Wednesday, 6 August 2025

माझ्या PMS च्या नोंदी - १

किचनमध्ये कुकरची पहिली शिट्टी झाली, आणि ऋताचं चार वेळाखीखीखीखी,’ ‘दादू दादूआणिमम्मी मम्मीचा जप, उगाच साळसुदपणाचा आव आणत लायटर हातात घेऊन रियुचापप्पा हे काये?’चा पाढा, ते बघून दादा आणि वहिनीच्या चेहऱ्यावरही अजूनही फुकतेयच्या दोन आठ्या, आणिजसं काही या वर्षांच्या घोड्याने कधी बापाच्या हातात लायटर आणि सिगारेट बघितलीच नाहीचे भाव आणूनअरे हे धूपसाठी आहे रेम्हणत माझा सावरण्याचा प्रयत्न, तेवढ्यात दुसरी शिट्टी झाली आणि वहिनी ओट्याकडे वळली. ऋताने लगेच चार्जिंगला लावलेला फोन हातात घेऊन युट्यूब चाळायला सुरुवात केली. रियु पुन्हा मला चिडवायला म्हणून घरातल्या सगळ्यात दुरुपयोगी वस्तू शोधू लागला. दादा बाल्कनीमध्ये जाऊनव्ह्यु काय भारीयेम्हणत टीशर्टमध्ये हात टाकून तो वाढलेल्या पोटावर फिरवू लागला, तेव्हा तो अगदी त्याच्या बापासारखा वाटला. फूट उंच, कलिंगडाएवढं वाढलेलं पोट, आणि आपल्या नैतिक-अनैतिक कुटूंबांसकट पूर्ण जगावर उपकार केल्यासारखे संतुष्ट भाव. दादा बाल्कनीबाहेरच नजर टाकत म्हणाला, “संध्याकाळी महालक्ष्मीला जाऊयात.” म्हटलं, “हो, तिथून रंकाळा, आणि मग रात्रीचं जेवण बाहेरूनच करून येऊ. मी एक चांगलं हॉटेल शोधलंय. इथून जवळच आहे.” दादाने बाहेर बघतच होकार दिला. तिसरी शिट्टी झाली आणि खालून घंटागाडीचं अतिशय बालिश आणि बेसूर गाणं वाजू लागलं. ‘ओला कचरा सुका कचरा, नवी करू सुरुवात हो..’ आवाज ऐकून रियु आणि ऋता दोघेही बाल्कनीत गेले, आणि त्या बेसूर गाण्यावर नाचू लागले. मी ओट्यावरचा कचरा आवरून डबे घेऊन जायची घाई करू लागले, तसा दादा म्हणाला, “अरे, इथे कचरेवाला नाही येत?” म्हटलं, “नाही, आपणच घेऊन जायचं असतं.” रियु ऋताचा फ्रिस्टाईल डान्स सुरूच होता. दोघेही उड्या मारत पूर्ण सोसायटीला आवाज जाईल एवढ्या जोरजोरात गात होते. किचनमधून चौथी शिट्टी वाजली, वहिनीने गॅस बंद केला. दोन्ही बारक्यांचे गोड आवाज घंटागाडीच्या गाण्यात मिसळून गेला होता. उशीर तर होत नाहीये ना, गाडी पुढे गेलीय का बघायला मी बाल्कनीत जाऊन डोकावलं. गाडी तिथे नव्हतीच. झालं..! आजपण कचरा टाकता नाही आला. आज शुक्रवार, आता थेट सोमवारीच गाडी येणार. ओल्या कचऱ्याला पुन्हा तीन दिवस वास मारत राहणार. किचन पुन्हा घाण वाटणार. हे चौघंही अजून दोन दिवस आहेत. पाच दिवसांचा कचरा तीन दिवस तसाच सडणार. एवढे दिवस झाले इथे येऊन, पण घंटागाडीचं आणि कचऱ्याचं गणित अजून जुळलं नाहीये माझं. कोणत्या दिवसाला येते, किती वाजता येते, किती वेळ उभी राहते, दिवसातनं दोन वेळा चक्कर मारते कि नाही, समजतच नाही. एक मिनिट, गाडी दिसत नाहीये, बाजुच्या बिल्डिंगमध्येही नाहीये, मग आवाज कुठून येतोय? आवाज आहे, तर मग गाडी गेली कुठे? मी बाल्कनीमधून खोलीत आले, बेडरूममध्ये गादीवर बसले, तशी ऋताने आत येऊन पुन्हा त्या गाण्याने कान खायला सुरुवात केली आणि आपल्या गोड आवाजात जोरात ओरडली, तेवढ्यात माझे डोळे उघडले. बेडरूमच्या बंद खिडकीतून घंटागाडीचा सौम्य आवाज येत होता. मी खोलीत इतरत्र नजर फिरवली. कोणीच नव्हतं.

