Saturday, 24 March 2018

'नेट'चं जाळं


ते मल्लू अॅप्सचं वेड आणि त्यामुळे डेटा चोरी होण्याचं प्रकरण वगैरे निघालंय, त्याबद्दल काही लिहावंसं वाटलं. खरं तर याआधी अशा साईट्स आल्या होत्या. त्यांतून आपण आजवर मजा घेत होतोच. पण ते सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं इंग्रजीत होती. पण आता तीच गोष्ट, तो पॅटर्न मराठीत, तोही आकर्षक अशा गावठण भाषेत आल्यावर कोणीही आकर्षित होईल. पण कोणाला आठवतंय का, ह्या अॅपमधून सुरुवातील खूप मजेशीर प्रश्न आणि त्यांची मजेशीर उत्तरं मिळत होती. जसं की, तुमचं लग्न कधी होणार? तर त्यावर तू सिंगलच मरणार भावड्या, आणि मुलगी असेल तर कशाला कुणा बिचाऱ्याचं आयुष्य उध्वस्थ करायचं, तू रहा अशीचवगैरे विनोदी उत्तरं यायची. कसंय, आपल्या पिढीत सगळेच आपण कसे सिंगल आणि दुःखी आहोत हेच दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणून अशी उत्तरं आपण शेअर सुद्धा करतो. हे फक्त वरवर झालं. पण नंतर या अॅपवर तुमचा रोल मॉडेल कोण? अशा आशयाचे प्रश्न आले. त्यात बहुतेकदा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, असे, महाराष्ट्रात कोणीही शेअर करेल असे उत्तर होते. बरं त्यानंतर तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात काय करत होतात? किंवा शिवाजी महाराजांसाठी तुम्ही काय केलं असतं?असे प्रश्न येऊ लागले. त्यांची उत्तरंच अशी होती की कोणालाही अभिमान वाटेल, मित्रांमध्ये हूलाहूल करता येईल. त्यामुळे तेही भरपूर शेअर होऊ लागले. या रोल मॉडेल्सनंतर देव आले, तुम्ही कोणत्या देवाला मानता? यात श्रीकृष्ण, शंकर, ब्रम्ह, गौतम बुद्ध, गणपती होते. जो ज्या देवाला मानतो, तो त्याच देवाचं उत्तर शेअर करतो. ही फार सहज मानवी वृत्ती आहे. मला जे आवडतं, मी तेच लोकांना सांगते. त्यामुळे मला उत्तरात जे आलं आहे, मी तेच शेअर करीन असं नाही. मला माझ्या आवडीचं किंवा अपेक्षेप्रमाणे उत्तर आलं नाही, की मी बंद करते, किंवा रिफ्रेश करते, आणि जे हवं तेच शेअर करते.

यानंतर मध्यंतरी आणखी एक प्रश्न दिसला, महाराष्ट्रातील कोणती जात खतरनाक आहे? ज्याने ती पोस्ट शेअर केली होती, तो त्याच जातीशी संबंधित होता. कोणत्या वेगळ्या जातीचा असता, तर कदाचित त्याने त्या जातीचं उत्तर शेअर केलं असतं.
तर एवढं सगळं सांगायचा मुद्दा हा की तुमच्या उत्तरांचा डेटा जमा होतो, त्याचं विश्लेषण होतं, आणि तो डेटा विकला जातो.

तुम्ही काय लाईक करता, काय शेअर करता, कोणता व्हिडिओ जास्त वेळ पाहता, काय सर्च करता, कुठे क्लिक करता ते सगळंच Google, YouTube, Facebook वर स्टोअर केलं जातं. Google आणि YouTube हा डेटा त्यांच्या अॅड्स साठी वापरतात. म्हणून त्यांत keywords असतात, लेबल असतात, टॅग्स असतात. त्यावरून आपण सर्च केलेल्या, पाहिलेल्या व्हिडिओच्या keywords नुसार इतर व्हिडिओ आपल्याला recommend होतात. आणि तशाच अॅड्स सुद्धा दिसतात. फेसबुकवर सुद्धा आतापर्यंत हेच होत होतं, आताही होतंय. पण लक्षात घ्यावं लागेल की मल्लू अॅप फेसबुकचं नाहीये. ते कुणी दुसर्यांनी बनवलंय, आणि त्याच्या लिंक्स तेवढ्या आपल्याला मिळतात. हे असले अॅप किंवा वेबसाईट बनवणं काही महाग नाही. त्यावर अॅड्स दिसतात. त्या अॅड्स मधून फेसबुक आणि त्यांचे मालकही खूप कमवतात.

पण आता प्रश्न हा येतो की हे अॅप बनवलं कोणी? त्याचा डेटा कोणाकडे जातो? तो कोण विकत घेतो? हे अॅप पूर्वी फक्त इंग्रजी, हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेत होतं. आताच मराठीत कसं आलं? बरं बनवलं, मजा करू दिली, आपण केली, करतोय. मग ते अॅप देव, धर्म आणि जातीचे प्रश्न का विचारतायत? राजकीय प्रश्न का विचारतायत? हे कोणतं वर्ष चालुय? पुढच्या वर्षी काय आहे?
या प्रश्नांची उत्तरं मिळाली की नक्की शेअर करा हे सुद्धा.

No comments:

Post a Comment