Sunday 6 November 2016

नात्यांचा वेन्टिलेटर

     परवा वेन्टिलेटर पाहिला, आणि पहिल्यांदाच कोणत्यातरी साहित्यात मला 'मी' सापडले. अगदी जशीच्या तशी. नात्यांपासून अलिप्त. कधीच कोणतीच नाती जवळ न करणारी, किंबहूना ती नातीच मला आता घाबरत असावीत. कोणी कितीही सांनगितलं ना, की नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे, तरी ती उलगडल्यावर त्यांच्यातल्या नकारात्मक गोष्टी सतत त्रास देतात, आणि मग स्वभावाने आपण त्यांना दूर करतो. पण अशा नात्यांपासून ते वेन्टीलेटरवर येईपर्यंत दूर राहणंही तितकंच त्रासदायक.
     मी सतत नात्यांमधला खरेपणा शोधत पाहिले. त्यांच्या नकारात्मक, किंबहूना मला नको असलेल्या बाजू मिळाल्या की त्यांच्यापासून दूर जात राहिले. नाती कधीच खरी किंवा खोटी नसतात ना, ती फक्त असतात. आणि त्यांचं असणं हीच सकारात्मक बाजू आहे त्यांची. आधार घ्यायला सच्चेपणा नव्हे तर फक्त खांदा हवा असतो. मग तो खांदा लहानपणी आई-ताईचा असो किंवा मेल्यावर मित्राचा. गरज कोणीतरी आजूबाजूला असण्याची असते आणि ती एका स्मितानेही मिळते. सेल्फीसाठी करते अगदी तेवढंच स्मित करायचंय मला, फक्त माणसांसमोर.., माझ्या माणसांसमोर.

Tuesday 1 November 2016

डायरीतल्या गोष्टी #2

     आईसोबत तिच्या रिपोर्ट्सचं काम करत होते. तिला कॉम्प्युटर वापरता येत नाही, आणि आजकाल सगळंच ऑनलाईन झालंय. गर्भवती स्त्रियांची नोंदणी करत होते वेबसाईटवर. आई नाव, नवर्याचं नाव, स्त्रीचं वय, नवर्याचं वय, असं कर्माने सांगत होती. एका वेळेस आई नाव सांगून जरा शांत झाली. म्हटलं, "वय?" आई हळूच म्हणाली, "सेहेचाळीस". मी एक आठी आणत, एक क्षण थांबत, लिहलं. ऐकलं तर नीटच होतं. पण विश्वास बसेना. पुढे म्हटलं, "काय मुल बाळ?" आई गडबडून म्हणाली, "हा, एक मुलगा.." श्वास घेतला जरा तिने. मला काय वाटेल याचाच विचार करत असावी. मग बिचकतच म्हणाली, "वीस वर्ष, सात महिने". माझा श्वासच थांबल्यासारखा झाला. पण आईला काहीच प्रतिक्रिया दाखवायची नाही असं अर्ध्या क्षणात ठरवून लगेच टाईप केलं. तीही अडखळली अन् मीही. दोघंही 'तिला' काय वाटेल म्हणून गप्प राहिलो. का? आम्ही मायलेकी ते प्रकरण फक्त रिपोर्ट्समध्ये बघूनच एवढे बिथरलो, तर मग त्या वीस वर्षांच्या मुलाला काय वाटत असावं..? त्याच्या आई-बाबांना त्याच्याविषयी काय वाटत असावं..? बरं याहूनही, त्या आईचे याआधी किती गर्भपात झाले असतील..? यामुळे आईच्या शारीरिक अवस्थेसोबत मुलाची मनोवस्थाही बिकटच असेल का..? अनेक शक्यता असू शकतात. गर्भपात नाही, घरगुती हिंसाही नाही, काहीच नाही. ती बाई गर्भवती आहे एवढंच जरी लक्षात घेतलं तरी सेहेचाळीसाव्या वर्षी, वीस वर्षांचा मुलगा असूनही, वासनेच्या बळी पडलेलं दांपत्य समोर येतं, अगदी डोळ्यांसमोर... दुःखीही असतील ते. पण दाखवण्यासाठीच का होईना, हा निर्लज्ज आनंद मित्रांसोबत या आपल्या पराक्रमावर विनोद करताना त्या पन्नास वर्षांच्या बापाच्या चेहर्यावर  दिसतोच. ते पाहून आई द्विधा मनस्थितीत, चेहर्यावर थोडंसं हसू आणि मनात थोडंसं दुःख. मैत्रिणी चिडवतील तेव्हा लाजून दाखवणं, किंवा दुःख सांगणं, एवढंच त्च्या हातात. मग तो वीस वर्षांचा, माझ्याएवढाच, मुलगा... मान खाली घातलेल्या त्याच्या निस्तेज चेहर्यावरचे हजारो प्रश्न... त्या प्रश्नांचं प्रतिनिधीत्व करणारा एक प्रश्न, 'हे असं माझ्यासोबतच का व्हावं..?' किंवा तो अगदी बिनधास्त. आई-बाबांशी बोलणार नाही. मान देणार नाही. व्यसनाच्या अधीन. लोक म्हणणार, अगदी बापावर गेलाय. या सगळ्यात गर्भातलं बाळंही येतंच. मुलगा असो वा मुलगी, त्याच्याही चेहर्यावर जन्मल्यानंतर अनेक प्रश्न असणार आहेत. 'मला का जन्माला घातलंत..? वारस तर एक मुलगा होताच ना, मग मी वासनेपोटीच का..? तेही तुम्ही म्हातारे झाल्यानंतर..?'
     अठरा वर्षांचं असतानाच गर्भवती राहणं, पाच-सहा महिन्यांचं मुल असतानाच गर्भवती राहणं, तीन मुली आणि एक मुलगा असूनही उतरत्या वयात बाळंतीण राहणं... अशा अनेक परिस्थिती त्या रिपोर्ट्समध्ये होत्या, ज्यांची कारणं नक्की माहीत नव्हती पण शक्यतांपैकीच काही होती. पण त्या ऑनलाईन रजिस्टर करण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते.

