या प्रचंड रागात होते. रागामुळे माफी न मागता अगदी कॉलेजसुद्धा सोडण्याचा हट्ट त्याच्या वृत्तीची पहिली खूण. पुढे घडतं ते म्हणजे मुलगी दिसली, तिला आपली मानली. पूर्ण कॉलेजला सांगितलं, तिच्याकडे ढुंकून बघायचं नाही. यात तिचा कन्सेन्ट कुठेय? त्याची तिच्याविषयी प्रचंड काळजी वगैरे दाखवलीय. अगदी लहान लहान गोष्टी. ही अशी काळजी आपल्याकडे आता १४-१५ वर्षांचे शेमडे पोरं करतात. यात वाईट काहीच नाही. पण एमबीबीएस करणाऱ्या एलिट क्लासच्या २२-२३ वर्षांच्या मुलांचा हा बालिशपणा वाटतो. बरं दिग्दर्शक हे सगळं त्याचं प्रेम आहे हे दाखवायला म्हणून करतोय. आणि कहर तेव्हा होतो जेव्हा तो होळीच्या दिवशी रंग लावून तिला हरॅस करणाऱ्याला मारल्यावर हा रडतो. म्हणजे काय चाललंय? नक्की कोणत्या प्रकारचं प्रेम दाखवताय? एकमेकांसाठी रडलं म्हणजे प्रेम होतं? एकाही दिवसाचा दुरावा सहन न होणं म्हणजे प्रेम असतं? आपण किती वेळा सेक्स केलाय हे मोजून ठेवणं प्रेम असतं? एकमेकांत इतकं बुडतो की अपघात झाल्यावर काही लागलंय खुपलंय की नाही हे न पाहता तितक्याच अग्रेशनने किस करत पुन्हा एकमेकांत बुडतो? हसू येतं अशा बालिश सिन्सवर. प्रेमाची व्याख्या बनवण्यात आजवर चित्रपटांनी नेहमीच मदत केलीय. म्हणूनच आपल्याकडे प्रेमाचा प्रचंड गोंधळ आहे. मुलीला तिच्या कन्सेन्ट शिवाय गालावर किस केल्यावर तिने कानफडात न मारता खाली मान घालून उभं राहणं सुद्धा अर्जुन रेड्डीच्या दिग्दर्शकाला प्रेमच वाटतं.

बरं हे सगळं झालं त्याचं प्रेम आहे आणि ते किती आहे वगैरे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न. तिचंसुद्धा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो तिच्या वडिलांना भेटायला जातो, तिला लग्नासाठी मागणी घालायला जातो. म्हटलं ग्रेट, आता काहीतरी बरं बघायला मिळेल. तिचे वडील त्याच्याच अग्रेशनने नकार देतात. हा काही वेळ समजवायचा प्रयत्न करतो. घराबाहेर काढलं जातं, आणि त्याचा रागही बाहेर येतो. यात त्याच्या बोलण्यातून जात, क्लासचा उल्लेख होतो. पण राग संपत नाही. ती समजवायचा प्रयत्न करते, तो ऐकत नाही. आणि स्वतःच्याच बापाला समजवायला तो तिला ६ तासांची मुदत देतो. तिच्याकडून तेव्हा ना होकार येत, ना नकार. तो तटस्थपणाही त्याला आवडत नाही. हा सिन लोकांना विद्रोही वगैरे वाटतोय. खरंच? कोणत्या हक्काने तो तिला ६ तास देत होता? कोणत्या हक्काने त्याने तिला कानफडवलं? मुळात त्याला तिच्या बापाचा नकार आवडला नाही. आणि नकार पचवताच न येणाऱ्यांना विद्रोही नाही, माजलेले भांडवलशाही म्हणतात. अर्जुन रेड्डी त्याच भांडवलशाही व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे ज्याला समाजाशी काही घेणं देणं नाही. सारं काही मिळालं आहे, मग ते आयतं असो वा मेहनतीने. पण त्यात कधीच नकार मिळाला नाही. त्याने तिला बघताच तिला गृहीत धरलं हे नक्की, तेच तिला आवडलं होतं, आणि तेच त्या दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन गेलं. ग्रेट.



