आईसोबत तिच्या रिपोर्ट्सचं काम करत होते. तिला कॉम्प्युटर वापरता येत नाही, आणि आजकाल सगळंच ऑनलाईन झालंय. गर्भवती स्त्रियांची नोंदणी करत होते वेबसाईटवर. आई नाव, नवर्याचं नाव, स्त्रीचं वय, नवर्याचं वय, असं कर्माने सांगत होती. एका वेळेस आई नाव सांगून जरा शांत झाली. म्हटलं, "वय?" आई हळूच म्हणाली, "सेहेचाळीस". मी एक आठी आणत, एक क्षण थांबत, लिहलं. ऐकलं तर नीटच होतं. पण विश्वास बसेना. पुढे म्हटलं, "काय मुल बाळ?" आई गडबडून म्हणाली, "हा, एक मुलगा.." श्वास घेतला जरा तिने. मला काय वाटेल याचाच विचार करत असावी. मग बिचकतच म्हणाली, "वीस वर्ष, सात महिने". माझा श्वासच थांबल्यासारखा झाला. पण आईला काहीच प्रतिक्रिया दाखवायची नाही असं अर्ध्या क्षणात ठरवून लगेच टाईप केलं. तीही अडखळली अन् मीही. दोघंही 'तिला' काय वाटेल म्हणून गप्प राहिलो. का? आम्ही मायलेकी ते प्रकरण फक्त रिपोर्ट्समध्ये बघूनच एवढे बिथरलो, तर मग त्या वीस वर्षांच्या मुलाला काय वाटत असावं..? त्याच्या आई-बाबांना त्याच्याविषयी काय वाटत असावं..? बरं याहूनही, त्या आईचे याआधी किती गर्भपात झाले असतील..? यामुळे आईच्या शारीरिक अवस्थेसोबत मुलाची मनोवस्थाही बिकटच असेल का..? अनेक शक्यता असू शकतात. गर्भपात नाही, घरगुती हिंसाही नाही, काहीच नाही. ती बाई गर्भवती आहे एवढंच जरी लक्षात घेतलं तरी सेहेचाळीसाव्या वर्षी, वीस वर्षांचा मुलगा असूनही, वासनेच्या बळी पडलेलं दांपत्य समोर येतं, अगदी डोळ्यांसमोर... दुःखीही असतील ते. पण दाखवण्यासाठीच का होईना, हा निर्लज्ज आनंद मित्रांसोबत या आपल्या पराक्रमावर विनोद करताना त्या पन्नास वर्षांच्या बापाच्या चेहर्यावर दिसतोच. ते पाहून आई द्विधा मनस्थितीत, चेहर्यावर थोडंसं हसू आणि मनात थोडंसं दुःख. मैत्रिणी चिडवतील तेव्हा लाजून दाखवणं, किंवा दुःख सांगणं, एवढंच त्च्या हातात. मग तो वीस वर्षांचा, माझ्याएवढाच, मुलगा... मान खाली घातलेल्या त्याच्या निस्तेज चेहर्यावरचे हजारो प्रश्न... त्या प्रश्नांचं प्रतिनिधीत्व करणारा एक प्रश्न, 'हे असं माझ्यासोबतच का व्हावं..?' किंवा तो अगदी बिनधास्त. आई-बाबांशी बोलणार नाही. मान देणार नाही. व्यसनाच्या अधीन. लोक म्हणणार, अगदी बापावर गेलाय. या सगळ्यात गर्भातलं बाळंही येतंच. मुलगा असो वा मुलगी, त्याच्याही चेहर्यावर जन्मल्यानंतर अनेक प्रश्न असणार आहेत. 'मला का जन्माला घातलंत..? वारस तर एक मुलगा होताच ना, मग मी वासनेपोटीच का..? तेही तुम्ही म्हातारे झाल्यानंतर..?'
अठरा वर्षांचं असतानाच गर्भवती राहणं, पाच-सहा महिन्यांचं मुल असतानाच गर्भवती राहणं, तीन मुली आणि एक मुलगा असूनही उतरत्या वयात बाळंतीण राहणं... अशा अनेक परिस्थिती त्या रिपोर्ट्समध्ये होत्या, ज्यांची कारणं नक्की माहीत नव्हती पण शक्यतांपैकीच काही होती. पण त्या ऑनलाईन रजिस्टर करण्याशिवाय मी काहीच करू शकत नव्हते.