Sunday 15 September 2019

#राजकरणाचा_बाजार – प्रोपगंडा आणि आरे


याआधीच्या ब्लॉगमध्ये नरेटिव्ह कसं तयार होतं ते लिहलं होतं. आता हे नरेटिव्ह पसरवण्याच्या उद्देशाने प्रोपगंडा किती उपयोगी येतो त्याबद्दल लिहायचा प्रयत्न आहे. सर्वात आधी, प्रोपगंडा म्हणजे नक्की काय ते समजायला हवं. इथे पत्रकारिता, कम्युनिकशन, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या किंवा केलेल्या मित्रमैत्रिणींना कळेल, की प्रोपगंडा काय असतो. मला शिकताना समजायला फार दिवस लागले, तरी शिक्षकांना पुन्हा विचारून हैराण करायचं नव्हतं. तर प्रोपगंडा म्हणजे Information, especially of a biased or misleading nature, used to promote a political cause or point of view.” ही गुगलने सांगितलेली व्याख्या आहे. राजकीय दृष्टीकोन बदलण्यासाठी वापरलेली एकांगी किंवा दिशाभूल करणारी माहिती. आपण सध्याच्या बोलीत त्याला फेक ट्रोल्स म्हणतो. हा प्रोपगंडा कितपत व्याप्ती देऊ शकतो? पैसे असतील तर खूप. सोशल मीडिया हे या प्रोपगंडाचं प्रमुख माध्यम आहे, ज्याने कमी वेळात प्रचंड रीच मिळतो.

सोशल मीडियावर आजपर्यंतचा मोठा प्रोपगंडा म्हणजे ७० वर्षांत काय झालं?’ लोकांचं उत्तर येतं भ्रष्टाचार. अगदी बरोबर. बरेच घोटाळे बाहेर आले. पण कितीही भ्रष्टाचार असला, आणि त्याविरुद्ध मीच काय, संपूर्ण भारत विरोधात असला, तरी मी असं म्हणणार नाही की ७० वर्षांत काहीच झालं नाही. कारण २०१४ च्या आधी मी शाळेत जाऊ शकले. २०१४ च्या आधी मी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकले. अगदी तसंच २०१४ च्या आधीही आयआयटी, विद्यापीठं, वाचनालये होती. २०१४ च्या आधीही हॉस्पिटल्स, दवाखाने आणि योगासुद्धा होता. २०१४ च्या आधीही ट्रेन, रस्ते, पूल, वाहतुक मार्ग होते. तुम्ही आता हा लेख ज्यात वाचत आहात ते मोबाइल तंत्रसुद्धा २०१४ च्या आधीच भारतात आलंय, इंटरनेटही २०१४ च्या आधी आलंय आणि ज्याच्या जोरावर मोदी सत्तेत आले, ते सोशल मीडियासुद्धा २०१४ च्या आधीच आपल्याला मिळालं आहे. आणि तरीही आपण विचारतो की ७० वर्षांत काय झालं? जितका भावनिक प्रोपगंडा तितकंच भावनिक त्याचं विश्लेषण.

आता भावनांच्या मिठीतून जरा बाहेर येऊ आणि अजून एक लेटेस्ट प्रोपगंडा बघू. आरे वाचवा ही चळवळ गेल्या ४ वर्षांपासून सुरु आहे. तुम्हाला माहित होतं का? बहुतेकांना अजुनही माहित नाहीये. म्हणूनच त्यांना आता हे नक्की पटलं असेल की आरे हे जंगल नाहीये. मेट्रो प्रकल्पाचे अधिकारीच काय, आता तर आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय, की आरे जंगल नाहीये, कुरण आहे. कोणत्या कुरणात ४ लाख झाडं असतात ओ? तेही जाऊद्या. कोणत्या कुरणाच्या लहानश्या भागात २७०० झाडं असतात? हा तर मौखिक प्रोपगंडा आहे. सोशल मीडियावर काय चालवलंय माहितीये? ४ वर्ष सुरु असलेल्या, आणि कोणाला मागमूसही नसलेल्या आरे वाचवा चळवळीला विरोध करायला त्यांनी आरे ऐका ना हे सोशल मीडिया कॅम्पेन सुरु केलंय. ज्याने २ दिवसात हजारो ट्विट्स आणि रिट्विट्स मिळवलेत. कसे? आरे वाचवा चळवळीला चूक सांगून.

