Sunday, 15 September 2019

#राजकरणाचा_बाजार – प्रोपगंडा आणि आरे


याआधीच्या ब्लॉगमध्ये नरेटिव्ह कसं तयार होतं ते लिहलं होतं. आता हे नरेटिव्ह पसरवण्याच्या उद्देशाने प्रोपगंडा किती उपयोगी येतो त्याबद्दल लिहायचा प्रयत्न आहे. सर्वात आधी, प्रोपगंडा म्हणजे नक्की काय ते समजायला हवं. इथे पत्रकारिता, कम्युनिकशन, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या किंवा केलेल्या मित्रमैत्रिणींना कळेल, की प्रोपगंडा काय असतो. मला शिकताना समजायला फार दिवस लागले, तरी शिक्षकांना पुन्हा विचारून हैराण करायचं नव्हतं. तर प्रोपगंडा म्हणजे “Information, especially of a biased or misleading nature, used to promote a political cause or point of view.” ही गुगलने सांगितलेली व्याख्या आहे. ‘राजकीय दृष्टीकोन बदलण्यासाठी वापरलेली एकांगी किंवा दिशाभूल करणारी माहिती.’ आपण सध्याच्या बोलीत त्याला फेक ट्रोल्स म्हणतो. हा प्रोपगंडा कितपत व्याप्ती देऊ शकतो? पैसे असतील तर खूप. सोशल मीडिया हे या प्रोपगंडाचं प्रमुख माध्यम आहे, ज्याने कमी वेळात प्रचंड रीच मिळतो.

सोशल मीडियावर आजपर्यंतचा मोठा प्रोपगंडा म्हणजे ’७० वर्षांत काय झालं?’ लोकांचं उत्तर येतं भ्रष्टाचार. अगदी बरोबर. बरेच घोटाळे बाहेर आले. पण कितीही भ्रष्टाचार असला, आणि त्याविरुद्ध मीच काय, संपूर्ण भारत विरोधात असला, तरी मी असं म्हणणार नाही की ७० वर्षांत काहीच झालं नाही. कारण २०१४ च्या आधी मी शाळेत जाऊ शकले. २०१४ च्या आधी मी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकले. अगदी तसंच २०१४ च्या आधीही आयआयटी, विद्यापीठं, वाचनालये होती. २०१४ च्या आधीही हॉस्पिटल्स, दवाखाने आणि योगासुद्धा होता. २०१४ च्या आधीही ट्रेन, रस्ते, पूल, वाहतुक मार्ग होते. तुम्ही आता हा लेख ज्यात वाचत आहात ते मोबाइल तंत्रसुद्धा २०१४ च्या आधीच भारतात आलंय, इंटरनेटही २०१४ च्या आधी आलंय आणि ज्याच्या जोरावर मोदी सत्तेत आले, ते सोशल मीडियासुद्धा २०१४ च्या आधीच आपल्याला मिळालं आहे. आणि तरीही आपण विचारतो की ७० वर्षांत काय झालं? जितका भावनिक प्रोपगंडा तितकंच भावनिक त्याचं विश्लेषण.

आता भावनांच्या मिठीतून जरा बाहेर येऊ आणि अजून एक लेटेस्ट प्रोपगंडा बघू. ‘आरे वाचवा’ ही चळवळ गेल्या ४ वर्षांपासून सुरु आहे. तुम्हाला माहित होतं का? बहुतेकांना अजुनही माहित नाहीये. म्हणूनच त्यांना आता हे नक्की पटलं असेल की आरे हे जंगल नाहीये. मेट्रो प्रकल्पाचे अधिकारीच काय, आता तर आपल्या मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय, की आरे जंगल नाहीये, कुरण आहे. कोणत्या कुरणात ४ लाख झाडं असतात ओ? तेही जाऊद्या. कोणत्या कुरणाच्या लहानश्या भागात २७०० झाडं असतात? हा तर मौखिक प्रोपगंडा आहे. सोशल मीडियावर काय चालवलंय माहितीये? ४ वर्ष सुरु असलेल्या, आणि कोणाला मागमूसही नसलेल्या ‘आरे वाचवा’ चळवळीला विरोध करायला त्यांनी ‘आरे ऐका ना’ हे सोशल मीडिया कॅम्पेन सुरु केलंय. ज्याने २ दिवसात हजारो ट्विट्स आणि रिट्विट्स मिळवलेत. कसे? ‘आरे वाचवा’ चळवळीला चूक सांगून.

