Friday, 2 August 2019

राजकारणाचा बाजार - ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि कन्टेन्टचा संबंध


कोणतंही मार्केट analyse करण्यासाठी पहिल्यांदा त्याचे की पॉईंट्स काढले जातात, की ते मार्केट कोणत्या बेसवर कार्यरत आहे, ग्राहक कोण, ग्राहकांना कोणतं प्रोडक्ट आवडतंय, याआधी तो ग्राहक कोणतं प्रोडक्ट वापरायचा. अशा अनेक बेस पॉईंट्सवर ग्राहकांचे वर्गीकरणही होते. अगदी हीच गोष्ट आता राजकारणाच्या मार्केटिंगमध्ये होतेय. इतकंच की हे राजकारण असल्याने प्रचंड मायक्रो लेव्हल मार्केट analysis होतं.

पॉलिटिकल मार्केटिंग मध्येही इतर प्रोडक्ट्स प्रमाणे ग्राऊंड analysis होतो, ग्राऊंड नॉलेज मिळवलं जातं. ते कसं, तर अनेक ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि बऱ्याच सब्जेक्टिव्ह सर्वेक्षणांतून ग्राऊंड नॉलेज मिळवता येतं. इतंकच की फार कोणी सब्जेक्टिव्ह सर्वे करत नाही. कारण लवकरात लवकर analysis आणि रिपोर्ट हवा असतो. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि ऑब्जेक्टिव्ह सर्वे यातून तथाकथित ग्राऊंड नॉलेज मिळवलं जातं.

आता ऑब्जेक्टिव्ह डेटा म्हणजे काय. हा डेटा स्थानिक प्रशासन, निवडणूक आयोग अशा ठिकाणांहून सहज मिळतो. फक्त बॅकींग हवी. या डेटामध्ये विभागनिहाय, अगदी बूथनिहाय तुमचे निवासी पत्ते, फोन नंबर, वय, नाव, नाव आणि क्षेत्रावरून जात, धर्म. सर्वेमधून तुमचा व्यवसाय आणि राजकीय कल जाणून घेतला जातो, जो खरं तर प्रचंड ढोबळ असतो. त्यात नेहमीच accuracy असेल असं नाही. दुसरा महत्त्वाचा डेटा म्हणजे याआधी तुमच्या मतदारसंघात कोणाकोणाची सत्ता होती, आता कोणाची आहे, विरोधकांचे वोटशेअर याचं गणित लावून डेटा बनवला जातो.

सर्वेमधून तुमचा सध्याचा कल समजला. तुमचा मतदारसंघ, बूथ, फोन नंबर, जात असा डेटा असेल तर त्याला तुमच्या आताच्या राजकीय विचाराची जोड मिळाली. पण हा तर आर्टिफिअल इंटलिजन्सने काढलेला डेटा आहे. या डेटाचं काय करायचं? तर माझा आताचा कल विरोधी पक्ष किंवा विरोधी उमेदवाराकडे असेल, तर तो वळवायचा. कसा? उत्तर आहे कन्टेन्ट. आर्टिफिशिअल इंटलिजन्सने काढलेला डेटा जेव्हा कन्टेन्ट रूपाने तुम्हाला भिडतो तेव्हा तो आर्टिफिशिअल राहत नाही, तर एक प्रोपागंडा बनून तुम्हाला तुमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत असतो.

तुमच्या फोनवर राजकीय संदर्भांचे एसएमएस येतात, फोन येतात. तुमचा फोन नंबर फेसबूक आणि इतर अॅप्सना लिंक्ड असेल तर अनेक अॅड तुम्हाला फीड केल्या जातात. विरोधी उमेदवार सत्तेत असेल तर शासनाविषयी द्वेष पसरवला जातो, आणि उमेदवारच स्वतः सत्तेत असेल तर योजना आणि त्यांच्या न्युमरीक्सचा भडीमार केला जातो. द्वेष असो वा विकासकार्य, तुम्हाला तुमच्या व्यवसाय, जात, धर्म, लिंग, विभाग यांनुसार कन्टेन्ट पुरवला जातो. जसं की तुम्ही नोकरदार असाल तर गृहकर्ज, वेहिकल लोन, इन्कम टॅक्स यांविषयी कन्टेन्ट असू शकतो. फरक इतकाच राहील की सत्ताधारी स्वतःचं कौतुक सांगेल, आणि विरोधक तुमची लुटमार कशी होतेय, हे पटवून देण्याचा प्रयत्न करील.

सध्याचे सत्ताधारी हा सगळा डेटा मिळवत आहेत खरे, पण त्याचा वापर नक्की कशासाठी करत आहेत यात शंका आहे. कारण त्यांचा कन्टेन्ट मात्र वेगळा आहे हे प्रकर्षाने दिसून येतं. त्यांच्या कन्टेन्ट आणि त्याच्या वेगळेपणाविषयी पुढचा लेख नक्की लिहीन. आता इतकंच लक्षात ठेवा, कोणत्याही जाहीरातबाजीला बळी पडू नका, कोणत्याही नंबर्सला बळी पडू नका. गुगल आहे, योग्य माहितीनिशी थोडासा रिसर्च करा. थोडंसं कष्ट लागेल, पण तुम्हालाच फायदा होईल.

Wednesday, 26 June 2019

Rebel With No Cause


कबीर सिंग चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. ट्रेलर पाहिला. नेहमीच्या टिपिकल बॉलीवुड मुव्हीसारखा वाटला, फक्त टेक्निकली चांगला. स्टोरी आणि त्याच्या प्रेसेंटेशनवर प्रश्न होतायंत सगळीकडून, म्हणून म्हटलं याचा ओरिजिनल सिनेमा पाहू. तसंही दोन्हींचा दिग्दर्शक एकच आहे. सो, अर्जुन रेड्डी पाहिला.

अर्जुन रेड्डीबद्दल बोलण्याआधी सिनेमा या माध्यमाबद्दल बोलेन. एक तर सिनेमा हे माध्यम वास्तवाशी निगडीत असतं हे मान्य करावंच लागेल. परिणामी वास्तवाचा माध्यमांवर, आणि माध्यमांचा लोकांवर प्रभाव पडतो. कोणतंही माध्यम जे तुम्हाला एखादी कथा सांगण्याचं प्रयत्न करतं ते काल्पनिक असूच शकत नाही. तुम्ही कथा बनवता ते वास्तव पाहून, मग त्याला मोल्ड करणं वगैरे नंतरची बाजू. पुस्तक असू द्या, चित्रपट असू द्या, कार्टून्स किंवा अगदी जाहिराती. तुम्ही एक तर सत्य सांगता, किंवा आपलं खोटं कन्विन्स करण्याचा प्रयत्न करता. आणि हे कन्विन्स करणंच आता बहुतेक सिनेमांत दिसतंय. अर्जुन रेड्डीचा दिग्दर्शक स्वतः म्हणतो, की ही माझी कथा आहे! मग अर्थात ही कथा, हा चित्रपट त्याची बाजू कन्विन्स करण्यासाठी बनवला आहे, असंच समजावं लागेल. असो. मी चित्रपट पाहिला, ते इतका गोंधळ का सुरु आहे हे पाहण्यासाठी.