सहा तासांमध्ये तिचा कॉल आला नाही म्हणून पुन्हा एकदा गृहीत धरून स्वतःचं जे करायचं ते करतो. छान! म्हणजे समोरच्याची परिस्थिती न बघता स्वतःला सिम्पथी द्या. का? कारण मी वेड्यासारखं प्रेम करतो. इतकं वेड्यासारखं की तिचं काय होतंय ते बघण्याची एकदाही जाणीव होऊ नये, आणि स्वतःला गोंजारावं. तिचं लग्न झाल्यावर तो स्वतःचं जे काही करतो ते किती विकृत आहे हे सांगण्याची गरज नाही. ते मुळात विकृत आहे, वाईट आहे, त्याचे परिणाम वाईट आहेत, हे सांगण्याची जास्त गरज आहे. जी पूर्ण सिनेमामध्ये एकाही ठिकाणी दिसत नाही. मुलींना सेक्ससाठी विचारतो. एखादी मुलगी आपल्याकडे बघतेय, म्हणजे ती आपल्यासोबत सेक्स करेलच, हा विचार करणंसुद्धा विकृतीच आहे. जी हातात असते तिला सेक्ससाठी सुरीचा धाक दाखवतो. नाही म्हणजे नाही हे समजत नसेल, आणि तरी हवं ते करण्याचा प्रयत्न हासुद्धा गुन्हाच. पण या गुन्ह्याचा परिणाम काय? तर त्याला सेक्स मिळत नाही! बरं ते ऑपरेशनवेळी अल्कोहोल पिऊन होता म्हणून जी केस झाली, त्यात ह्याने स्वतःची चूक मान्य करून असं काय मिळवलं कळलं नाही. कारण ते मान्य केल्याचा विशेष परिणाम तरी काय झाला? फक्त त्याची इमेज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न. झालं. आता शेवट जवळ आला म्हणून त्याला पुन्हा सोबर बनवायला परदेशात वेकेशनवर जाणं गरजेचं. मग आल्यावर तिचं भेटणं. आणि एकूण ५ मिनिटसुद्धा नसलेल्या सिनमध्ये ते दोघं पुन्हा एकत्र होतात. हुह. काय तर ती लग्नानंतर ३ दिवसांनी पळून येते, कुठेतरी राहते, तिला त्याचं कोणासोबत तरी अफेअर असल्याचं कळतं, तिच्या मनात राग असतो, असं बरंच काही बोलते. शेवटी काय, तर मी नवऱ्याला हातसुद्धा लावायला दिला नाही. हे पोटातलं मुल तुझं आहे!” आणि त्याला कोण विचारणार, की त्याने इतके महिने काय केलं? जे केलं ते का केलं? बरं स्वतःहून त्या सगळ्याचा गिल्ट सुद्धा नाही त्याला. वाह. निष्कर्ष काय, तर पुरुष कितीही नालायक वागला तरी शेवटी त्याला हवं ते मिळतं. त्यासाठी काय करावं, तर हे असं वेड्यासारखं प्रेम करावं. आणि हे प्रेम करताना अर्जुन स्वतःला Rebel with a cause म्हणतो. मुळात रिबेल म्हणजे प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध बंड करणारा. पण इथे वर्षानुवर्षे स्त्रियांना गृहीत धरून वागणारी जी पितृसत्ताक व्यवस्था आहे, म्हणजे आक्रमक आततायी वृत्ती. तीच वृत्ती तर अर्जुनमध्ये दिसून येते. तो कुठेही तिला समान वागवण्याचा सोडा, तिच्या भावनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न करत नाही. हेच विद्रोही असेल तर आज बरेच जण या जगात Rebel with a cause असतील.

बरं आता म्हणाल की ठिके ना, चित्रपट आहे, मनोरंजन म्हणून बघ आणि सोडून दे. शिवाजी महाराजांच्या, आणि अनेक मोठ्या नेतृत्वाच्या, देवांच्या वगैरे कथांवर आधारित चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये इतिहासाची हेळसांड करतात, तेव्हा बोलता का? तेव्हा तर इतिहास आणि संस्कृतीची रक्षा करायला तोंड उघडताच ना? बरं ते फॅक्च्युल आहे म्हणून विरोध करता. ठीके. आर्टिकल १५ वर ब्राम्हण जातीबद्दल लोकांचे मत कलुशित करायचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल मग? तोही चित्रपट मनोरंजन म्हणून बघायचा का? चित्रपट काय, तुम्हाला चित्र पटत नाहीत, तुमच्याच पूर्वजांनीच कोरलेले शिल्प पटत नाहीत, तुम्ही काय चित्रपटांना मनोरंजन म्हणून बघा सांगताय? चित्रपट सुद्धा फक्त मनोरंजन असतं तर धूमआल्यावर लोकांना स्पोर्ट्सबाईकचं वेड नसतं लागलं, एक दुजे के लिएनंतर प्रेमी जोडप्यांचं एकत्र आत्महत्यांची प्रकरणं आली नसती. चित्रपट पाहून एकावर जरी परिणाम झाला असेल, तरीही चित्रपट प्रभावी आहे हेच मान्य करावं लागतं. आणि म्हणूनच लक्ष्य, शोले, बॉबी, सैराट हे सिनेमे प्रभावी आहेत.

बरं आता एक उत्तर त्यांच्यासाठी ज्यांना गली बॉयमधली सफीना आणि अर्जुन रेड्डी यांच्यात फरक दिसत नाहीत. सफीना जेलस होते, ती मुलींना मारते, आणि तिला त्याचे परिणामही भोगावे लागतात. पहिलं म्हणजे तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं, घरचे तिच्यावर विश्वास ठेवणं बंद करतात, आणि बॉयफ्रेन्ड सुद्धा दुरावतो. अर्जुनचं काय होतं? त्याच्या वागण्याचं स्वतःकडून फक्त आणि फक्त समर्थन होतं. का समर्थन होतं? कारण विरोध करायला कोणीच नसतं. विरोधी पक्षच सक्रीय नसेल तर समोरचा किती फोफावतो ते तर पूर्ण देश बघतोय. हीच गोष्ट माणसाच्या वागण्यातही लागू होते हे मान्य करावं, आणि वाईट प्रवृत्तींना विरोध करावा. कारण एकच, आपण विरोध केला नाही, तर समोर येईल ते भोगावं लागतं. विचार करा आणि व्यक्त व्हा.