मेनकापडाच्या छतातून लागलेल्या पाण्याच्या धारा जेव्हा त्याच्या चेहर्यावर पडल्या तेव्हा कुठे त्याला जाग आली. कोणत्या मुर्खाने उठवलं अशा थाटात त्याने डोळे उघडले आणि छताकडे लक्ष जाताच आपल्याच मुर्खपणामुळे उठावं लागलं हे जाणून तो वैतागतच उठला. वैतागही कोणावर काढणार? आपणच आपले, स्वतःवरच वैतागायचं आणि स्वतःच वैताग घालवायचा. बाहेर जाऊन भिंतीवर उभं राहून त्याने एक मेनकापडाचा तुकडा धार वाहू जाणार्या भागावर टाकला, आणि पून्हा जाऊन झोपला. त्या पडक्या भिंतीच्या वाड्यामध्ये, दगडमातीवर कशी एवढी झोप येत असावी त्यालाच ठऊक. कदाचित दिवसभर काहीच करायचं नसतं म्हणून असावं, किंवा काही करायचाच कंटाळा येत असावा त्याला. या दोन्ही कारणांमुळे तो अजुनही या पडक्या खोलीतच राहत होता. कोणत्याही नावाशिवाय, कोणत्याही पत्त्याशिवाय. तो कोणत्या गावात राहतो तेही माहित नसावं त्याला. दिवसभर भटकून याच पत्ता नसलेल्या त्या चार पडक्या भिंतींत येऊन झोपणं हेच त्याचं वीस – पंचवीस वर्ष काम होतं. बाकी लहानपण तेव्हाही अज्ञानात होतं आणि आताही अज्ञानातच राहिलं.
पावसामुळे वाढलेल्या थंडीमुळे त्याला आता काही झोप लागेना. काही वेळ लोळून तो बाहेर पडला... घरापासून सुरू होणार्या वाटेवरून... गंगेकडे... गंगेत एक - दोन डुबकी मारून बाहेरही निघाला, तोच पाऊस सुद्धा थांबला होता. अंगातलं हल्लीच कुठूनतरी मिळालेलं करड्या रंगाचं, मळकं शर्ट काढून पिळलं, आणि खांद्यावर टाकून, मागे वळून पायवाटेवरच बसला. समोर खळखळ वाहणार्या नदीकडे पाहतच राहिला. अगदी एकटक. ‘ती आता कुठे जाणार... तीही आपल्यासारखीच, आपल्या नशीबासारखी नुसतीच वाहते? आपली वाट शोधत, वाट काढत... तिच्याकडे कुणी पाहतं का? की आपल्यासारखंच दूर पळतात सगळे? हो पळतातच... कोण येतंय इथे किनार्यावर? मीच तर असतो. तीही माझ्यासारखीच. एकटीच... कदाचित म्हणूनच एवढे वर्ष झाली... रोज खळाळते, जणु माझ्यासाठीच.’ पाहता पाहता बराच वेळ झाला, आणि तो तंदरीतून बाहेर आला. खरं तर पाऊस पडून गेल्यानंतरच्या नदीच्या त्या देखण्या अवताराकडून नजर वळवावीशीही वाटत नव्हती, पण पोटाची भूकही तेवढीच खेचत होती. म्हणून गावाकडे जाऊ लागला, तीही पायवाटच होती. दोन्ही पायवाटा, पडक्या भिंतींकडून नदीपर्यंतची आणि तिलाच लागून बाजुला सरलेली, दुसर्या गावाकडे जाणारी, जणु काही त्याच्याच पायांमुळे झाल्या होत्या. त्याची उठून नदीत डुबकी मारून एखाद्या कामासाठी, पैशांसाठी, पोटासाठी दुसर्या गावात जाण्याची वाट नेहमीचीच झाली होती, गेली वीस ते पंचवीस वर्ष. आता तो तसा मध्यमवयीनच वाटत होता. बारीक, पण काटक. सावळा, ऋक्ष. हा सारी वर्षच त्याला काटक आणि ऋक्ष बनवत आली होती. तो ज्या गावात काम मागायला जायचा, त्या गावातल्यांपैकी कुणालाच तो कुठून आला, कसा आला माहीत नसायचं, आताही माहीत नसतंच. कदाचित तोही विसरला असावा त्याचा रस्ता, म्हणूनच तर ह्या कच्च्या पायवाटेलाच आपलं वर्तमान आणि भविष्य मानलं होतं त्याने.
