Wednesday, 27 July 2016

डायरीतल्या गोष्टी #१

नुकतंच बदलापूरला राहायला आले होते मी पहिलीत असताना. काहीच महिन्यांत महिन्यांत गोपाळकाला आला. आणि आम्ही खाड्यातले लोक खाड्यातला गोविंदा चुकवू असं होऊच शकत नाही. कारणही तसंच होतं ना, होतं काय, आजही आहेच. रात्री बाराला एक हंडी फोडायचेच, पण सकाळची जी धमाल असायची, ती कुठेच नव्हती. बैलगाडीवर चार-पाच जणांची वेशभूषा करून, बेंजोच्या तालावर नाचत पूर्ण चाळ मिरवणूक घेऊन निघायची. त्यात कृष्ण तर नेहमीच असायचा, पण इतर देव-देवींना, आणि चित्रपटातल्या प्रसिद्ध भूमिकांनाही मिरवणूकीत मान मिळायचा. आजकाल सामाजिक संदेशही त्या मिरवणुकीत देतात. तर पहिलीतली मी ही मिरवणूक संपवून, बेंजोवर खूप नाचून चाळीत परतले. परतले ते प्यायलेल्या काकांनी अंगावर चढवलेला जॅकेट आणि डोळ्यांवर गॉगल घेऊनच. जॅकेट पायांपर्यंत आला होता, तरी मी मिरवतच होते तो. मिरवायची हौस तशी तेव्हापासूनचीच. तोर्यातच मावशीच्या दारात गेले आणि तिथे जमलेल्या बायका मला पाहून खिदळायला लागल्या, मीही हसू लागले. वेडीच होते मी. त्यातल्या शिकवणी घेणार्या काटे वहिनी, नात्याने किंवा वयानेही वहिनी नाहीत त्या, तरी आजुबाजूच्यांचं ऐकून सवय झाली होती वहिनी बोलायची, तर काटे वहिनी कौतुकाने म्हणाल्या, "डॉक्टरीणबाई... काय गं, आयशीसारखी डॉक्टर होणार ना तू?" माझ्या त्या मोठ्या जॅकेटमुळेच म्हणाल्या असाव्यात त्या. पण त्यांना काय माहीत, मी त्यामुळेच पुढे आईसारखं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहू लागले होते. खेळण्यातलं स्टेथस्कोप घेऊन बाहूलीला तपासू लागले होते. मग आई लोकांना कोणत्या रंगाच्या गोळ्या कोणत्या आजारासाठी देते ते लक्षात ठेवू लागले होते. पण माझ्या भाबड्या डोळ्यांतलं भाबडं स्वप्न तेव्हाच तुटलं जेव्हा नववीचं विज्ञानाचं पुस्तक माझ्या हाती आलं. ते तसंच टाकून मी जे दूर पळाले, ते आतापर्यंत नक्की काय बनावं ह्याच विचारात अजुनही पळतेय... जशी काटे वहिनींच्या बोलण्याने लाजून पळाले होते, अगदी तशीच, पण घाबरून.

No comments:

Post a Comment