मागील ब्लॉगमध्ये २०१९ चा कन्टेन्ट आणि २०१४ पासून बदलत आलेल्या कन्टेन्ट
बद्दल लिहिलं होतं. म्हणजे २०१४ च्या विकासाच्या मुद्द्यापासून २०१९ च्या शहीद
जवानांपर्यंतचा मत मागण्याचा प्रवास. एखादा कन्टेन्ट जेव्हा प्रत्येक घटनेत वापरला
जातो, किंवा सगळ्या अर्थी फिरवला जातो तेव्हा ते नरेटिव्ह बनतं. उदाहरणार्थ, ‘मोदी लहानपणी चहा विकायचे’ या एका कन्टेन्टवरून किती काही बनवलं गेलं. मोदींच्या गरीब असण्यापासून ते
मोठमोठे ‘चाय पे चर्चा’चे इव्हेन्ट, हे सारं काही नरेट केलं गेलं. चहावरून मोदींच्या
आयुष्याची कथा सांगितली गेली, जी किती खरी अन् किती खोटी हा संशोधनाचा मुद्दा. हा
नरेटिव्ह नियोजित होता, आणि दीर्घकालासाठी वापरला गेला, अजुनही वापरला जातो. पण
आपत्तीकाळात टिकाव कसा धरला जातो याचे काही उदाहरण देते.
१.
५ नोव्हेंबर २०१७ रोजी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धनगर समाजाच्या मेळाव्यात उपस्थित होते. मंचावर भाषण करण्यासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांकडून
धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करून गाणी वाजवली गेली. त्यात आरक्षणाच्या
आश्वासनाचं काय झालं? या प्रश्नासाठी
‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं बेस्ट होतं. आता माइकसमोर असताना, हजारो लोक
आपल्याकडेच पाहत असताना, मीडियाचे कॅमेरा रोखले गेले असताना मुख्यमंत्री काय
बोलणार अशी उत्सुकता होती. गाणी ऐकून, सगळे आरोप ऐकून त्यांनी उत्तर दिलं. – ‘येळकोट येळकोट...
जय मल्हार... येळकोट येळकोट... जय मल्हार.’ धनगर समाजाचा मंच, दैवत खंडोबा. देवासमोर आम्ही संसाराचे प्रश्न विसरतो.
२.
अगदी असाच प्रसंग परभणीतल्या महाजनादेश यात्रेत झाला. दोन
शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न घेऊन घोषणा देत होते. त्यांना आवरण्यासाठी
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बाहेर घेऊन जायला सांगितलं. पण लोकांच्या नजरा अजुनही
त्या घोषणा देणाऱ्यांवरच होत्या. वळवायचं कसं? मग भाषण सुरु ठेवण्यासाठी ‘भारत माता
की....’ लोकांकडून साहजिकच उत्तर
येणार होतं ‘...जय’. ‘वंदे... मातरम्’. मराठवाडा, शेतीप्रश्न. कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायची
निन्जा टेक्निक. देशप्रेम घुसवणे.
३.