त्याला बहुतेक कामं ही बेवारस प्रेतांना गंगेत दूर टाकायची मिळत होती. ते देणारा दुसर्या गावातला एक माणूस ओळखीचाही झाला होता आता. म्हणूनच तो काही कष्ट न करता सरळ गावात, बाजारात जाऊन बसायचा, त्याची वाट बघत. काम कोणतंही असो, एका कामामागे 50 रुपये मिळायचे. मग असं एक जरी प्रेत मिळालं तरी एका दिवसाच्या जेवणाची सोय होई. बरेच महिने हे केल्यावर कळालं, की आपल्याला काम देणारा, प्रेतं देणारा तो माणूस प्रेतांवरचे दागिने, मौल्यवान वस्तू काढून घ्यायचा. मग कधी कधी काही उरलंसुरलेलं तरी आपल्याला मिळावं अशी त्याची फार इच्छा असायची. पण अशी संधी कधीच त्याला मिळाली नाही, आणि चांगल्या वस्तूही मिळाल्या नाहीत. पण केव्हातरी प्रेतांवरचे कपडे तो काढून घ्यायचा. आताही तेच प्रेतावरचे कपडे घालून तो बाजारपेठेतल्या एका दुकानाजवळ बसून हाच विचार करत होता. ‘आज तरी काही मिळायला हवं’. बरेच तास तिथेच थांबून त्यालाही आता वैताग आला, भूकेनेही त्रासला होताच, आणि कोणाकडून काही मागून खायची त्याची वृत्ती नव्हती. संस्कारांशिवाय वाढलेलं मुल एकतर स्वतः स्वतःवर संस्कार लावून घेतो, नाहीतर स्वतःच एखादी वृत्ती पाळून वाढतो. अशीच वृत्ती घेऊन वैतागतच तो निघाला. निघाला तो सरळ कोणालाच माहीत नसलेल्या, त्याच्याच पायवाटेवर. तोपर्यंत दुपार सरत आली होती. वैतागत, पण भूकेला आवरत, आणि आता बिनपैशाचं काय खायचं या विचारात, मान खाली घालून जात होता. आपल्या ठिकाणाकडे जाणार्या वाटेवर जाताना त्याला गवतात काहीतरी असल्यासारखं वाटलं. एखादा पक्षी मरून पडला असावा, भाजून खाता तरी येईल, भूक भागेल या आशेने वाट सोडून गवतात गेला. दहा पावलं पुढे गेल्यावर आता स्पष्ट दिसलं. एक सुंदर, सुडौल स्त्री... गवतावरच पहूडली होती. अगदी मेनकेसारखी आकर्षक. पण मानेवरून प्रचंड रक्त घरंगळत गवतावर सांडत होतं, आणि रक्ताने दागिनेही माखले होते. त्याची नजर त्या सुंदर स्त्रीच्या चेहर्याकडे, मग बांध्याकडे गेली, अन् मग दागिन्यांवर स्थिरावली. इकडे-तिकडे बघून, जपून तो तिच्याजवळ गेला. नाकाजवळ हात घेऊन आधी श्वास तपासला, अन् ती गेलीये हे जाणवून एक सुस्कारा सोडला. दोन क्षण तिच्याकडे बघितलं, जणु तिला डोळ्यात साठवून ठेवत होता. पण मग पोटाने भूकेची आरोळी देताच त्याचा हात तिच्या रक्ताळलेल्या मानेजवळ गेला. मान एका हाताने उंचावून दुसर्या हाताने त्याने हार काढला, मंगळसुत्रही काढलं. यावेळी झालेल्या त्या तिच्या शरीर आणि रक्ताच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. शहारलेल्या