Friday 21 July 2017

कोथळीगड (Kothaligad)

     कोथळीगड हा शिवकालीन किल्ला कर्जतपासून साधारण २१ किलोमीटरवर, पेठ या गावात आहे. पेठ गावामुळे त्याला 'पेठचा किल्ला' असेही म्हटले जाते. गावापाशी गेल्यावर खरं तर तो दिसतही नाही. त्यासाठी सुमारे १५०० फूट डोंगर चढावा लागतो. पण एकदा का त्याचं दर्शन झालं, की त्याचा सुळका सतत खुणावत राहतो.

     कोथळीगडाच्या  पायथ्यापासून ते अगदी शिखरापर्यंत माणसाच्या बुद्धीची, कल्पकतेची आणि कलेची आपण साक्ष घेतो. पायथ्याच्या गावातल्या घरांपासूनच याची सुरुवात होते. पायथ्याच्या गावात लाल विटांची, मातीने चोपून तयार केलेली घरे, त्याच्या आडोशाला ठेवलेली मोठाली चाकं, अंगणात खेळणारी मुलं आणि दारातून आपल्याला पाहून 'लिंबूपाणी, पोहे, काही घेणार का ताई?' म्हणून विचारणाऱ्या मावशी. हे असं दृश्य डोळ्यांत तरळत राहतं नुसतं. इथल्या एका तरी मावशीच्या घरी लिंबूपाणी, चहा, पोहे, अशी न्याहारी नक्की करावी. पुढे गड चढायला घ्यावा. एकावर एक आलेले दगड पायऱ्याच बनवून देतात. एका ठिकाणी तर मोठ्या, तिरप्या दगडावर लहानशा पायऱ्या कोरलेल्या दिसतात. सुळक्यावरच्या पायऱ्यांचा हा नमुनाच जणु!


     यामुळे सुळक्याकडे जाण्याचं आकर्षण तीव्र होतं आणि त्या पाषाणयुगातून जायची मजा वाढते. शेवटी एकदाचा सुळका येतो आणि गुहेच्या पोटातल्या भल्यामोठ्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांवाटे शिखरावर जाण्याआधी सुळक्याचा भोवतालचा परिसरही पाहून घ्यावा. सुळक्याच्या खाली डावीकडे दोन मोठमोठी कोठारे आहेत. या दगडात कोरलेली ही धान्य कोठारे किंवा त्यातलं एखादं दारू कोठार असावं. सुळक्याच्या उजवीकडेही असेच, पण बंदिस्त अशी कोठारे आहेत. यातील पहिलं पाण्याचं टाकं असावं. पुढच्या दोन कोठारांत बंदुखा, बाण, होक ठेवत असावेत. शेवटची कोठारे सर्वांत मोठी आणि इतरांपासून दूर आहेत. त्यात दारूगोळा ठेवत असावेत. या कोठारांतील भिंतींना आणि तळालाही चुना थोपलेला आहे. तो आजही सक्षम आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित 'आज्ञापत्रात' असल्याप्रमाणे तळघरात, म्हणजे जास्तीत जास्त खोल खणलेल्या आणि किल्ल्याच्या इतर इमारतींपासून दूरच्या कोठारात दारूगोळा ठेवणे योग्य आहे. तसेच, बाण, होक अशी हत्यारे मध्यघरात ठेवावी. या शास्त्राप्रमाणेच बनवलेली ही शस्त्रकोठारे आहेत. बरं ह्यातलं एखादं कोठार वगळता सगळी कोठारे सुरक्षित आहेत. यावरून कोथळीगडाच्या सुरक्षिततेचा अंदाज येतो.


     पण उजवीकडच्या कोठारांकडे जाणारी वाट फार चिंचोळी असल्याने तिथून हत्यारे कसे नेत असावेत हा प्रश्न पडतो. कारण त्या चिंचोळ्या वाटेने दोन्ही किंवा एका हातातही अवजड सामान नेणं जिकीरीचं आहे. कदाचित तिथली जमीन, कडा खचून कोसळला असावा. जाणकारांनी पाहून याचा निष्कर्ष काढावा.