चित्रपटाची सुरुवातच अर्जुनच्या प्रचंड रागात होते. रागामुळे माफी न मागता अगदी कॉलेजसुद्धा सोडण्याचा हट्ट त्याच्या वृत्तीची पहिली खूण. पुढे घडतं ते म्हणजे मुलगी दिसली, तिला आपली मानली. पूर्ण कॉलेजला सांगितलं, तिच्याकडे ढुंकून बघायचं नाही. यात तिचा कन्सेन्ट कुठेय? त्याची तिच्याविषयी प्रचंड काळजी वगैरे दाखवलीय. अगदी लहान लहान गोष्टी. ही अशी काळजी आपल्याकडे आता १४-१५ वर्षांचे शेमडे पोरं करतात. यात वाईट काहीच नाही. पण एमबीबीएस करणाऱ्या एलिट क्लासच्या २२-२३ वर्षांच्या मुलांचा हा बालिशपणा वाटतो. बरं दिग्दर्शक हे सगळं त्याचं प्रेम आहे हे दाखवायला म्हणून करतोय. आणि कहर तेव्हा होतो जेव्हा तो होळीच्या दिवशी रंग लावून तिला हरॅस करणाऱ्याला मारल्यावर हा रडतो. म्हणजे काय चाललंय? नक्की कोणत्या प्रकारचं प्रेम दाखवताय? एकमेकांसाठी रडलं म्हणजे प्रेम होतं? एकाही दिवसाचा दुरावा सहन न होणं म्हणजे प्रेम असतं? आपण किती वेळा सेक्स केलाय हे मोजून ठेवणं प्रेम असतं? एकमेकांत इतकं बुडतो की अपघात झाल्यावर काही लागलंय खुपलंय की नाही हे न पाहता तितक्याच अग्रेशनने किस करत पुन्हा एकमेकांत बुडतो? हसू येतं अशा बालिश सिन्सवर. प्रेमाची व्याख्या बनवण्यात आजवर चित्रपटांनी नेहमीच मदत केलीय. म्हणूनच आपल्याकडे प्रेमाचा प्रचंड गोंधळ आहे. मुलीला तिच्या कन्सेन्ट शिवाय गालावर किस केल्यावर तिने कानफडात न मारता खाली मान घालून उभं राहणं सुद्धा अर्जुन रेड्डीच्या दिग्दर्शकाला प्रेमच वाटतं.

बरं हे सगळं झालं त्याचं प्रेम आहे आणि ते किती आहे वगैरे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न. तिचंसुद्धा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो तिच्या वडिलांना भेटायला जातो, तिला लग्नासाठी मागणी घालायला जातो. म्हटलं ग्रेट, आता काहीतरी बरं बघायला मिळेल. तिचे वडील त्याच्याच अग्रेशनने नकार देतात. हा काही वेळ समजवायचा प्रयत्न करतो. घराबाहेर काढलं जातं, आणि त्याचा रागही बाहेर येतो. यात त्याच्या बोलण्यातून जात, क्लासचा उल्लेख होतो. पण राग संपत नाही. ती समजवायचा प्रयत्न करते, तो ऐकत नाही. आणि स्वतःच्याच बापाला समजवायला तो तिला ६ तासांची मुदत देतो. तिच्याकडून तेव्हा ना होकार येत, ना नकार. तो तटस्थपणाही त्याला आवडत नाही. हा सिन लोकांना विद्रोही वगैरे वाटतोय. खरंच? कोणत्या हक्काने तो तिला ६ तास देत होता? कोणत्या हक्काने त्याने तिला कानफडवलं? मुळात त्याला तिच्या बापाचा नकार आवडला नाही. आणि नकार पचवताच न येणाऱ्यांना विद्रोही नाही, माजलेले भांडवलशाही म्हणतात. अर्जुन रेड्डी त्याच भांडवलशाही व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे ज्याला समाजाशी काही घेणं देणं नाही. सारं काही मिळालं आहे, मग ते आयतं असो वा मेहनतीने. पण त्यात कधीच नकार मिळाला नाही. त्याने तिला बघताच तिला गृहीत धरलं हे नक्की, तेच तिला आवडलं होतं, आणि तेच त्या दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन गेलं. ग्रेट.



सहा तासांमध्ये तिचा कॉल आला नाही म्हणून पुन्हा एकदा गृहीत धरून स्वतःचं जे करायचं ते करतो. छान! म्हणजे समोरच्याची परिस्थिती न बघता स्वतःला सिम्पथी द्या. का? कारण मी वेड्यासारखं प्रेम करतो. इतकं वेड्यासारखं की तिचं काय होतंय ते बघण्याची एकदाही जाणीव होऊ नये, आणि स्वतःला गोंजारावं. तिचं लग्न झाल्यावर तो स्वतःचं जे काही करतो ते किती विकृत आहे हे सांगण्याची गरज नाही. ते मुळात विकृत आहे, वाईट आहे, त्याचे परिणाम वाईट आहेत, हे सांगण्याची जास्त गरज आहे. जी पूर्ण सिनेमामध्ये एकाही ठिकाणी दिसत नाही. मुलींना सेक्ससाठी विचारतो. एखादी मुलगी आपल्याकडे बघतेय, म्हणजे ती आपल्यासोबत सेक्स करेलच, हा विचार करणंसुद्धा विकृतीच आहे. जी हातात असते तिला सेक्ससाठी सुरीचा धाक दाखवतो. ‘नाही’ म्हणजे ‘नाही’ हे समजत नसेल, आणि तरी हवं ते करण्याचा प्रयत्न हासुद्धा गुन्हाच. पण या गुन्ह्याचा परिणाम काय? तर त्याला सेक्स मिळत नाही! बरं ते ऑपरेशनवेळी अल्कोहोल पिऊन होता म्हणून जी केस झाली, त्यात ह्याने स्वतःची चूक मान्य करून असं काय मिळवलं कळलं नाही. कारण ते मान्य केल्याचा विशेष परिणाम तरी काय झाला? फक्त त्याची इमेज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न. झालं. आता शेवट जवळ आला म्हणून त्याला पुन्हा सोबर बनवायला परदेशात वेकेशनवर जाणं गरजेचं. मग आल्यावर तिचं भेटणं. आणि एकूण ५ मिनिटसुद्धा नसलेल्या सिनमध्ये ते दोघं पुन्हा एकत्र होतात. हुह. काय तर ती लग्नानंतर ३ दिवसांनी पळून येते, कुठेतरी राहते, तिला त्याचं कोणासोबत तरी अफेअर असल्याचं कळतं, तिच्या मनात राग असतो, असं बरंच काही बोलते. शेवटी काय, तर “मी नवऱ्याला हातसुद्धा लावायला दिला नाही. हे पोटातलं मुल तुझं आहे!” आणि त्याला कोण विचारणार, की त्याने इतके महिने काय केलं? जे केलं ते का केलं? बरं स्वतःहून त्या सगळ्याचा गिल्ट सुद्धा नाही त्याला. वाह. निष्कर्ष काय, तर पुरुष कितीही नालायक वागला तरी शेवटी त्याला हवं ते मिळतं. त्यासाठी काय करावं, तर हे असं वेड्यासारखं प्रेम करावं. आणि हे प्रेम करताना अर्जुन स्वतःला Rebel with a cause म्हणतो. मुळात रिबेल म्हणजे प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध बंड करणारा. पण इथे वर्षानुवर्षे स्त्रियांना गृहीत धरून वागणारी जी पितृसत्ताक व्यवस्था आहे, म्हणजे आक्रमक आततायी वृत्ती. तीच वृत्ती तर अर्जुनमध्ये दिसून येते. तो कुठेही तिला समान वागवण्याचा सोडा, तिच्या भावनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न करत नाही. हेच विद्रोही असेल तर आज बरेच जण या जगात Rebel with a cause असतील.

