Friday, 23 August 2019

राजकारणाचा बाजार - भाजपचा कन्टेन्ट २०१९


२०१९ च्या कन्टेन्टबद्दल काही लिहीण्याआधी २०१८ च्या विधानसभा निवडणूकांविषयी सांगावंसं वाटतं. २०१८ मध्ये फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण ९ राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या. नव्या सरकारचा बराच काळ आता लोकांनी पाहिला होता. त्यामुळे या निवडणूका महत्त्वाच्या होत्या. ९ पैकी फक्त २ राज्यांमध्ये भाजपाला सत्ता बनवता आली. त्रिपुरा आणि नागालँड. नागालँडमध्येही National Democratic Progressive Party च्या जागा जास्त होत्या. युतीमुळे भाजपा सत्तेत आली असं म्हणता येईल, कारण मुख्यमंत्री मित्रपक्षाचाच आहे. इतर ७ राज्य होते, मेघालय, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या निवडणूकांनंतर काही लोकांकडून म्हटलं गेलं, अजून बोला विकास-विकास. हिंदुराष्ट्राची तर तुम्हालाही पडली नाही. काँग्रेसीसारखेच निघाले तुम्हीही. हे कोण लोक होते, ज्यांना भाजपने हिंदुराष्ट्र बनवावा अशी ईच्छा होती? किंवा तशी भाजपकडून अपेक्षा होती? आणि ही अपेक्षा आली कुठून? जर २०१४ लोकसभा आणि विधानसभा, २०१५ विधानसभा, सगळ्या निवडणूकांमध्ये भाजपची अधिकृत भूमिका ही काँग्रेसमुक्त भारत आणि विकसित भारत ही होती, तर मग २०१८ मध्ये लोकांकडूनच हिंदूराष्ट्र वगैरेची अपेक्षा ठेवणं, नक्की काय भानगड आहे?

याची सुरुवात होते २०१४ च्या प्रचारामध्ये पाकीस्तानला सडेतोड उत्तर देऊ, दहशतवादाला आळा घालू वगैरे विधानांपासून. आपल्याकडे देशप्रेम दाखवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, शहीद सैनिकांचा बदला घेण्यासाठी पाकीस्तानला शिव्या घालणे, आणि शांततेच्या गोष्टी करणाऱ्यांना पाकीस्तानात जायला सांगणे. तर यात सैनिक आले, पाकिस्तान आला, दहशतवादी आले, आणि दहशतवादाला जोडून आणलेला त्यांचा धर्म आला.

एप्रिल २०१४ ते २०१७ यादरम्यान एकूण १६ दहशतवादी हल्ले झाले. ज्यातील गुरदासपूर, पठाणकोट आणि उरी येथील हल्ले मोठे आहेत. आणि यातून शहीद सैनिकांच्या बदल्याची भावना निर्माण झाली. सर्जिकल स्ट्राइकसारखे लष्करी शब्द मोठे करण्यात आले. त्यात आपली भूमिका मोठी करून पंतप्रधानांना महत्त्व दिलं गेलं. आम्ही आता ऐकणार नाही, शांत बसणार नाही वगैरे बोलून संपूर्ण लक्ष सीमेवर, तिथल्या जवानांवर केंद्रीत करण्यात आलं. पण याआधी आपल्यात पाकिस्तान-द्वेष, दहशतवादाचा द्वेष नव्हता का? होताच. मग ही गोष्ट आत्ताच का आणि कशी इतकी संवेदनशील होत आहे? इथे भूमिका येते कन्टेन्टची. आपल्या सर्वांच्याच मनात देशप्रेम असतं. सर्वांनाच वाटतं, की देशासाठी एकदा काहीतरी करायला हवं. लहानपणापासूनची एक सुप्त इच्छा असते, की आपण सैनिक व्हावं, देशासाठी लढावं. तशी आपली घडणच झालीये, ज्यात काहीच वाईट नाही. २०१४ नंतर लोकांची हीच नाडी घेऊन भाजपच्या प्रचारातील भाषणांपासून ते आयटी सेलच्या कमेन्ट्स पर्यंत आणि विविध योजनांपासून ते अगदी नेत्यांच्या जीवनचरित्रांपर्यंत राष्ट्रप्रेमाची व्याख्या नव्याने निर्माण करण्यात आली. कशी? तर इथेही समोरच्याचा द्वेष करून. जे खरं तर खूप सोपं झालं आहे. लोकांच्या पोस्टवर कमेंट करून देशप्रेमाचे धडे शिकवणं काही कठीण काम नाही. राष्ट्रप्रेम रुजवताना पहिले देशद्रोह ही संकल्पना रुजवली गेली.

