२०१४ च्या निवडणूकीत भाजपचा main content खूप सामान्य होता. १५ वर्षे तेच सरकार आणि तेच लोक पाहून जनतेत असं वातावरण निर्माण झालं की काहीतरी फॅन्टॅसी हवी, मोठं हवं. २००९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा पुन्हा घेतल्याने तो तसाही फेल झालेला, आणि त्यात ग्राउंडवर भक्कम संघटनही नव्हतं, ते तर २०१४ मध्येही नव्हतं. पण २०१४ मध्ये भाजपकडून मार्केटिंगसाठी प्रचंड गुंतवणूक करण्यात आली, हे कोणीच नाकारू शकत नाही. तसे आपल्याकडे आकडे सुद्ध आहेत. तर मार्केटिंग कोणत्या कन्टेन्टने झाली? सर्वांत पहिले काँग्रेसविषयी द्वेष निर्माण करण्यात आला. अर्थात बऱ्याच अनधिकृत पेजेसवरून काँग्रेसविरुद्ध बऱ्याच पोस्ट, व्हिडीओ, मीम्स शेअर होत होते. ते तसेही अनपेड पेजेस वरूनही होत होतेच. कारण खरंच लोक कंटाळले होते. सो पहिले विरोधकांविषयी द्वेष निर्माण झाला, काहीच प्रगती झाली नाही वगैरे पेरलं गेलं. पण मग काँग्रेस नाही, तर आम्हाला वाली कोण? हा प्रश्न यायच्या आतच नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करण्यात आला. गुजरात मॉडेल म्हणवून कित्येक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले. लोक गुजरातची तुलना इतर विकसित देशांसोबत करू लागले, ते करण्यासाठी पुरेपुर खाद्य पुरवलं गेलं. पण तेव्हा गुजरातची तुलना महाराष्ट्रासोबत, किंवा भारतातील इतर राज्यांसोबत सकारात्मकतेने झालीच नाही. बरं त्याच काळात अमिताभ बच्चनची गुजरात टुरीजमची जाहिरात सुद्धा बरीच गाजत होती. त्यामुळे गुजरातबद्दल प्रचंड कौतुक सुरु होतं. मग ओघाने नरेंद्र मोदी हा दुसरा कन्टेन्ट बनले. तऱ्हेतऱ्हेचे लेख, फोटो, व्हिडीओ आले. सलमान खानसोबत मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवतानाचा व्हिडीओ तर बेस्ट होता. हा झाला सोशल मीडियाचा वायरल कन्टेन्ट.
भाजपकडून बरेच स्लोगन आले – ‘अब की बार,
मोदी सरकार’, ‘सबका साथ सबका विकास,
चलो चले मोदी के साथ’, ‘अच्छे दिन आने
वाले है’. यातील ‘अब की बार..’ हा स्लोगन ‘अब की बारी अटल बिहारी’ वरून ‘प्रेरित’ होता.
नरेंद्र मोदी जेव्हा प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा जो
कन्टेन्ट आला तो अजून इंटरेस्टिंग आहे. तेव्हा ते प्रत्येक ठिकाणची टोपी, तिथल्या
भाषेतील पहिलं एक वाक्य, तिथल्या देवी-देवता किंवा इतर आदर्श नेत्यांविषयी बोलून
माहोल बनवायचे. मग काँग्रेसविरुद्ध वातावरण बनवलं जायचं, की गेल्या ६० वर्षांमध्ये
काहीच झालं नाही वगैरे. आणि मग विकासाचा मुद्दा यायचा, वेगवेगळी आश्वासनं वगैरे. याने
सकारात्मकता दिली जायची. त्या सकारात्मकतेचा कन्टेन्ट म्हणजे ‘अच्छे
दिन आनेवाले है’. जोडीला आकर्षक भाषणशैली होतीच. सामान्य माणूस
मोदींच्या त्या भन्नाट वक्तृत्वाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहिला नाही. बरं अनेक
भाषणात काही वेगळं द्यायचा प्रयत्न होता. म्हणजे लोकांना नक्की काय आवडतंय, हे
तपासणं सुद्धा चालू होतं. जसं की एका भाषणात ‘Yes, we can’
हा स्लोगन म्हटला गेला. जे खरं तर बराक ओबामांचं कॅम्पेन होतं. यातून कन्टेन्टचा
प्रयोग होत होता असं म्हणणंही चुकीचं होणार नाही.
स्थानिक स्तरावर काहीच संघटन नसताना, प्रत्येक लोकसभेत मजबूत
उमेदवार नसताना फक्त भाषण आणि सोशल मीडियाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही.