पहिल्यांदा अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी यांचं भलं मोठं पत्र वजा स्टेटमेंट येतं. आरे कसं जंगल नाही, मेट्रोमुळे काय काय होणार आहे, आरे वाचवा चळवळीतील पर्यावरणप्रेमी फक्त प्रसिद्धीसाठी सहभागी होत आहेत, वगैरे. त्यांचं फेसबूक पेज किंवा अकाउंट मला तरी मिळालं नाहीये. मग हे फेसबूकवर इतक्या वेगात व्हायरल कोण करतं? बरं हे तेव्हा व्हायरल होतं, जेव्हा आरेबद्दल कोणत्याही मेनस्ट्रीम मीडियामध्ये बातमी नव्हती, १-२ सोडलं तर कुठेच आरेबद्दल काही छापलं जात नव्हतं. या बाईंचे ट्विटरवर आत्ता कुठे १० हजार फॉलोअर्स झालेत. मग ही पोस्ट वायरल होते कशी? सर्व #SaveAarey च्या पोस्ट्सवर, कमेंटवर, विविध पेजेसवर पडते कशी? How? कैसन? बरं हा प्रश्न सध्या बाजुला ठेवा. आता ‘आरे ऐका ना’ काय म्हणतंय पाहूया.

1.  प्रोपगंडा – आरे वाचवा चळवळ ही फक्त पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ चालवत आहेत.
फॅक्ट – ही चळवळ आरेमधील रहिवाश्यांनी सुरु केली आहे, जिच्यात पर्यावरणप्रेमी आणि एनजीओ सहभागी होतायंत.

2.  प्रोपगंडा – आरे वाचवा चळवळीचा मेट्रो लाईनला विरोध आहे.
फॅक्ट – मेट्रोला विरोध नाहीये. मेट्रो कारशेड बनवण्यासाठी आरेमधील झाडं तोडण्याला विरोध आहे. कारशेड म्हणजे मेट्रो वाहनाचा डेपो म्हणू शकता.

3. प्रोपगंडा - पर्यावरणप्रेमींकडून आरे जंगल तोडण्याचे आरोप बीएमसीवर केले जात आहेत.
फॅक्ट – आरे जंगलातील २७०० झाडं तोडण्याच्या विरोधातच हा लढा आहे.

4. प्रोपगंडा - मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठी वृक्षारोपण मोहीम राबवणार, २३ हजारपेक्षा जास्त रोपटे लावणार.
फॅक्ट – ५० ते १०० वर्षे वय असलेल्या, माती आणि पाणी सहज रोखू शकणाऱ्या झाडांच्या बदल्यात बिया आणि रोपं लावणार. किती ती सद्बुद्धी.

बरं त्यांनी काय पसरवलं ते तुम्ही वर पाहिलं. आता काय सांगितलंच नाही तेही पाहू.

1. त्यांनी मेट्रोमुळे कार्बनची कशी बचत होईल याची माहिती दिलीय. जी योग्यच असेल, पण मुद्दा वेगळाच आहे. आरेमधली २७०० झाडं तोडल्यामुळे काय नुकसान होईल ते सांगितलंच नाहीये.

2. आरेमध्ये होणाऱ्या मेट्रो कार शेडमुळे आरेच्या परिसरावर काय परिणाम होईल याचं गणित त्यांनी मांडलं नाहीये.