Saturday 17 September 2016

पायवाट

     मेनकापडाच्या छतातून लागलेल्या पाण्याच्या धारा जेव्हा त्याच्या चेहर्यावर पडल्या तेव्हा कुठे त्याला जाग आली. कोणत्या मुर्खाने उठवलं अशा थाटात त्याने डोळे उघडले आणि छताकडे लक्ष जाताच आपल्याच मुर्खपणामुळे उठावं लागलं हे जाणून तो वैतागतच उठला. वैतागही कोणावर काढणार? आपणच आपले, स्वतःवरच वैतागायचं आणि स्वतःच वैताग घालवायचा. बाहेर जाऊन भिंतीवर उभं राहून त्याने एक मेनकापडाचा तुकडा धार वाहू जाणार्या भागावर टाकला, आणि पून्हा जाऊन झोपला. त्या पडक्या भिंतीच्या वाड्यामध्ये, दगडमातीवर कशी एवढी झोप येत असावी त्यालाच ठऊक. कदाचित दिवसभर काहीच करायचं नसतं म्हणून असावं, किंवा काही करायचाच कंटाळा येत असावा त्याला. या दोन्ही कारणांमुळे तो अजुनही या पडक्या खोलीतच राहत होता. कोणत्याही नावाशिवाय, कोणत्याही पत्त्याशिवाय. तो कोणत्या गावात राहतो तेही माहित नसावं त्याला. दिवसभर भटकून याच पत्ता नसलेल्या त्या चार पडक्या भिंतींत येऊन झोपणं हेच त्याचं वीस – पंचवीस वर्ष काम होतं. बाकी लहानपण तेव्हाही अज्ञानात होतं आणि आताही अज्ञानातच राहिलं.
     पावसामुळे वाढलेल्या थंडीमुळे त्याला आता काही झोप लागेना. काही वेळ लोळून तो बाहेर पडला... घरापासून सुरू होणार्या वाटेवरून... गंगेकडे... गंगेत एक - दोन डुबकी मारून बाहेरही निघाला, तोच पाऊस सुद्धा थांबला होता. अंगातलं हल्लीच कुठूनतरी मिळालेलं करड्या रंगाचं, मळकं शर्ट काढून पिळलं, आणि खांद्यावर टाकून, मागे वळून पायवाटेवरच बसला. समोर खळखळ वाहणार्या नदीकडे पाहतच राहिला. अगदी एकटक. ‘ती आता कुठे जाणार... तीही आपल्यासारखीच, आपल्या नशीबासारखी नुसतीच वाहते? आपली वाट शोधत, वाट काढत... तिच्याकडे कुणी पाहतं का? की आपल्यासारखंच दूर पळतात सगळे? हो पळतातच... कोण येतंय इथे किनार्यावर? मीच तर असतो. तीही माझ्यासारखीच. एकटीच... कदाचित म्हणूनच एवढे वर्ष झाली... रोज खळाळते, जणु माझ्यासाठीच.’ पाहता पाहता बराच वेळ झाला, आणि तो तंदरीतून बाहेर आला. खरं तर पाऊस पडून गेल्यानंतरच्या नदीच्या त्या देखण्या अवताराकडून नजर वळवावीशीही वाटत नव्हती, पण पोटाची भूकही तेवढीच खेचत होती. म्हणून गावाकडे जाऊ लागला, तीही पायवाटच होती. दोन्ही पायवाटा, पडक्या भिंतींकडून नदीपर्यंतची आणि तिलाच लागून बाजुला सरलेली, दुसर्या गावाकडे जाणारी, जणु काही त्याच्याच पायांमुळे झाल्या होत्या. त्याची उठून नदीत डुबकी मारून एखाद्या कामासाठी, पैशांसाठी, पोटासाठी दुसर्या गावात जाण्याची वाट नेहमीचीच झाली होती, गेली वीस ते पंचवीस वर्ष. आता तो तसा मध्यमवयीनच वाटत होता. बारीक, पण काटक. सावळा, ऋक्ष. हा सारी वर्षच त्याला काटक आणि ऋक्ष बनवत आली होती. तो ज्या गावात काम मागायला जायचा, त्या गावातल्यांपैकी कुणालाच तो कुठून आला, कसा आला माहीत नसायचं, आताही माहीत नसतंच. कदाचित तोही विसरला असावा त्याचा रस्ता, म्हणूनच तर ह्या कच्च्या पायवाटेलाच आपलं वर्तमान आणि भविष्य मानलं होतं त्याने.
     त्याला बहुतेक कामं ही बेवारस प्रेतांना गंगेत दूर टाकायची मिळत होती. ते देणारा दुसर्या गावातला एक माणूस ओळखीचाही झाला होता आता. म्हणूनच तो काही कष्ट न करता सरळ गावात, बाजारात जाऊन बसायचा, त्याची वाट बघत. काम कोणतंही असो, एका कामामागे 50 रुपये मिळायचे. मग असं एक जरी प्रेत मिळालं तरी एका दिवसाच्या जेवणाची सोय होई. बरेच महिने हे केल्यावर कळालं, की आपल्याला काम देणारा, प्रेतं देणारा तो माणूस प्रेतांवरचे दागिने, मौल्यवान वस्तू काढून घ्यायचा. मग कधी कधी काही उरलंसुरलेलं तरी आपल्याला मिळावं अशी त्याची फार इच्छा असायची. पण अशी संधी कधीच त्याला मिळाली नाही, आणि चांगल्या वस्तूही मिळाल्या नाहीत. पण केव्हातरी प्रेतांवरचे कपडे तो काढून घ्यायचा. आताही तेच प्रेतावरचे कपडे घालून तो बाजारपेठेतल्या एका दुकानाजवळ बसून हाच विचार करत होता. ‘आज तरी काही मिळायला हवं’. बरेच तास तिथेच थांबून त्यालाही आता वैताग आला, भूकेनेही त्रासला होताच, आणि कोणाकडून काही मागून खायची त्याची वृत्ती नव्हती. संस्कारांशिवाय वाढलेलं मुल एकतर स्वतः स्वतःवर संस्कार लावून घेतो, नाहीतर स्वतःच एखादी वृत्ती पाळून वाढतो. अशीच वृत्ती घेऊन वैतागतच तो निघाला. निघाला तो सरळ कोणालाच माहीत नसलेल्या, त्याच्याच पायवाटेवर. तोपर्यंत दुपार सरत आली होती. वैतागत, पण भूकेला आवरत, आणि आता बिनपैशाचं काय खायचं या विचारात, मान खाली घालून जात होता. आपल्या ठिकाणाकडे जाणार्या वाटेवर जाताना त्याला गवतात काहीतरी असल्यासारखं वाटलं. एखादा पक्षी मरून पडला असावा, भाजून खाता तरी येईल, भूक भागेल या आशेने वाट सोडून गवतात गेला. दहा पावलं पुढे गेल्यावर आता स्पष्ट दिसलं. एक सुंदर, सुडौल स्त्री... गवतावरच पहूडली होती. अगदी मेनकेसारखी आकर्षक. पण मानेवरून प्रचंड रक्त घरंगळत गवतावर सांडत होतं, आणि रक्ताने दागिनेही माखले होते. त्याची नजर त्या सुंदर स्त्रीच्या चेहर्याकडे, मग बांध्याकडे गेली, अन् मग दागिन्यांवर स्थिरावली. इकडे-तिकडे बघून, जपून तो तिच्याजवळ गेला. नाकाजवळ हात घेऊन आधी श्वास तपासला, अन् ती गेलीये हे जाणवून एक सुस्कारा सोडला. दोन क्षण तिच्याकडे बघितलं, जणु तिला डोळ्यात साठवून ठेवत होता. पण मग पोटाने भूकेची आरोळी देताच त्याचा हात तिच्या रक्ताळलेल्या