Thursday, 31 December 2015

सरलेलं वर्ष... अनुभवांचं

     अजुन एक नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतंय.  सगळ्यांना नव्या वर्षाची उत्सुकता लागलीये.  सगळेच नवीन वर्षाचं स्वागत गेल्या १५  दिवसांपासूनच करू लागलेत.  पण खरं सांगू का.. हे वर्ष ना मला सोडवतच नाहीये.  वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून वेगवेगळे अनुभव आलेत.  इतके की कदाचित पूर्ण आयुष्यभरही एवढे विचित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव एकाच वर्षात येणार नाहीत.
     घरगुती भांडणांपासून ब्रेक-अप पर्यंत आणि नव्या नात्याच्या सुरुवातीपासून ते घर संभाळण्यापर्यंत , mix झालेल्या emotions पासून अगदी depression पर्यंत २०१५ माझ्यासाठी पूर्णपणे emotions, feelings ( स्वत:च्या आणि दुसर्यांच्याही ) समजण्या आणि समजवण्यात गेला.  आणि खर तर तेच आपल जग असत.  सगळ्या भावभावनांची मिळुनच दुनिया होते आणि त्यांचीच दुनियादारी . अशाच सगळ्या  emotions मुळे वर्षातल्या अगदी पहिल्या महिन्यापासून माझ्या स्वभावात वेगवेगळे बदल होत होते.
    आधीच वर्षीच्या emotions आणि confusion चा पूर्ण भार मनावर घेऊनच जानेवारी उजाडला होता. कॉलेज फेस्टिवल असूनही कॉलेज ला न जाणं, एकटच राहणं, चिडचिड-वैताग स्वत:वर काढणं, असा एकूणच depression मुळे अजुनच confusion वाढत गेलं.  confusion of emotion असं म्हणेन मी त्या वेळेला.  म्हणजे सत्य आपल्या समोर आहे, ते कळतंय पण मानता येत नाहीये, का? तर ते सत्य आपल्याला खोटं व्हावं, ती आधीची वेळ पुन्हा यावी आणि आपण ती परिस्थिती पुन्हा दुरुस्त करावी अशी इच्छा असते जी कधीच पूर्ण होणार नसते. आणि हीच गोष्ट जास्त बोचते.  त्यावेळी माझं एकच काम असायचं.  झोपायचं, झोपून उठलं की बेडरुम लॉक करून एकट्यात बसून राहायचं.  आणि असं बसून राहीलं की विचार आपोआपच येतात आणि ते चांगले असणं नक्कीच शक्य नाही.
     आज मागे वळून पाहीलं तर कळतं, पहिल्या 3-4 महिन्यांत या depression मुळेच माझी social life सुद्धा बिघडू लागली होती.  समाजात वाया जाणं जे म्हणतात तेच झाले.  पण हे सलग 3-4 महिने चाललं असं नाही.  माणूस वाईट होतो ते वाईट परिस्थितीमुळे.  आधीची चांगली स्थिती तो पूर्णपणे विसरतोच असं नाही.  मध्ये मध्ये मी भानावर यायचे.  एकदा तर एवठी भानावर आले की समजवणार्याच्या प्रेमातच पडले की काय असं वाटू लागलं.  Crush की काय असतं तसं काहीतरी वाटू लागलं मलाही, पण ये सब झूट मूट का scene समजून सोडूनही दिलं आणि ये रे माझ्या मागल्या करत लागले परत त्याच वाटेला.