3. बरं फक्त कार्बन आणि ऑक्सिजनचाही मुद्दा नाहीये. ‘मेट्रो कारशेडसाठी जो परिसर निवडला आहे, तिथलं पाणी थेट मिठी नदीत जाऊ शकतं, इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि चकालामध्ये पूरपरिस्थिती उद्भवू शकते’, ही वाक्य माझी नाहीयेत. राज्य सरकारच्या समितीनेच त्यांच्या अहवालात हे लिहलंय. आणि हे ‘आरे ऐका ना’मध्ये नाहीये.

आता विचार करा, ‘आरे ऐका ना’च्या कॅम्पेनमध्ये हे सगळं का नाहीये? कारण त्यांना काही ऐकवायचं नाही, लपवायचंय. हा प्रोपगंडा आहे.

हा झाला त्यांच्या तथाकथित फॅक्ट्सचा मुद्दा. पण तो कसा पेरला गेला हे अजून महत्त्वाचं आहे. मुंबई मेट्रो ३ नावाचं ऑफिशिअल ट्विटर अकाउंट आहे. मुळात मुंबई मेट्रोमधील सर्व प्रकल्पांमधील फक्त मुंबई मेट्रो ३ या एकाच प्रकल्पाचं ट्विटर अकाउंट आहे, इतर नाही. ही गोष्ट विचित्र आणि अर्थात संशय निर्माण करणारी आहे. अश्विनी भिडे यांच्या ऑफिशिअल अकाउंटवर #AareyAikaNa हॅशटॅगने ट्विट येतात. मुंबई मेट्रो ३ वरून ते रिट्विट केले जाता. अनेक इन्फ्लुअर्सच्या ट्विटर प्रोफाइल्स वरून राज्य सरकारला समर्थन देणारे ट्विट्स येतात. अनेक मराठी सेलिब्रिटीकडून ट्विट्स येतात. त्यात तुमचा सोज्वळ म्हणवणारा सुमित राघवन सुद्धा आहे (माहितीसाठी लिहलंय फक्त).

हा ट्विटर ट्रेण्ड नक्की कोण पसरवतंय हे जाणून घेण्यासाठी मी ट्रेण्डचे रिपोर्ट्स काढले. ते आपल्याला बऱ्याच एक्सटर्नल वेबसाईटवरून मिळतात.


वरील फोटोमध्ये अश्विनी भिडे, आशू, आशिष चांदोरकर, अनि, सुशिल कश्यप (तथाकथित इन्फ्लूअन्सर), भाजपा महाराष्ट्र, मुंबई मेट्रो ३ हे टॉप ट्विटर अकाउंट्स आहेत, ज्यांना #AareyAikaNa हे ट्विट केलं. त्यात अश्विनी भिडे, मुंबई मेट्रो ३ यांनी अधिक ट्विट्स केले, आणि बाकीच्यांनी १ किंवा अधिकाधिक ३ ट्विट्स. ते MP @mpopat आणि Bollywood Era @BollywoodArvind हे अकाउंट काही समजलं नाही. नक्की कोण आहे, का ट्विट करतंय. असो. तर भारतात एकूण ७४९ वैयक्तिक ट्विटर अकाउंट्स होते, ज्यांनी स्वतः या हॅशटॅगसोबत ट्विट केलं, रिट्विटचा आकडा वेगळा आहे.

बरं यातले जास्तीत जास्त ट्विट्स हे इंग्रजीत आहेत. मराठीत नाही. याचा अर्थ काय? आरे वाचवा या मोहीमेत पर्यावरणप्रेमी आणि एनजीओचा मोठा सहभाग आहे. आणि यांचे बऱ्यापैकी फॉलोअर्ससुद्धा आहेत. त्यांना वळवण्यासाठी म्हणा किंवा ट्रोल करण्यासाठी म्हणा हा प्रोपगंडा, इंग्रजीमध्ये.




या इंग्रजी ट्विट्सचा आकडा ८८% पर्यंत पोहोचतो. मराठी ट्विट्स ७.४% आहेत. मग हिंदी आणि गुजराती येतं. पण ते फिनीश आणि इस्टोनिअन भाषेचा आणि आरेमधील झाडं तोडण्याचा काय संबंध आहे कळालं नाही. तेही #AareyAikaNa या मराठी हॅशटॅगसोबत!

