Monday, 10 December 2018

सुवर्णदुर्ग : समृद्ध इतिहास आणि वर्तमानातील अवस्था


हर्णै बंदरावर गेल्यावर एका ठिकाणी एक बोर्ड वाचायला मिळतो. वीर कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातील किल्ले सुवर्णदुर्गची सफर. सोबत डॉल्फिन व समुद्र सफर असं काहीतरी. तुम्ही दहा लोकांचा ग्रुप होईपर्यंत तिथे थांबता, बोट सुरु होते आणि तुम्ही डॉल्फिनचं अर्धमुर्ध डोकं पाहत, सुवर्णदुर्गापाशी पोहोचता. महादरवाजापासून गवताची चाहूल लागते ती आत ५ फूट उंचीच्या गवतापर्यंत मजल जाते. प्रत्येक वास्तूला घेरलेलं गवत आणि झाडं. तटबंदी व बुरुजाच्या प्रत्येक दगडावर या झाडांची दहशत आणि किल्ल्यावर बंदरावरल्या माणसांची दहशत.

सुवर्णदुर्गचा महादरवाजा


१६६० मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला. यावर अनेक गोड्या पाण्याचे तळे आहेत, विहीर आहे, तटबंदीभोवती खंदकं आहेत, धान्य कोठार, चोर दरवाजा आणि बरंच काही आहे. एक जलदुर्ग म्हणून सर्वतोपरी मजबूत किल्ला आहे. पण हे सगळं पाहायला आपण तटबंदीवरून खाली उतरू शकत नाहीत, ना पूर्ण किल्ला धड पाहू शकत. याची दोन मुख्य कारणे – एकतर प्रचंड गवत आणि दुसरं म्हणजे नावाड्याने किल्ला पाहायला दिलेली ३० मिनिटे! ३० मिनिटांत ८ एकरचा हा विस्तृत किल्ला पाहायचा. ३० मिनिटांत एरवी आमच्या लग्नाचे फेरे घेऊन होत नाहीत, आणि ३० मिनिटांत आम्ही किल्ला फिरून यायचा. बरं ही सवय काही आपसूक लागली नाही. लोक अर्धा फेरा मारून किल्ल्याच्या बाहेरही पडतात. का? तर बघायला काही नाही. आणि बघायला का नाही? तर संपूर्ण किल्ल्यावर झाडं आणि गवत वाढलंय. एकही वास्तू नीट पाहता येत नाही. आणि वास्तू दिसली नाही की अर्थात आमचे शिवभक्त कंटाळून डॉल्फिन बघायला बाहेर येतात.


सुवर्णदुर्गावरील अवशेष


हीच अवस्था समोरच्या कणकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ल्यांची आहे. गोवा किल्ला त्यातल्या त्यात तग धरून आहे. पण कणकदुर्ग आणि फत्तेगड मधला कणकदुर्ग कोणता आणि फत्तेगड कोणता हेसुद्धा कळत नाही. तिथल्या पायऱ्यांवर गोधड्या आणि मासे सुकत घातलेले आणि पाण्याच्या टाक्या नेहमीप्रमाणे गाळ आणि शेवाळाने भरलेल्या. एखाद दुसरी तटबंदीची भिंत सोडली तर तिथे काहीच नाही. जिथे बीएसएनएलचं टॉवर लावण्यासाठी एखाद्या नेत्याचे आभार मानणारं पोस्टर लावलं जातं, पण रस्त्यांची अवस्था बेकार असते, त्या ठिकाणी अजून काय अपेक्षित असावं?


गोवा किल्ला


एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण तेव्हाच होते जेव्हा स्थानिक लोकांना त्या किल्ल्याबद्दल, त्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत काहीतरी आपुलकी, आदर असतो. इथे ते काहीच दिसत नाही. हर्णैमध्ये साधारण मच्छीमारांचीच वस्ती आहे. त्यांचा रोजगार मच्छीमारीवरच जास्त असतो. पण ज्या समुद्रातून आपला उदरनिर्वाह होतो त्या समुद्रातला आपलाच इतिहास ते पूर्णपणे विसरलेले दिसतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या होड्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फेरीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही आपली वेळ त्यांच्याच हातात. मी इथे प्रशासनाला जबाबदार ठरवत नाही असं नाही. पण प्रशासनही माणसंच चालवत आहेत. पृथ्वीवर सध्या माणसाच्या इच्छेनुसारच बरंच काही सुरु आहे. त्यामुळे किल्ल्याची अवस्था वाळीत टाकलेल्या वाड्यासारखी झालेली पाहताना दोष फक्त आणि फक्त माणसांना द्यावासा वाटतो.

एकेकाळी सोन्यासारखी समृद्धी पाहिलेला सुवर्णदुर्ग आज दगडांचं एक बेट उरला आहे, ज्याची अवस्था पाहायला लोक जय शिवराय म्हणत येतात अन् फक्त गवतातले दगड पाहून जातात. इथे ना इतिहास उरलाय, ना आता वर्तमान. उरलाय तो फक्त निसर्गाचा नियम – जिथे पाणी, तिथे जीव.