     पण ह्या वर्षानेच कदाचित ठरवलं असावं, 'हिला धक्के देतच राहूया'.  म्हणूनच की काय, अचानक कोणाचातरी फोन येतो, चार महिने गप्प असलेलं तोंड आणि मन बोलतं करतं.  मग मीच माझ्याभोवती बांधलेली बंधनं सूटतात.  मला खरी मी सापडते.  आधीची.  मग भविष्याचा विचार होतो, अन् तिथेच घोडा अडतो.  कारण जिथे भविष्याचा विचार होतो तिथे मनाच्या कोणत्या ना कोणत्या कोपर्यात भूतकाळ पून्हा आठवतो.  पण तो आता आठवूच शकतो, बाकी काहीच नाही ही जाणीव पुरेशी होती.  जग असंच असतं - जगणारं, टिकणारं.  आयुष्यभर.  आणि ज्यामध्ये कळी फूलूच शकणार नाही असं रोपटं तरी कोण लावतं ना आजकाल.मी लावलेल्या रोपट्यामध्ये कळी फुललीही आणि त्याच फुलाच्या सुगंधाने आधारही दिला.  रोपटं जसजसं मोठं होऊ लागतं तशी त्यालाही आधाराला काठी लावावी लागते.  ती विश्वासाची काठी आता मी द्यायची होती.  माझा तापट स्वभाव आता कमी करायचा होता आणि कोणत्याही आपुलकीच्या नात्यासाठी, नातं टिकवण्यासाठी स्वत:त बदल करावाच लागतो, तो करायचाही असतो.  कारण त्यात नातं टिकवण्याचं सुख असतं.  So मी आता हळूहळू पुन्हा शांत, समंजस मुलगी झाले.
     सगळ्यांना असं कोणी ना कोणी हवं असतं आधारासाठी.  मला कोणीतरी बोलायला लागतं, मनातलं कोणा एकाला सांगायला लागतं.  मी एरवी गप्प असले तरी माझ्या त्या रोपट्याला मी सगळं सांगते.  अशावेळी तोच उपयोगी येतो.  म्हणजे एकीकडे झालेला अपमान, पूर्वीपासूनचे न्यूनगंड, लिखाण चांगलं झालय की नाही याचं nervousness, असं सगळंच त्याला सांगत गेले अन् मन मोकळं होत गेलं.  याचा परिणाम म्हणजे confidence वाढत गेला, न्यूनगंड कमी झाला.  याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता मी 'बारीक म्हणजे मुर्ख' असं समजणार्यांना माझा 'मुर्खपणा' बिनधास्त दाखवू शकते.
     बरं ह्या सगळ्या वर्षात अगदी शेवटच्याच महिन्यात मोठी जबाबदारी अंगाशी येऊन आदळली.  म्हणजे घरच येऊन आदळलंय, तेही जबाबदारीच्या स्वरूपात.  पण जबाबदारी अंगावर पडली की माझ्यासारख्या आळशी मुलीला सुद्धा झोपेतून खाडकन उठवते.  आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात का होईना, मी उठलेय या गोष्टीचं आईलाही कौतूक वाटतंय.