मानेजवळ गेला. मान एका हाताने उंचावून दुसर्या हाताने त्याने हार काढला, मंगळसुत्रही काढलं. यावेळी झालेल्या त्या तिच्या शरीर आणि रक्ताच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. शहारलेल्या त्याने दोन क्षण इथेतिथे पाहून पुन्हा तिच्या जवळ जाऊन कानातले काढून घेतले. कानातले खिशात टाकून तिला दोन्ही हातांत उचलून, मनात समाधान, मोह, वासना, आकर्षण, सार्या भावनांना लपेटून त्याने तिच्या प्रेताला गंगेत वाहून दिलं, अन् माफीसाठी काही क्षण हात जोडले. खिशातले दागिने पाण्यात धुवून खिशाचा तो रक्ताळलेला भागही धुवून काढला. सगळं करून मागे वळून पाहतो तर 10-12 पावलांवर, पायवाटेपासून दूर गवतात, एक लहान 5-6 वर्षांचा मुलगा त्याच्याकडेच बघत होता. मुलगा अगदी चांगल्या घरातला वाटत होता. तो मुलापाशी गेला. मुलगा दोन पावलं मागे झाला तसा तो मुलाच्या उंचीला आला, गुढघ्यांवर. हात धरला तसा त्याच्या अंगावर काटा आला, पण हा काटा त्या स्त्रीच्या शरीराला स्पर्श करून आला होता तसा आजिबात नव्हता. हा फारच वेगळा होता. मायेचा, करुणेचा, दयेचा, निरागसतेचा तो शहारा होता. त्याने स्मित केलं. मुलाला थोडा विश्वास मिळाला असावा त्या स्मिताने. तो घाबरतच कापत म्हणाला, “माझी आई कुठंय?” ते एकून पुन्हा त्याच्या अंगावर शहारा येऊन गेला. त्याला काय बोलावं, सुचेनासं झालं. मुलाचे ते निरागस बोल, आपल्या आईच्या शोधात असलेले डोळे त्याला मरणापेक्षाही भीतीदायक वाटू लागले. तो “चल” म्हणून उभा राहिला, का ते त्यालाही कळलं नाही. मुलाला घेऊन फक्त चालत राहिला. आपल्या घराकडे जाणार्या वाटेवरून, मुलाचा हात हातात घेऊन... घर केव्हा आलं कळालंही नाही. त्याला घरात घेऊन गेला तो काहीतरी खायला देऊ या उद्देशाने बाहेर पडण्यासाठीच. त्याला एका मेनकापडावर बसवलं आणि “येतोच मी खाऊ घेऊन" असं म्हणून केसांवरून हात फिरवून तो धावतच बाजारात गेला. खिशातले कानातले काढून सोनाराच्या दुकानात शिरला आणि ते विकून पैसे घेऊन एका चांगल्या हॉटेलात गेला. तिथून चपाती भाजी घेतली. वाटेत येताना एक फुगेवाला दिसला, त्याच्याकडून चार-पाच फुगे घेतले. पोटभर जेवण मिळाल्याचाही जितका आनंद होणार नाही तितका उत्साह त्याला फुगे घेताना झाला, तो चेहर्यावरही अगदी स्पष्ट झळकत होता. बाजुलाच एक आईसक्रीमची गाडी होती, त्यांच्याकडून दोन आईसक्रीम घेतले आणि विरघळू नये म्हणून धावतच तो घरी गेला. मुलाची निरागसता आणि त्याचं प्रेम यामुळे त्या पडक्या भिंतींनाही आता घराचं रूप आलं होतं, त्याच्याही नकळत... मुलगा तिथे शांत बसला होता. त्याला पाहून सुखावलेला तो आत गेला आणि आईसक्रीम दिलं. मुलगा आईसक्रीम आणि फुगे पाहून फारच आनंदी झाला. तरी त्याचे डोळे मात्र तो आनंद दाखवत नव्हते. आईच्या शोधात ते अजुनही पाणावलेलेच होते. एका हातात आईसक्रीम आणि दुसर्या हातात फुगे आणि चेहर्यावरचं निरागस स्मित पाहून तो कितीतरी सुखावला. याआधीच्या त्याच्या ऋक्ष जीवनात कधीच अशी निरागसता त्याने पाहिली नव्हती... तीही जिवंत निरागसता... नाहीतर मेल्यावर प्रत्येक माणूस निरागसच वाटतो. पण आज ती या मुलाच्या रुपात पाहताना त्याचे डोळे उपाशी असूनही पोटभर समाधानासारखे चमकत होते. दोघांनीही आईसक्रीम खाल्ली. त्याला चपाती भाजी भरवताना, त्याला खाताना पाहताना त्याचे डोळे फक्त त्याच दृश्याने भरले होते. मायेने केसांवरून हात फिरवताना आता आपणच याचे आई आणि बाबा असू ही जाणीवच त्याला अंगावर सतत शहारा आणत होती; मनाशी, स्वतःशी जोडून ठेवत होती. दोघांचं खाऊन झालं. मुलगा हाताचा अंगठा करून तोंडाजवळ नेत ‘पाणी हवंय’ असं सांगू लागला, तेव्हा त्याला पाणी आणायची आठवण झाली. तो स्वतःला आवरत उठतो न उठतो तोच एक माणूस घरात डोकावला, आणि ‘इथेचे इथेचे’ म्हणून ओरडला. मागून पाच-सहा माणसं घरात घुसली. तो प्रचंड घाबरला. काय होतंय त्यालाही कळेनासं झालं. मुलाला उभं करून आपल्या मागे घेत विचारू लागला, “कोण पायजे, कोण आहात तुम्ही?” दोघांनी त्याला एका कोपर्यात धरून ठेवलं. आणि एक सुटाबूटातला माणूस येऊन मुलाला घेऊन जाऊ लागला. तो ओरडतच राहिला... रडतच राहिला...
     त्याला काहीच बोलू न देता इतरांनी लाथा बुक्के मारले, तोंड बंद करायला तोंडावर मारलं. पण तो ओरडतच राहिला. एकाने चाकू काढला आणि गळा चिरला. एका क्षणातच सारं संपलं. आवाज, रडणं, सुख, दुःख, आयुष्य, सारंच...
     सकाळी तिथून जात असलेल्या एकाला कुबट वास येऊ लागला. काही मेलेलं असावं म्हणून तो समोर दिसणार्या पडक्या भिंतींपाशी गेला. आत भलंमोठ मेनकापड पडलं होतं. बाजुला आईसक्रीमच्या काड्या, एक फुगा आणि दोन रिकामे जेवणाचे खोके. त्याने तिथूनच आलेल्या वासाचा वेध घेतला. वास आधिकच कुबट झाला होता. त्याने ते ओलं मेनकापड उचललं प्रेत तिथेच उपडं पडलं होतं... मेनकापडाखली. कोणाचं प्रेत असावं म्हणून त्याने पायानेच प्रेत सरळ केलं, तसे खिशातून दगिने थोडे बाहेर आलेले दिसले. त्याने पटकन बसून ते ओढले, आणि सोबतच पैसे बाहेर आले. तेही क्षणात खिशात टाकले. मग तोंडाला रूमाल बांधून जरा बाहेर कोणी आहे का ते संशायाने पाहिलं. कोणीच नव्हतं. प्रेत खांद्यावर घेऊन घरासमोरच्या पायवाटेवरून चालू लागला. एक त्याच्या परतीच्या वाटेवर निघाला होता, आणि एक आयुष्याच्या काठावर... पण दुसर्याच्या पावलांनी... दुसर्याने बनवलेल्या पायवाटेवरून... 