ही भाषेची शंका आली म्हणून या ट्रेण्डचा जागतिक रिपोर्ट काढला, आणि अहो आश्चर्यम्. भारतासह कित्येक देशांत #AareyAikaNa हा मराठी हॅशटॅग वापरला गेला होता.



अमेरिका, इटली, यु.ए.इ., कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी, सिंगापूर, हाँग-काँग अशा अनेक ठिकाणी हे हॅशटॅग वापरलं गेलं. कमी प्रमाणात का असेना. तरीही भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. १९०२ ट्विट्स तिथून आलेत.

यानंतर मी #SaveAarey सोबत ट्रेण्डची तुलना केली. एक आठवड्याचा रिपोर्ट मिळाला. खालील फोटो बघा. इथे जांभळा रंग #SaveAarey चा आहे, आणि गुलाबी रंग #AareyAikaNa चा आहे.



डाव्या बाजुला ट्विट्सचे मेन्शन, एन्गेजमेंट, सेन्टिमेंट आणि पोटेन्शिअल रीच रिपोर्ट आहे.
मेन्शन – ‘आरे ऐका ना’चे अधिक.
एन्गेजमेंट - ‘आरे ऐका ना’चे अधिक.
पोटेन्शिअल रीच - ‘आरे ऐका ना’चे अधिक.

पण इथे सेन्टिमेंट म्हणजे त्यांच्याप्रती भावना या महत्त्वाच्या आहेत. ‘आरे ऐका ना’ चे सेन्टिमेंट ७०.९% नकारात्मक आहेत. आणि तेच ‘सेव्ह आरे’चे सेन्टिमेंट ५७.९% सकारात्मक आहेत. हे सेन्टिमेंट प्रत्येक ट्विटच्या कीवर्डनुसार मोजले जातात. म्हणजे मी आरेबद्दल लिहित असेन, आणि मी #AareyAikaNa ला उद्देशून नकारात्मक म्हणत असेन, तर तो माझा निगेटिव्ह सेन्टिमेंट होतो. म्हणजे हा ट्रेण्ड सुरू झाल्यानंतर त्याचाही विरोध करणाऱ्यांनी ट्विट्स केले. म्हणून ते निगेटिव्ह सेन्टिमेंट झालं आहे.

४ सप्टेंबर ते १० सप्टेंबरचा हा रिपोर्ट आहे. उजव्या बाजुला जांभळ्या रंगातल्या ग्राफमध्ये (Save Aarey) थोडंफार सातत्य आहे, आणि ८ सप्टेंबर, जेव्हा मेगा प्रोटेस्ट होतं तेव्हाच थोडासा उंचावलाय. म्हणजे त्या दिवशीचे ट्विट्स वाढलेत. गुलाबी रंग म्हणजे #AareyAikaNa ४, ५ आणि ६ सप्टेंबरला शुन्य आहे. पण ७ सप्टेंबरला सर्वांत जास्त उंचावला आहे. त्या एका दिवशी १५०० पेक्षा जास्त ट्विट्स झाले. ८ सप्टेंबरला ८०० पेक्षा जास्त ट्विट्स आहेत. ९ आणि १० सप्टेंबरला ग्राफ कमी झाला आहे. पण हे लक्षात घ्यायला हवं की कमी असला तरी #SaveAarey पेक्षा जास्तच ट्विट्स आहेत. ३ दिवसांपूर्वी सुरू झालेलं हे हॅशटॅग एका दिवसात १५०० पेक्षा जास्त ट्विट्स करतं, आणि गेले कित्येक वर्ष आणि महिने सुरू असलेलं ‘सेव्ह आरे’ त्याच्यापुढे फिकं पडतं. कसं शक्य आहे?
  