Thursday, 26 November 2015

प्रिय दहशतवाद्यास,...

प्रिय दहशतवाद्यास,
     मी एक सामान्य मुलगी. कोणत्यातरी नावाची, कोणत्यातरी देशाची आणि तुझ्यासाठी कोणत्यातरी धर्माची.  त्यामुळे माझं बोलणं तसं तुला पटणारं नाहीये. पण हे पत्र मी लिहतेय ते मला काल रात्री पडलेल्या स्वप्नामुळे.  तसं झोपेत पाहिलेलं स्वप्न वेगैरे मी काही खरं मानत नाही.  पण तुझी काळजी वाटतेय म्हणून सांगते. कारण हे खरंच आहे आणि खरं होईलही असं वाटू लागलंय आता मला.
     स्वप्न तसं सुरवातीला खुप सुंदर होतं...  मी आणि माझा नवरा मस्त classic movie बघायला गेलोय.  गुरुदत्तचा प्यासा.  त्यातली गाणी. आहाहाहा...  हातात हात घेऊन वहीदा रेहमान आणि गुरुदत्तच्या कथेत, एस. डी. बर्मन यांच्या संगीतात, साहीर लुधीयानवींच्या काव्यात वाहत चाललो होतो.  जणु बर्याच दिवसांनी असं सोबत movieला आलो होतो.  classic असल्याने theater मध्ये गर्दीही फार नव्हतीच.  मोजकेच जण.  त्यामुळे अजुनच निवांत वाटत होतं.  इतक्यात काहीतरी आवाज झाला. फार मोठा आवाज.  पुन्हा पुन्हा जोरजोरात तसाच आवाज होऊ लागला.  बाहेर काहीतरी गोंधळ झालाय हे कळायच्या आतच तोच आवाज theaterच्या आत आला.  मी त्याचा हात होता त्याहीपेक्षा अधिक घट्ट पकडला.  क्षणाक्षणाला आवाज मोठा होत गेला.  ह्रदयाची धडधड एवढी तीव्र असूनही त्या आवाजात ऐकू येत नव्हती.  हात अजून घट्ट झाला.  आम्ही एकमेकांकडे पाहायला आणि आवाज अगदी ह्रदयापर्यंत यायला एकच क्षण झाला आणि मग सारंच उद्ध्वस्त झालं.  त्याचे डोळे मिटले, पण हात अजूनही तितकाच, उलट अजूनच घट्ट होता.  आता तो कोणालाच सोडवता येणार नव्हता.  दोन क्षण त्याच्याकडे पाहून मला तू दिसलास.  जेवढ्या वेगाने आलास तेवढ्याच वेगाने गेलासही.  पण तुझ्या त्या फक्त डोळे दाखवणार्या मुखवट्यामागचा दहशतवादी मी ओळखला.  हो दहशतवादीच.  कारण ना तू माणूस आहेस, ना तुझी जनावर म्हणण्याची लायकी.  तू फक्त एक दहशतवादी आहेस.  जो धर्माचं नाव पुढे करुन अधर्म करतोय.  मला नाही माहीत तू स्वत:ला कोणत्या धर्माचा म्हणवतोस, मला ते जाणूनही घ्यायचं नाहीये.  तू अधर्मी आहेस एवढं मात्र मी खात्रीने सांगेन.  कारण ज्याच्या आत्म्याचं फक्त थडगं उरलंय त्याला काय कळणार धर्म आणि धर्माची शिकवण?  जो माणूसच नाही त्याला धर्मही नाही असं मी मानते आणि ते खरंही आहे.
     त्यावेळी मी तुला घाबरावं असं तुला वाटत होतं.  पण मी नाही घाबरले.  घाबरणारही नाही.  कारण काये ना, तुझ्याच डोळ्यांत मरणाची भीती दिसत होती मला.  तेच मरण जे तू माझ्या नवर्याला दिलंस.  आणि झालंही तसंच.  तुझ्या मालकाने तुला मरायचे आदेश दिले.  आम्हाला मारायचे जसे आदेश दिले होते, अगदी तसेच.  जवळ आलेल्या मरणाला तूही घाबरलास आणि भीतभीतच शेवटची गोळी झाडलीस.  स्वत:वर.  हो शेवटचीच.  ती तुझीच होती.  नंतर एकही गोळी नसणार होती.  ना तुझ्यासाठी, ना माझ्यासाठी.
      तु हे सर्व करतोस देव वाचवण्यासाठी.  मी देव मानत नाही, पण जर देव असेलच तर त्याला तुझ्या रक्षणाची गरज नाही हे मात्र मी खात्रीने सांगू शकते.  जर दुसर्यांना मारून स्वत:चं रक्षण करणारा देव असेल तर मी स्वत:ला भाग्यवानच काय तुझ्याहूनही हुशार समजेन, की असा देव मी मानत नाही.
     मी माझ्या नवर्याला गमावलं, माझं छोटं जग गमावलं.  पण तू स्वत:लाच गमावलंस.  जे जग तुझं कधी नव्हतंच, होणारही नव्हतं ते तू संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलास.  आणि स्वत:च संपलास.  तुझ्या त्या देवासाठी का होईना, मागे फिर रे बाबा.  माझं हे झोपेतलं स्वप्न खरं व्हायला नको.

अजुनही तुझीच हितचिंतक,
कोणीतरी.

Monday, 16 November 2015

#नो फुल्ल-इस्टॉप

     आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे#ही गोष्ट आहे एका खेळण्याची#एका#मोठ्या#online#social#always on#addicted वेगैरे पुरुषाच्या#छोट्या#नाजूक#cute#गोंडस वेगैरे मुलीचं फुल्ली-गोळ्याचं ते खेळणं#त्या #छोट्या#नाजूक#cute#गोंडस वेगैरे मुलीसारखंच ते खेळणंही#छोटं#नाजूक#cute#गोंडस वेगैरे#ते तिच्या बापाने म्हणजे त्या#मोठ्या#online#social#always on#addicted वेगैरेने पाहिलं#आणि मग काय#ते खेळणं त्या#गोंडस वेगैरे मुलीच्या हातून हिसकावून घेतलं#पण दुर्दैव#हिसकावून घेताना#ते खेळणं वाकडं झालं#मुलीने आरडाओरडा केला#रडून डोळे लाल केले#पण ते खेळणं काही तिच्या पप्पांच्या हाताने सरळ होईना#त्या addicted वेगैरे बापालाही मग वाईट वाटलं#तो आपलं guilt लपवू शकला नाही#मग त्या#addicted बापाने तिच्या खेळण्याला#श्रद्धांजली देण्याचं ठरवलं#अन् श्रद्धांजलीही आपल्या online मार्गाने त्याने दिली#आणि जगभर ती पसरली#संपूर्ण जगभरातू त्या#गोंडस वेगैरे मुलीच्या खेळण्याला#श्रद्धांजली मिळाली#ती_श्रद्धांजली_होती ### #त्या खेळण्याचं वाकडं झालेलं रूप#आणि आजच्या भाषेतलं#hashtag#हो_ही_तीच_श्रद्धांजली_होती_जी_आपण_आजही_नकळत_त्या_खेळण्याला_देत असतो#ही_तीच_श्रद्धांजली_आहे_जी_आपण_जगात#trending_म्हणून_वापरतो
     #आज खरंच मनोभावे त्या खेळण्याला श्रद्धांजली देऊयात#status मध्ये #फक्त ### टाकून upload करा#आणि#पुन्हाकधीचयाचाअतिरेककरुनकानाहीतरअशाचपोस्टटाकण्यातयेतीलधन्यवाद#संपलीहीगोष्ट