बरं आता म्हणाल की ठिके ना, चित्रपट आहे, मनोरंजन म्हणून बघ आणि सोडून दे. शिवाजी महाराजांच्या, आणि अनेक मोठ्या नेतृत्वाच्या, देवांच्या वगैरे कथांवर आधारित चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये इतिहासाची हेळसांड करतात, तेव्हा बोलता का? तेव्हा तर इतिहास आणि संस्कृतीची रक्षा करायला तोंड उघडताच ना? बरं ते फॅक्च्युल आहे म्हणून विरोध करता. ठीके. आर्टिकल १५ वर ‘ब्राम्हण जातीबद्दल लोकांचे मत कलुशित करायचा प्रयत्न सुरु आहे’, असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल मग? तोही चित्रपट मनोरंजन म्हणून बघायचा का? चित्रपट काय, तुम्हाला चित्र पटत नाहीत, तुमच्याच पूर्वजांनीच कोरलेले शिल्प पटत नाहीत, तुम्ही काय चित्रपटांना मनोरंजन म्हणून बघा सांगताय? चित्रपट सुद्धा फक्त मनोरंजन असतं तर ‘धूम’ आल्यावर लोकांना स्पोर्ट्सबाईकचं वेड नसतं लागलं, ‘एक दुजे के लिए’नंतर प्रेमी जोडप्यांचं एकत्र आत्महत्यांची प्रकरणं आली नसती. चित्रपट पाहून एकावर जरी परिणाम झाला असेल, तरीही चित्रपट प्रभावी आहे हेच मान्य करावं लागतं. आणि म्हणूनच ‘लक्ष्य’, ‘शोले’, ‘बॉबी’, ‘सैराट’ हे सिनेमे प्रभावी आहेत.

बरं आता एक उत्तर त्यांच्यासाठी ज्यांना ‘गली बॉय’मधली सफीना आणि अर्जुन रेड्डी यांच्यात फरक दिसत नाहीत. सफीना जेलस होते, ती मुलींना मारते, आणि तिला त्याचे परिणामही भोगावे लागतात. पहिलं म्हणजे तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं, घरचे तिच्यावर विश्वास ठेवणं बंद करतात, आणि बॉयफ्रेन्ड सुद्धा दुरावतो. अर्जुनचं काय होतं? त्याच्या वागण्याचं स्वतःकडून फक्त आणि फक्त समर्थन होतं. का समर्थन होतं? कारण विरोध करायला कोणीच नसतं. विरोधी पक्षच सक्रीय नसेल तर समोरचा किती फोफावतो ते तर पूर्ण देश बघतोय. हीच गोष्ट माणसाच्या वागण्यातही लागू होते हे मान्य करावं, आणि वाईट प्रवृत्तींना विरोध करावा. कारण एकच, आपण विरोध केला नाही, तर समोर येईल ते भोगावं लागतं. विचार करा आणि व्यक्त व्हा.

Wednesday, 6 March 2019

रिक्षा, ती आणि तिचा orgasm

काही दिवसांपासून रिक्षातला 'तो' व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यावर प्रचंड विनोद, टिका आणि मीम्स सुरु आहेत. 'चार भिंतींमध्ये करण्याच्या गोष्टी' किंवा त्यांनी रिक्षात केलेलं ते चूक कि बरोबर यात मला शिरायचंच नाहीये. उलट यातून वेगळाच विषय समोर आणण्याचा प्रयत्न आहे. तो म्हणजे, 'तिचा orgasm', Female Orgasm!




स्त्रियांचा परमोच्च बिंदू (female orgasm) म्हणजे काय?


मूळात सेक्स म्हणजे काय? प्रणयक्रीडा (fore play) आणि संभोग (intercourse) यांची मिळून बनलेली साधी व्याख्या म्हणजे सेक्स. मराठीत याला प्रणय म्हणतात. या प्रणयात संभोग (intercourse) जितका महत्त्वाचा, तितकीच   प्रणयक्रीडा सुद्धा (fore play) महत्त्वाची असते. कारण सेक्सची सुरुवात  प्रणयक्रीडेने (fore play) झाली तर तो सेक्स अधिक आरोग्यदायी आणि जास्तीत जास्त आनंद देणारा होतो. आणि याच प्रक्रियेने पुरुष आणि स्त्री दोघांनाही परमोच्च बिंदू सापडते, orgasm मिळतो. परमोच्च बिंदू (orgasm) म्हणजे सेक्समधून मिळणारा सर्वोत्तम आनंद. हा आनंद घेण्यासाठी दोघांच्याही शरीरात pleasure points आहेत. पुरुषांचा pleasure point हा संभोग करताना उद्युक्त होतो, आणि तेव्हा त्यांना पुरेपुर आनंद घेताही येऊ शकतो. पण स्त्रियांचा pleasure point हा संभोग करताना फार कमी वेळा उद्युक्त होतो. कारण संभोग (intercourse) हा त्या pleasure point च्या मार्गात येत नाही.


अनेक सर्वेक्षणांनुसार, भारतातील सेक्स करणाऱ्या पुरुषांपैकी तीन चतुर्थांश पुरुषांना संभोगातून orgasm मिळतो, आणि हाच आकडा स्त्रियांच्या बाबतीत एक चतुर्थांश इतकाच राहतो. या एक चतुर्थांश स्त्रियांना orgasm कसा मिळतो? तर संभोगाच्या वेळी किंवा fore play च्या वेळी योनी उत्तेजित करून म्हणजे clitoris stimulation ने स्त्रिया परमोच्च बिंदू orgasm मिळवतात, आणि काहीवेळा त्या orgasm च्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही पोहचू शकतात. आता योनी उत्तेजित करणे (clitoris stimulation) म्हणजे काय? तर तुम्ही रिक्षातल्या व्हिडीओमध्ये पाहिलं तेच!