ट्विटर कॅम्पेन हे कन्टेन्टपासून सुरू होतं. एक दोन हॅशटॅग आणि मेन्शन वापरून एक कंपनी ५० ते १०० ट्विट्स बनवते. बनवते म्हणजे ते ट्विट्स कन्टेनट रायटरकडून लिहीले जातात. त्यात मेन्शन होतं MMRDA, Mumbai Metro 3 आणि अश्विनी भिडे यांना. कन्टेन्ट हा पूर्ण प्रोपगंडा होता, ते आपण वर पाहिलंच. मग हा कन्टेन्ट वेगवेगळ्या एजन्सीला दिला जातो, जे त्यांच्या प्रभावी ट्विटर अकाउंट्सवर ठराविक वेळेला ट्विट, रिट्विट, रिप्लाय करतात. सोबतच सेलिब्रिटीजना या कॅम्पेनसाठी अप्रोच केलं जातं, कारण त्यांच्या ट्विट्सना रीच आणि प्रभाव जास्त असतो. अशा प्रकारे या ट्विटर प्रमोशनने हा हॅशटॅग चक्क एका दिवसात ट्रेण्ड होतो. मग गेले चार वर्षे आरे वाचवा मोहीम चालवलीय तिचं काय? #SaveAarey हे हॅशटॅग ट्रेण्ड व्हायला ४ वर्षेही कमी पडतात, पण एका दिवसात ‘आरे ऐका ना’ ट्रेण्ड होतो. कसं शक्य आहे? ट्विटर प्रमोशनवर एजन्सीमध्ये पैसा घातला ना, की होय, हे शक्य आहे. मग हे तर फक्त ट्विटर आणि फेसबूक झालं. वृत्तपत्रांमधल्या संपूर्ण पानाच्या जाहिराती, त्यांचं ग्राफिक डिजाइन, कन्टेन्ट, रिसर्च यावर किती पैसा लागत असेल?

बरं तो #SaveForts वाला गेल्या आठवड्यातला दिवस आठवतोय का? तो पूर्ण दिवस प्रोपगंडा बेस्ड होता. एक बातमी, तिच्यावर गदारोळ, किल्ल्यांच्या वर्गीकरणाचा एक व्हायरल फोटो, रावलांचा व्हिडीओ, अमोल कोल्हेचा व्हिडीओ, जाधवगड, जाधवगडाची मालकी, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट. इतिहास अस्तित्वात नाही वगैरे. फक्त ४ भिंती वगैरे. बघा प्रोपगंडा कळतो का.

Sunday, 1 September 2019

राजकारणाचा बाजार - मिनिटांत तयार केलं जाणारं नरेटिव्ह



मागील ब्लॉगमध्ये २०१९ चा कन्टेन्ट आणि २०१४ पासून बदलत आलेल्या कन्टेन्ट बद्दल लिहिलं होतं. म्हणजे २०१४ च्या विकासाच्या मुद्द्यापासून २०१९ च्या शहीद जवानांपर्यंतचा मत मागण्याचा प्रवास. एखादा कन्टेन्ट जेव्हा प्रत्येक घटनेत वापरला जातो, किंवा सगळ्या अर्थी फिरवला जातो तेव्हा ते नरेटिव्ह बनतं. उदाहरणार्थ, ‘मोदी लहानपणी चहा विकायचे’ या एका कन्टेन्टवरून किती काही बनवलं गेलं. मोदींच्या गरीब असण्यापासून ते मोठमोठे ‘चाय पे चर्चा’चे इव्हेन्ट, हे सारं काही नरेट केलं गेलं. चहावरून मोदींच्या आयुष्याची कथा सांगितली गेली, जी किती खरी अन् किती खोटी हा संशोधनाचा मुद्दा. हा नरेटिव्ह नियोजित होता, आणि दीर्घकालासाठी वापरला गेला, अजुनही वापरला जातो. पण आपत्तीकाळात टिकाव कसा धरला जातो याचे काही उदाहरण देते.

