Tuesday, 15 September 2015

पहिली पोस्ट

 कुठेतरी ऐकलं होतं की ब्लाॅग म्हणजे खरं तर आॅनलाईन डायरी आहे ज्यात आपण मनाचं, आवडणारं, न आवडणारं, सगळं काही शब्दात मांडू शकतो.
 मी डायर्या खुप लिहल्या आहेत, ज्यात छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी ब्रेक-अप अाणि भांडणांपर्यंत सगळं काही लिहलंय. मग ही डायरी लिहण्यात एवढा कसला विचार करावा मी? मनाला वाटतं ते लिहत सुटावं असं मला वाटायचं, मग हे ब्लाॅग का जमत नाहीये मला? 
ब्लाॅगला पब्लिक आॅनलाइन डायरी म्हणायला हवं, कारण डायरी ही दुसर्यांना वाचायला नाही तर आपल्या मनाचं ओझं कमी करण्यासाठी असते. पण झालंय असं की माझी ही डायरी अख्खं जग वाचणार आहे म्हणून कदाचित मला भिती वाटतेय. जसं कोणतीतरी नवीन स्टाईल केल्यावर लोक आपल्याकडे बघतील या विचारात आपण असतो, अगदी तसंच आता मला ही पोस्ट शेअर करताना वाटतंय. कारण पब्लिकली काही करायचं म्हटलं तर विचार हा करावाच लागतो. हल्ली तर गर्दीत चालण्याचेही धडे घ्यावे लागतात, मग हे सोशल नेटवर्कींग तर अजुनच डेंजर आहे, मग ते डायरी असो वा प्रोफेशनल मेल, सगळंच सोफॅस्टीकेटेड झालंय.
 असो, तर मला कळत नाहीये की मी नक्की काय लिहू ह्या पब्लिक डायरीमध्ये? माझे अनुभव की लोकांचे आवडलेले किस्से? राजकारण की माझे रोल माॅडेल? शाळेत लिहतात तसे निबंध लिहू की काॅलेजमध्ये डिबेट होण्यासारखे संस्कृती आणि संस्कारांचे विषय घेऊ?
 लोकांसोबत बोलायचं झालं तर कितीतरी विषय चर्चा करायला मिळतात. पण तेच एकपात्री स्पर्धेसारखं एकट्यानेच बडबडणं म्हणजे फारच अवघड. आणि त्यात हे आॅनलाईन बडबडणं म्हणजे फेरीवाल्याचं "रद्दी पेपर भंगार" ओरडण्यासारखं आहे, ऐकतील तेवढे  जागे लोकच  दाद देतात.
 असो, तर काय लिहु यावर बोलता बोलता बरंच काही लिहलं, तर आता ही झाली माझी पहिली पोस्ट...

4 comments: