आमच्या परिसरातील एका इमारतीतले बौद्ध धर्मातील लोकही त्यांच्या इमारतीत गणपती बसवतात. नवरात्रीत गरबा, दांडियासुद्धा असतोच. मीही जाते तिथे खेळायला. होळी साजरी होते. बिल्डरने संपूर्ण इमारत फक्त बौद्ध बांधवांसाठी बांधलीय. त्यामुळे अर्थात सगळेच बौद्ध आहेत. मग त्यांच्यावर हिंदू धर्मीयांचा त्रास असणं, किंवा गणपती जबरदस्ती बसवला गेलाय असंही नाही. बरं इतर सर्व इमारतींत गणपती मंडळ आहेत असंही नाही. त्यामुळे हिंदू धर्माशी सांगड घालण्यासाठी किंवा इतरांत मिसफिट वाटू नये यासाठीही ते करत नाहीयेत. ते इतरांप्रमाणे मध्यमवर्गीय आहेत, किंवा आम्ही सारेच मध्यमवर्गीय आहोत. त्यांना आवडतं, म्हणून ते करतायत. इथे कोणी अडवलंही नाहीये त्यांना. उलट इतर इमारतीतले, इतर जातिधर्मातली मुलंही त्यात उत्साहाने सामील असतात. बरं बुद्ध जयंती, आंबेडकर जयंतीही आमच्याकडे दिमाखात साजरी करतात. त्याचा कोणीच त्रास करून नाही घेतला कधी. उलट सकाळ सकाळ गणपतीत जशी गाणी ऐकू येतात आणि प्रसन्न वाटतं, तसंच काहीसं आम्हालाही वाटतं. सकाळी लवकर उठून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी त्यांचे पाहूणेही येतात, आमच्याकडे गणपतीला येतात, अगदी तसेच... आमच्या इमारतीत नसलं तरी आम्ही वर्गणी देतोच सगळ्या सणांसाठी.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवस पाहतेय, घरी गणपती बसवला म्हणून भाऊ कदमवर फेसबुकच्या माध्यमातून प्रचंड टोकाची टीका होतेय. मी याआधी जाती धर्मावर फार लिहलं नाहीये. कारण त्यात कधी पडावसंच वाटलं नाही मला, आणि अर्थात माझ्या आडनावावरूनही नको ते वाद होतील. पण आता काही दिवसात जे दिसण्यात आलं ते भयावह आहे. भाऊ कदम हे उत्कृष्ट कलाकार आहेत, घराघरांत लोकप्रिय आहेत. आता त्यांची श्रद्धा असावी गणपतीवर, देवावर, म्हणून बसवला गणपती. हे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. ह्यात त्यांची जात कुठे आली हा प्रश्न पडला मला सुरुवातीला. पण नंतर आकलन झालं, की जात भाऊ कदमची नव्हे तर जातीयवाद्यांची मधे आली. प्रत्येक धर्म, जात यांचा प्रचार करण्याची मानसिकता एकच असते, ती कमी होण्याची, त्याची लोकप्रियता कमी होण्याची भीती. मग त्यासाठी टोकाची भूमिका ही मंडळी घेतात. देव ह्यांचा लाडका. देवाच्या नावावर नको ते खपवतात. सनातन संस्था ही त्यातील एक आहे हे आपल्याला माहित आहेच. पण स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणवणाऱ्यांचं काय? खरं तर त्यांना बुद्ध कळाले असते तर ती टीका केलीच नसती त्यांनी. बरं मूर्तीपूजन करणाऱ्यांवरच इतकी आगपाखड का? हिंदू धर्मीयांनी बौद्ध धर्म आचरण केलं तर योग्य ठरतं, पण बौद्धांनी मूर्तिपूजा केली तर धर्म कळला नाही असा आरोप करवा? 'आमची ती अस्मिता, तुमची ती सनातनी वृत्ती' असाच आशय निर्माण होतो यातून. व्यक्ति स्वातंत्र्य जसं मूर्तीपूजनावर बहिष्कार टाकण्यात आहे तसं ते मूर्तीपूजन करण्यातही आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.
आज भाऊ कदम लोकप्रिय आहे म्हणून त्याच्यावर इतक्या त्वेषाने टीका करतायत. तितक्याच त्वेषाने आमच्या परिसरात येऊन त्या बौद्ध बांधवांचा विरोध करतील का? नाही ते शक्य नाही. कारण त्यामुळे प्रसिद्धी तर मिळणार नाहीच, उलट 'आपल्यापैकी' म्हणून जी माणसं आहेत, तीही तुटतील. कोणत्याही जातीधर्माला माणसं एवढी उपयोगी असतील तर ती त्यांना आलेल्या शहाणपणातून उभी करावी, तेव्हा त्या जातिधर्माला अर्थ आहे. माथी भडकवून, ब्रेन वॉश करून फक्त दहशतवादी निर्माण होतात, मानवतावादी नाही.