त्याने दोन क्षण इथेतिथे पाहून पुन्हा तिच्या जवळ जाऊन कानातले काढून घेतले. कानातले खिशात टाकून तिला दोन्ही हातांत उचलून, मनात समाधान, मोह, वासना, आकर्षण, सार्या भावनांना लपेटून त्याने तिच्या प्रेताला गंगेत वाहून दिलं, अन् माफीसाठी काही क्षण हात जोडले. खिशातले दागिने पाण्यात धुवून खिशाचा तो रक्ताळलेला भागही धुवून काढला. सगळं करून मागे वळून पाहतो तर 10-12 पावलांवर, पायवाटेपासून दूर गवतात, एक लहान 5-6 वर्षांचा मुलगा त्याच्याकडेच बघत होता. मुलगा अगदी चांगल्या घरातला वाटत होता. तो मुलापाशी गेला. मुलगा दोन पावलं मागे झाला तसा तो मुलाच्या उंचीला आला, गुढघ्यांवर. हात धरला तसा त्याच्या अंगावर काटा आला, पण हा काटा त्या स्त्रीच्या शरीराला स्पर्श करून आला होता तसा आजिबात नव्हता. हा फारच वेगळा होता. मायेचा, करुणेचा, दयेचा, निरागसतेचा तो शहारा होता. त्याने स्मित केलं. मुलाला थोडा विश्वास मिळाला असावा त्या स्मिताने. तो घाबरतच कापत म्हणाला, “माझी आई कुठंय?” ते एकून पुन्हा त्याच्या अंगावर शहारा येऊन गेला. त्याला काय बोलावं, सुचेनासं झालं. मुलाचे ते निरागस बोल, आपल्या आईच्या शोधात असलेले डोळे त्याला मरणापेक्षाही भीतीदायक वाटू लागले. तो “चल” म्हणून उभा राहिला, का ते त्यालाही कळलं नाही. मुलाला घेऊन फक्त चालत राहिला. आपल्या घराकडे जाणार्या वाटेवरून, मुलाचा हात हातात घेऊन... घर केव्हा आलं कळालंही नाही. त्याला घरात घेऊन गेला तो काहीतरी खायला देऊ या उद्देशाने बाहेर पडण्यासाठीच. त्याला एका मेनकापडावर बसवलं आणि “येतोच मी खाऊ घेऊन" असं म्हणून केसांवरून हात फिरवून तो धावतच बाजारात गेला. खिशातले कानातले काढून सोनाराच्या दुकानात शिरला आणि ते विकून पैसे घेऊन एका चांगल्या हॉटेलात गेला. तिथून चपाती भाजी घेतली. वाटेत येताना एक फुगेवाला दिसला, त्याच्याकडून चार-पाच फुगे घेतले. पोटभर जेवण मिळाल्याचाही जितका आनंद होणार नाही तितका उत्साह त्याला फुगे घेताना झाला, तो चेहर्यावरही अगदी स्पष्ट झळकत होता. बाजुलाच एक आईसक्रीमची गाडी होती, त्यांच्याकडून दोन आईसक्रीम घेतले आणि विरघळू नये म्हणून धावतच तो घरी गेला. मुलाची निरागसता आणि त्याचं प्रेम यामुळे त्या पडक्या भिंतींनाही आता घराचं रूप आलं होतं, त्याच्याही नकळत... मुलगा तिथे शांत बसला होता. त्याला पाहून सुखावलेला तो आत गेला आणि आईसक्रीम दिलं. मुलगा आईसक्रीम आणि फुगे पाहून फारच आनंदी झाला. तरी त्याचे डोळे मात्र तो आनंद दाखवत नव्हते. आईच्या शोधात ते