१.       ५ नोव्हेंबर २०१७ रोजी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर समाजाच्या मेळाव्यात उपस्थित होते. मंचावर भाषण करण्यासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न उपस्थित करून गाणी वाजवली गेली. त्यात आरक्षणाच्या आश्वासनाचं काय झालं? या प्रश्नासाठी ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं बेस्ट होतं. आता माइकसमोर असताना, हजारो लोक आपल्याकडेच पाहत असताना, मीडियाचे कॅमेरा रोखले गेले असताना मुख्यमंत्री काय बोलणार अशी उत्सुकता होती. गाणी ऐकून, सगळे आरोप ऐकून त्यांनी उत्तर दिलं. – ‘येळकोट येळकोट... जय मल्हार... येळकोट येळकोट... जय मल्हार.’ धनगर समाजाचा मंच, दैवत खंडोबा. देवासमोर आम्ही संसाराचे प्रश्न विसरतो.

व्हिडीओची लिंक - https://www.youtube.com/watch?v=Fttraodj7a8

२.       अगदी असाच प्रसंग परभणीतल्या महाजनादेश यात्रेत झाला. दोन शेतकरी कर्जमाफीवर प्रश्न घेऊन घोषणा देत होते. त्यांना आवरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बाहेर घेऊन जायला सांगितलं. पण लोकांच्या नजरा अजुनही त्या घोषणा देणाऱ्यांवरच होत्या. वळवायचं कसं? मग भाषण सुरु ठेवण्यासाठी ‘भारत माता की....’ लोकांकडून साहजिकच उत्तर येणार होतं ‘...जय’. ‘वंदे... मातरम्’. मराठवाडा, शेतीप्रश्न. कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायची निन्जा टेक्निक. देशप्रेम घुसवणे.

व्हिडीओची लिंक - https://www.youtube.com/watch?v=CIYW-ZGJPRQ&feature=youtu.be

३.       आता एक वेगळा प्रसंग भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, चंद्रकांत पाटील यांचा. महाराष्ट्रात प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली. ७ ऑगस्टपासून सामान्य जनतेसह माध्यमांमधूनही शासनावर दबाव आणला जात होता. दिवसभर फक्त पूराच्या बातम्या झळकत होत्या. त्यात चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री. मुद्दा हाताबाहेर जाऊ लागला होता. माध्यमांना सामोरं जाणं भाग होतं. मग ९ ऑगस्टला संध्याकाळी चंद्रकांत पाटलांनी बऱ्याच वृत्त वाहिन्यांना लहानश्या मुलाखती दिल्या. आपण किती मदत केली याची आकडेवारी सांगत होते. त्यातल्या त्यात TV9 मराठीच्या मुलाखतीचा एक हिस्सा वायरल होऊ लागला. ‘अँकरला मंत्रीपदाची ऑफर दिली’ वगैरे. काहीतरी इंटरेस्टिंग म्हणून पूर्ण मुलाखत पाहिली. योग्य प्रश्न, आकडेवारीतले उत्तरं, पण पाटलांचे मुद्दे दोनच – ‘आम्हाला अंदाज नव्हता की इतका पाऊस येईल’ आणि ‘लोक घरातून बाहेर पडत नव्हते’. बरं पहिला मुद्दा अँकरने पोखरून काढला, की ‘प्रशासन असतं, इतकं पाणी साठलं तरी २-२ दिवस का लागतात मदत पोहचायला?’ हा झाला आपत्ती नियोजनाचा भाग. पाटलांच्या दुसऱ्या मुद्द्याला कोणीच हात लावला नाही. ‘लोक घरातून बाहेर पडत नव्हते, त्याला आम्ही काय करणार? लोकांना जबरदस्तीने कसं सांगणार की बाहेर या?’ यावर प्रतिप्रश्न न करण्यामागचं ते कानात असलेलं दडपण सध्या समजू शकते. पण लोकांकडून तरी प्रतिप्रश्न असे असायला होते, की ‘लोक का बाहेर पडत नव्हते? असे लोक बाहेर येत नव्हते का, ज्यांच्याकडे दुभती जनावरं आहेत? जर होती, तर त्या जनावरांना बाहेर काढत होतात का? नाही तर का नाही?’