पहिल्यांदा अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी यांचं भलं मोठं पत्र वजा स्टेटमेंट येतं. आरे कसं जंगल नाही, मेट्रोमुळे काय काय होणार आहे, आरे वाचवा चळवळीतील पर्यावरणप्रेमी फक्त प्रसिद्धीसाठी सहभागी होत आहेत, वगैरे. त्यांचं फेसबूक पेज किंवा अकाउंट मला तरी मिळालं नाहीये. मग हे फेसबूकवर इतक्या वेगात व्हायरल कोण करतं? बरं हे तेव्हा व्हायरल होतं, जेव्हा आरेबद्दल कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये बातमी नव्हती, १-२ सोडलं तर कुठेच आरेबद्दल काही छापलं जात नव्हतं. या बाईंचे ट्विटरवर आत्ता कुठे १० हजार फॉलोअर्स झालेत. मग ही पोस्ट वायरल होते कशी? सर्व #SaveAarey च्या पोस्ट्सवर, कमेंटवर, विविध पेजेसवर पडते कशी? How? कैसन? बरं हा प्रश्न सध्या बाजुला ठेवा. आता आरे ऐका ना काय म्हणतंय पाहूया.

1.  प्रोपगंडा – आरे वाचवा चळवळ ही फक्त पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ चालवत आहेत.
फॅक्ट – ही चळवळ आरेमधील रहिवाश्यांनी सुरु केली आहे, जिच्यात पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ सहभागी होतायंत.

2.  प्रोपगंडा – आरे वाचवा चळवळीचा मेट्रो लाईनला विरोध आहे.
फॅक्ट – मेट्रोला विरोध नाहीये. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी आरेमधील झाडं तोडण्याला विरोध आहे. कारशेड म्हणजे मेट्रो वाहनाचा डेपो म्हणू शकता.

3. प्रोपगंडा - पर्यावरणप्रेमींकडून आरे जंगल तोडण्याचे आरोप बीएमसीवर केले जात आहेत.
फॅक्ट – आरे जंगलातील २७०० झाडं तोडण्याच्या विरोधातच हा लढा आहे.

4. प्रोपगंडा - मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठी वृक्षारोपण मोहीम राबवणार, २३ हजारपेक्षा जास्त रोपटे लावणार.
फॅक्ट – ५० ते १०० वर्षे वय असलेल्या, माती आणि पाणी सहज रोखू शकणाऱ्या झाडांच्या बदल्यात बिया आणि रोपं लावणार. किती ती सद्बुद्धी.

बरं त्यांनी काय पसरवलं ते तुम्ही वर पाहिलं. आता काय सांगितलंच नाही तेही पाहू.

1. त्यांनी मेट्रोमुळे कार्बनची कशी बचत होईल याची माहिती दिलीय. जी योग्यच असेल, पण मुद्दा वेगळाच आहे. आरेमधली २७०० झाडं तोडल्यामुळे काय नुकसान होईल ते सांगितलंच नाहीये.

2. आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कार शेडमुळे आरेच्या परिसरावर काय परिणाम होईल याचं गणित त्यांनी मांडलं नाहीये.

3. बरं फक्त कार्बन आणि ऑक्सिजनचाही मुद्दा नाहीये. मेट्रो कारशेडसाठी जो परिसर निवडला आहे, तिथलं पाणी थेट मिठी नदीत जाऊ शकतं, इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि चकालामध्ये पूरपरिस्थिती उद्भवू शकते, ही वाक्य माझी नाहीयेत. राज्य सरकारच्या समितीनेच त्यांच्या अहवालात हे लिहलंय. आणि हे आरे ऐका नामध्ये नाहीये.

आता विचार करा, आरे ऐका नाच्या कॅम्पेनमध्ये हे सगळं का नाहीये? कारण त्यांना काही ऐकवायचं नाही, लपवायचंय. हा प्रोपगंडा आहे.

हा झाला त्यांच्या तथाकथित फॅक्ट्सचा मुद्दा. पण तो कसा पेरला गेला हे अजून महत्त्वाचं आहे. मुंबई मेट्रो ३ नावाचं ऑफिशिअल ट्विटर अकाउंट आहे. मुळात मुंबई मेट्रोमधील सर्व प्रकल्पांमधील फक्त मुंबई मेट्रो ३ या एकाच प्रकल्पाचं ट्विटर अकाउंट आहे, इतर नाही. ही गोष्ट विचित्र आणि अर्थात संशय निर्माण करणारी आहे. अश्विनी भिडे यांच्या ऑफिशिअल अकाउंटवर #AareyAikaNa हॅशटॅगने ट्विट येतात. मुंबई मेट्रो ३ वरून ते रिट्विट केले जाता. अनेक इन्फ्लुअर्सच्या ट्विटर प्रोफाइल्स वरून राज्य सरकारला समर्थन देणारे ट्विट्स येतात. अनेक मराठी सेलिब्रिटीकडून ट्विट्स येतात. त्यात तुमचा सोज्वळ म्हणवणारा सुमित राघवन सुद्धा आहे (माहितीसाठी लिहलंय फक्त).

हा ट्विटर ट्रेण्ड नक्की कोण पसरवतंय हे जाणून घेण्यासाठी मी ट्रेण्डचे रिपोर्ट्स काढले. ते आपल्याला बऱ्याच एक्सटर्नल वेबसाईटवरून मिळतात.


