Wednesday, 6 March 2019

रिक्षा, ती आणि तिचा orgasm

काही दिवसांपासून रिक्षातला 'तो' व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यावर प्रचंड विनोद, टिका आणि मीम्स सुरु आहेत. 'चार भिंतींमध्ये करण्याच्या गोष्टी' किंवा त्यांनी रिक्षात केलेलं ते चूक कि बरोबर यात मला शिरायचंच नाहीये. उलट यातून वेगळाच विषय समोर आणण्याचा प्रयत्न आहे. तो म्हणजे, 'तिचा orgasm', Female Orgasm!




स्त्रियांचा परमोच्च बिंदू (female orgasm) म्हणजे काय?


मूळात सेक्स म्हणजे काय? प्रणयक्रीडा (fore play) आणि संभोग (intercourse) यांची मिळून बनलेली साधी व्याख्या म्हणजे सेक्स. मराठीत याला प्रणय म्हणतात. या प्रणयात संभोग (intercourse) जितका महत्त्वाचा, तितकीच   प्रणयक्रीडा सुद्धा (fore play) महत्त्वाची असते. कारण सेक्सची सुरुवात  प्रणयक्रीडेने (fore play) झाली तर तो सेक्स अधिक आरोग्यदायी आणि जास्तीत जास्त आनंद देणारा होतो. आणि याच प्रक्रियेने पुरुष आणि स्त्री दोघांनाही परमोच्च बिंदू सापडते, orgasm मिळतो. परमोच्च बिंदू (orgasm) म्हणजे सेक्समधून मिळणारा सर्वोत्तम आनंद. हा आनंद घेण्यासाठी दोघांच्याही शरीरात pleasure points आहेत. पुरुषांचा pleasure point हा संभोग करताना उद्युक्त होतो, आणि तेव्हा त्यांना पुरेपुर आनंद घेताही येऊ शकतो. पण स्त्रियांचा pleasure point हा संभोग करताना फार कमी वेळा उद्युक्त होतो. कारण संभोग (intercourse) हा त्या pleasure point च्या मार्गात येत नाही.


अनेक सर्वेक्षणांनुसार, भारतातील सेक्स करणाऱ्या पुरुषांपैकी तीन चतुर्थांश पुरुषांना संभोगातून orgasm मिळतो, आणि हाच आकडा स्त्रियांच्या बाबतीत एक चतुर्थांश इतकाच राहतो. या एक चतुर्थांश स्त्रियांना orgasm कसा मिळतो? तर संभोगाच्या वेळी किंवा fore play च्या वेळी योनी उत्तेजित करून म्हणजे clitoris stimulation ने स्त्रिया परमोच्च बिंदू orgasm मिळवतात, आणि काहीवेळा त्या orgasm च्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही पोहचू शकतात. आता योनी उत्तेजित करणे (clitoris stimulation) म्हणजे काय? तर तुम्ही रिक्षातल्या व्हिडीओमध्ये पाहिलं तेच!


स्त्रियांचा pleasure point हा संभोगाने (intercourse) उद्युक्त होत नसतो. त्यासाठी nipple stimulation किंवा clitoris stimulation ची गरज असते. ते स्वतः स्त्री सुद्धा करू शकते. इतकंच काय, स्त्रियांच्या या सुखामध्ये प्रजननाचाही प्रश्न येत नाही. पण आपल्याकडे मूळात प्रश्नच हा आहे, की "बाईने सेक्सचा आनंद का घ्यावा?" याचं उत्तर आहे, गरज म्हणून. आणि ही गरज जोडीदाराने घुसून केलेल्या संभोगाने (intercourse) पूर्ण होत नसते, त्यासाठी प्रेमाने केलेल्या fore play ची, nipple stimulation, clitoris stimulation ची गरज असते. स्त्रियांची ही गरज किती पुरुष जोडीदारांना माहित असते? किती पुरुष जोडीदार आपल्या स्त्री जोडीदाराला शरीरसुख उपभोगू देतात? आणि किती जोडीदारांना त्यांच्या जोडीदाराचं pleasure point सापडतं? इतकंच काय, किती स्त्रियांना आपली ही गरज माहित असते? किती स्त्रियांना ती भागवता येते? त्यासाठी ते जोडीदाराची मदत घेतात कि कृत्रिम उपकरणांची? अनेक फाटे आहेत, आणि गरज एक, जी पुरवणे आवश्यक आहे.


रिक्षातल्या त्या व्हिडीओवर अनेकांनी टीका करताना विचारलं, "यह रंडीखाना है क्या?" बाबांनो, मला सांगा, कोणत्या रंडीखान्यात लोक त्या बायांना झुलवायला जातात? कोण तिथे त्यांना शरीरसुख द्यायला जातं? पुरुष जातात ते स्वतःची गरज भागवायला. त्यातून त्या बाईला वापरण्यासारखे फक्त पैसे मिळतात.


