Sunday, 23 April 2017

डायरीतल्या गोष्टी #3

     आज जागतिक पुस्तकदिन आहे. पुस्तक, साहित्य वगैरे दहावी-बारावी पर्यंत माहितही नव्हतं. कदाचित कळतच नव्हतं. मराठीच्या पुस्तकातले ते धडे मी कधीच गोष्टींसारखे वाचले नाही. परीक्षा आली की गाईड घेऊन बासायचं आणि उत्तरं पाठ करायची. गोष्टी नुसत्याच प्रश्नोत्तरांसारख्या. आणि कविता तर विमानासारख्या दूरूनच ऊडून जायच्या. त्या न कळणारे शब्द आणि न कळणारा काहीतरी विचित्र, परग्रहासारखा प्रकार वाटायचा.
दहावीत असताना एक स्थूलवाचन आवडलं होतं. म्हणजे स्वतःच वाचून स्वतःच अभ्यास करायचा त्यावर. पण क्लासमध्ये करायचं म्हणून किंवा 'तुम्ही काय वाचणार नाही घरी!' म्हणून टीचरने तो फक्त वाचला. 'भूक' नावाचा तो धडा होता. फार साधी गोष्ट होती. एका आईची आणि तिच्या दोन मुलांची. मुलांना भूक लागलेली असताना टोळ पकडून, शिजवून खाऊ घातलेलं तिने आणि नंतर तो टोळ मासा विषारी साप होता की काय, या फक्त कल्पनेनेच तिचं काळीज फुटतं. अशी साधारण कथा होती. लेखकांच्या वर्णनाने सारं काही कसं डोळ्यांसमोर दिसत होतं. त्यात टीचर वाचतही अगदी सहज होत्या. अगदी कथाकथनच. पहिल्यांदा क्लासमध्ये पूर्ण वेळ शांतता होती. आम्ही ऐकतच होतो. ती पहिली कथा, जेव्हा मला कथांबद्दल, गोष्टींबद्दल आकर्षण वाटू लागलं असावं. नंतर दहावीच्या सुट्टीत वेळ जावा म्हणून लायब्ररी सुरु केली. तेव्हा कोणीच माहित नव्हतं. म्हणून तिकडच्या लायब्ररीयनलाच सांगितलं कोणतं तरी पुस्तक द्यायला. त्या बाईंनी जरा गमतीनेच दिलं ते. तेव्हा वाटलं काय असावं जे एवढी मस्करी करतेय ही... घ्यायचं म्हणून घेतलं मी. पुं. लं. चं फुलराणी होतं ते आणि सोबतीला एक गृहशोभिका. मासिकेमुळे लघुकथा कळल्या. एवढंच की आता त्यांचं हसू येतं. 'मला एवढ्या इमोशनल वगैरे कथा कशा आवडल्या?' कारण अर्थातच त्या स्त्रीप्रधान आणि अतिशय ड्रॅमॅटिक होत्या. सुरुवातीला तसं सगळंच आवडतं.

     नंतर अकरावी बारावी पुन्हा पुस्तकांपासून दूर झाले. अभ्यास आणि अभ्यास. अगदी कधीतरी लायब्ररीत पैसे भरायचे म्हणून आणायचे एखादं पुस्तक. पण वाचायचे कधीतरीच. त्यात वपु, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर, अनिल अवचट यांची पुस्तकं वाचली. बारावीत तर काहीच वाचलं नाही. त्यामुळे आईने लायब्ररी बंदच केली. आणि मग मला पुन्हा लावताही आली नाही. बी.एम.एम. घ्यायचं म्हणून पेपर सुरु केला. सकाळ आवडता होता, कारण त्यातलं रविवारचं 'सप्तरंग' आवडीचं होतं. शेजार्यांकडे लोकमत यायचं. त्यातली ऑक्सिजन पुरवणी आवडीची झाली.

     बी.एम.एम. च्या पहिल्या वर्षात star-pro हातात आला. त्यात मग वॉट्स अॅप, फेसबुकवरच्या कविता, लेख, वायरल गोष्टी सतत नजरेत आल्या. आणि खरं सांगू का.. तेव्हा ते सगळं आवडलंही खूप. सुरवातीला सगळंच आवडतं, हेच खरं. त्यातच मैत्रिणींनी सांगितलेले इ-बुक्स. बी.एम.एम. मध्ये अभ्यास फार मनावर न घेतल्याने इ-बुक्स वाचायला लागले. त्यात नको तेवढं सर्फ केल्यावर चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या सापडल्या आणि तुकारामांचे काही अभंगही. एकाने तर चक्क भगवद्गीता दिली वाचायला. वाचून काही दिवस शांत वाटलं. नंतर पुन्हा गोंधळ सुरुच राहिला. ती तशीही सगळ्या वयांत वाचावी. पुन्हा पुन्हा नवीन अर्थ सापडतो. हा सध्याचा निष्कर्ष.

     नवीन माणसांत आलो की नवीन गोष्टी सापडतात. तसंच मला पुस्तकं सापडली. मग ती कॉलेजच्या लायब्ररीत असो किंवा ठाण्याच्या स्काय वॉकवरची हाफ रेटमधली पुस्तकं असो, मी वाचतच राहिले. भले ते टिपिकल का असेनात. वाचणं महत्वाचं. वाचण्यात वाहून घेतलं नाही इतकंच. मी अजुनही जास्त वाचायाचं टाळते, आणि काही गॅपने, पुन्हा प्रेमात पडते पुस्तकांच्या. एकदाच वाहून घेण्यापेक्षा पुन्हा पुन्हा प्रेमात पडणं केव्हाही छानच.

Monday, 10 April 2017

आत्महत्येऐवजी

आत्महत्येऐवजी               
मी वेचीन प्राजक्त झाडावरचा
कोवळा, सुगंधित
आणि माळीन केसांत
त्यानेही केसांतच वाळण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी वाळूचं बनवेन एक घर
सुरेख, कुंपणासहित
आणि जाईन निघून ते सोडून
कोणीतरी येऊन तुडवण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी वाढवीन एक बोन्साय
लहानशा कुंडीत
आणि दाखविन त्याला त्याचं मूळ झाड
त्यानेही खंगून जाण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी काढेन एक चित्र
आखिव रेखीव
आणि रंगहीन ठेवीन तसंच
अश्वत्थाम्यासारखं वाट पाहण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी पडेन पुन्हा प्रेमात
तशाही स्थितीत
आणि ओघाने बाहेरही येईनच
पुन्हा कविता लिहिण्यासाठी