Saturday 10 September 2016

पायरी

पायर्यांना दोनच वाटा असतात. त्यांना आपण कुठून पाहतो यावर ठरतं आपण त्यांना कसे पाहतो.
खालून पाहत असू तर वर जावं आणि वरून पाहत असू तर आपण मागे पाहत आहोत हे लक्षात असावं.
पुन्हा उतरावं की पूढे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

Tuesday 6 September 2016

किनारा

     एकदा समुद्रात गेलं की एकतर वार्याच्या वेगाने पुढे सरकत राहावं, नाहीतर वार्याला आपल्या दिशेने न्यावं. संघर्ष करतच राहावा. जगण्यासाठी... टिकण्यासाठी... किनार्यावर यावं ते फक्त मोती होऊन... माणसाच्या हातात.. जो आपल्याला सांभाळून नेईल. नाहीतर तुटलेले शिंपले तर कित्येक असतात किनार्यावर, वाट चुकलेले, फक्त तरंगत राहिलेले किंवा आपल्या आत मोती असल्याचा गर्व घेऊन आलेले... ज्यांना खेळण्यासाठी लहान मुलंही हातात घेत नाहीत.


Wednesday 27 July 2016

डायरीतल्या गोष्टी #१

नुकतंच बदलापूरला राहायला आले होते मी पहिलीत असताना. काहीच महिन्यांत महिन्यांत गोपाळकाला आला. आणि आम्ही खाड्यातले लोक खाड्यातला गोविंदा चुकवू असं होऊच शकत नाही. कारणही तसंच होतं ना, होतं काय, आजही आहेच. रात्री बाराला एक हंडी फोडायचेच, पण सकाळची जी धमाल असायची, ती कुठेच नव्हती. बैलगाडीवर चार-पाच जणांची वेशभूषा करून, बेंजोच्या तालावर नाचत पूर्ण चाळ मिरवणूक घेऊन निघायची. त्यात कृष्ण तर नेहमीच असायचा, पण इतर देव-देवींना, आणि चित्रपटातल्या प्रसिद्ध भूमिकांनाही मिरवणूकीत मान मिळायचा. आजकाल सामाजिक संदेशही त्या मिरवणुकीत देतात. तर पहिलीतली मी ही मिरवणूक संपवून, बेंजोवर खूप नाचून चाळीत परतले. परतले ते प्यायलेल्या काकांनी अंगावर चढवलेला जॅकेट आणि डोळ्यांवर गॉगल घेऊनच. जॅकेट पायांपर्यंत आला होता, तरी मी मिरवतच होते तो. मिरवायची हौस तशी तेव्हापासूनचीच. तोर्यातच मावशीच्या दारात गेले आणि तिथे जमलेल्या बायका मला पाहून खिदळायला लागल्या, मीही हसू लागले. वेडीच होते मी. त्यातल्या शिकवणी घेणार्या काटे वहिनी, नात्याने किंवा वयानेही वहिनी नाहीत त्या, तरी आजुबाजूच्यांचं ऐकून सवय झाली होती वहिनी बोलायची, तर काटे वहिनी कौतुकाने म्हणाल्या, "डॉक्टरीणबाई... काय गं, आयशीसारखी डॉक्टर होणार ना तू?" माझ्या त्या मोठ्या जॅकेटमुळेच म्हणाल्या असाव्यात त्या. पण त्यांना काय माहीत, मी त्यामुळेच पुढे आईसारखं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहू लागले होते. खेळण्यातलं स्टेथस्कोप घेऊन बाहूलीला तपासू लागले होते. मग आई लोकांना कोणत्या रंगाच्या गोळ्या कोणत्या आजारासाठी देते ते लक्षात ठेवू लागले होते. पण माझ्या भाबड्या डोळ्यांतलं भाबडं स्वप्न तेव्हाच तुटलं जेव्हा नववीचं विज्ञानाचं पुस्तक माझ्या हाती आलं. ते तसंच टाकून मी जे दूर पळाले, ते आतापर्यंत नक्की काय बनावं ह्याच विचारात अजुनही पळतेय... जशी काटे वहिनींच्या बोलण्याने लाजून पळाले होते, अगदी तशीच, पण घाबरून.

