Thursday, 14 May 2026

Moora - Not found

दोन आठवडे झाले, नव्या घरात आले. पुन्हा तेच घर बदलणं - टेम्पो-मूवर्सवाल्यांना हजारदा फोन, किती सामान, कुठून कुठे, कितवा मजला, किती माणसं, किती चार्जेस; घर स्वच्छ करणं - आधीच्या लोकांच्या वस्तूंची विल्हेवाट, घासाघास, खिडक्या, लाद्या, कोपरे; वस्तू लावणं - कशात काय ठेवलंय, सगळं पुन्हा धुवा, पुसा, स्वच्छ करा, नको ते टाकून द्या, आधी का नाही टाकलं म्हणून स्वतःलाच कोसा, वस्तू लावायला electrician, plumber ला बोलवा, १० वेळा फोन करून दोन दिवस वाट बघा, वैतागून दुसऱ्यांना बोलवा; किराणा भरणं - मूविंग नंतर आणखी एक मोठा खर्च; आठवड्याभराचं वाटण बनवून ठेवणं - जे पहिल्या दोन आठवड्यांत बनवण्याची ताकद आणि डोकं दोन्ही नसतं. सगळं सगळं करतेय. पण नेहमी एकटंच. असं एकटं नव्हतं करायचं. कधीच नव्हतं करायचं. ही नाहीये empowerment वगैरे. ही नाहीये strength वगैरे. यात काहीच smartness नाहीये. जबरदस्ती करावं लागतंय. काही option नाहीये. एक लाईट चालु ठेवते, का तर कोणी येईल याची भीती नाही, उलट कोणीतरी आहे हे वाटावं म्हणून. १५ दिवस झालेत, मूव-इन करून, अजून एकदाही मूरा ऐकलं नाहीये.

काही गोष्टी फक्त documentation साठी असतात. हा ब्लॉग त्यासाठीच आहे.