स्त्रियांचा pleasure point हा संभोगाने (intercourse) उद्युक्त होत नसतो. त्यासाठी nipple stimulation किंवा clitoris stimulation ची गरज असते. ते स्वतः स्त्री सुद्धा करू शकते. इतकंच काय, स्त्रियांच्या या सुखामध्ये प्रजननाचाही प्रश्न येत नाही. पण आपल्याकडे मूळात प्रश्नच हा आहे, की "बाईने सेक्सचा आनंद का घ्यावा?" याचं उत्तर आहे, गरज म्हणून. आणि ही गरज जोडीदाराने घुसून केलेल्या संभोगाने (intercourse) पूर्ण होत नसते, त्यासाठी प्रेमाने केलेल्या fore play ची, nipple stimulation, clitoris stimulation ची गरज असते. स्त्रियांची ही गरज किती पुरुष जोडीदारांना माहित असते? किती पुरुष जोडीदार आपल्या स्त्री जोडीदाराला शरीरसुख उपभोगू देतात? आणि किती जोडीदारांना त्यांच्या जोडीदाराचं pleasure point सापडतं? इतकंच काय, किती स्त्रियांना आपली ही गरज माहित असते? किती स्त्रियांना ती भागवता येते? त्यासाठी ते जोडीदाराची मदत घेतात कि कृत्रिम उपकरणांची? अनेक फाटे आहेत, आणि गरज एक, जी पुरवणे आवश्यक आहे.


रिक्षातल्या त्या व्हिडीओवर अनेकांनी टीका करताना विचारलं, "यह रंडीखाना है क्या?" बाबांनो, मला सांगा, कोणत्या रंडीखान्यात लोक त्या बायांना झुलवायला जातात? कोण तिथे त्यांना शरीरसुख द्यायला जातं? पुरुष जातात ते स्वतःची गरज भागवायला. त्यातून त्या बाईला वापरण्यासारखे फक्त पैसे मिळतात.


बहुतेक स्त्रिया या फक्त आपलं नवऱ्याप्रती असलेलं दायित्व अन् कर्तव्य वगैरे म्हणून संभोग सहन करतात. Enjoy करणाऱ्यांना त्यातून समाधान मिळतंच असं नाही. ही व्यथा नेहमी सेक्स करणाऱ्यांची. मग पहिल्यांदा करणाऱ्या कित्येक पोरी आहेत, त्यांच्या न मिळालेल्या orgasm वर काय बोलावं?


हे का होतं? बहुतेक स्त्रिया orgasm पर्यंत का पोहचत नाहीत?


कारण आपल्याकडे स्त्रीने अंगाखाली आणि पुरुषाने नेहमीच 'वर' राहण्याची सवय आहे. हो मी या गोष्टीला सवयच म्हणीन. कारण पूर्वीची संस्कृती काही वेगळं दर्शवते. पूर्वीच्या भारतातील संस्कृतीत माणसाच्या surviving needs मध्ये शरीरसुख ही सुद्धा एक गोष्ट होतीच. कदाचित म्हणूनच 'कामसूत्र' सारखा ग्रंथ इथे लिहिला गेला. कित्येक मंदिरांमध्ये, लेणींमध्ये राजाचे, देवाचे मैथून चितारले आणि कोरले गेले आहेत. अनेक ठिकाणी प्रणयात स्त्रियांनी वर्चस्व केल्याचेही शिल्प आढळतात. पूर्वी ज्याला 'प्रणयक्रीडा' म्हणत, प्रणय खेळले जात, ते सेक्स आता भारतात 'taboo' झालं आहे. आणि पुरुषप्रधान होत गेलेल्या या संस्कृतीमुळे स्त्रियांचा शरीरसुख घेण्याचा अधिकारही हिरावला गेला आहे. कारण योनी हा अवयव मासिक पाळी येण्याचा आणि पुरुषाने प्रणयात वापरायचा, इतकीच धारणा झाली आहे. खाज आल्यावर योनी खाजवूही शकत नाही इतकं अज्ञान त्याभोवती पसरलंय.


शरीरसुख न मिळाल्याने जसे पुरुष चिडचिडे होतात, इतर मार्ग शोधतात, तशा स्त्रियाही चिडचिड्या होतात, नैराश्य येतं. पण त्यांना dildo किंवा vibrators ची कितपत माहिती असते? माहिती असली तरी ते वापरण्याची किती भीती असते? आणि मूळात कायद्यानुसार या सेक्स टॉईजवर बंदी आहे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अर्थात कोणत्याही नात्यात, रोजच्या घुसोफाय सेक्समध्ये त्यांना रस राहत नाही. सेक्स एकतर्फी होतात. मला भीती याची वाटते की, तीन चतुर्थांश स्त्रिया या orgasm न मिळवताच आयुष्य संपवतात. म्हणजे सेक्स करूनही त्याचा परमोच्च आनंद न मिळवताच त्या जग सोडतात. प्राथमिक गरजांनतर ही एक मानसिक व शारीरिक गरज भागवणे आवश्यक आहे. ती प्रत्येक स्त्रीने आणि तिच्या जोडीदाराने सामंजस्याने, प्रेमाने भागवणे गरजेचे आहे.


Forced sex हा विषय वेगळा, पण आपल्या संमतीने संभोग होत असला तरी आपल्याला त्यातून खरंच समाधान मिळतंय का? हा प्रश्न स्त्रियांनीच स्वतःला विचारायला हवा. प्रश्न विचारणं आणि त्याचं समाधान मिळवणं गरजेचं आहे. नाहीतर आपणही त्या तीन चतुर्थांश स्त्रियांमधील एक राहू, ज्यांनी सेक्स करूनही कधीच शरीरसुख मिळालं नाहीये. आणि पुरुषांनो, तुम्हीही स्वतःला विचारा, "आपल्या एका तरी संभोगाने तिला आनंद मिळाला आहे का?" उत्तर 'नाही' आलं तर निदान एकदा तरी तिचा विचार करा, प्रयत्न करा. कदाचित तिची एकदा तरी गरज भागवल्याचा आनंद तुम्हाला नक्की होईल.


हाच आनंद रिक्षातला ' तो ' तिला देत होता.


शेवटी, आपण आनंद देण्या-घेण्यासाठी जन्माला आलोत. आपल्या जोडीदाराला आनंद द्या.

