Saturday, 28 October 2017

एक पहाट रायगडावर...

दिवाळीच्या एक महिन्यापूर्वीच दिवाळीत रायगडावर जायचं ठरलं होतं. 'एक पहाट रायगडावर' म्हणून कार्यक्रम आहे, दिवाळी पहाट जल्लोषात साजरी होते वगैरे बरंच ऐकलं होतं. पण माझ्या डोळस मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. मला रात्रीचा रायगड पहायचा होता. रात्री दिवे-मशालींनी नव्हे, तर चांदणभरल्या आभाळाने सजलेला रायगड पहायचा होता. महिन्यांपूर्वी ठरवलेला बेत दिवाळी आली तसा काहीसा डळमळीत होऊ लागला. काम आहे, सुट्टी नाही, आई सणाला घरी एकटी राहणार... बरंच काही होतं. पण रायगड एकीकडे आणि बाकी सारी दुनिया एकीकडे. घरात दिवाळीची तयारी करून रायगडावर, महाराजांच्या घरच्या दिवाळीची तयारी करायला गेले. एक दिवस सुट्टी टाकली, ऑफिसला फाट्यावर  मारून...

नेहमीप्रमाणे रात्री निघाले, पहाटे पोहोचले. सकाळी सूर्यदेवाने पूर्ण रायगड परिसराच्या शेतमळ्यांवर आपल्या किरणांची मायाळू झालर पांघरलेली पाहिली. कुडकुडणाऱ्या थंडीपासून हि मायेची ऊबच आता या शिवारांना वाचवत होती. ती ऊबही सूर्यदेव, बापदेव देत होता हे थोरच!



सकाळी नाश्ता करून मशाली घेऊन वर गेले. तेव्हा पहिल्यांदाच मशाल पाहिली. भले आता ती आधुनिक झाली असेल, निदान तिचं स्वरूप पाहता आलं, हाताळता आलं. पूर्वी अंधारात गडाचं रक्षण करणारी, मावळ्यांना वाट दाखवणारी तीच तर होती. गडागडांच्या भिंतींवर, देवड्यांवर तिच्या खुणा आढळतात. त्या देवड्यांत मला मशाली दिसतात, आणि त्यांच्या प्रकाशात नजर मालवु न देता, पहारा देणारे मावळेही दिसतात.

दुपारभर अशा अनेक विचारांसोबत उनाडल्यावर विश्रांती घेते न घेते तोवर लोक जमू लागले. दिवसभराच्या शांततेचं काही मिनिटांतच घरभरल्या अंगणात रूपांतर झालं. महाराष्ट्राभरातून लोक आले होते. मुंबईतल्या लोकलच्या अनोळख्या गर्दीतली मी, या रायगडावरच्या आपुलकीच्या माणसांत माझी मला केव्हा सापडले कळलंच नाही. इथे कोणीच कोणाला ओळखत नव्हतं, कोणीच कोणाच्या जवळचं नव्हतं, पण या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा होता तो 'रायगड'. या रायगडाच्या अंगाखांद्यांवर खेळलेले सगळे आज अंधारातल्या रायगडाला मशालींनी उजळायला आले होते.

संध्याकाळी रायगडाची प्रत्येक वास्तू फुलांनी सजवायला सुरुवात झाली. फुलांचे हार, तोरण, फुलांच्याच रांगोळ्या... आणि त्या रांगोळ्यांमध्ये लहानशा पणत्या. घरी करू अशी सजावट लाडक्या रायगडावर केली. घरच ते. घराची सजावट घरची माणसं नाही करणार तर कोण करणार? आणि आता तर पूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं.

सजावट करून जेवून थोडा आराम झाला. प्रचंड माहितीपूर्ण व्याख्यान झालं. आणि रात्री 2 वाजता दिपोत्सवाची तयारी सुरु झाली. अंघोळ तर करता आली नाही, पण दिवाळीच्या पहाटे लहानपणी फटाके लावायला ज्या उत्सुकतेने नवनवीन कपडे घालायचे ना तेवढ्याच उत्सुकतेने आज मशाली लावण्यासाठी सगळे तयार झाले होते. तयारी आटोपून अंधाऱ्या रायगडावर चालू लागलो, जगदीश्वरकडे. महाराजांना आशीर्वाद देणाऱ्या त्या जगदीश्वराला अभिषेक घालून आम्हीही हा अवघा सह्याद्री आणि त्या सह्याद्रीची राजधानी असलेला रायगड असाच चिरकाल पाहण्यासाठी त्याच्यासारखंच आम्हालाही दिर्घायुष्य लाभुदे अशी प्रार्थना केली. पहाटेची काकड आरतीच ती. जगदीश्वरात त्याच्या आरतीचा नाद घुमला. जगदीश्वराला सूर्यदेव यायच्या अगोदर पूजलं गेलं. रायगडाचं आद्यदैवत म्हणून पूजलं गेलं...



