Thursday, 20 July 2017

रायगडावरील स्तंभ

रायगडावर राजवाड्याच्या बाजूला अंगणाएवढी जागा सोडून तीन मजली निमुळत्या खिडक्यांचा एक स्तंभ आहे. पुढे बालेकिल्ल्याच्या भिंतीला टेकून अजून दोन स्तंभ आहेत. त्यांच्या दगड आणि नक्षीकामावरून ते शिवपूर्वकलीन असल्याचं दर्शवतात. स्तंभाच्या मधोमध कारंजे असण्याचीही खूण मिळते.

संध्याकाळी गडाचा लवाजमा आटोपून वृंदावनजवळ दिवा ठेवून महाराणीसाहेब याच प्रांगणात आपल्या सहचारिणींसमवेत शतपावली करत असाव्यात. मग केव्हातरी या अष्टकोनी स्तंभावर जात असाव्यात. तिथली कारंजं खोबणीतल्या दिव्यांच्या प्रकाशात मिणमिणत असावीत. एका खिडकीचा पडदा सारून त्या निवांत बसून मनाचे पडदे उघडत असाव्यात.

संध्याकाळच्या सूर्यकिरण आणि मेघांच्या खेळात त्यांना आपलं खेळकर बालपण आठवत असावं. कधी आई आठवत असावी, वडील आठवत असावे, तर कधी लग्नानंतरची माँसाहेबांची प्रेमळ माया आठवत असावी. लग्न झाल्यावर आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेसारखीच ढगांनी भरलेल्या आभाळाची जाणीव होत असावी. कधी मोहिमेवर गेलेल्या स्वारींची वाट पाहणारी सांज कोरडी होत असावी. कधी या रायगडासारख्या अभेद्य सम्राज्यावर सावटाचं आभाळ असावं, तर कधी लढाई जिंकून आलेल्या राजांचं स्वागतोत्सुक आभाळ असावं. बाळराजेंना खेळवणारं, खळाळणारं आभाळ असावं, तर कधी मुलांना लढाईचे धडे घेताना पाहणारं लढाऊ आभाळ असावं. राज्याभिषेकाला वैभवाचं, स्वातंत्र्याचं, मोकळं आभाळ असावं, तर नजरकैदेत असताना आभाळालाच कैद करावंसं वाटलं असावं. असे एक ना अनेक आभाळ नजरेवरून फिरवून, गंगासागर तलावातील सौम्य तवंगांना पाहत मनातील तवंग रिझवून त्या राजवाड्यात जात असाव्यात,
उद्याच्या आभाळात लढण्यासाठी...

फोटो - सौमित्र सुनिल देसाई

No comments:

Post a Comment