इथे आल्यापासून आज एक महिना झालाय, कोणीच आलं नाहीये. काळजी म्हणून नाही, पण फिरायला म्हणून तरी यावं. तसं एवढं काही कष्टाचं नाहीये, मुंबईहून महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडली की झालं, कोणीही येऊ शकतं. बदलापुरात सगळ्यांपासून अगदी हाकेच्या अंतरावर राहत होते तेव्हा तरी कुठे कोण आलेलं. मग हे तर ४०० किलोमीटर दूरचं शहर. काकू म्हणतच होती, तिला कुठेतरी फिरायला जायचंय. पण तिथून एक कॉल सुद्धा आला नाही. काकू दोन-तीन महिने, बहिणीही जवळपास एक-दोन महिने, आई कि ? आणि बाप १० कि १२? कोणतं वर्ष होतं? नाही, ह्यांचे दिवस मोजत बसत पुन्हा मागे जायचं नाहीये.


वाजलेत किती? सात? काय फालतुगिरी आहे. एवढ्या सकाळी कोण कचरा टाकायला जातं? काय मूर्ख लोकांचं शहर आहे. दोन हजार फुकटचा मेन्टेनंस घेतात, बिल्डींगमध्ये दोन मोठे डबे ठेवायला काय जातं ह्यांना. सगळ्यांच्या घरात हाऊसवाईफ आहेत, म्हणून चालून जातं. पुरुषांना एकदा एवढ्या सकाळी कचरा टाकण्याचं काम सांगून बघा, दुसऱ्या दिवशी बिल्डींगमध्ये मोठे डबे दिसतील. इथे सात म्हणजे काही खूप लवकर सुद्धा नाहीये म्हणा. त्यादिवशी समोरच्या घरात पाच वाजता लाईट पेटलेली. एवढ्या लवकर उठून करतात काय हे लोक? मग रात्री वाजताच सगळं बंद करून झोपून जातात. मीही ह्यांचा रूटीन फॉलो करू का? काय माहीत, जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह दिवस जाईल. उद्यापासून करते. पण आता उठावं वाटत नाहीये. पण तोंड धुवून, ब्रश करून, जावंच लागेल. आज नाही गेले तर तीन दिवस कचरा तसाच राहिल, वास मारेल, तो आवरायला किचनमध्ये कापूर, धूप, अगरबत्ती आणि माझं डोकं पेटवत ठेवावं लागेल. वैतागवाडी नुसती. तोंड धुवू कि नको? ब्रश नाही करत, फक्त तोंड धुते. नको, आताच आलीये वाटतं गाडी. दोन मिनिटांत आवरेल. येऊन परत झोपते. नको, येऊन गप्प कामं सुरू करते. फ्रेश वाटेल. हूह. काय करू? सोड, उठतेच.


डोळ्यांखाली खूपच काळं झालंय. काल एवढं जागं राहायला नको होतं. आजपासून व्यवस्थित रूटिन लावायला हवा. व्यायाम वाढवायला हवा. थायरॉइड परत एकदा चेक करू का? डाएट आणि व्यायामाला मदत होईल. तसंही आधीपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेला वाटतोय. पण डबल चिन काही कमी झाली नाहीये. वाढतेय का? त्या इन्स्टाग्रामवाल्या पोरीसारखं तर काही नसेल ना? क्लॉट्स तर नाहीत ना? लागत तर नाहीये काही तसं. क्लॉट्स असतील ऑपरेशन करावं लागेल. च्यायला मेडीक्लेम करून घ्यायला हवं होतं. पण हे डबल चिन मी वजन वाढण्याआधीच होतं का? नाही नाही. तेव्हा हाडं होती नुसती. पण गाल तर बरेच फ्लफी होते आधीपासूनच. म्हणजे तेव्हा डबल चिन मी नीट बघितली नसेल का? याची पण एक टेस्ट करू का? नको. फालतूचे पैसे खर्च करायला काय मी आधीसारखे कमवत नाहीये. पैसे रेग्युलर झाले की बघू. ते झाले की ती हजार रुपयांची टूथपेस्ट पण घेऊन बघीन. तशी ही वाली पण ठीकच आहे, पण पैसे असतील ट्राय काय हरकत आहे? पण आता नाही, नंतर. घंटागाडीचा आवाज कमी झाला का? नाही, माझ्या ब्रशचा आवाज होता. सोड, बाल्कनीमधून बघते. हे चांगलंय, इथे शहर आणि डोंगर बघत सकाळ होते. काय वाईट थंडीये पण. हिवाळ्यात एक मिनी हिटर घ्यावाच लागेल. गेले तिथे पण हजार रुपये. एक मिनिट, घंटागाडी कुठेय? शीट. आज परत मिस झाली.

3 comments:

  1. Kolhapur ची गोष्ठ च निराळी

    ReplyDelete
  2. पुढचा भाग येऊ दे. मस्त.

    ReplyDelete
  3. स्वतःला explose न करणे... या चक्रात मीपण अडकलोय.... कारणं वेगळी आहेत...

    ReplyDelete