Saturday 7 April 2018

प्रश्नांमागचा Propaganda


आज सकाळी ट्रेनने दादरला जात होते. सारं काही नेहमीचं. धावपळ, गोंधळ. ट्रेनसाठी कटकट, ट्रेनची कटकट, ट्रेनमधली कटकट. आवाज, आवाज, नुसते आवाज. सोबतीचेच झालेत ते आता. नसले की उलट चुकल्यागत वाटतं. सगळ्या आवाजात घाटकोपर गेलं तेव्हा काही वेगळं ऐकू आलं. मागूनच ऐकू येत होतं. पण आपण नुसतं ऐकायचं. ट्रेनमध्ये गर्दीतले चेहरे तसेही विरून जातात. म्हणून बघायचे कष्टही घेतले नाहीत. ऐकू येत होतं.

काय रे, एकटाच आहेस? सोबत कोण आहे?”
कौन है तेरे साथ? मम्मी बैठी है अंदर?”
अकेला है? किधर से चढा?”
उल्हासनगर से door पे ही है?”
कहा जा रहा है?”
वापी? गुजरात?”
वहा पे कौन है?”
मम्मी है?”
तो उल्हासनगर मे किसके साथ रहता है?”
मौसी को पता है तू अकेला ट्रेन मे जा रहा है?”
मौसी नही आयी छोडने को?”
स्कूल जाता है?”
अकेला कैसे जायेगा गुजरात में?”
दादर में पापा है?”
पापा रुके है? वो लेके जायेंगे? ठीक है|”
पापा के साथ ही जाना हा, ऐसे अकेले कभी जाना नही|”

आवाजांच्या बदलत्या माहितीने माझ्या भावनाही बदलत होत्या. एकटा, 10-12 वर्षांचा जीव, एवढ्या गर्दीत रिकाम्या मनात निरर्थक प्रश्न सोसत होतं. पण हे संपणार आहे. काही वेळाने दादर येईल. तो पप्पांना भेटेल. आईकडे जाईल. मित्रांना भेटेल. मन बालपणात शिरतं न शिरतं तोच आवाज पून्हा वर्तमानात घेऊन आला.

नाम क्या है तेरा?”
आं? मुसलमान है?”
तभी ऐसा अकेला भटक रहा है| और तेरी मौसी को, पापा को, किसी को फिकीर नही है| तेरे धर्म में ना सब ऐसे ही है|”

बालपणात गेलेलं, मोकळं, अंहं, रिकामं मन, पुन्हा जहरभरल्या वर्तमानात आणल्याचा पश्चाताप झाला. डोक्यात सणक गेली. याआधी मागे पाहिलं नव्हतं. आता पाहायची ईच्छा उरली नाही. तरी आवाज येतच होते, आणि बधिर करतच होते.

गुजरात के मुसलमान हो?”
पंजाबी हो?”
“Non-veg खाते हो?”
तुम्हारा भगवान कौन है?”
वो वाहेगुरु? कि गुरु गोविंद सिंग?”
अरे रो क्यों रहा है?”
मम्मी की याद आ रही है?”
आठवण येत असेल हो...

आता सहन करणं शक्य नव्हतं. कोणीतरी हे थांबवणं गरजेचंच होतं. तसंही दादर येत होतंच. मी उठले आणि त्या आवाजाला काहीसं चिरडलंच.

अहो का त्या पोराला धर्मात अडकवतायत? स्वतः तर जाती-धर्माचा चोथा केलाय. का हा गोंधळ त्याला दाखवताय? कळलंय, बाप आहे त्याचा घ्यायला स्टेशनवर. जाईल त्याचा तो. देव बिव काय विचारायची गरज आहे का?”

हिला काय झालं मध्येच?”

मुसलमानाला मुसलमान नाहीतर अजून काय बोलणार?”

आम्हाला पण मराठे बोलतात ना. मराठेच आहोत आम्ही.

तुम्हाला बोलले का तुमचा धर्म किती गचाळ आहे? बोलले तर आत्ता ढकलून द्याल मला गाडीतून. त्या पोराला बोलताय. त्याला देवाचा अर्थही माहित नाहीये. आणि आईची आठवण ना तुमच्या या फालतू प्रश्नांनी येतेय त्याला. मुर्ख कुठचे.

तरी बरंच बोलायचं होतं. पण लोक खरंच मुर्ख असतात. बदलापूरला नीट चढायला मिळालं, बसायला ठाणे सीट मिळाली, दादरला नीट उतरायला मिळालं तेच पुरे होतं त्यांना.

गर्दीला चेहरे नसतात, पण मन असतं. एकंच नाही, अनेक. वेगवेगळ्या प्रकारचे मन. ते वळवायचं काम जेव्हा राज्य चालवणारे आणि ते चालवू पाहणारे करतात, तेव्हा ते अशाच गर्दीच्या मनांतून दिसतात. आपण कितीही म्हटलं, सोशल मिडिया लोकांवर तात्पुरता प्रभाव टाकते वगैरे. तरी तो प्रभाव हळूहळू वाढतही असतो, आणि खोलात जातही असतो. ही खोलात शिरण्याची प्रक्रिया बघायला मिळणं भयंकर आहे. इतके वर्ष पेरलेलं विष खोलवर पसरतंय, हेच दिसलं आज.

मागे भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर काढलेल्या मोर्चातला एका लहान मुलाचा व्हिडियो वायरल झालेला. त्याआधीही, मराठा मोर्चात लहान मुलांचे मोठे डोळे करून, भावनिकरित्या भडकवणारे फोटो वायरल झाले होते, घोषणा वायरल झाल्या होत्या. गोष्ट कोणतीही असो, ती लहान मुलांच्या रुपात आली की भीती वाटते. कारण, लहान मुलांचं मन रिकामं असतं. त्यात आपण जे भरू तशीच आणि त्याचीच प्रतिक्रिया ते देतात. त्यामुळे आपण विष पेरावं की आणखी काही, याचा विचार करावा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे.

आपण म्हणू, What’s App वरचे forwarded message सगळ्यांना forward करणाऱ्या लोकांना काही कळत नाही. त्यांना कळत असतं खरं तर, म्हणूनच ते अचूक target बनतात. पाहिलं ते मान्य करणारी जानता म्हणूनच २०१४ मध्ये मोदीला निवडून आणते. आणि आता हीच जनता त्यांना किती वैतागलीय ते सतत निघणाऱ्या मोर्चांतून दिसत आहेच. समोर पाहिलेलं मान्य करणारा माणूस तर्क शोधू लागला तर काय होईल माहित नाही. पण तर्कहीन राहून, डोळ्यांना पट्टी लावून राहिलेल्यांमुळे देशात अराजकता माजेल हे नक्की.

वर्षानुवर्षे चालू असलेल्या propaganda मधून खोलात जाणारं brainwash आता अशा लहान मुलांच्या आणि ट्रेनमधल्या गर्दीच्या आवाजांतून ऐकू येतायंत. हे आवाज वाढण्याआधीच बंद करावे वाटतात. पण मानवतेला आता इथे जागा नाही. अंतराळाचीही नाही.