अवघ्या आसमंतात जेव्हा परकीय अन्यायाचे ढग जमले होते, तेव्हा अचानक निसर्गाने आपल्या मुक्त रंगांची उधळण केली. त्यांत रंग होते सुखाचे, समृद्धीचे अन् स्वातंत्र्याचे. निसर्ग रणसंग्रामासाठी सज्ज झाला. ढगांनी नगाडे वाजवले. कड्याकड्यांवरच्या धबधब्यांनी ताशांचा ठेका धरला. वाऱ्याने तुतारीची नाद दिला. ताऱ्यांनी आकाशमंडल सजवले. सुखाच्या दिवसांची नांदी खुद्द निसर्गदेवतेने करून दिली. तो दिवस होता सह्याद्रीच्या पोटात नवसंजीवनी रुजण्याचा. तो दिवस होता अंधाऱ्या शतकात सूर्याचा अंश दीपवण्याचा. त्या दिवसाला उपमा शक्य नाही. त्या क्षणाचे वर्णन शक्य नाही. वर्षानुवर्षे परकीय राजवटींचा अन्याय सहन करणारा प्रत्येक क्षण आज शिवनेरी भोवती घिरट्या घालत होता, वाट पाहत होता त्या एका शुभ क्षणाची. तो शुभ क्षण जन्म घेत होता, जिजाबाईसाहेबांच्या पोटी. तो क्षण जो सूर्याच्या उत्तरायणात यावा अन् अवघा कौस्तुभाचा व्हावा. तो शुभ क्षण, जो यायला कित्येक वर्षे लागली. तो क्षण फाल्गुन मासातील वद्य तृतीयेचा. तो क्षण शुक्ल संवत्सराच्या महिमेचा. तो शुभ क्षण आला.. संवत्सर जनलोकात आले.. आऊसाहेबांच्या उदरी शिवबा जन्मले...
फाल्गुन वद्य तृतीयेच्या संध्याकाळी, सूर्य अस्ताला गेलेला... अन् तेव्हाच शिवबांच्या रुपाने नवसुर्याचा उदय झाला. नवपर्वाचा उदय झाला. अस्मानी संकटांशी झुंझण्यासाठी तेजोमय शिवपर्वाचा उदय झाला.