बहुतेक स्त्रिया या फक्त आपलं नवऱ्याप्रती असलेलं दायित्व अन् कर्तव्य वगैरे म्हणून संभोग सहन करतात. Enjoy करणाऱ्यांना त्यातून समाधान मिळतंच असं नाही. ही व्यथा नेहमी सेक्स करणाऱ्यांची. मग पहिल्यांदा करणाऱ्या कित्येक पोरी आहेत, त्यांच्या न मिळालेल्या orgasm वर काय बोलावं?


हे का होतं? बहुतेक स्त्रिया orgasm पर्यंत का पोहचत नाहीत?


कारण आपल्याकडे स्त्रीने अंगाखाली आणि पुरुषाने नेहमीच 'वर' राहण्याची सवय आहे. हो मी या गोष्टीला सवयच म्हणीन. कारण पूर्वीची संस्कृती काही वेगळं दर्शवते. पूर्वीच्या भारतातील संस्कृतीत माणसाच्या surviving needs मध्ये शरीरसुख ही सुद्धा एक गोष्ट होतीच. कदाचित म्हणूनच 'कामसूत्र' सारखा ग्रंथ इथे लिहिला गेला. कित्येक मंदिरांमध्ये, लेणींमध्ये राजाचे, देवाचे मैथून चितारले आणि कोरले गेले आहेत. अनेक ठिकाणी प्रणयात स्त्रियांनी वर्चस्व केल्याचेही शिल्प आढळतात. पूर्वी ज्याला 'प्रणयक्रीडा' म्हणत, प्रणय खेळले जात, ते सेक्स आता भारतात 'taboo' झालं आहे. आणि पुरुषप्रधान होत गेलेल्या या संस्कृतीमुळे स्त्रियांचा शरीरसुख घेण्याचा अधिकारही हिरावला गेला आहे. कारण योनी हा अवयव मासिक पाळी येण्याचा आणि पुरुषाने प्रणयात वापरायचा, इतकीच धारणा झाली आहे. खाज आल्यावर योनी खाजवूही शकत नाही इतकं अज्ञान त्याभोवती पसरलंय.


शरीरसुख न मिळाल्याने जसे पुरुष चिडचिडे होतात, इतर मार्ग शोधतात, तशा स्त्रियाही चिडचिड्या होतात, नैराश्य येतं. पण त्यांना dildo किंवा vibrators ची कितपत माहिती असते? माहिती असली तरी ते वापरण्याची किती भीती असते? आणि मूळात कायद्यानुसार या सेक्स टॉईजवर बंदी आहे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अर्थात कोणत्याही नात्यात, रोजच्या घुसोफाय सेक्समध्ये त्यांना रस राहत नाही. सेक्स एकतर्फी होतात. मला भीती याची वाटते की, तीन चतुर्थांश स्त्रिया या orgasm न मिळवताच आयुष्य संपवतात. म्हणजे सेक्स करूनही त्याचा परमोच्च आनंद न मिळवताच त्या जग सोडतात. प्राथमिक गरजांनतर ही एक मानसिक व शारीरिक गरज भागवणे आवश्यक आहे. ती प्रत्येक स्त्रीने आणि तिच्या जोडीदाराने सामंजस्याने, प्रेमाने भागवणे गरजेचे आहे.


Forced sex हा विषय वेगळा, पण आपल्या संमतीने संभोग होत असला तरी आपल्याला त्यातून खरंच समाधान मिळतंय का? हा प्रश्न स्त्रियांनीच स्वतःला विचारायला हवा. प्रश्न विचारणं आणि त्याचं समाधान मिळवणं गरजेचं आहे. नाहीतर आपणही त्या तीन चतुर्थांश स्त्रियांमधील एक राहू, ज्यांनी सेक्स करूनही कधीच शरीरसुख मिळालं नाहीये. आणि पुरुषांनो, तुम्हीही स्वतःला विचारा, "आपल्या एका तरी संभोगाने तिला आनंद मिळाला आहे का?" उत्तर 'नाही' आलं तर निदान एकदा तरी तिचा विचार करा, प्रयत्न करा. कदाचित तिची एकदा तरी गरज भागवल्याचा आनंद तुम्हाला नक्की होईल.


हाच आनंद रिक्षातला ' तो ' तिला देत होता.


शेवटी, आपण आनंद देण्या-घेण्यासाठी जन्माला आलोत. आपल्या जोडीदाराला आनंद द्या.