Monday, 28 January 2019

सप्तरंगी गोष्ट


काही दिवसांपूर्वी जुनून फाऊंडेशनच्या सप्तरंग या कार्यक्रमासाठी गेले होते. यात कला, विज्ञान, इत्यादी विविध विषयांवरील उपक्रमांचे आयोजन होते. त्यात मी volunteer करण्यासाठी विचारणा केली. स्वागत झालं. वाडामधील गारगावच्या एका आश्रमशाळेत हा उपक्रम होता. यामध्ये आपण काय करावं, हा प्रश्न समोर आला. आपण कधी अशा शाळेत गेलो नाही, लहान मुलांना शिकवायला तर नाहीच नाही. पण मग विचार केला, आपण लहानपणी असं अभ्यासाव्यतिरिक्त फार गोष्टींचा विचार करायचो. पण परीक्षेत फक्त प्रश्नांची उत्तरं तेवढी लिहली. अगदी नववी-दहावीत निबंध लिहायचे, व्यवस्थित, पाठ न करता. पण तेही परीक्षेत. लहानपणी परीक्षेत आपण पाठ केलेलंच लिहितो. आपलं, आपल्याला समजलेलं, आपल्या भाषेतून असं काहीच लिहित नाही. या मुलांसोबत असं व्हायला नको. पण पाचवी-सहावीच्या मुलांना, ज्यांना लिहीण्याची फार सवय नाही, असे मुलं काय लिहितील? उत्तर होतं, गोष्ट. मुलांना गोष्टी आवडतात, कारण त्यांना ती लगेच समजतात. त्यांना जर ते समजत असेल, तर ते लिहायला किंवा निदान सांगायला तरी नक्कीच आवडेल. ठरलं. त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या पात्रांची एकच गोष्ट बनवायची. त्यांना ती मजेशीररित्या सांगायची. ती कशी बनली ते सांगायचं आणि त्यांना स्वतःची गोष्ट तयार करायला सांगायचं. हे असं ढोबळमानाने ठरवून मी निघाले.

प्रचंड लाजरीबुजरी मुलं. पण त्यांना बोलतं करणं भाग होतं. मग त्यांची आवड विचारणं, आपल्या गोष्टीत त्यांच्या आवडीचे पात्र टाकणं, गोष्ट सांगताना मध्येच प्रश्न विचारणं, असं चालू ठेवलं. मग माझी गोष्ट कशी आयत्या वेळी तयार झाली हे पटवून देणं, आणि तुम्हीही कशी ती बनवू शकता हा विश्वास देणं ही कसरतच होती. अधिकाधिक प्रयत्न करून यातसुद्धा निपुण होणं गरजेचं आहे हे लक्षात आलं. पण निदान त्यांना त्यांची स्वतःची गोष्ट तयार करायची आहे हे कळणंही पुरे आहे. मग आपण मदत करूच शकतो की.
वर्गात काही गट बनवून त्यांना आपसांत चर्चा करायला सांगितली. ते प्रथम एकमेकांशी बोलणं गरजेचं होतं. आपल्या मित्रांसमोर आपण बाता मारतोच की. तेच करायचं होतं. एकमेकांशी बोलून, सगळ्यांची मिळून एक गोष्ट तयार करायची. काही मुलींनी मिळून तर स्वतःच्या गटाचं नामकरण सुद्धा केलं – ‘सावित्री ग्रुप’! कोणाचीही मदत न घेता त्या मुलींनी स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. अशी स्वतःची ओळख निर्माण करणं सुद्धा महत्त्वाचं असतंच. आत्मविश्वासाचं हे प्रतिक अंधारात येणाऱ्या आशेच्या किरणाहून कमी नव्हतं.
अनेकांनी प्राणी आणि जंगल आपल्या गोष्टीत घेतले, तर काहींनी चक्क भूताची गोष्ट लिहली. मुलांची कल्पनाशक्ती ही अशी मिश्र असते. एकीकडे कुत्रा, कावळा, बैल अशा नेहमी दिसणाऱ्या प्राणी-पक्षांची गोष्ट, आणि दुसरीकडे फक्त एकीव, मजा म्हणून सांगायची गोष्ट. गोष्टींचे वेगवेगळे प्रकार त्यांनीच शोधून दिले.

काहींनी तर बाहुबली नारळाच्या झाडावरून महालात शिरतो, अशा लहानशा बारकाव्यांसह आणि मध्ये येणाऱ्या सगळ्या गाण्यांसह बाहुबली – २ ची गोष्ट अतिशय कौतुकास्पद लिहली. चित्रपटांचा प्रभाव इतका आहे की बाहुबलीच काय, सैराट सुद्धा लिहला एकाने. पण या सैराटमध्ये आर्ची आणि परशा पळून जात नाहीत. ते खूप शिकतात. परशा इंजिनीअर होतो. आर्चीच्या बाबांकडे लग्नाची मागणी घालतो, ते नकार देतात. मग लंगड्या बाबांना समजावतो. पण ते ऐकत नाहीत. एकदा प्रिन्स दादा सल्याच्या बहिणीशी लग्न करून तिला घेऊन येतो. तेव्हा आर्चीच्या बाबांना त्यांची चूक कळते, आणि ते दोघांचे लग्न लावून देतात. बरं हे मी त्यांना विचारून, त्यांच्याकडूनच ऐकलं आहे. पण त्यात त्यांनी आर्ची आणि परशा शेतात फिरायला जातात, सल्या अन् लंगड्या त्यांना मदत करतात, हे काही सोडलं नाही. ते आवर्जून सांगितलं. तरीही प्रचंड आत्मज्ञान देणारी आहे ही त्यांची गोष्ट. योग्य-अयोग्य कळण्याइतपत ही मुलं वास्तवाशी जोडले गेले आहेत का हा प्रश्न पडतो.

सप्तरंगमध्ये story creating चा उपक्रम घेण्याचं सार्थक झालं ते एका वेगळ्या गोष्टीमुळे. गारगावच्या त्या आश्रमशाळेत सगळे विद्यार्थी शाळेच्याच वसतीगृहत राहतात. त्यामुळे अर्थात घरी जाणं फार कमी होतं. पण घरच्यांवरचं प्रेम आणि शिकण्याची जिद्द जबर आहे. पाचवीतल्या शुभांगीने लिहलेली गोष्ट मनाला भिडली आणि आपण हे कार्य असंच नेहमी करण्याची प्रेरणा मिळाली. ती गोष्ट जशीच्या तशी पुढे देत आहे.

शेतकऱ्याची गोष्ट

एक होता शेतकरी. तो शेतकरी शेतात खूप कष्ट करायचा. त्या शेतकरीची बायको होती. त्या शेतकरीला एक मुलगी होती. त्या मुलीला शेतकरी शाळेत पाठवायचा. कष्ट करायचा. कष्ट करून त्या मुलीला शेतकरी घेवून जायचा आणि ती मुलगी खूप शिकली, आणि ती मुलगी खूप खूप शिकली. आणि मोठं शिक्षण केलं. आणि ती इंजीनियर झाली. ती घरी कधी कधी यायची. तिच्या गावातल्यांना सांभाळायची आणि आई बाबांना पण सांभाळायची. त्या मुलीचे आई बाबा खूप खूश झाले.


माणसाच्या पोटाची भूक शमत नसली तरी पोटातलं ओठावर आणायची भूक प्रचंड असते. माणसाच्या मनातलं ऐकावं वाटतं खूप. ही न शमणारी भूक निदान समाधान देते, बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोघांनाही.