वरील फोटोमध्ये अश्विनी भिडे, आशू, आशिष चांदोरकर, अनि, सुशिल कश्यप (तथाकथित इन्फ्लूअन्सर), भाजपा महाराष्ट्र, मुंबई मेट्रो ३ हे टॉप ट्विटर अकाउंट्स आहेत, ज्यांना #AareyAikaNa हे ट्विट केलं. त्यात अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो ३ यांनी अधिक ट्विट्स केले, आणि बाकीच्यांनी १ किंवा अधिकाधिक ३ ट्विट्स. ते MP @mpopat आणि Bollywood Era @BollywoodArvind हे अकाउंट काही समजलं नाही. नक्की कोण आहे, का ट्विट करतंय. असो. तर भारतात एकूण ७४९ वैयक्तिक ट्विटर अकाउंट्स होते, ज्यांनी स्वतः या हॅशटॅगसोबत ट्विट केलं, रिट्विटचा आकडा वेगळा आहे.

बरं यातले जास्तीत जास्त ट्विट्स हे इंग्रजीत आहेत. मराठीत नाही. याचा अर्थ काय? आरे वाचवा या मोहीमेत पर्यावरणप्रेमी आणि एनजीओचा मोठा सहभाग आहे. आणि यांचे बऱ्यापैकी फॉलोअर्ससुद्धा आहेत. त्यांना वळवण्यासाठी म्हणा किंवा ट्रोल करण्यासाठी म्हणा हा प्रोपगंडा, इंग्रजीमध्ये.




या इंग्रजी ट्विट्सचा आकडा ८८% पर्यंत पोहोचतो. मराठी ट्विट्स ७.४% आहेत. मग हिंदी आणि गुजराती येतं. पण ते फिनीश आणि इस्टोनिअन भाषेचा आणि आरेमधील झाडं तोडण्याचा काय संबंध आहे कळालं नाही. तेही #AareyAikaNa या मराठी हॅशटॅगसोबत!

ही भाषेची शंका आली म्हणून या ट्रेण्डचा जागतिक रिपोर्ट काढला, आणि अहो आश्चर्यम्. भारतासह कित्येक देशांत #AareyAikaNa हा मराठी हॅशटॅग वापरला गेला होता.



अमेरिका, इटली, यु.ए.इ., कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी, सिंगापूर, हाँग-काँग अशा अनेक ठिकाणी हे हॅशटॅग वापरलं गेलं. कमी प्रमाणात का असेना. तरीही भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. १९०२ ट्विट्स तिथून आलेत.

यानंतर मी #SaveAarey सोबत ट्रेण्डची तुलना केली. एक आठवड्याचा रिपोर्ट मिळाला. खालील फोटो बघा. इथे जांभळा रंग #SaveAarey चा आहे, आणि गुलाबी रंग #AareyAikaNa चा आहे.



डाव्या बाजुला ट्विट्सचे मेन्शन, एन्गेजमेंट, सेन्टिमेंट आणि पोटेन्शिअल रीच रिपोर्ट आहे.
मेन्शन – आरे ऐका नाचे अधिक.
एन्गेजमेंट - आरे ऐका नाचे अधिक.
पोटेन्शिअल रीच - आरे ऐका नाचे अधिक.

पण इथे सेन्टिमेंट म्हणजे त्यांच्याप्रती भावना या महत्त्वाच्या आहेत. आरे ऐका ना चे सेन्टिमेंट ७०.९% नकारात्मक आहेत. आणि तेच सेव्ह आरेचे सेन्टिमेंट ५७.९% सकारात्मक आहेत. हे सेन्टिमेंट प्रत्येक ट्विटच्या कीवर्डनुसार मोजले जातात. म्हणजे मी आरेबद्दल लिहित असेन, आणि मी #AareyAikaNa ला उद्देशून नकारात्मक म्हणत असेन, तर तो माझा निगेटिव्ह सेन्टिमेंट होतो. म्हणजे हा ट्रेण्ड सुरू झाल्यानंतर त्याचाही विरोध करणाऱ्यांनी ट्विट्स केले. म्हणून ते निगेटिव्ह सेन्टिमेंट झालं आहे.

