Thursday, 26 November 2015

प्रिय दहशतवाद्यास,...

प्रिय दहशतवाद्यास,
     मी एक सामान्य मुलगी. कोणत्यातरी नावाची, कोणत्यातरी देशाची आणि तुझ्यासाठी कोणत्यातरी धर्माची.  त्यामुळे माझं बोलणं तसं तुला पटणारं नाहीये. पण हे पत्र मी लिहतेय ते मला काल रात्री पडलेल्या स्वप्नामुळे.  तसं झोपेत पाहिलेलं स्वप्न वेगैरे मी काही खरं मानत नाही.  पण तुझी काळजी वाटतेय म्हणून सांगते. कारण हे खरंच आहे आणि खरं होईलही असं वाटू लागलंय आता मला.
     स्वप्न तसं सुरवातीला खुप सुंदर होतं...  मी आणि माझा नवरा मस्त classic movie बघायला गेलोय.  गुरुदत्तचा प्यासा.  त्यातली गाणी. आहाहाहा...  हातात हात घेऊन वहीदा रेहमान आणि गुरुदत्तच्या कथेत, एस. डी. बर्मन यांच्या संगीतात, साहीर लुधीयानवींच्या काव्यात वाहत चाललो होतो.  जणु बर्याच दिवसांनी असं सोबत movieला आलो होतो.  classic असल्याने theater मध्ये गर्दीही फार नव्हतीच.  मोजकेच जण.  त्यामुळे अजुनच निवांत वाटत होतं.  इतक्यात काहीतरी आवाज झाला. फार मोठा आवाज.  पुन्हा पुन्हा जोरजोरात तसाच आवाज होऊ लागला.  बाहेर काहीतरी गोंधळ झालाय हे कळायच्या आतच तोच आवाज theaterच्या आत आला.  मी त्याचा हात होता त्याहीपेक्षा अधिक घट्ट पकडला.  क्षणाक्षणाला आवाज मोठा होत गेला.  ह्रदयाची धडधड एवढी तीव्र असूनही त्या आवाजात ऐकू येत नव्हती.  हात अजून घट्ट झाला.  आम्ही एकमेकांकडे पाहायला आणि आवाज अगदी ह्रदयापर्यंत यायला एकच क्षण झाला आणि मग सारंच उद्ध्वस्त झालं.  त्याचे डोळे मिटले, पण हात अजूनही तितकाच, उलट अजूनच घट्ट होता.  आता तो कोणालाच सोडवता येणार नव्हता.  दोन क्षण त्याच्याकडे पाहून मला तू दिसलास.  जेवढ्या वेगाने आलास तेवढ्याच वेगाने गेलासही.  पण तुझ्या त्या फक्त डोळे दाखवणार्या मुखवट्यामागचा दहशतवादी मी ओळखला.  हो दहशतवादीच.  कारण ना तू माणूस आहेस, ना तुझी जनावर म्हणण्याची लायकी.  तू फक्त एक दहशतवादी आहेस.  जो धर्माचं नाव पुढे करुन अधर्म करतोय.  मला नाही माहीत तू स्वत:ला कोणत्या धर्माचा म्हणवतोस, मला ते जाणूनही घ्यायचं नाहीये.  तू अधर्मी आहेस एवढं मात्र मी खात्रीने सांगेन.  कारण ज्याच्या आत्म्याचं फक्त थडगं उरलंय त्याला काय कळणार धर्म आणि धर्माची शिकवण?  जो माणूसच नाही त्याला धर्मही नाही असं मी मानते आणि ते खरंही आहे.
     त्यावेळी मी तुला घाबरावं असं तुला वाटत होतं.  पण मी नाही घाबरले.  घाबरणारही नाही.  कारण काये ना, तुझ्याच डोळ्यांत मरणाची भीती दिसत होती मला.  तेच मरण जे तू माझ्या नवर्याला दिलंस.  आणि झालंही तसंच.  तुझ्या मालकाने तुला मरायचे आदेश दिले.  आम्हाला मारायचे जसे आदेश दिले होते, अगदी तसेच.  जवळ आलेल्या मरणाला तूही घाबरलास आणि भीतभीतच शेवटची गोळी झाडलीस.  स्वत:वर.  हो शेवटचीच.  ती तुझीच होती.  नंतर एकही गोळी नसणार होती.  ना तुझ्यासाठी, ना माझ्यासाठी.
      तु हे सर्व करतोस देव वाचवण्यासाठी.  मी देव मानत नाही, पण जर देव असेलच तर त्याला तुझ्या रक्षणाची गरज नाही हे मात्र मी खात्रीने सांगू शकते.  जर दुसर्यांना मारून स्वत:चं रक्षण करणारा देव असेल तर मी स्वत:ला भाग्यवानच काय तुझ्याहूनही हुशार समजेन, की असा देव मी मानत नाही.
     मी माझ्या नवर्याला गमावलं, माझं छोटं जग गमावलं.  पण तू स्वत:लाच गमावलंस.  जे जग तुझं कधी नव्हतंच, होणारही नव्हतं ते तू संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलास.  आणि स्वत:च संपलास.  तुझ्या त्या देवासाठी का होईना, मागे फिर रे बाबा.  माझं हे झोपेतलं स्वप्न खरं व्हायला नको.

अजुनही तुझीच हितचिंतक,
कोणीतरी.

No comments:

Post a Comment