Monday, 10 December 2018

सुवर्णदुर्ग : समृद्ध इतिहास आणि वर्तमानातील अवस्था


हर्णै बंदरावर गेल्यावर एका ठिकाणी एक बोर्ड वाचायला मिळतो. “वीर कान्होजी आंग्रे यांच्या आरमारातील किल्ले सुवर्णदुर्गची सफर. सोबत डॉल्फिन व समुद्र सफर” असं काहीतरी. तुम्ही दहा लोकांचा ग्रुप होईपर्यंत तिथे थांबता, बोट सुरु होते आणि तुम्ही डॉल्फिनचं अर्धमुर्ध डोकं पाहत, सुवर्णदुर्गापाशी पोहोचता. महादरवाजापासून गवताची चाहूल लागते ती आत ५ फूट उंचीच्या गवतापर्यंत मजल जाते. प्रत्येक वास्तूला घेरलेलं गवत आणि झाडं. तटबंदी व बुरुजाच्या प्रत्येक दगडावर या झाडांची दहशत आणि किल्ल्यावर बंदरावरल्या माणसांची दहशत.

सुवर्णदुर्गचा महादरवाजा


१६६० मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला. यावर अनेक गोड्या पाण्याचे तळे आहेत, विहीर आहे, तटबंदीभोवती खंदकं आहेत, धान्य कोठार, चोर दरवाजा आणि बरंच काही आहे. एक जलदुर्ग म्हणून सर्वतोपरी मजबूत किल्ला आहे. पण हे सगळं पाहायला आपण तटबंदीवरून खाली उतरू शकत नाहीत, ना पूर्ण किल्ला धड पाहू शकत. याची दोन मुख्य कारणे – एकतर प्रचंड गवत आणि दुसरं म्हणजे नावाड्याने किल्ला पाहायला दिलेली ३० मिनिटे! ३० मिनिटांत ८ एकरचा हा विस्तृत किल्ला पाहायचा. ३० मिनिटांत एरवी आमच्या लग्नाचे फेरे घेऊन होत नाहीत, आणि ३० मिनिटांत आम्ही किल्ला “फिरून” यायचा. बरं ही सवय काही आपसूक लागली नाही. लोक अर्धा फेरा मारून किल्ल्याच्या बाहेरही पडतात. का? तर बघायला काही नाही. आणि बघायला का नाही? तर संपूर्ण किल्ल्यावर झाडं आणि गवत वाढलंय. एकही वास्तू नीट पाहता येत नाही. आणि वास्तू दिसली नाही की अर्थात आमचे शिवभक्त कंटाळून डॉल्फिन बघायला बाहेर येतात.


सुवर्णदुर्गावरील अवशेष


हीच अवस्था समोरच्या कणकदुर्ग, फत्तेगड आणि गोवा किल्ल्यांची आहे. गोवा किल्ला त्यातल्या त्यात तग धरून आहे. पण कणकदुर्ग आणि फत्तेगड मधला कणकदुर्ग कोणता आणि फत्तेगड कोणता हेसुद्धा कळत नाही. तिथल्या पायऱ्यांवर गोधड्या आणि मासे सुकत घातलेले आणि पाण्याच्या टाक्या नेहमीप्रमाणे गाळ आणि शेवाळाने भरलेल्या. एखाद दुसरी तटबंदीची भिंत सोडली तर तिथे काहीच नाही. जिथे बीएसएनएलचं टॉवर लावण्यासाठी एखाद्या नेत्याचे आभार मानणारं पोस्टर लावलं जातं, पण रस्त्यांची अवस्था बेकार असते, त्या ठिकाणी अजून काय अपेक्षित असावं?


गोवा किल्ला


एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण तेव्हाच होते जेव्हा स्थानिक लोकांना त्या किल्ल्याबद्दल, त्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत काहीतरी आपुलकी, आदर असतो. इथे ते काहीच दिसत नाही. हर्णैमध्ये साधारण मच्छीमारांचीच वस्ती आहे. त्यांचा रोजगार मच्छीमारीवरच जास्त असतो. पण ज्या समुद्रातून आपला उदरनिर्वाह होतो त्या समुद्रातला आपलाच इतिहास ते पूर्णपणे विसरलेले दिसतात. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या होड्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर फेरीसाठी उपलब्ध आहेत. त्यातही आपली वेळ त्यांच्याच हातात. मी इथे प्रशासनाला जबाबदार ठरवत नाही असं नाही. पण प्रशासनही माणसंच चालवत आहेत. पृथ्वीवर सध्या माणसाच्या इच्छेनुसारच बरंच काही सुरु आहे. त्यामुळे किल्ल्याची अवस्था वाळीत टाकलेल्या वाड्यासारखी झालेली पाहताना दोष फक्त आणि फक्त माणसांना द्यावासा वाटतो.

एकेकाळी सोन्यासारखी समृद्धी पाहिलेला सुवर्णदुर्ग आज दगडांचं एक बेट उरला आहे, ज्याची अवस्था पाहायला लोक जय शिवराय म्हणत येतात अन् फक्त गवतातले दगड पाहून जातात. इथे ना इतिहास उरलाय, ना आता वर्तमान. उरलाय तो फक्त निसर्गाचा नियम – जिथे पाणी, तिथे जीव.

Saturday, 2 June 2018

भाग्य - हजार राम मंदिराचं



हंपी म्हणजे देवालयांची, मंदिरांची, खऱ्या अर्थाने देवभूमी! ठिकठिकाणी लहान-मोठी देवालयांच्या, तिथल्या संस्कृतीची कथा सांगणाऱ्या शिल्पांनी परिपूर्ण देवालयं, असंख्य मंदिरं. अशा या समृद्ध शहराच्या मध्यभागी, जणू हंपीचं हृदय असल्यागत अजुनही धडधडत आहे, हजार राम मंदिर. शब्दशः श्रीरामांची हजार शिल्पचित्रे असल्यासारखं भासवणारं हे मंदिर. विजयनगर साम्राज्याची राजा दुसरा देवराय याने पंधराव्या शतकात हे मंदिर उभारलं. असं म्हणतात, राज कुटूंबाचं हे मंदिर होतं. तसं पाहायला गेलं तर हे मंदिर राजवाड्यापासून काही अंतरावरच आहे. आणि ते पाहून मान्य करणंही भाग आहे. हंपीतल्या इतर देवालयांपेक्षा लहान असलं तरी या हजार राम मंदिरात प्रचंड कला कौशल्य पाहायला मिळते, आणि त्यावर कारागिरांचे अतोनात कष्टही राजकुटूंबाच्या या मंदिराला शोभेसेच आहेत.