Friday 3 June 2016

प्रवास

    रात्रीचे बारा वाजले होते. तो अजुनही गाडी चालवत होता. तो म्हणजे असेल 40-42 वर्षांचा. पण त्या सरलेल्या वर्षांचा फरकच काय पडतोय. वर्ष सरण्यासाठीच असतात, आपण फक्त काम करत राहायचं, गाडी चालवत राहायचं. जीवनाची गाडी शेवटी स्मशानाजवळच थांबते. ना त्या गाडीचा नंबर कोणला सापडतो, ना त्यातला माणूस. असेच काहीसे विचार करत तो नेहमी गाडी चालवत असावा. 15-16 वर्ष झाली असावीत. आवडती गाणी ऐकत.. आपल्याच प्रवाहात... आताही गाणीच चालू होती. आणि त्याची झोपसुद्धा ती गाणीच आवरत होती. प्रवासी तर केव्हाच झोपले होते. गाडी गच्च भरली होती. तवेरा होती ती. त्यात 5-6 बायका, त्यांची 5-6 मुलं आणि बाजुला एक कर्ता पुरुष आणि त्याचा 10-12 वर्षांचा मुलगा. जेजुरीहून नाशिकला परतत होते ते सगळे. तोही नाशकातल्या कोणत्यातरी उपनगरातला... गावातलाच म्हणा. कसाबसा आपली झोप आवरत होता. शक्य होईल तितक्या वेगात पण सावधपणे तो पुढे जातच होता. कधी एकदा डोळे बंद करून शांतपणे झोपतोय असं झालं होतं त्यालाही.
     शेवटी एकदाचं गाव आलंच आणि एवढ्या मरगळलेल्या प्रवासातून सुटका झाली होती एकदाची. दाराजवळ गाडी लावली आणि दार ठोकलं. बायकोने झोपेतच ते उघडलं आणि पुन्हा अंथरूणावर पडलीही. ती आणि मुलं उठतील म्हणून लाईट नाही लावली त्याने. त्या दोन खोल्यांच्या घरात सगळ्या सुविधा केल्या होत्या त्याने. बेड, टीव्ही, होम थेटर आणि मुलं आजारी पडू नयेत म्हणून वॉटर प्युरीफायरसुद्धा होतं. तरी त्या अंधारात रंग निघालेल्या त्या भिंती भूक आणि झोपेमुळे भकासच वाटत होत्या त्याला. तो स्वयंपाकघरात गेला, जेवायला खिचडी भातच होता. त्या गावात खिचडी भातच सगळ्यांचा आवडीचा असला तरी आता त्यालाही कंटाळा आला होता त्याचा. हंड्यातून पाणी घेतलं आणि तेच चांगले 3 ग्लास प्यायला. अंथरूणात जाऊन झोपण्याआधी घड्याळात पाहायला विसरला नाही तो. दिड वाजला होता तेव्हा. पडल्या पडल्याच झोप लागली.
पण घड्याळाचे काटे असे फिरले, जसं त्याचं संपूर्ण आयुष्यही फिरलं नसावं. दारावर जोरजोरात ठोके द्यायचे आवाज येऊ लागले अन् त्याला जाग आली. त्याने घड्याळात पाहिलं, साडे चार वाजले होते. उठून दार उघडलं. झोपेतच... दारावरचा माणूस बोलू लागला, "आरे काय लेका.. अजून झोपलायस. फोन करून थकून गेलो ना मी. चल, कसार्याला जायचंय."
"नाय पण ते शाळेवर पण जायचंय ना..."
"बारा वाजताय ना शाळा.. चल सोडून लगेच यायचंय. दहा वाजतायत यायला चल.. चल सगळे पैसे आताच देतोय.."
     तो वैतागतच आत गेला आणि पाण्याच्या ओंजळा जोरजोरात तोंडावर मारू लागला. वैतागतच गाडी काढली आणि पुन्हा त्याच प्रवासाला सुरवात केली. तोच प्रवास ज्यात पुन्हा बायका-मुलांची कटकट, सततची कुजबूज, नको तेवढा लोकांचा उत्साह, कर्त्याचा धाक, आणि सोबत प्रवाशांना आवडणारी धांगडधिंग्यातली गाणी. हा सगळा वैतागवाणा प्रवास करून एकदाचं त्याने प्रवाशांना सोडलं आणि एका टपरीवर शांतपणे चहा पिऊन, एकटाच, त्याच्याच सुखात, त्याच्याच रंगात, पण बाराच्या आधी पोहोचण्याच्या घाईत घरी आला.
     घराच्या अंगणातच बायकोने टपरीवजा दुकान बांधलं होतं. शिलाईचं. तो गेला तेव्हा ती शिलाईच करत बसली होती. ब्लाऊज कापत होती बहुतेक. तिच्याकडे एक नजर टाकून तो घरात गेला. मुलं मस्ती करत होती बेडवर. WWF चालु होतं. एकाला जरी लागलं तरी गोंगाट पसरत होता. ते सारं बघून त्याने दोघांनाही बाहेर खेळायला हाकललं. आणि बेडवर झोपून घेतलं.
     तो गाढ झोपेत जातो न जातो, इतक्यात दोन मुलं घरात आली, आणि दोन जण दारातूनच लपून बघत होती. शाळेचा युनिफॉर्म घातलेली ती मुलं 'काका काका' म्हणत त्याला उठवत होती. तो पुन्हा तोंड धुवून बाहेर निघाला. सोबत त्याची मुलंही निघाली. पावणे बारा वाजले होते. शाळेची वेळ होती ती.
     आता पुन्हा गाडी गच्च भरली होती. लहान-लहान मुलांनी. छोट्यांची खूप सारी किलबिल आणि त्याची जुनी गाणी. कदाचित हीच काही मिनिटं सुखद असावीत त्याच्यासाठी. म्हणून तर ह्या प्रवासाला तो वैतागत नव्हता कधीच. पण रस्ता फार मोठा नव्हता. तो लगेच पोहोचला आणि सगळ्यांना उतरवलं.
     शाळेवरूनच तो न्हाव्याकडे गेला. दाढी केली आणि जरा डोक्याची मालिशही करून घेतली. मग घरी येऊन जेवून पुन्हा बेडवर लवंडला. बायको अजुनही शिलाईचं कामच करत होती. तिच्या मशिनचा आवाज सतत त्रास देत होता. एवढ्या आवाजाने तो कूसच बदलू शकत होता, झोप काही येणार नव्हती.
     झोपूनच तो ओरडला, "ए... बंद कर त्ये."
आवाज दोन क्षण बंद झाला आणि पुन्हा चालु झाला. पुन्हा कूस बदलू लागला तो. शेवटी वैतागून दारावर गेला आणि पून्हा बोलू लागला, "अय... डोक्यात फरक पडून राहलाय का गं तुझ्या... एकदा सांगून कळत नाय काय... हे बंद कर अन् डोकं दाबायला ये माझं. ठनकतंय कालपास्नं."
     "हो, तुम्ही दूनिया फिरा अन् डोकं दाबून देतेय मी. अन् इथं ह्ये ब्लाऊजं माझा बाप शिवनारे."
     "ए जास्ती तोंड चालवू नकोस.."
     "आधी घर चालवा नीट. मग बसतेय मी गप्प."
     तो रागातच पून्हा झोपायला गेला. कशीबशी झोप लागली, पण नशीब काही आज त्याला झोपू देणार नव्हतं. काही वेळाने बायकोने उठवलंच. कोणीतरी गाडीभाड्यासाठी आलं होतं. दूर नागपूरला जायचं होतं. दोघं जण होते. पून्हा गाडीभाडं, पून्हा गाडी प्रवास...
     "आताच निघायचंय?", त्याने विचारलं.
     "हा अंघोळ बिंघोळ करून ये. तोवर आम्ही पण आवरतो."
     "नाय ते शाळेवर पण जायचंय ना. पोरांना आणायचंय."
     "शाळेवर.... मंग्या जाईल की. (मंग्याकडे बघून) सुमो जा घेऊन तुझी."
     "जाईन की", मंग्याने होकार दिला.
     अंघोळ वेगैरे करून, चहा पिऊन त्याने गाडी काढली, तेव्हा 2 वाजले असावेत. पुन्हा तोच प्रवास. गच्च भरलाली गाडी. त्रासदायक कुजबूज, कटकट, भांडण. या सगळ्यातच रात्र झाली. थोडंसं चहापाणी आणि जेवणही झालं होतं. गाडीतले सगळेच झोपले होते. नागपूर काही अजून गाठता आलं नव्हतं. पण जेवणामुळे झोपही आवरत नव्हती. पण झोपू शकत नव्हता. डोळे सताड उघडे ठेवायचेच होते. म्हणून नुसती गाणी ऐकत कशीबशी झोप आवरली होती त्याने. आला रस्ता मागे टाकत होता. सतत थंड पाणी पित होता. वार्यामुळे झोप लागते म्हणून काचही अर्धी बंद केली होती. पण कोणताच उपाय मार्गी लागेना. झोप महत्वाची होतीच, पण भाडं सुद्धा पोहोचवायचं होतं. आता चहा शोधू लागला तो. तशी मागे बरीच दुकानं लागून गेली, पण तेव्हा हे लक्षात आलं नाही त्याच्या. आणि रात्रीच्या 2-3 वाजता टपरी मिळणं शक्यही नव्हतं फार. आता रस्त्याच्या कडेला नुसतीच झाडं झुडपं लागत होती. तीही सुकलेलीच. त्याला अजुनच भकास वाटू लागलं. अजूनच झोप येऊ लागली. मध्येच एकाची आरोळी आली, झोपेच्या आवाजातच.. "आवाज बंद कर रे टेपचा..." त्याने मुकाट्याने आधीच कमी असलेला आवाज अजुन कमी केला. पण त्याला ऐकू येईल असाही ठेवला.
     आजुबाजुला शेत आणि भकास वाटणारी सागाची झाडं, अशा रस्त्याने तो टपरी शोधत होता. समोर उजव्या बाजुला लहानशा ठिपक्याएवढी वीज चमकताना दिसली. पुढे जाता जाता ती टपरी आहे असं समजलं. त्याने डाव्या बाजुला गाडी लावली. टपरीच्या समोरच. रस्ता ओलांडून टपरीजवळ गेला. चहासाठी विचारलं, पण 'नाहीये' असं उत्तर मिळालं. तो खुप वैतागला. शेवटी तिकडची पाण्याची बाटली घेतली आणि ती पूर्णच तोंडावर ओतली. तीही संपली तेव्हा रागाने फेकून दिली आणि तसाच बसला खाली. गुडघ्यात तोंड खुपसून. टपरीमधला माणूस बाहेर आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने लगेच हात झटकला आणि तसाच उठून एकच क्षण त्याच्याशी नजर मिळवून टपरीच्या बाजूने, मागे शेतात पळत सुटला. झोप न आवरलेल्या, डोळे आत, लाल झालेल्या त्याला पळताना काय काय सुचत असावं, काय काय दिसत असावं... आजचा दिवस, आजचा प्रवास की जीवनभर चालवलेली दुःखांची गाडी... त्या कर्कश गाण्यांसोबत, त्या शांत कहाण्यांसोबत चालवत आलेली जीवनाची गाडी...
     पळता पळता तिथे एक जागा त्याला दिसली. पत्र्यांचं छप्परच होतं एका मोठ्या सिमेंटच्या ओट्यावर. बाकी सगळं मोकळंच. गावात नव्हतं ते, पण झोपण्यालायक नक्कीच होतं. तो पळतच गेला आणि त्या ओट्यावर पडल्या पडल्याच झोपला.
     सकाळ झाली, एक माणूस तिथे आला. तो अजुनही तिथेच झोपला होता. त्या माणसाने त्याला उठवायला म्हणून हलवलं. पण तो काही उठेना. मग नस आणि श्वास तपासले. एक सुस्कारा सोडला आणि बाजुच्या सरणावर नेऊन त्याला अग्नी दिला. स्मशानभुमी होती ती.
     प्रवास संपला होता... जीवनभरच्या मरणाकडून सरणाकडचा हा प्रवास आता पूर्ण झाला होता.