आता एक वेगळा प्रसंग भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश
अध्यक्ष, चंद्रकांत पाटील यांचा. महाराष्ट्रात प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली. ७
ऑगस्टपासून सामान्य जनतेसह माध्यमांमधूनही शासनावर दबाव आणला जात होता. दिवसभर
फक्त पूराच्या बातम्या झळकत होत्या. त्यात चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे
पालकमंत्री. मुद्दा हाताबाहेर जाऊ लागला होता. माध्यमांना सामोरं जाणं भाग होतं. मग
९ ऑगस्टला संध्याकाळी चंद्रकांत पाटलांनी बऱ्याच वृत्त वाहिन्यांना लहानश्या मुलाखती
दिल्या. आपण किती मदत केली याची आकडेवारी सांगत होते. त्यातल्या त्यात TV9 मराठीच्या मुलाखतीचा एक हिस्सा वायरल होऊ लागला. ‘अँकरला मंत्रीपदाची ऑफर दिली’ वगैरे. काहीतरी इंटरेस्टिंग म्हणून पूर्ण मुलाखत पाहिली. योग्य प्रश्न, आकडेवारीतले
उत्तरं, पण पाटलांचे मुद्दे दोनच – ‘आम्हाला अंदाज
नव्हता की इतका पाऊस येईल’ आणि ‘लोक घरातून बाहेर पडत नव्हते’. बरं पहिला मुद्दा अँकरने पोखरून काढला, की ‘प्रशासन असतं, इतकं पाणी साठलं तरी २-२ दिवस का लागतात मदत पोहचायला?’ हा झाला आपत्ती नियोजनाचा भाग. पाटलांच्या दुसऱ्या
मुद्द्याला कोणीच हात लावला नाही. ‘लोक घरातून
बाहेर पडत नव्हते, त्याला आम्ही काय करणार? लोकांना जबरदस्तीने कसं सांगणार की बाहेर या?’ यावर प्रतिप्रश्न न करण्यामागचं ते कानात असलेलं दडपण सध्या समजू शकते. पण लोकांकडून
तरी प्रतिप्रश्न असे असायला होते, की ‘लोक का बाहेर
पडत नव्हते? असे लोक बाहेर येत नव्हते
का, ज्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत? जर होती, तर
त्या जनावरांना बाहेर काढत होतात का? नाही तर का
नाही?’
मुद्दा असा, की
या वक्तव्यामुळे हाच समज झाला, की लोक बाहेर येत नाहीयेत. बरं या सगळ्या मुलाखतींनंतर
रात्रीपर्यंत एक व्हिडीओ वायरल झालेला. ज्यात एक कुटुंब विनंती करूनही घरातून
बाहेर येत नाहीये. त्यावर लोक बरेच चिडले. पूरग्रस्त भागातील लोकांबद्दल निराशा
निर्माण झाली. पण ‘तो व्हिडीओ कोणत्या
दिवसाचा होता?, व्हिडाओ काढणारा कोण होता?, त्यांना बाहेर पडण्यासाठी विचारणारे कोण होते?, त्या भागातलं पाणी ओसरू लागलेलं का?’, हे सगळे प्रश्न त्या गोंधळात फार कोणाला सुचले नसावेत.
म्हणूनच चंद्रकांत पाटलांचं नरेटिव्ह यशस्वी झालं असं म्हणता येईल.
वायरल व्हिडीओची लिंक - https://m.facebook.com/story.php?story_fbid=2405123826242223&id=631788120242478
या नरेटिव्ह मधून नक्की काय शिकायला हवं? हे नरेटिव्ह जसे प्रत्यक्ष नेत्यांकडून केले जातात ना तसेच ते पसरवण्यासाठी
सोशल मीडियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जसा या पूरातील व्हिडीओमुळे
तिथल्या लोकांबद्दलच अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला ना, अगदी तसाच वापर
म्हणतेय मी. विचार करा. देशावर आर्थिक संकट निर्माण झालंय. हजारे लहानमोठे उद्योग
कंपन्या बंद होतायंत. लाखो नोकऱ्या जातायंत. अन्नधान्याचे भाव वधारलेत. आरे
जंगलातील जवळपास २७०० झाडे कापण्याचा निर्णय झालाय. त्याविरुद्ध लोकांचा लढा सुरु
आहे. ट्राफिक नियम, दंड बदललेत. पण आजपासून ५ सप्टेंबर पर्यंत आपण न्युज चॅनलवर काय
पाहणार आहोत? दिग्गज नेते एका पक्षातून
दुसऱ्या पक्षात कसे जातायंत वगैरे. का पाहणार? कारण इतर काही दाखवू शकत नाही, तशी वरून ऑर्डर आहे. वरून
कोणाकडून? चॅनलच्या मालकाकडून. असो.
तर कोणत्याही माध्यमांवर अवलंबून राहू नका. कोणत्या नरेटिव्हचा फायदा कोणाला
होत असतो इतकाच विचार करा. पण विचार करा.
No comments:
Post a Comment