मंदिरात प्रवेश करण्याआधीच त्यात दडलेल्या, प्रगत साम्राज्याची ग्वाही मिळते. मंदिराच्या कंपाऊंडच्या भिंतींवर अतिशय रेखीव चित्रे कोरली आहेत. ही चित्रे अखंड भिंतींवर आहेत, हे विशेष. यात तत्कालीन संस्कृती, सामाजिक व वैचारिक बूद्धी लक्षात येते हे आपल्याला माहित आहेच. हे सारं आपल्याला त्यांची वेशभूषा, केशभूषा, शिल्पांत मांडलेल्या घटना व कथांवरून कळतं. या साऱ्यांचे अर्थ काढत, अंदाज बांधत मी हंपीत एक-एक चित्र पाहत होते. पण इथे, हजार राम मंदिरातल्या या कंपाऊंडच्या भिंतींवरील चित्रे पाहून काही वेळ अगदी अवाक् झाले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर संपूर्ण स्त्रियांची शिल्पचित्रे कोरली होती. त्यात तसं आश्चर्यचकित वगैरे होण्यासारखं काही नाही. कारण भारतात बऱ्याच ठिकाणी नृत्यांगनांची शिल्पचित्रे पाहायला मिळतात. स्त्रियांचा कला व संगीत क्षेत्रातील सहभाग मोठ्या प्रमाणावर शिल्पचित्रांत आणि अनेक पुरातन माध्यमांत दिसून येतो. पण इथे अखंड भिंतीवर स्त्रियांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील सहभाग पाहायला मिळतो. त्यातही तलवारी, भाले, धनुष्यबाण घेऊन लढाईसाठी सज्ज असलेल्या स्त्रिया विशेष आहेत. इतकंच नव्हे, तर घोडेस्वारी करणाऱ्या, हत्तीवर कुशलतेने स्वार स्त्रियाही विलक्षण आहेत. पुरुषी मानली जाणारी हत्यारं हातात बाळगून लढणारी ही स्त्री शिल्पे पाहून अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण हत्यारं हातात घेऊन लढण्याची ताकद आणि कर्तुत्व फक्त पुरुषांमध्ये आहे असे विचार रुजलेल्या देशात पंधराव्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील हंपीसारख्या शहरात असे शिल्प दिसणे म्हणजे आश्चर्यासोबतच अभिमानाची बाब आहे. स्त्रियांचं असं सर्वव्यापी असणंही, तेही पंधराव्या शतकात, जेव्हा परकीय राजवट व इस्लाम आणि मनुस्मृतीचे सावट अवघ्या देशावर होते, तेव्हा या हंपीतील चित्रांची निर्मिती नक्कीच गौरवपूर्ण आहे.




स्त्रियांच्या युद्धातील सहभागासोबतच, त्यांच्या कलेतील सहभागाचेही दर्शन घडते. नृत्य, संगीत, अशा कलांमध्येही त्या निपुण होत्या हे आपल्याला इतर शिल्पांतूनही पाहायाला मिळाले आहेच. पण बासरी, डफली यांसारखे पुरुषी म्हणवले गेलेले वाद्य स्त्रिया अगदी सहज हाताळत असल्याचं दिसतं. मला यात प्रचंड आवडलेलं, बासरी वाजवत, कृष्णाच्या मधुरधूनेत तल्लीन झालेल्या स्त्रीचं सुंदर चित्र. तिचे बंद डोळे, हात आणि पायांची ठेवण आणि विशेषतः संपूर्ण शरीरात दाटून आलेला रोमांच ते चित्र पाहताना प्रखरतेने जाणवतो. एक नृत्यांगनाही अशीच मोहक आहे. तिच्याही नृत्यात मग्नतेची, समर्पणाची भावना दिसते आहे. खरंच, दगडात कोरलेली भावनाचित्रे आहेत ही.




मला अजुन एक आवडलेलं सुंदर चित्र मंदिराच्या भिंतीवर बाहेरील बाजूला, ते म्हणजे बाळकृष्णाचं गोंडस चित्र. खालील दोन्ही चित्रे इतकी सुरेख आहेत की खरंच कृष्ण लहान असताना असाच गोंडस आणि खट्याळ असावा असं वाटतं. त्याच्या कुरळ्या केसांपासून गुबगुबीत गाल आणि पोटाच्या ठेवणीपर्यंत प्रचंड आकर्षक असं हे शिल्प आहे. बाळकृष्णाची कथाच बाहेरील खांबांवर चितारली आहे.




मंदिरात विष्णुच्या अनेक अवतारांच्या कथा अगदी सहज कळतील अशा कोरल्या आहेत, आणि विशेष म्हणजे, ऊन-पाऊस-वारा सोसूनही इतक्या शतकांनंतरही त्या पुसट झाल्या नाहीत. मंदिराच्या दुसऱ्या द्वारातून आत आल्यास डाव्या बाजूच्या भिंतीवर वराहमित्रांची कथा चितारली आहे. तीही विशेष पाहण्यासारखी आहे. तर मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतीवर अनेक ठिकाणी श्रीरामाची कथा वेगवेगळ्या वेळेची, वेगवेगळ्या पर्वाची कथा दाखवली आहे. अनेक ठिकाणी रामांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, रामायणातील अशी अनेक पात्रं कोरून त्यांना विशेष महत्व असल्याचं दाखवून दिलं आहे. काही ठिकाणी अगदी तळहाताहून लहान शिल्पचित्रे कोरली आहेत. त्यात श्रीरामांचीही आहेत. ही लहान, पण दागिन्यांसकट स्पष्ट दिसणारी चित्रे विलक्षण रेखीव आहेत.



इतकं आकर्षक मंदिर पंधराव्या शतकात दुसऱ्या देवरायने बांधलं असलं, तरी मुसलमानांनी त्यांच्या विकृत धर्माच्या प्रसारासाठी भग्न केलं. हे मंदिराच्या आवारात प्रवेश करताच, अभिमानाने जी मान वर जाते, ती कळसाच्या शिल्पांचा भग्न अवतार पाहून दुःखाने खाली येते. अतिशय विकृतपणे या शिल्पमूर्तींची विटंबना केलेली दिसते. शेजारीशेजारी असलेल्या शिल्पमूर्तींचे चेहरे तर लागोपाठ एका आघातात पाडलेले दिसतात. अत्यंत असहाय्य वाटतं ती शिल्पं पाहून. आणि शिल्पांकडून नजर काढून समोर मंदिराती गाभाऱ्याकडे लक्ष गेलं की त्यातील नसलेल्या देवाला एकदा तरी आठवल्याशिवाय राहत नाही. एकदा भग्न झाल्यावर पुन्हा या मंदिरात कधी देव बसलेलाच नाही. त्या बंद गाभाऱ्याला नमस्कार करून बाहेरील सगळी अनमोल चित्रे पाहायचं भाग्य मिळालं यात आनंद मानायचा, इतकंच.