     गुहेच्या डावीकडे एक लेणी आहे. ही नक्कीच शिवपूर्वकालीन असावी. लेणीत मुख्य अशा चार खोल्या आहेत. पण शेवटच्या दोन खोल्यांत वटवाघुळांनी आपले घर केल्याने तेथे जाता येत नाही. बाहेरच्या मुख्य खोलीत आधारासाठी चार खांब आहेत. यांवर कलात्मक अशी चित्रे कोरली आहेत. पण बाजुच्या खिडक्यांतून येणारा पाऊसवारा सहन करून ती भग्न झाली आहेत. खांबाच्या सर्वांत वर दक्षिण भारतातील राक्षसाच्या मुखवट्यासारखा चेहरा चितारला आहे. याचा हेतू नक्कीच वाईट नजरेपासून सुरक्षा मिळावी हा आहे. त्याखालील सुंदर रेखीव नक्षी आगीच्या ज्वालांसारखी वाटते मला. त्याखाली भग्नावस्थेतील एक चित्र आहे. त्यात दोन नर्तकी आणि दोन वादक असावेत असं वाटतं. त्यातल्या एका वादकाच्या हातात ढोलकी तर एकाच्या हातात डफली असावी. या चित्राला लागूनच खांबाच्या कोपऱ्यातील रचनेत दोन्हीकडे एक-एक नर्तिका आहेत. त्याखाली मोरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याची लहानशी नक्षी आहे. त्याखाली एक नर्तिका असावी अशा महिलेची भग्न झालेली, पण आकाराने मोठी कलाकृती आहे. प्रत्येक खांबावर अशी सारखीच चित्रे व नक्षी आहे. आणि यावरून इथे राहणाऱ्या लोकांत संगीत व नृत्यास महत्वाचं स्थान असावं असं वाटतं. हा त्यांचा व्यवसायही असू शकेल. प्रवेशद्वरावर मध्यभागी एक चित्र आहे, पण ते इतकं भग्न झालंय, की ते चित्र नक्की कोणाचं, कसलं आहे याचा अंदाजही येत नाही. उजवीकडे मोठा कठडा असून त्याच्या भिंतीवर काही चौकोनी खिडक्या दिसतात. ती माळ्यासारखी सामान ठेवण्यापुरती जागा असावी असं वाटतं. पण त्यातही वटवाघुळ असल्याने, ऑक्सिजन कमी असल्याने आत जाणं टाळलंच जातं. खांबांकडची, बाहेरची भिंत ही विटांची आहे. ती कदाचित लेणी बांधल्या नंतर, किंवा शिवकाळात बांधली असावी. पाऊसवारा आत येऊ नये व खांबांतील चित्रांच्या सुरक्षेसाठी ती बांधली गेली असावी. पण तीही आता काहीशी ढासळली आहे.


     लेण्याच्या आत जाण्याआधी  एक ग्रामदेवतेचं किंवा कदाचित विठ्ठल रखुमाईचं लहानसं मंदिर आहे. मुर्ती पाहून वाटते, की त्या काळात कादाचित देवांची संकल्पना फार खोलवर रुजली नसावी. पण एकविसाव्या शतकातल्या माणसाने मंदिराबाहेर 'महिलांनी आत प्रवेश करू नये' असं का लिहलं असावं, याचं उत्तर काही मिळत नाही.

     लेणी पाहून मग पायऱ्या चढायला घ्याव्या. मोठमोठ्या पायऱ्या प्रचंड थकवतात. एक पायरी दिड फूट तरी असावी. गुहेत उजवीकडेही लहान पायऱ्या आहेत. पण त्या सरळ कड्यावर आणून सोडतात. त्यामुळे तिथल्या तुटलेल्या दगडांना पाहून तिथे काहीतरी असावं असं राहून राहून वाटतं. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलं की उसंत मिळते. या प्रवेशद्वाराबाहेर शरभ या प्राण्याचं चित्रं दगडात कोरलं आहे. बाजुलाच गजमुखही आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजुला एक-एक आडव्या, मोठ्या खोबणी आहेत. त्यांचा रक्षकांना तलवारी, बाण ठेवायला वापर होत असावा. 

     पुढच्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण शिखरावर पोहोचतो. समोरच लहान झाडाझुडपांच्या सावलीत असलेलं पाण्याचं टाकं दिसतं. पाणी आजही पिण्यायोग्य आहे हे महत्वाचं. पुढे कडेला गेल्यावर डावीकडे एक दगड ठेवला आहे. कदाचित तटबंदीचा किंवा इतर बांधकामातला हा उरलेला एकमेव दगड असावा. तिथून खाली पाहिलं तर एक वाट समोरच्या डोंगराला, किंबहूना डोंगररांगेला जाऊन मिळते. या डोंगररांगेच्या डावीकडे गेल्यास वाजंत्री घाट आणि  पुढे भीमाशंकर डोंगररांग मिळते. बरं त्याच रांगेत पुढे गेल्यास पदरगड दिसतो आणि पलीकडे भीमाशंकरचा डोंगर. याच वाटेने कोथळीगड या समृद्ध शस्त्रागावरून शस्त्रसाठ्याची ने-आण कशी होत असावी, हे प्रत्यक्ष अनुभवण्यास ही भटकंती खरंच रोमांचकारी असेल. हा साराच रोमांच मनात साठवून, इथे निवांत बसल्यावर गवताच्या पात्यांवरून भिरभिरणारे बहुरंगी, बहुप्रकारचे फुलपाखरू पाहिले ना, की या जागेची, इथल्या पराक्रमाची साक्ष मिळते. तुफानी वाऱ्यातही जगणारे हे फुलपाखरू आपल्यालाही तुफानात जगायला शिकवतात.

No comments:

Post a Comment