४ सप्टेंबर ते १० सप्टेंबरचा हा रिपोर्ट आहे. उजव्या बाजुला जांभळ्या रंगातल्या ग्राफमध्ये (Save Aarey) थोडंफार सातत्य आहे, आणि ८ सप्टेंबर, जेव्हा मेगा प्रोटेस्ट होतं तेव्हाच थोडासा उंचावलाय. म्हणजे त्या दिवशीचे ट्विट्स वाढलेत. गुलाबी रंग म्हणजे #AareyAikaNa ४, ५ आणि ६ सप्टेंबरला शुन्य आहे. पण ७ सप्टेंबरला सर्वांत जास्त उंचावला आहे. त्या एका दिवशी १५०० पेक्षा जास्त ट्विट्स झाले. ८ सप्टेंबरला ८०० पेक्षा जास्त ट्विट्स आहेत. ९ आणि १० सप्टेंबरला ग्राफ कमी झाला आहे. पण हे लक्षात घ्यायला हवं की कमी असला तरी #SaveAarey पेक्षा जास्तच ट्विट्स आहेत. ३ दिवसांपूर्वी सुरू झालेलं हे हॅशटॅग एका दिवसात १५०० पेक्षा जास्त ट्विट्स करतं, आणि गेले कित्येक वर्ष आणि महिने सुरू असलेलं सेव्ह आरे त्याच्यापुढे फिकं पडतं. कसं शक्य आहे?
  
ट्विटर कॅम्पेन हे कन्टेन्टपासून सुरू होतं. एक दोन हॅशटॅग आणि मेन्शन वापरून एक कंपनी ५० ते १०० ट्विट्स बनवते. बनवते म्हणजे ते ट्विट्स कन्टेनट रायटरकडून लिहीले जातात. त्यात मेन्शन होतं MMRDA, Mumbai Metro 3 आणि अश्विनी भिडे यांना. कन्टेन्ट हा पूर्ण प्रोपगंडा होता, ते आपण वर पाहिलंच. मग हा कन्टेन्ट वेगवेगळ्या एजन्सीला दिला जातो, जे त्यांच्या प्रभावी ट्विटर अकाउंट्सवर ठराविक वेळेला ट्विट, रिट्विट, रिप्लाय करतात. सोबतच सेलिब्रिटीजना या कॅम्पेनसाठी अप्रोच केलं जातं, कारण त्यांच्या ट्विट्सना रीच आणि प्रभाव जास्त असतो. अशा प्रकारे या ट्विटर प्रमोशनने हा हॅशटॅग चक्क एका दिवसात ट्रेण्ड होतो. मग गेले चार वर्षे आरे वाचवा मोहीम चालवलीय तिचं काय? #SaveAarey हे हॅशटॅग ट्रेण्ड व्हायला ४ वर्षेही कमी पडतात, पण एका दिवसात आरे ऐका ना ट्रेण्ड होतो. कसं शक्य आहे? ट्विटर प्रमोशनवर एजन्सीमध्ये पैसा घातला ना, की होय, हे शक्य आहे. मग हे तर फक्त ट्विटर आणि फेसबूक झालं. वृत्तपत्रांमधल्या संपूर्ण पानाच्या जाहिराती, त्यांचं ग्राफिक डिजाइन, कन्टेन्ट, रिसर्च यावर किती पैसा लागत असेल?

बरं तो #SaveForts वाला गेल्या आठवड्यातला दिवस आठवतोय का? तो पूर्ण दिवस प्रोपगंडा बेस्ड होता. एक बातमी, तिच्यावर गदारोळ, किल्ल्यांच्या वर्गीकरणाचा एक व्हायरल फोटो, रावलांचा व्हिडीओ, अमोल कोल्हेचा व्हिडीओ, जाधवगड, जाधवगडाची मालकी, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट. इतिहास अस्तित्वात नाही वगैरे. फक्त ४ भिंती वगैरे. बघा प्रोपगंडा कळतो का.

5 comments:

  1. खूप खूप धन्यवाद हा रिसर्च सर्वसामान्य लोकांसमोर आणण्यासाठी. 🙏

    ReplyDelete
  2. #भाजपचे चाटु पदाधिकारी त्यांच्या थोड्याथोडक्या फायद्यासाठी #आरेला भस्मसात करायला बगतायत.,.

    ReplyDelete
  3. फारच छान विश्लेषण आणि अभ्यास, दडपशाही चालूच राहणार कारण आत्ता संख्याबळ आहे आणि इतर पक्ष कमकुवत झालेत तशी चुकी त्यांचीच आहे पण लोकशाही एकटा मीडिया कसा कंट्रोल करू शकतो ह्याच उत्तम उधाहरण गेल्या 12-15 वर्षांपासून दिसत आहेच.

    ReplyDelete
  4. यातून निर्माण होतो voice less पणा, जर तुमच्या कडे संसाधने नसतील तर तुमचा आवाज कितीही सद्सद्विवेकबुद्धीला धरून असला तरी तो मागे पडतो. बाकी ब्लॉग छान आहे खूप दिवसांनी इतक्या महत्वपूर्ण विषयावर इतके deatil आणि माहितीपुर्ण लिखाण वाचायला भेटले, त्याकरता धन्यवाद... 😊

    ReplyDelete
  5. Very good example of Social Media Analytics

    ReplyDelete