हंपी म्हणजे देवालयांची, मंदिरांची, खऱ्या अर्थाने देवभूमी! ठिकठिकाणी लहान-मोठी देवालयांच्या, तिथल्या संस्कृतीची कथा सांगणाऱ्या शिल्पांनी परिपूर्ण देवालयं, असंख्य मंदिरं. अशा या समृद्ध शहराच्या मध्यभागी, जणू हंपीचं हृदय असल्यागत अजुनही धडधडत आहे, हजार राम मंदिर. शब्दशः श्रीरामांची हजार शिल्पचित्रे असल्यासारखं भासवणारं हे मंदिर. विजयनगर साम्राज्याची राजा दुसरा देवराय याने पंधराव्या शतकात हे मंदिर उभारलं. असं म्हणतात, राज कुटूंबाचं हे मंदिर होतं. तसं पाहायला गेलं तर हे मंदिर राजवाड्यापासून काही अंतरावरच आहे. आणि ते पाहून मान्य करणंही भाग आहे. हंपीतल्या इतर देवालयांपेक्षा लहान असलं तरी या हजार राम मंदिरात प्रचंड कला कौशल्य पाहायला मिळते, आणि त्यावर कारागिरांचे अतोनात कष्टही राजकुटूंबाच्या या मंदिराला शोभेसेच आहेत.
मंदिरात प्रवेश करण्याआधीच त्यात दडलेल्या, प्रगत साम्राज्याची ग्वाही मिळते. मंदिराच्या कंपाऊंडच्या भिंतींवर अतिशय रेखीव चित्रे कोरली आहेत. ही चित्रे अखंड भिंतींवर आहेत, हे विशेष. यात तत्कालीन संस्कृती, सामाजिक व वैचारिक बूद्धी लक्षात येते हे आपल्याला माहित आहेच. हे सारं आपल्याला त्यांची वेशभूषा, केशभूषा, शिल्पांत मांडलेल्या घटना व कथांवरून कळतं. या साऱ्यांचे अर्थ काढत, अंदाज बांधत मी हंपीत एक-एक चित्र पाहत होते. पण इथे, हजार राम मंदिरातल्या या कंपाऊंडच्या भिंतींवरील चित्रे पाहून काही वेळ अगदी अवाक् झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर संपूर्ण स्त्रियांची शिल्पचित्रे कोरली होती. त्यात तसं आश्चर्यचकित वगैरे होण्यासारखं काही नाही. कारण भारतात बऱ्याच ठिकाणी नृत्यांगनांची शिल्पचित्रे पाहायला मिळतात. स्त्रियांचा कला व संगीत क्षेत्रातील सहभाग मोठ्या प्रमाणावर शिल्पचित्रांत आणि अनेक पुरातन माध्यमांत दिसून येतो. पण इथे अखंड भिंतीवर स्त्रियांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील सहभाग पाहायला मिळतो. त्यातही तलवारी, भाले, धनुष्यबाण घेऊन लढाईसाठी सज्ज असलेल्या स्त्रिया विशेष आहेत. इतकंच नव्हे, तर घोडेस्वारी करणाऱ्या, हत्तीवर कुशलतेने स्वार स्त्रियाही विलक्षण आहेत. पुरुषी मानली जाणारी हत्यारं हातात बाळगून लढणारी ही स्त्री शिल्पे पाहून अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण हत्यारं हातात घेऊन लढण्याची ताकद आणि कर्तुत्व फक्त पुरुषांमध्ये आहे असे विचार रुजलेल्या देशात पंधराव्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील हंपीसारख्या शहरात असे शिल्प दिसणे म्हणजे आश्चर्यासोबतच अभिमानाची बाब आहे. स्त्रियांचं असं सर्वव्यापी असणंही, तेही पंधराव्या शतकात, जेव्हा परकीय राजवट व इस्लाम आणि मनुस्मृतीचे सावट अवघ्या देशावर होते, तेव्हा या हंपीतील चित्रांची निर्मिती नक्कीच गौरवपूर्ण आहे.
