Monday, 14 July 2025

Moora - part n

उद्या मुंबई सोडून एक पूर्ण महिना होईल, आणि आजच कित्येक वर्षांनंतर मी एक अख्खं पुस्तक वाचून संपवून टाकलं. जी. एं.चं काजळमाया. शेवटच्या कथेतल्या विदुषकाला कधी एकदा तो suspense कळतोय असं झालेलं, आणि दहा पानं आधीच आपण कसं एकदम बरोबर प्रेडीक्ट केलं याचं कौतुक घेऊन मी बसून राहिले. कानावर काहीतरी शब्द पडावे म्हणून सकाळीच आठवण झालेलं moora लावलं, तसं ते कौतुक थोड्यावेळाने सरलं. समोरचा सूर्यास्त बघत, आयुष्यात आता आभाळही उरल्यासारखी, स्वप्नात मरणयातना भोगून झोपेतच मेलेल्या जी.एं.च्याच एखाद्या कथेतली नायिका होऊन बसून राहिले. याआधी किती वर्षांपूर्वी आणि कोणतं पुस्तक वाचलेलं ते आठवतही नाहीये, एवढ्या आठवणी पुसट झाल्यात.

गेल्या दोन वर्षांतलं हे तिसरं move-out, पण यावेळी थेट मुंबईच्या बाहेर. त्यामुळे आता packing, moving सगळं सवयीचं झालंय. Unorganised chaos कसा सांभाळायचाय, panic नाही व्हायचंय, कळू लागलंय आता. त्यामुळे यावेळी गोष्टी बऱ्याच आरामात झाल्या. मुंबईतून निघाले तेव्हा नेमका ऋताचा शाळेचा पहिला दिवस होता, पण पोरगी खूप खूश होती. तेव्हा तिचा पहिला वाढदिवस आठवला. आपल्याभोवती पहिल्यांदाच एवढ्या माणसांचा अतिउत्साही गलका बघून रडण्याच्या दिवशी ती पोरगी आपणच क्वीन एलिझाबेथ असून आपलाच राज्याभिषेक सोहळा असल्यासारखा संयतपणा, धीर आणि मध्येच अर्धवट आलेले दात दाखवत होती. शाळेतल्या पिवळ्या युनिफॉर्ममध्ये कोणत्यातरी प्राण्याचा चेहरा असलेली तिच्या पाठीएवढी बॅग आणि फुलाफुलांची अंगापेक्षा मोठी छत्री घेऊन नाटकी पण कानापर्यंत आलेलं हसू असे फोटो बघितले, आणि सकाळी पासून shifting मुळे आलेला त्राण नाहीसा झाला. वाटलं, हिला कसल्याच ‘firsts’ ची भीती वाटत नाही, आणि पुढे कधीच ती वाटूही नये. कारण हिला माहीत नाहीये, शाळेचा हा पहिला दिवस म्हणजे बऱ्याच सुरुवातींची सुरुवात आहे. आता ज्युनिअर केजी, मग पुढे इयत्ता पहिली, मग सातवीतला सकाळच्या शाळेचा पहिला दिवस, नंतर कॉलेजचा पहिला दिवस, मग झालंच तर मास्टर्सचाही पहिला दिवस, पुढे नोकरीचा पहिला दिवस, आणि तीही बदलत राहिली तर नोकरीचे, बढतीचे, नव्या रोल्सचे असंख्य पहिले दिवस..! असे कितीतरी पहिले दिवस असतील, कितीतरी वेळा वाटेल की ही नवी सुरुवात आहे, अगदी मरणशय्येवर असलेला माणूससुद्धा नव्या जन्माची सुरुवातच करण्याचे बोलत असतो.


माझ्या अशा shifting चेही कितीतरी पहिले दिवस झाले. सुरुवात कामानिमित्त पुण्याला जाऊन केली, मग लॉकडाऊनमध्ये बदलापुरातच एकाकी घर, मग घोटीमधली ती टेकडी, मग पुन्हा बदलापुरातलं तेच घर, मग थेट महलक्ष्मी, पुढे ठाणे आणि आता सरळ कोल्हापूर..! याआधी कामासाठी इथे-तिथे गेले होते. यावेळी move-out चं कारण इथेच शोधेन म्हणतेय.


या एका महिन्यात किती काही घडलं. घर व्यवस्थित लावायलाच एक-दोन आठवडे गेले. कॉलेज संपून वर्षांनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली, एक परीक्षा सुद्धा दिली. लेक्चर ऐकून नोट्स काढू लागले. आता हातात अभ्यासाच्या पुस्तकांसह अवांतर मराठी पुस्तकंही आलं, एक तर वाचून संपलंही. कुराण पुन्हा सुरु केलं. जेवण बनवायला सुरुवात करून ते कसं का झालं असेना, आपण बनवलेलं आपणच खायला लागणार म्हणून ते खायलाही सुरुवात झाली. इतकंच काय, मॉडर्न फॅमिलीचे ११ सिजनसुद्धा संपवून झाले. पण अर्थात, चांगली भाजी माझ्याकडून overcook नाही झाली तर मलाच चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. एवढं सगळं छान होत असतानाही simultaneously कधी नव्हे ते नको ते प्रश्नही पडले. त्या प्रश्नांची उत्तरं नको त्यांच्याकडून मागायची कि आपणच सोडवायची या गोंधळातही कित्येक दिवस-रात्री गेल्या. शेवटी ते प्रश्न आणि उत्तर दोन्ही मासिक पाळीच्या रक्तासह वाहून गेले, आणि मला moora ची आठवण झाली. माझं move-out song महिना होत आला तरी ऐकलं नव्हतं. आठवणच राहिली नाही म्हणा. आता वाटतंय, आधीच ऐकलं असतं तर एवढ्या रात्री वाया गेल्या नसत्या. असो, ते आठवलं म्हणून आता हे महिन्याभराचं कथन लिहू शकले, हेहे नसे थोडके.

Anytime anytime                  

Diye chance-wa jo life

Anytime anytime

Refuse-o nahi moora..!


 



11 comments:

  1. सुंदर!❤️

    ReplyDelete
  2. नेहमी लिहित राहा.🌸

    ReplyDelete
  3. Wahh पण थेट कोल्हापूर 😍

    ReplyDelete
  4. कोणतरी ब्लॉग लिहिलेलं लई दिवसांनी पाहिलं.. भारी.

    ReplyDelete
  5. मस्त नवीन अनुभव एन्जॉय कर आणि लिहित रहा💐👍

    ReplyDelete
  6. लिहिती रहा!

    ReplyDelete
  7. खूप छान

    ReplyDelete
  8. क़ैद-ए-हयात ओ बंद-ए-ग़म अस्ल में दोनों एक हैं
    मौत से पहले आदमी ग़म से नजात पाए क्यूँ ?
    And by saying गम, Ghalib is actually talking about that essential solitude that keeps the flame of curiosity alive.

    फ्रेंच मध्ये या une mer à boire असही म्हणतात. there's still a sea to drink..! Keep your thirst and your solitude alive. Cheers to Kolhapur.

    ReplyDelete