अजुनही पाणावलेलेच होते. एका हातात आईसक्रीम आणि दुसर्या हातात फुगे आणि चेहर्यावरचं निरागस स्मित पाहून तो कितीतरी सुखावला. याआधीच्या त्याच्या ऋक्ष जीवनात कधीच अशी निरागसता त्याने पाहिली नव्हती... तीही जिवंत निरागसता... नाहीतर मेल्यावर प्रत्येक माणूस निरागसच वाटतो. पण आज ती या मुलाच्या रुपात पाहताना त्याचे डोळे उपाशी असूनही पोटभर समाधानासारखे चमकत होते. दोघांनीही आईसक्रीम खाल्ली. त्याला चपाती भाजी भरवताना, त्याला खाताना पाहताना त्याचे डोळे फक्त त्याच दृश्याने भरले होते. मायेने केसांवरून हात फिरवताना आता आपणच याचे आई आणि बाबा असू ही जाणीवच त्याला अंगावर सतत शहारा आणत होती; मनाशी, स्वतःशी जोडून ठेवत होती. दोघांचं खाऊन झालं. मुलगा हाताचा अंगठा करून तोंडाजवळ नेत ‘पाणी हवंय’ असं सांगू लागला, तेव्हा त्याला पाणी आणायची आठवण झाली. तो स्वतःला आवरत उठतो न उठतो तोच एक माणूस घरात डोकावला, आणि ‘इथेचे इथेचे’ म्हणून ओरडला. मागून पाच-सहा माणसं घरात घुसली. तो प्रचंड घाबरला. काय होतंय त्यालाही कळेनासं झालं. मुलाला उभं करून आपल्या मागे घेत विचारू लागला, “कोण पायजे, कोण आहात तुम्ही?” दोघांनी त्याला एका कोपर्यात धरून ठेवलं. आणि एक सुटाबूटातला माणूस येऊन मुलाला घेऊन जाऊ लागला. तो ओरडतच राहिला... रडतच राहिला...
त्याला काहीच बोलू न देता इतरांनी लाथा बुक्के मारले, तोंड बंद करायला तोंडावर मारलं. पण तो ओरडतच राहिला. एकाने चाकू काढला आणि गळा चिरला. एका क्षणातच सारं संपलं. आवाज, रडणं, सुख, दुःख, आयुष्य, सारंच...
सकाळी तिथून जात असलेल्या एकाला कुबट वास येऊ लागला. काही मेलेलं असावं म्हणून तो समोर दिसणार्या पडक्या भिंतींपाशी गेला. आत भलंमोठ मेनकापड पडलं होतं. बाजुला आईसक्रीमच्या काड्या, एक फुगा आणि दोन रिकामे जेवणाचे खोके. त्याने तिथूनच आलेल्या वासाचा वेध घेतला. वास आधिकच कुबट झाला होता. त्याने ते ओलं मेनकापड उचललं प्रेत तिथेच उपडं पडलं होतं... मेनकापडाखली. कोणाचं प्रेत असावं म्हणून त्याने पायानेच प्रेत सरळ केलं, तसे खिशातून दगिने थोडे बाहेर आलेले दिसले. त्याने पटकन बसून ते ओढले, आणि सोबतच पैसे बाहेर आले. तेही क्षणात खिशात टाकले. मग तोंडाला रूमाल बांधून जरा बाहेर कोणी आहे का ते संशायाने पाहिलं. कोणीच नव्हतं. प्रेत खांद्यावर घेऊन घरासमोरच्या पायवाटेवरून चालू लागला. एक त्याच्या परतीच्या वाटेवर निघाला होता, आणि एक आयुष्याच्या काठावर... पण दुसर्याच्या पावलांनी... दुसर्याने बनवलेल्या पायवाटेवरून...