स्त्रियांच्या युद्धातील सहभागासोबतच, त्यांच्या कलेतील सहभागाचेही दर्शन घडते. नृत्य, संगीत, अशा कलांमध्येही त्या निपुण होत्या हे आपल्याला इतर शिल्पांतूनही पाहायाला मिळाले आहेच. पण बासरी, डफली यांसारखे पुरुषी म्हणवले गेलेले वाद्य स्त्रिया अगदी सहज हाताळत असल्याचं दिसतं. मला यात प्रचंड आवडलेलं, बासरी वाजवत, कृष्णाच्या मधुरधूनेत तल्लीन झालेल्या स्त्रीचं सुंदर चित्र. तिचे बंद डोळे, हात आणि पायांची ठेवण आणि विशेषतः संपूर्ण शरीरात दाटून आलेला रोमांच ते चित्र पाहताना प्रखरतेने जाणवतो. एक नृत्यांगनाही अशीच मोहक आहे. तिच्याही नृत्यात मग्नतेची, समर्पणाची भावना दिसते आहे. खरंच, दगडात कोरलेली भावनाचित्रे आहेत ही.
मला अजुन एक आवडलेलं सुंदर चित्र मंदिराच्या भिंतीवर बाहेरील बाजूला, ते म्हणजे बाळकृष्णाचं गोंडस चित्र. खालील दोन्ही चित्रे इतकी सुरेख आहेत की खरंच कृष्ण लहान असताना असाच गोंडस आणि खट्याळ असावा असं वाटतं. त्याच्या कुरळ्या केसांपासून गुबगुबीत गाल आणि पोटाच्या ठेवणीपर्यंत प्रचंड आकर्षक असं हे शिल्प आहे. बाळकृष्णाची कथाच बाहेरील खांबांवर चितारली आहे.
मंदिरात विष्णुच्या अनेक अवतारांच्या कथा अगदी सहज कळतील अशा कोरल्या आहेत, आणि विशेष म्हणजे, ऊन-पाऊस-वारा सोसूनही इतक्या शतकांनंतरही त्या पुसट झाल्या नाहीत. मंदिराच्या दुसऱ्या द्वारातून आत आल्यास डाव्या बाजूच्या भिंतीवर वराहमित्रांची कथा चितारली आहे. तीही विशेष पाहण्यासारखी आहे. तर मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर अनेक ठिकाणी श्रीरामाची कथा वेगवेगळ्या वेळेची, वेगवेगळ्या पर्वाची कथा दाखवली आहे. अनेक ठिकाणी रामांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, रामायणातील अशी अनेक पात्रं कोरून त्यांना विशेष महत्व असल्याचं दाखवून दिलं आहे. काही ठिकाणी अगदी तळहाताहून लहान शिल्पचित्रे कोरली आहेत. त्यात श्रीरामांचीही आहेत. ही लहान, पण दागिन्यांसकट स्पष्ट दिसणारी चित्रे विलक्षण रेखीव आहेत.
इतकं आकर्षक मंदिर पंधराव्या शतकात दुसऱ्या देवरायने बांधलं असलं, तरी मुसलमानांनी त्यांच्या विकृत धर्माच्या प्रसारासाठी भग्न केलं. हे मंदिराच्या आवारात प्रवेश करताच, अभिमानाने जी मान वर जाते, ती कळसाच्या शिल्पांचा भग्न अवतार पाहून दुःखाने खाली येते. अतिशय विकृतपणे या शिल्पमूर्तींची विटंबना केलेली दिसते. शेजारीशेजारी असलेल्या शिल्पमूर्तींचे चेहरे तर लागोपाठ एका आघातात पाडलेले दिसतात. अत्यंत असहाय्य वाटतं ती शिल्पं पाहून. आणि शिल्पांकडून नजर काढून समोर मंदिराती गाभाऱ्याकडे लक्ष गेलं की त्यातील नसलेल्या देवाला एकदा तरी आठवल्याशिवाय राहत नाही. एकदा भग्न झाल्यावर पुन्हा या मंदिरात कधी देव बसलेलाच नाही. त्या बंद गाभाऱ्याला नमस्कार करून बाहेरील सगळी अनमोल चित्रे पाहायचं भाग्य मिळालं यात आनंद मानायचा, इतकंच.