Saturday, 7 April 2018

प्रश्नांमागचा Propaganda


आज सकाळी ट्रेनने दादरला जात होते. सारं काही नेहमीचं. धावपळ, गोंधळ. ट्रेनसाठी कटकट, ट्रेनची कटकट, ट्रेनमधली कटकट. आवाज, आवाज, नुसते आवाज. सोबतीचेच झालेत ते आता. नसले की उलट चुकल्यागत वाटतं. सगळ्या आवाजात घाटकोपर गेलं तेव्हा काही वेगळं ऐकू आलं. मागूनच ऐकू येत होतं. पण आपण नुसतं ऐकायचं. ट्रेनमध्ये गर्दीतले चेहरे तसेही विरून जातात. म्हणून बघायचे कष्टही घेतले नाहीत. ऐकू येत होतं.

“काय रे, एकटाच आहेस? सोबत कोण आहे?”
“कौन है तेरे साथ? मम्मी बैठी है अंदर?”
“अकेला है? किधर से चढा?”
“उल्हासनगर से door पे ही है?”
“कहा जा रहा है?”
“वापी? गुजरात?”
“वहा पे कौन है?”
“मम्मी है?”
“तो उल्हासनगर मे किसके साथ रहता है?”
“मौसी को पता है तू अकेला ट्रेन मे जा रहा है?”
“मौसी नही आयी छोडने को?”
“स्कूल जाता है?”
“अकेला कैसे जायेगा गुजरात में?”
“दादर में पापा है?”
“पापा रुके है? वो लेके जायेंगे? ठीक है|”
“पापा के साथ ही जाना हा, ऐसे अकेले कभी जाना नही|”

आवाजांच्या बदलत्या माहितीने माझ्या भावनाही बदलत होत्या. एकटा, 10-12 वर्षांचा जीव, एवढ्या गर्दीत रिकाम्या मनात निरर्थक प्रश्न सोसत होतं. पण हे संपणार आहे. काही वेळाने दादर येईल. तो पप्पांना भेटेल. आईकडे जाईल. मित्रांना भेटेल. मन बालपणात शिरतं न शिरतं तोच आवाज पून्हा वर्तमानात घेऊन आला.

“नाम क्या है तेरा?”
“आं? मुसलमान है?”
“तभी ऐसा अकेला भटक रहा है| और तेरी मौसी को, पापा को, किसी को फिकीर नही है| तेरे धर्म में ना सब ऐसे ही है|”

बालपणात गेलेलं, मोकळं, अंहं, रिकामं मन, पुन्हा जहरभरल्या वर्तमानात आणल्याचा पश्चाताप झाला. डोक्यात सणक गेली. याआधी मागे पाहिलं नव्हतं. आता पाहायची ईच्छा उरली नाही. तरी आवाज येतच होते, आणि बधिर करतच होते.

“गुजरात के मुसलमान हो?”
“पंजाबी हो?”
“Non-veg खाते हो?”
“तुम्हारा भगवान कौन है?”
“वो वाहेगुरु? कि गुरु गोविंद सिंग?”
“अरे रो क्यों रहा है?”
“मम्मी की याद आ रही है?”
“आठवण येत असेल हो...”

आता सहन करणं शक्य नव्हतं. कोणीतरी हे थांबवणं गरजेचंच होतं. तसंही दादर येत होतंच. मी उठले आणि त्या आवाजाला काहीसं चिरडलंच.

“अहो का त्या पोराला धर्मात अडकवतायत? स्वतः तर जाती-धर्माचा चोथा केलाय. का हा गोंधळ त्याला दाखवताय? कळलंय, बाप आहे त्याचा घ्यायला स्टेशनवर. जाईल त्याचा तो. देव बिव काय विचारायची गरज आहे का?”

“हिला काय झालं मध्येच?”

“मुसलमानाला मुसलमान नाहीतर अजून काय बोलणार?”

“आम्हाला पण मराठे बोलतात ना. मराठेच आहोत आम्ही.”

“तुम्हाला बोलले का तुमचा धर्म किती गचाळ आहे? बोलले तर आत्ता ढकलून द्याल मला गाडीतून. त्या पोराला बोलताय. त्याला देवाचा अर्थही माहित नाहीये. आणि आईची आठवण ना तुमच्या या फालतू प्रश्नांनी येतेय त्याला. मुर्ख कुठचे.”

तरी बरंच बोलायचं होतं. पण लोक खरंच मुर्ख असतात. बदलापूरला नीट चढायला मिळालं, बसायला ठाणे सीट मिळाली, दादरला नीट उतरायला मिळालं तेच पुरे होतं त्यांना.

गर्दीला चेहरे नसतात, पण मन असतं. एकंच नाही, अनेक. वेगवेगळ्या प्रकारचे मन. ते वळवायचं काम जेव्हा राज्य चालवणारे आणि ते चालवू पाहणारे करतात, तेव्हा ते अशाच गर्दीच्या मनांतून दिसतात. आपण कितीही म्हटलं, सोशल मिडिया लोकांवर तात्पुरता प्रभाव टाकते वगैरे. तरी तो प्रभाव हळूहळू वाढतही असतो, आणि खोलात जातही असतो. ही खोलात शिरण्याची प्रक्रिया बघायला मिळणं भयंकर आहे. इतके वर्ष पेरलेलं विष खोलवर पसरतंय, हेच दिसलं आज.

मागे भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर काढलेल्या मोर्चातला एका लहान मुलाचा व्हिडियो वायरल झालेला. त्याआधीही, मराठा मोर्चात लहान मुलांचे मोठे डोळे करून, भावनिकरित्या भडकवणारे फोटो वायरल झाले होते, घोषणा वायरल झाल्या होत्या. गोष्ट कोणतीही असो, ती लहान मुलांच्या रुपात आली की भीती वाटते. कारण, लहान मुलांचं मन रिकामं असतं. त्यात आपण जे भरू तशीच आणि त्याचीच प्रतिक्रिया ते देतात. त्यामुळे आपण विष पेरावं की आणखी काही, याचा विचार करावा. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे.

आपण म्हणू, What’s App वरचे forwarded message सगळ्यांना forward करणाऱ्या लोकांना काही कळत नाही. त्यांना कळत असतं खरं तर, म्हणूनच ते अचूक target बनतात. पाहिलं ते मान्य करणारी जानता म्हणूनच २०१४ मध्ये मोदीला निवडून आणते. आणि आता हीच जनता त्यांना किती वैतागलीय ते सतत निघणाऱ्या मोर्चांतून दिसत आहेच. समोर पाहिलेलं मान्य करणारा माणूस तर्क शोधू लागला तर काय होईल माहित नाही. पण तर्कहीन राहून, डोळ्यांना पट्टी लावून राहिलेल्यांमुळे देशात अराजकता माजेल हे नक्की.

वर्षानुवर्षे चालू असलेल्या propaganda मधून खोलात जाणारं brainwash आता अशा लहान मुलांच्या आणि ट्रेनमधल्या गर्दीच्या आवाजांतून ऐकू येतायंत. हे आवाज वाढण्याआधीच बंद करावे वाटतात. पण मानवतेला आता इथे जागा नाही. अंतराळाचीही नाही.