Friday, 30 October 2015

हसु की रडू?

     अनेकदा आपल्या जीवनात नक्की काय react व्हावं हेच कळत नाही.  म्हणजे नक्की हसावं की रडावं की नुसतंच पाहून पुढं जावं?  नाही नाही, मी आपले मित्र व शत्रू मरणाच्या दाढेत आहेत आणि मित्रासाठी रडावं की शत्रू मरतोय म्हणून हसावं अशा घोर परिस्थितींबद्दल बोलत नाहीये.  आणि बायको आणि आईच्या भांडणात अडकलेल्या पुरुषाची विनोदी स्थितीसुद्धा मांडत नाहीये.  मला बोलायचंय आयुष्यातल्या अगदी छोट्या पण महत्वाच्या किंवा मोठ्या होऊ शकणार्या गोष्टींबद्दल.
     नाही म्हटलं तरी रोजच असे महारथी भेटतात ज्यांच्या महानतेवर काय बरं बोलावं, काय बरं react करावं, हेच कळत नाही मला.  सर्वात पहिले सांगायचं झालं तर कधी कधी असे काही विनोदवीर भेटतात, ज्यांचे विनोद एकतर माझ्यासारख्या साध्या भोळ्या, पुलंचे विनोद follow करणार्या मुलीला समजण्यापलीकडे असतात, नाहीतर त्यांच्या विनोदावर फक्त रडावसं वाटतं (किंवा कदाचित तो माणूसच समजण्यापलीकडे असावा!) असो माझ्या भाषेत त्या विनोदांना पानचट असं अगदी अदबीनं म्हणतात, पण जमाना त्यांचा आहे, म्हणून तेवढ्याच अदबीनं त्यांना PJ असं म्हणतात.  बरं तशी आता Whats App मुळे सोयीस्कर अशी सोयही झालीय म्हणा त्या jokes वर react व्हायची.  Whats App ने "डोळ्यांत पाणी आणून दात बाहेर काढणारा" हा emoji माझ्यासारख्या सोशिक मुलीलाच दिलाय असं माझं ठाम मत आहे.  कदाचित Whats App वाले सुद्धा या हसु की रडू या प्रश्नाने केव्हातरी छळले गेले असावेत.  बरं ह्या हसण्याच्या emoji वरुन आठवलं, आजकाल हसण्यालाही शब्द आलेत! नाही ते हाहाहा किंवा हीहीही नाहीत आणि खिखिखि सुद्धा नाहीत.  LOL, ROFL, LMAO असे काहीतरी ते शब्द आहेत.  म्हणजे आजच्या shortcut च्या जमान्यात "मी हसतेय" एवढं म्हटलं की झालं.  मग माझ्यासारख्या गावंढळ मुलीने दात बाहेर काढून हसायचं तरी केव्हा?  हे हसणं असंच असेल तर चित्रपटातल्या villain ने "हा हा हा" करण्याऐवजी "L O L" असं जोरात म्हटलं तरी पुरे.  villain चंच काय आपले हिरो तर हिरोईनच्या हसण्याच्याच अदांवर जास्त फिदा असतात.  मग हेमा मालिनीने "हूंहूंहूं" च्या ऐवजी ROFL बोलून मोकळी झाली तर धर्मेंद्र तिथून पळालाच म्हणून समजा.  मग ह्यांच्या विनोदांवर (?) आणि हसण्यावर (?) LOLAवं की रडावं तेच कळत नाही.
     कधी कधी असे काही लोक भेटतात ज्यांचं व्यक्तिमत्व पहिले तर महाभारतातल्या गुरू द्रोणांचा मुलगा अश्वत्थामा किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णासारखं वाटतं.  कारण त्यांचं बोलणं, त्यांचा उपदेश, त्यांची sympathy सारं काही अमृतासारखी गोड वाटते.  पण खरं तर त्यांना सर्वकाही माहीत असतं (असं त्यांना वाटतं.)  श्रीकृष्णासारखं फक्त डोळ्यांत पाहून त्यांना व्यक्तीचं मन कळतं (हेही त्यांनाच वाटतं.)  आणि म्हणून ते लोकांना जीवन कसं सुंदर करता येईल, problems कसे सोडवता येतील याचे sympathyful धडे देतात आणि अगदी तसेच धडे ते ज्याच्यामुळे किंवा ज्याच्यासोबत problems चालू आहेत त्यांनाही देतात.  आणि त्या पवित्र कार्याला ते भगवद्गीतेची उपमा देतात!  कोणत्या मुहुर्तावर श्रीकृष्णाने अर्जुनासोबत दुर्योधनालाही युद्धात सल्ले दिले होते?  या अशांना आदराने नारद आणि मनात चोमड्या बोलून मी मोकळी होते.  या नारदांच्या अज्ञानावर खरंच हसावं की त्याच अज्ञानाची कीव करावी हेच कळत नाही.  आणि मग प्रश्न कायम राहतोच, हसू की रडू?  नारायण नारायण!
     तशी ही माझी फार सात्विक आणि केविलवाणी problems आहेत.  पण जगाच्या प्रत्येक कोपर्यात अशी काही माणसं असतात जी सतत problems नी ग्रासलेली असतात.  काहींना mercedes मध्ये जरी बसवलं तरी आपल्याकडे BMW नाही म्हणून ते रडतात; तर काही जण आपल्याकडे काहीच नसताना एवढा confidence कमवतात की त्या confidence ने आजच BMW आणतील किंवा BMW सकट सलमान खानला तरी आणतील.  काही जण इतरांना पाहून आपले problems ठरवतात, तर काही जण इतरांचे problems एवढे कमी का म्हणून स्वत: problems ओढावून घेतात.  भारतात इलेक्शनच्या वेळेला एकीकडे problems चा महापूर असतो, तर आमचा नेता किती छान म्हणून दुसरीकडे पाच वर्षांच्या रस्ते, पाणी, वीज या problems ना काना डोळा करून नवीन wifi चा problem कसा दूर केला म्हणत कुरवाळत असतात.
     असो... तर ह्या लोकांच्या अशा अत्यंत गहन problems वर तसाही काही उपाय नाही आणि माझ्या प्रश्नाचंही माझ्याकडे उत्तर नाही...