  •  सरकारला त्यांच्या दहशतवादाविषयी प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • भारत असहिष्णु होत चालला आहे म्हणणारे – देशद्रोही
  •  JNU मधली मुलं – देशद्रोही
  • भारत सरकारने दिलेले पुरस्कार परत करणारे – देशद्रोही
  • नोटबंदीला विरोध करणारे – देशद्रोही
  • जीएसटीला विरोध करणारे – देशद्रोही
  • तीन तलाकविरोधी बिलला विरोध करणारे - देशद्रोही
  • पाकिस्तानी कलेचं आणि कलाकारांचं कौतूक करणारे – देशद्रोही
  • पंतप्रधानांना त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • कॅबिनेटमधील, पक्षामधील नेत्यांवर प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • वाढत्या गुन्हेगारीवर, मॉब लिंचिंगवर बोलणारे – देशद्रोही
  • काश्मीरच्या सामान्य जनतेवर पॅलेट गनचा मारा करण्याविरुद्ध बोलणारे – देशद्रोही


अमुक तमुक देशप्रेम नाहीहे वाक्य सोडता, कधी कोणी विचार केला का, की नक्की देशप्रेम म्हणजे काय आहे? आता करणार असाल तर, खरं तर तो विचार करायची गरजच नाही. प्रेमाला कधीच व्याख्या नसते. पण आता बनलेल्या व्याख्येचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण कुणाचा तरी द्वेष करून प्रेम केलं जात नाही. आणि हा द्वेष इतका पसरलाय की आता आपण मस्करीमध्येही एकमेकांना देशद्रोही आणि भक्त वगैरे बोलू लागलोयत.

बरं हे झालं राष्ट्रप्रेम, देशद्रोह वगैरे. तरीही प्रश्न येतोच, की हिंदुराष्ट्र ही संकल्पना कुठून आली? ती आजपर्यंत फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेबसाईटवर दिसते. पण याशिवाय भाजप नेत्यांच्या तोंडून ही संकल्पना येते. आणि या काळात ती जास्त गडद झाली, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत. योगी आदित्यनाथ, ज्यांच्यावर कित्येक hate speech च्या केसेस होत्या, ज्या हल्लीच त्यांनी स्वतःच clean केल्यात, असे योगी आदित्यनाथ भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आले, आणि मुख्यमंत्री झालेही. या निवडणूकीत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राम मंदिर, बाबरी मसजीद, हिंदु राष्ट्र या गोष्टी आल्या. त्याचाच ट्रेण्ड म्हणजे मंदिर वहीं बनाएंगे. हा ट्रेण्ड अर्थात फक्त उत्तर प्रदेशात कसा राहील, तो संपूर्ण भारतात पसरणार होताच, पसरला. याचाच परिणाम म्हणजे, विकासाचे मुद्दे सोडून फक्त धर्माच्या, द्वेषाच्या आधारावर निवडणूक आणि राजकारण सुरु झालं. परिणामी समाजकारणही याच गोष्टीभोवती फिरू लागलं. राष्ट्रप्रेम तर भिनवलं होतंच, त्याला धर्माची जोड मिळाली. ती इतकी की अल्पसंख्यांकांना देशात घाबरून राहावं लागत आहे. मॉब लिंचिंगच्या कित्येक बातम्या आपण पाहतो, कित्येक आपल्यापर्यंत पोहचवल्या जात नाहीत. मॉब लिंचिंगच्या केसमधील कोणी दोषीही ठरत नाही. अर्थात हा कन्टेन्ट तुम्हाला कधीच मोदींकडून मिळणार नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, आणि पंतप्रधान कोणत्या एका धर्मासाठी नसतो. भाजप आपला कन्टेन्ट सोयीस्कररित्या, आयटी सेलमधून, स्थानिक नेत्यांकडून वगैरे पोहोचवतं, आणि तो आपण आत्मासातही करतो.

आता थोडं थांबून विचार करायची गरज आहे. २०१४ ला आपण विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मत दिलं, मग २०१९ ला पूर्ण झालेल्या कामांवर मत का दिलं नाही? शहीद जवानांच्या नावावर मत का दिलं?

No comments:

Post a Comment