त्यानंतर महाराजांच्या समाधीजवळ महाराजांना वंदन करून मशाली घेऊन सिंहसनाच्या जागेकडे जायला निघालो. जगदीश्वरातून बाहेर निघाल्यावर मशालींच्या प्रकाशाने जसा रायगड उजळला होता, त्याचं वर्णन शब्दांत सांगता येत नाहीये मला अजूनही. त्या पहाटेच्या काळोख्या थंडीत प्रकाशमय ऊब रायगडावरच मिळू शकते. शंभरहून अधिक मशाली एका रांगेने पुढे सरकतायत, आणि आजूबाजूचा सारा परिसर आपल्या तेजाने उजळून टाकतायत. श्या... अजूनही जमत नाहीये. मला मरीन ड्राईव्हच्या रात्रीच्या दृश्याचं खूप आकर्षण होतं. क्वीन्स नेकलेसचं विहंगम दृश्य वगैरे आज रायगडावरच्या या जिवंत नजाऱ्याने ते सारं साफ पुसून टाकलंय डोळ्यासमोरून. आताही, बाजारपेठेजवळून मशाली घेऊन जाणारे मावळेच दिसतायत...

हे मावळे आता आले ते गडदेवतेला अंधारातून दूर करायला. शिरकाई देवीच्या लहानश्या मंदिरात दीपोत्सव करून, देवीची आरती करून होळीच्या माळावर महाराजांच्या स्मारकापाशी आलो. तिथेही पणती, दिवे लावले गेले, फुलांचे हार घातले गेले. मानवंदना दिली गेली, आणि राजदरबारात, दस्तुरखुद्द महाराज जिथे विराजमान होत तिथे त्यांना हि मशालींची मानवंदना द्यायला चालू लागलो. अजूनही तसा काळोखच. सूर्यदेव काही या मशालींच्या उजेडापुढे यायला मागत नव्हते. कदाचित त्यांनाही या शूर वीराला त्यांच्याच काळात नेऊन, त्यांच्याच काळातील हि पेटत्या मशालींची दिवाळी भेट द्यायची असणार...

सिंहसनाकडे या मशाली वळल्या आणि राजांचं सिंहासन सोन्याहून पिवळं असल्याचा भास झाला मला. भास कसला, ते होतंच मुळात सुर्याहून सोनेरी. तेही फक्त या एकवटलेल्या मावळ्यांमुळे...

'आस्ते कदम' म्हणत सूर्यदेव आपल्या येण्याची घोषणा करत होते. ढगांवर किरणांची भगवी गुलाबी छटा सोडत होते. स्वतः मात्र येत नव्हते. मागे राजदरबारात चालणारं जोशपूर्ण भाषण ऐकत मी बाहेर पूर्वेला चाललेली सूर्यदेवांची रणनीती पाहत बसले होते. सूर्याने आपल्या किरणांची सेना सर्वात आधी ढगांवर चढवली. त्यांना केशरी, मग लाल, मग गुलाबी रंग दिला. मी आत्ता सूर्य येणार म्हणून मोबाईलवर टाईम लॅप्स लावून उभी राहिले. पण गुलाबी झालेलं आभाळ आता फिकं होत पांढरं झालं. फसवलंच की. मी म्हटलं एवढ्यात काही येत नाही आता हा. म्हणून टाईम लॅप्स बंद करून बसून राहिले. चांगली १० मिनिटं गेली. ढग नुसतेच इथून तिथून पळत होते. अन् अंदाज लावते न लावते तोच सूर्यदेव हजर. सूर्याला नारायण का म्हणतात ते त्या क्षणी कळलं.
रायगडावर उगवणारा सूर्यसुद्धा फक्त महाराजांना वंदन करायला प्रत्येक दिवशी आपली आभाळ सजवण्याची शैली दाखवत असतो. तोसुद्धा रणनीती वापरतो, अगदी राजांसारखी...

एक नारायण दुसऱ्या नारायणाला वंदन करतो ना तेव्हाचा क्षण पाहिलाय मी.. या पहाटेच्या रायगडावर...


No comments:

Post a Comment