Sunday, 4 October 2015

यादों का सफर

     काही दिवसांपूर्वी शाळेतल्या एका मित्राशी बोलत होते.  बोलत होते म्हणजे आजकालचं Digital Talk (चॅटींग हो!).  दहावीत आमचा वर्ग एवढा बेशिस्त(?) होता की टिचरांना एक मुलगा-एक मुलगी असं शिक्षा(?) म्हणून बसवावं लागलं होतं.  तर हा निखिल माझ्या बाजुला बसायचा.  निखिल आणि मी म्हणजे "मोटु और पतलु की जोडी" (याचा अर्थ तर तुम्हाला कळालाच असेल).  या जोडीसारखीच आम्ही खुप गप्पा मारायचो.  आणि दहावी म्हटलं तर आमचं वय असावं जेमतेम 15-16 वर्ष.  या कोवळ्या वयात जे काही घडतं, जेवढे काही मित्र बनतात, ते नेहमीच लक्षात राहतात.  म्हणुनच त्याच्यासोबत मारलेल्या गप्पा मला नेहमीच लक्षात राहिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही अजूनही खुप चांगले मित्र आहोत.
     तर बोलता बोलता निखिल म्हणाला,
     "खुप दिवसांपासुन एक विचारायचं होतं.  विचारु का?"
म्हटलं विचार.
     "तु मला अजुन सांगितलं नाहीस, तु त्या दिवशी का रडत होतीस? तुला आता आठवत असेल की नाही माहीत नाही."
     आइंSSSग...  मला खुप हसु आलं.  कारणही तसंच होतं ना.  काय झालेलं, आमचा कॅम्प जाणार होता आणि सगळे जण Mobile Phones आणणार होते फोटो काढायला.  तर मीही ताईकडे मागत होते Mobile.  पण तिने सरळ "नाही"ची पाटी घेऊन तोंडासमोर ठेवली.  आईला सुद्धा पटवायचा प्रयत्न केला, पण त्यानेही काही झालं नाही.  मग सकाळ सकाळ वाद घालून तशीच शाळेत गेले आणि रडत बसले आणि ते फक्त निखिललाच कळालं, कारण मधल्या सुट्टीपर्यंत वातावरण नॅार्मल झालंही होतं.  किती बालिश होते मी.  एका फोनसाठी एवढं रडले.  हो अन् मग "कॅम्पला Mobile Phone आणायचा नाही.  जप्त केला जाईल!" अशी सूचनाही नंतर आलीच म्हणा.  पण तेव्हा Mobile च्या त्या fascination मुळे बरंच वाईट वाटून घेतलं होतं मी.
     आणि अजुन एक सांगायची गोष्ट म्हणजे, निखिलला अजुनही हे आठवतंय.  वा!  मला तर त्याने आठवण करून दिली तेव्हा आठवलं.  आणि दुसरं म्हणजे त्याला अजुनही आधी एवढीच Curiosity आहे, की "लोक असं का करतायंत" हे जाणून घ्यायची.  मस्तच.  नाहीतर मला "लोकांना काय करायचंय ते करुदे" हे म्हणण्या इतपत सगळ्याचा वैताग आलाय.
     अचानक समोर आलेला तो किस्सा पहिले तर खुप हसायला लावतो, पण विचार केला तर तेव्हाच्या त्या परिस्थितीची जाणीवही करुन देतो.  आणि आजच्या परिस्थितीला जोडून पाहिलं तर ते क्षण आपल्यासाठी किती महत्वाचे होते हेही तेव्हाच कळतं. कारण त्यातून  आपल्याला अनुभव मिळालेला असतो.  आणि खरं सांगायचं झालं तर अनुभवातूनच आपण खरे शिकतो.  माझ्यासाठी तर ट्रेनमध्ये टी.सी.ने Without Ticket पकडलं तोही खतरनाक अनुभव होता.  यातून सर्वात चांगला एक बदल झाला तो म्हणजे आता मी कधीच Without Ticket प्रवास करत नाही आणि दुसरं म्हणजे मी किती छान Acting करू शकते आणि किती चांगल्या गोष्टी On The Spot बनवू शकते हेही कळालं.  कदाचित म्हणूनच आता BMM करतेय मी.  पण खरंच यादों का एक सफर करना तो बनता है,  क्योंकी यादों का ये सफर बडा सुहाना है.