Tuesday 17 May 2016

जातीभेद - कुंडीतील आणि कुंडीबाहेरील

मागे मी ब्रह्मकमळाची काही पानं लावली होती कुंडीत. म्हटलं जागा फार नाहीये, पण जगवायचा आणि वाढवायचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. लवकरच वाढूही लागलं होतं. ती छोटी छोटी पानं नंदनवनासारखी कुंडीत फुलत होती. सकाळ सकाळ उठून अगोदर त्या रोपट्यांकडे धाव असे माझी. पण काही दिवसांपूर्वी आईने ती नवीन फुललेली रोपटी उखडून फेकून दिली.  सुरवातीला लावलेली ती दोनच पानं ठेवली. सकाळ सकाळ माझं डोकं फिरलं. कारण विचारलं तर एकच ऐकायला मिळालं, "अगं ती ब्रह्मकमळाची रोपटं नव्हती. दुसरीच कोणतीतरी होती. "  हे ऐकून अजुनच तिडीक गेली डोक्यात. मी काही कृषितज्ञ वेगैरे नाहीये. त्यामुळे मीही सांगू शकत नाही की ती रोपटी ब्रह्मकमळाचीच होती की नाही... पण ती जरी नसली तरी काय फरक पडणार आहे? तेही जीवच आहेत ना... ब्रह्मकमळ लावलेल्या कुंडीत त्यांनी जन्म घेतला म्हणून काय असं मारून टाकायचं का त्यांना? मला त्यांच्याबद्दल किती जिव्हाळा होता, वेगैरे मला सांगावसं नाही वाटत. पण त्यांना असं उखडून टाकणं आणि तेही अशा कारणासाठी, हे नक्कीच मला पटलं नाही.
मुळात कसंय, आपल्याकडे दर्जे, वर्ग फार दिले जातात, सगळ्याच वस्तूंना. खालचा, वरचा, मधला... त्याच वर्गांवरून आईने ब्रह्मकमळ आणि ते वेगळंच उगवलेलं रोपटं, यात फरक केला. मग तिच्या नजरेत उच्च असलेल्या रोपट्याला जगू दिलं आणि निचाला मारून टाकलं. अर्थात काय, माणसांप्रमाणे रोपटीसुद्धा या जातीभेदाला, वर्गभेदाला बळी पडली!
आता या आमच्या घरातल्या वर्गभेदाचं काय करावं म्हणून सद्ध्या आईला रोपट्यांना हात लावण्यासही बंदी आहे..! जगातल्या वर्गभेदावरही त्यांच्याच देवाने बंदी आणली असती तर कदाचित हे घडलं नसतं, पण आाता जर तर म्हणून काही होणार नाही. स्वतःच स्वतःच्या मनातील वर्गभेदावर बंदी आणावी लागेल.

Thursday 7 April 2016

आपलेच ओठ अन् आपलेच दात

आपलेच ओठ अन् आपलेच दात
एकाच देहाच्या फसले जाळ्यात

कुणी म्हणे दात करी पोटभरण्या मदत
कुणी म्हणे ओठच काय ते संपूर्ण सजग

अहो कुणाचं काय तर कुणाचं काय
दात मानेत अन् पोटावर पाय
अहो कुणाचं काय तर कुणाचं काय
ओठ नाही त्याला बोलता येईल काय?

बघा, तुम्ही ओठ न हलवता बोलता येतंय का? 
तरी ह्यांचं चालूच.. हे रिकामे ना...

दात नि ओठांकरवी अख्खं शरीर भांडे
दात नि ओठांपरी तेच शरीर व्यथा मांडे

करु नये असा दात-ओठांचा पडशा
ना खायला मिळणार, अन् होईल ओठांचीच दशा

     म्हणून म्हणतो -
एकीत असे बळ
सगळ्यांचीच साथ
तेचि जीवन!

     हे धर्माचंही असंच आहे.. एकाच जमिनीवरची, मातीपासून बनलेली माणसं खरा देव कोणाचा यावरून भांडतात.  आणि त्यात श्रेष्ठ कोण ह्याची चर्चा मात्र ए.सी. रुममध्ये बसलेल्या पांढर्या कावळ्यांमध्ये होते.  पण साईबाबांनी काय म्हटलंय? सबका मालिक एक.. तो सगळीकडे आहे आणि सगळ्यांचा आहे.. तो एकच आहे.
     बरं हे फक्त धर्मा-धर्मातच नाही तर धर्म आणि कर्मातही होतं.  आपण असं समजू की धर्माच्या विरुद्ध नास्तिक म्हणजे कशावरच श्रद्धा नसणारे असावेत आणि कर्माच्या विरुद्ध देवावर सगळी व्यथा सोडलेले असावेत.  दोघेही एकमेकांसाठी तितकेच घातक.  पण धर्म काही कर्मापासून वेगळा ठेवता येत नाही.  जसे आपण न आवडणार्या माणसापासून दूर राहू शकत नाही, अगदी तसंच.  निवड असते ती आपली - धर्म पाळायचा की त्याचं अधर्म होऊ द्यायचं.. आणि सुकर्म करायचे कुकर्म... देव आणि धर्मामुळे शांतता मिळते आणि कर्मामुणे व्यक्तिमत्व.
     तर जसं एकाच शरीराचे दोन भाग विसंगत वागून चालत नाही, तसंच आपलंही आहे आणि हे जेवढं लवकर समजेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे.