त्यामुळे संघटनासाठी अजून एक कन्टेन्ट आणला. तो म्हणजे ‘चाय
पे चर्चा’ आणि ‘Nation with NaMo’. हे
ग्राउंड प्रोजेक्ट्स होते. ज्यात चर्चा तर व्हायचीच, सोबत टेम्पररी कार्यकर्ते सुद्धा
मिळायचे. या तरुण कार्यकर्त्यांना सोशल मीडिया आणि ग्राउंडवर प्रचारासाठी, डेटा कलेक्शन,
सर्वेक्षण आणि मतदानाच्या दिवशी बूथवर लोकांना घेऊन जाणे, बूथवर किती टक्के मतदान
झालंय यावर लक्ष ठेवणे अशा मायक्रो लेव्हलचे काम सुद्धा करून घेता येत होतं. बूथ
लेव्हल मॅनेजमेंट याआधी गुजरातमध्ये खूप यशस्वीरित्या झालं होतं. या दोन्ही
उपक्रमांचा कन्टेन्ट पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि विकास हाच होता. याने तरुण
जास्त प्रभावित झाले, आणि खरंच काहीतरी प्रोडक्टिव्ह करत असल्याचं त्यांना वाटलं.
आता या सगळ्यात आपली mainstream मीडिया कुठे होती? मीडिया तेव्हाही सोशल मीडिया अॅडीक्ट होती. त्यामुळे सगळे मोदीच्या मार्केटिंगमध्ये
बिझी होते. मीडियालाही काँग्रेसविरुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट मिळालेली. बरीच माध्यमं
गुजरात मॉडेलसोबतच गोधरा फाइल्ससुद्धा दाखवत होते, हे महत्त्वाचं. आता किती चॅनल्स
गोधराबद्दल बोलतील ही शंकाच आहे. असो. तर कदाचित लोकसभेचा शेवटचा टप्पा ज्या दिवशी
संपला, त्यादिवशी संध्याकाळी आयबीएन लोकमतवर अलका धुपकरने गुजरातमधील काही
गावांमध्ये जाऊन लोकांचे बाईट्स घेतले होते, ते आठवतायंत. गोधराबद्दल ते लोक प्रचंड
हळहळून बोलत होते. पण अर्थात मतदान झालं होतं, वेळ गेली होती.
२०१४ च्या लोकसभेत एनडीएला बहुमत मिळालं. त्या बहुमताचाच
पुढे कन्टेन्ट बनला. तेव्हा एक कॉमन टॅगलाइन होती – ‘सबका
साथ सबका विकास, चलो चले मोदी के साथ’. या टॅगलाइनला घेऊन
राज्याराज्यांत वेगवेगळ्या टॅगलाइन बनल्या. महाराष्ट्राच्या लोकांसाठी विशेष
टॅगलाइन होती – ‘शिवछत्रपती का आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ’. कारण सांगायची गरज नाही. महाराजांचं नाव घेतलं की आम्हाला कोणीही महान
वाटतो. जम्मू-काश्मीरात मुद्दाम नेहमीच्या स्थितीवर भाष्य करणारी टॅगलाइन – ‘जम्मू-काश्मीर के बदले हालात, चलो चलें मोदी के साथ’.
झारखंड – ‘कमज़ोर सरकार बिगड़ते हालात, चलो चलें मोदी के साथ’.
अजून एक टॅगलाइन होती, जी मला प्रचंड आवडली – ‘क्यों बैठे
युवा बेकार? चलो चलें मोदी के साथ’. ही
२०१४ मध्ये जम्मू-काश्मीरसाठी वापरलेली दिसली. पण खरं तर आता वेळ अशी आहे की ही
टॅगलाइन भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात वापरू शकतो. असो.
तर अशा प्रकारे लोकसभा असो, किंवा विधानसभा, कन्टेन्ट मोदीच
होते. म्हणजे भाजपाकडून खासदार किंवा आमदार पदासाठी निवडणूक नव्हती. पंतप्रधानपदासाठीच
निवडणूक असल्याचं चांगलंच भासवलं. लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं, की आपला खासदार
हा आपल्यासाठी लोकसभेत बिल घेऊन जातो, तो आपल्याला देशासमोर रिप्रेजेंट करतो.
पंतप्रधान हे आपण निवडून दिलेल्या खासदारांकडून निवडून दिले जातात. त्यामुळे हा
भ्रम सोडून द्या, की आपण पंतप्रधान निवडतो. अगदी तसंच विधानसभेच्या निवडणूकीत लागू
होतं. आपण आमदार निवडून देतो, मुख्यमंत्री नाही. बेसिक निवडणूकीचं ज्ञान
आपल्याकडून हिरावून भलतंच डोक्यात शिरवण्याचा हा कन्टेन्ट आहे, पंतप्रधान किंवा
मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावरून मत मागणे.
तर हा झाला २०१४ चा कन्टेन्ट.
१. विरोधकांविषयी द्वेष पेरणे.
२. चेहरा निर्माण करणे.
३. विकासाचे आश्वासन.
यानंतर भाजपचा कन्टेन्ट कसा
बदलत गेला, आणि अजूनही कसा बदलत आहे, त्याबद्दल पुढचा लेख नक्की लिहीन.
No comments:
Post a Comment