Friday, 18 September 2015

चिडचिड

  "ए आई काय गं आज पण खिचडी भात. रोज रोज काय खिचडी भात खायला लावते गं."
  "पापड तळले आहेत ना"
  "म्हणून काय झालं, सारखं सारखं खिचडी भात खाऊन कंटाळा आलाय. एकतर शेजवान चटणी पण नाये."
  "मग आता जा आण दुकानातून"
  "मी नाय जाणार आता.. राहुदे.. एकतर भुक लागलीय एवढी आणि खिचडी भात खायला लागतोय. एकतर दुपारी पण काय ती भाजी होती. मला आवडत नाही तेच बनवते तु नेहमी."
  "बरं मग जा आण ना काहीतरी खायला."
  "नको काय, राहुदे. बघेन माझं मी."
  प्रत्येक घरात हे conversation तसं नेहमीचंच आहे. आणि सगळ्यांची फेवरेट वांग्याची भाजी असली की बातच काही और... आजकाल मनासारखं काही झालं नाही की डोकं फुटतं. TV चालत नाही, फोडला रिमोट.. इंटरनेट स्लो चालतंय, फोडला मोबाईल.. इंटरनेटमुळे आपलं जग फास्ट आणि इझी झालं असलं तरी आपल्याला हे कळतच नाही की ह्याच इंटरनेटमुळे आपली चिडचिड होतेय. कारण झालंय असं की ज्या स्पीडने आपलं इंटरनेट चालतं तो स्पीड माणसाला आला नाहीये. इंटरनेटमुळे हवं ते आणि हवं तसं सगऴं एका क्लिकवर मिळतं आणि नेमकं तसंच बाहेरच्या जगाकडूनही आपण expect करायला लागलोय.
  आजच्या 4G च्या युगात इंटरनेट सोडून देणं शक्य नाही, पण निदान त्यावर कंट्रोल तरी असायला हवा ना. आजुबाजुला काय चाललंय हे थोडफार इंटरनेटशिवाय माहीत करुन घेण्याचा प्रयत्न करायला हवाच ना. बरं ते नाही तर निदान घरात काय चाललंय हे तर पाहु शकतो. घरातल्यांशी इंटरनेट चॅट सोडून थोडी प्रॅक्टीकल चिट चॅट सुद्धा करायला हवी.
  कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा आपण एखाद्या साॅफ्ट वे ची अपेक्षा न करता स्वत: स्वत:चे मार्ग शोधतो तेव्हा आपण खरे Mature होतो. मग ही Maturity नुसती Sarcasm वर वापरण्यापेक्षा इंटरनेटवर कंट्रोल आणायला आणि चिडचिड कमी करायला सुद्धा वापरायला हवीच की.
  त्यामुळे आता आईने कारल्याची भाजी जरी बनवली तरी मुकाट्याने खायची. आणि नाहीच जमलं तर त्यासोबत टोमॅटो साॅस घ्या, काहीतरी क्रीएटीव्ह केल्याचा तुम्हालाही आनंद आणि भाजी सगळी संपवली म्हणूल आईही खुश. ( आणि आज मी कारल्याची भाजी खाणार आहे. :-P )

Tuesday, 15 September 2015

पहिली पोस्ट

 कुठेतरी ऐकलं होतं की ब्लाॅग म्हणजे खरं तर आॅनलाईन डायरी आहे ज्यात आपण मनाचं, आवडणारं, न आवडणारं, सगळं काही शब्दात मांडू शकतो.
 मी डायर्या खुप लिहल्या आहेत, ज्यात छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी ब्रेक-अप अाणि भांडणांपर्यंत सगळं काही लिहलंय. मग ही डायरी लिहण्यात एवढा कसला विचार करावा मी? मनाला वाटतं ते लिहत सुटावं असं मला वाटायचं, मग हे ब्लाॅग का जमत नाहीये मला? 
ब्लाॅगला पब्लिक आॅनलाइन डायरी म्हणायला हवं, कारण डायरी ही दुसर्यांना वाचायला नाही तर आपल्या मनाचं ओझं कमी करण्यासाठी असते. पण झालंय असं की माझी ही डायरी अख्खं जग वाचणार आहे म्हणून कदाचित मला भिती वाटतेय. जसं कोणतीतरी नवीन स्टाईल केल्यावर लोक आपल्याकडे बघतील या विचारात आपण असतो, अगदी तसंच आता मला ही पोस्ट शेअर करताना वाटतंय. कारण पब्लिकली काही करायचं म्हटलं तर विचार हा करावाच लागतो. हल्ली तर गर्दीत चालण्याचेही धडे घ्यावे लागतात, मग हे सोशल नेटवर्कींग तर अजुनच डेंजर आहे, मग ते डायरी असो वा प्रोफेशनल मेल, सगळंच सोफॅस्टीकेटेड झालंय.
 असो, तर मला कळत नाहीये की मी नक्की काय लिहू ह्या पब्लिक डायरीमध्ये? माझे अनुभव की लोकांचे आवडलेले किस्से? राजकारण की माझे रोल माॅडेल? शाळेत लिहतात तसे निबंध लिहू की काॅलेजमध्ये डिबेट होण्यासारखे संस्कृती आणि संस्कारांचे विषय घेऊ?
 लोकांसोबत बोलायचं झालं तर कितीतरी विषय चर्चा करायला मिळतात. पण तेच एकपात्री स्पर्धेसारखं एकट्यानेच बडबडणं म्हणजे फारच अवघड. आणि त्यात हे आॅनलाईन बडबडणं म्हणजे फेरीवाल्याचं "रद्दी पेपर भंगार" ओरडण्यासारखं आहे, ऐकतील तेवढे  जागे लोकच  दाद देतात.
 असो, तर काय लिहु यावर बोलता बोलता बरंच काही लिहलं, तर आता ही झाली माझी पहिली पोस्ट...