Saturday 27 February 2016

निवृत्ती पश्चात आयुष्य...

     आज निवृत्तीला दोन महिने पूर्ण झाले.  तसं नवीन डायरीमध्ये पहिलंच वाक्य निवृत्तीचं लिहायला कारण म्हणजे ती एकच गोष्ट सद्ध्या मोठी वाटतेय.  निवृत्त झालो म्हणजे मोकळं, रिकामं झालो आणि हेच कारण ठरलं डायरी लिहायला.  दिवसभर खूप रिकामटेकडं वाटतं.  तसं निवृत्ती मिळाल्या मिळाल्या रिकामं वाटू नये म्हणून बरेच उद्योग केले.  मॉर्निंग वॉक, ग्रंथालय, मित्रांच्या घरी जाणं, गप्पा मारणं, मग इविनिंग वॉकदेखील करुन पाहिला.  पण नवीन वर्षाच्या संकल्पासारखं सगळं उत्साहापोटी चालू झालं अन् पुन्हा त्याच त्याच गोष्टींच्या कंटाळामुळे मोडकळीसही आलं.  म्हटलं आता आराम करायला मिळतोच आहे, मग संधी का सोडावी? आयुष्यभर एवढी पायपीट केली, आता पुन्हा नियमितपणाचं बंधन का ठेवावं? पण काहीच करायचं नाही असाही याचा अर्थ नाही बरं का.  बेधुंद म्हणजे काही सतत झोपून, आळशी राहणं नाही.  बेधुंद म्हणजे आपल्याला हवं तसं जगणं, हवं तसं राहणं, हवं ते करणं, हवं तिथे जाणं; नोकरीच्या धावपळीत असं मनासारखं जगताच आलं नाही.  म्हणून आता मी ठरवलंय, उरलंय ते फक्त माझं आयुष्य आहे, आणि मी ते हवं तसं जगणार आहे.  पण असं असतानाही कधी कधी फार रिकामटेकडं वाटतं.  मग एकट्याने फार आठवणी जाग्या होतात.  बालपणीच्या, तरुणपणीच्या, सगळ्याच आठवणी अशा डोळ्यांसमोर येतात.  म्हटलं लिहायला घेतलं तर आठवणींचा संग्रह प्रत्यक्ष समोर राहील आणि ते लिहतानाही तेवढाच विरंगुळा!  तसंही कोणीतरी म्हटलंच आहे, "Great Stories Happen To Those Who Can Tell Them."  आता स्वत:च स्वत:ला आपल्या गोष्टी सांगण्यातही काय गंमत आहे, बघुच.
     सुरवात कुठून करु या विचारात होतो, आणि आमच्या श्रीमती समोर आल्या.  पण सुरवात अन् शेवट दोन्हीही त्यांच्यानेच होतो असंच वाटू लागलंय आता मला.  कारण आज माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत तीच आहे माझ्यासाठी, माझ्या हक्काची मैत्रिण.  खरं तर हे सारं मला हल्लीच समजू लागलंय.  याआधी कधी कोणी आपल्या आणि स्वत:च्याही शेवटापर्यंत साथ करील याचा विचारही नव्हता, तो करायला वेळही नव्हता.  कारण मी कोणी फार विचारवंत लेखक किंवा तत्वज्ञही नाही.  साध्या मिलमध्ये काम करणारा कर्मचारी मी.  शिकत असतानाही अभ्यासाच्या बाहेर कधी विचार केला नाही.  पण निवृत्तीनंतर फार प्रगल्भ विचारवंत असल्याचा किंवा तसा आव आणल्याचा मला भास होतो.  रिकामं असल्यावर मन कसं सगळ्याच गोष्टींचा फार खोल आणि निरागस विचार करतं.  त्यादिवशीही तसंच झालं; काही नव्हतं म्हणून मुद्दाम हालचाल करण्यासाठी आमचं जुनं कपाट उघडलं.  फार धूळ साचली होती सगळ्यावरच.  फाईल्स, पुस्तकं, फोटो अल्बम, सारं काही कपड्यानं झाडत, एक एक चाळत बसलो होतो.  बसलो त्या ठिकाणी अवती-भवती सगळी अडगळ तशीच जमा होती.  तरी ती साफ करण्याची मला गरज वाटली नाही.  पहिले सगळ्या फाईल्स चाळून पाहिल्या ते कोणती एखादी जमीन राहिलीय का प्रॉपर्टीमध्ये तेच तपासायला.  आयुष्याच्या उत्तरार्धातही किती लोभ असावा माणसाला! हे कळत असुनही मन काही वळलं नाही.  शेवटी फाईल्सच संपल्या.  मग फोटो अल्बम्स पुस्तकांपेक्षा कमी होते म्हणून ते घेतले.  पहिल्या अल्बममध्ये माझ्या मिलच्या मित्रांसोबतचे फोटो होते.  सगळे ब्लॅक अॅंड व्हाईट असल्याने दिसत नव्हते ते फारसे.  पण बर्याच जणांना ओळखले मी.  ते फोटो एकविरा आणि जेजुरीचे होते.  तेव्हा कामाची जागा म्हणून देवदर्शन आणि आता तेव्हाचं वय राहिलं नाही म्हणून देवदर्शन.
     एक अजुनही टिकून असलेला, आणि इतरांपेक्षा बरा वाटणारा अल्बम हाती आला.  पहिलंच पान उघडलं तर मी आणि आमचं कुटूंब - लग्न लागताना.  पहिलं लक्ष गेलं ते स्वतःकडेच.  कारण कुठे का असेना, आपण कसे दिसतो हे पाहण्याचा मोह कोणत्याच वयात दूर ठेवता येत नाही.  असो, तर पाहताना कळालं, किती बारीक होतो मी तेव्हा.  अठरा - एकोणीसचा असेन, तेव्हा लग्न लावलेलं माझं.  का? तर जबाबदारी अंगावर घ्यावी म्हणून.  आताच्या काळात तर या वयात मुलींचंही लग्न करू देत नाहीत.  का करावं?  त्या काळी शिक्षणाची वर्षे फार नव्हती, पण आता आपल्याला हवं तसं, हवं तिथे, अगदी परदेशातही शिक्षणाची संधी मिळते; मग ते सोडून जबाबदारीच्या नावाखाली का कोणी लग्न करावं?  मी केलं, पण माझ्या मुलामुलींना मी योग्य तसं शिक्षण दिलं म्हणून फार समाधानी वाटलं मला त्या क्षणी.  अन् तेवढ्यात नजर गेली ती मान खाली घालून, कोवळ्या, बारीक हातात जाड वरमाळा धरून असलेल्या आमच्या श्रीमतींकडे.  पंधरा - सोळा वर्षांची ती नाजूक कळीसारखीच भासली मला.  ब्लॅक अॅंड व्हाईट फोटो असला तरी चेहर्यावरचे भीतीचे भाव मात्र स्पष्ट दिसत होते.  तरी मी लाईट लावायला म्हणून उठलो आणि उठता उठता कमरेत कळ आली, तशी तिला हाक मारली.  त्या वेदनेतच तिच्या सवयीची जाणीवही पहिल्यांदाच झाली अन् स्मित उमटले.  तिच्या सोळाव्या वर्षांपासून अन् माझ्या एकोणीसाव्या वर्षांपासून दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती.  मी कामावरून येणार, ती एका हाताने माझी बॅग घेणार आणि दुसर्या हाताने पाण्याचा ग्लास पुढे करणार.  हा एक कधीही न बदलणारा नाटकीय scene नेहमीच न चुकता आमच्याकडे चालत असे.  माझ्या प्रत्येक कामाला, नवीन गोष्टीसाठी प्रोत्साहन देणं, काही फारच चुकत असेल तर एकांतात समजावून सांगणं - जे मी फारसं ऐकत नसे, आणि तरीही माझ्या प्रत्येक अडचणीत मदत, प्रत्येक हाकेला ओ देणं कधी सुटलं नाही.
     उठलो आणि लाईट चालू करायला आणि ती समोर यायला एकच क्षण गेला.  फोटोमध्ये दिसत होती तशीच नाजूक, रेखीव... अजुनही तशीच.  क्षणभर डोळे दिपून गेले.  पण ते क्षणभरच.  म्हातारा झालो असलो, निवृत्त झालो असलो तरी मनातलं चेहर्यावर आणून न देण्याचा मूळ स्वभाव पुन्हा जागा झाला.
   "अहो काय झालं?  हाक का मारली?"
   "तुला ऐकू गेली?"
   "हो म्हणून तर आलेय ना.  आणि हे काय, किती पसारा केलाय.  का ते कपाट उघडलं?  किती धूळ आहे यात."
     स्वारी लगेच सगळं सामान उचलून आत ठेवायला लागली.  पण मी अजुनही फोटो आणि प्रत्यक्ष हीचं रूप पाहण्यात शुद्ध हरवली होती.  अन् नकळत शब्द फूटु लागले - 'किती करतेस गं माझ्यासाठी.  अर्ध्याहून जास्त आयुष्य माझ्यासोबतच गेलं तुझं.  मी आणि मुलं.  बास ना आता.  हे बघ, आपण आपल्या लग्नाचा अल्बम बघू.'  तिला ओढतच खाली बसवलं.  तिच्या चेहर्यावर आनंद आणि लाजेची छटा पाहण्यासारखी होती.  पुढच्या, मोठ्या मुलाच्या बारश्याच्या वेळच्या फोटोमध्ये होती, अगदी तशीच.  प्रत्येक फोटो वेगवेगळ्या आठवणींचा, अन् आनंदाचा.  त्यातही तिला आनंद तो मी तिला हे फोटो दाखवतोय त्याचा.  खरंच, पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात हे आता, अर्ध - अधिक आयुष्य संपल्यावर कळतंय.  पण अजुन आयुष्य उरलंय अन् ते आपण तिच्यासोबत जगणार आहोत याचा आनंद मोठा.

