आत्महत्येऐवजी
मी वेचीन प्राजक्त
झाडावरचा
कोवळा, सुगंधित
आणि माळीन केसांत
त्यानेही केसांतच
वाळण्यासाठी
आत्महत्येऐवजी
मी वाळूचं बनवेन एक
घर
सुरेख, कुंपणासहित
आणि जाईन निघून ते
सोडून
कोणीतरी येऊन
तुडवण्यासाठी
आत्महत्येऐवजी
मी वाढवीन एक
बोन्साय
लहानशा कुंडीत
आणि दाखविन त्याला
त्याचं मूळ झाड
त्यानेही खंगून
जाण्यासाठी
आत्महत्येऐवजी
मी काढेन एक चित्र
आखिव रेखीव
आणि रंगहीन ठेवीन
तसंच
अश्वत्थाम्यासारखं
वाट पाहण्यासाठी
आत्महत्येऐवजी
मी पडेन पुन्हा
प्रेमात
तशाही स्थितीत
आणि ओघाने बाहेरही
येईनच
पुन्हा कविता
लिहिण्यासाठी
No comments:
Post a Comment