Tuesday 26 January 2016

अभ्यासापलिकडे आणखी काही...

     कॉलेजमध्ये फेस्टिवल्सचं रणांगण पेटलं होतं.  सगळे योद्धे युद्धाची तयारी करत होते.  काही वीर PR च्या वर्कशॉपमध्ये बोलण्याची कला शिकत होते, तर काही sponsorship साठी लोकांना लाडीगोडी लावण्याची training घेत होते.  खुद्द रणांगणावर जाणारे योद्धे आपली युद्धनीती ठरवत होते, तर बाकीचे त्यांच्यासाठी शस्त्र आणि त्यांची संख्या ठरवत होते.  पण युद्धातले खरे योद्धे, आपल्या कुशल कारागीरीने, कलेने संपुर्ण रणांगण सजवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, ज्यांना इथे कलाकार असे प्रांजळपणे म्हटले जाते, ते सभेत काही दिसले नाही.  कसे दिसणार?  त्यांनी आपलं काम केव्हाच सुरु केलं होतं.  ना कोणत्याही training ने, ना lectures घेऊन वा देऊन!  आणि शिक्षणाच्या अटीला न जुमानता, आवडतं तेच करणारे, आवड म्हणून करणारे असे हे मुळचे कलाकार आवडीने आपल्या कामाला लागले होते.  कारण ढीगभर पुस्तकं आणि इंटरनेटवरची अफाट माहिती या ही पलिकडे असते ती आवड.
     आवड ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय, आपल्याला परिपूर्ण करणारा असा अभ्यासही, आवडीशिवाय होत नाही.  अगदी मान्य, की, अभ्यासाशिवाय ना आपण डिग्री मिळवू शकत, ना कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकत.  पण आवड असल्याशिवाय आपण अभ्यासही करू शकत नाही, आणि अभ्यास केलाच, तर एक कृत्रिमता त्या अभ्यासातून, कामातून नेहमीच जाणवत राहते.  एखादी गोष्ट आपल्याला आवडत असते, आपण ती गोष्ट, ती सवय जोपासतो.  पण त्याचं शिक्षण घेणं, अभ्यास करणं गरजेचं समजत नाही.  अशा गोष्टी एकतर कलाकुसरीच्या क्षेत्रात म्हणजेच creative field मध्ये येतात, नाहीतर आपण करू न शकलेल्या गोष्टींच्या यादीत जमा होतात.
     आपल्यापैकी बर्याच जणांच्या अशा यादीमध्ये नृत्य, गायन, अभिनय, क्रिकेट या गोष्ट नक्कीच असतील.  इतकंच काय, बर्याच जणांना recipe books मधून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायलाही आवडते.  पण cook, chef होतात ते काहीच जण.  पण म्हणून recipes बनवायचे कोणी थांबत नाही; नाचायचे, गायचे कोणी थांबवत नाही.  अशा आवडी नेहमीच सवडीने पूर्ण केल्या जातात.  अन् मग त्याच एकांतासाठी, एकांतात सोबती म्हणून, कामापासून थोड्याशा विरंगुळ्यासाठी, नेहमीच सोबत असतात, पण नाव मात्र येतं छंद म्हणून.
    पण आवडीला छंदाचं नाव देऊन चालणार नाही.  कारण ज्यात आपण शिक्षण घेत असतो तेही आवडीचंच क्षेत्र असतं.   आता मी journalism करते आहे आणि आतापासूनच कॉलेजच्या वर्तमानपत्रात काम करते, तसंच कॉलेजच्या फेस्टिवल्समधूनही मला पुढच्या आयुष्यासाठी अनुभव मिळत आहेत.  असे events, festivals आपण अभ्यास सोडून आणि lectures bunk करून जरी करत असलो तरी यांमधूनच जगासोबतचं खरं connection आणि त्यांचं व्यवस्थापन याचं प्रात्यक्षिक मिळतं, जे अभ्यासापलिकडचं असतं.