मुलाखतीची लिंक - https://www.youtube.com/watch?v=bGsQzrlf9Mo

मुद्दा असा, की या वक्तव्यामुळे हाच समज झाला, की लोक बाहेर येत नाहीयेत. बरं या सगळ्या मुलाखतींनंतर रात्रीपर्यंत एक व्हिडीओ वायरल झालेला. ज्यात एक कुटुंब विनंती करूनही घरातून बाहेर येत नाहीये. त्यावर लोक बरेच चिडले. पूरग्रस्त भागातील लोकांबद्दल निराशा निर्माण झाली. पण ‘तो व्हिडीओ कोणत्या दिवसाचा होता?, व्हिडाओ काढणारा कोण होता?, त्यांना बाहेर पडण्यासाठी विचारणारे कोण होते?, त्या भागातलं पाणी ओसरू लागलेलं का?’, हे सगळे प्रश्न त्या गोंधळात फार कोणाला सुचले नसावेत. म्हणूनच चंद्रकांत पाटलांचं नरेटिव्ह यशस्वी झालं असं म्हणता येईल.

वायरल व्हिडीओची लिंक - https://m.facebook.com/story.php?story_fbid=2405123826242223&id=631788120242478

या नरेटिव्ह मधून नक्की काय शिकायला हवं? हे नरेटिव्ह जसे प्रत्यक्ष नेत्यांकडून केले जातात ना तसेच ते पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जसा या पूरातील व्हिडीओमुळे तिथल्या लोकांबद्दलच अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न झाला ना, अगदी तसाच वापर म्हणतेय मी. विचार करा. देशावर आर्थिक संकट निर्माण झालंय. हजारे लहानमोठे उद्योग कंपन्या बंद होतायंत. लाखो नोकऱ्या जातायंत. अन्नधान्याचे भाव वधारलेत. आरे जंगलातील जवळपास २७०० झाडे कापण्याचा निर्णय झालाय. त्याविरुद्ध लोकांचा लढा सुरु आहे. ट्राफिक नियम, दंड बदललेत. पण आजपासून ५ सप्टेंबर पर्यंत आपण न्युज चॅनलवर काय पाहणार आहोत? दिग्गज नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातायंत वगैरे. का पाहणार? कारण इतर काही दाखवू शकत नाही, तशी वरून ऑर्डर आहे. वरून कोणाकडून? चॅनलच्या मालकाकडून. असो.

तर कोणत्याही माध्यमांवर अवलंबून राहू नका. कोणत्या नरेटिव्हचा फायदा कोणाला होत असतो इतकाच विचार करा. पण विचार करा.

Friday, 23 August 2019

राजकारणाचा बाजार - भाजपचा कन्टेन्ट २०१९


२०१९ च्या कन्टेन्टबद्दल काही लिहीण्याआधी २०१८ च्या विधानसभा निवडणूकांविषयी सांगावंसं वाटतं. २०१८ मध्ये फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण ९ राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या. नव्या सरकारचा बराच काळ आता लोकांनी पाहिला होता. त्यामुळे या निवडणूका महत्त्वाच्या होत्या. ९ पैकी फक्त २ राज्यांमध्ये भाजपाला सत्ता बनवता आली. त्रिपुरा आणि नागालँड. नागालँडमध्येही National Democratic Progressive Party च्या जागा जास्त होत्या. युतीमुळे भाजपा सत्तेत आली असं म्हणता येईल, कारण मुख्यमंत्री मित्रपक्षाचाच आहे. इतर ७ राज्य होते, मेघालय, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या निवडणूकांनंतर काही लोकांकडून म्हटलं गेलं, “अजून बोला विकास-विकास. हिंदुराष्ट्राची तर तुम्हालाही पडली नाही. काँग्रेसीसारखेच निघाले तुम्हीही.” हे कोण लोक होते, ज्यांना भाजपने हिंदुराष्ट्र बनवावा अशी ईच्छा होती? किंवा तशी भाजपकडून अपेक्षा होती? आणि ही अपेक्षा आली कुठून? जर २०१४ लोकसभा आणि विधानसभा, २०१५ विधानसभा, सगळ्या निवडणूकांमध्ये भाजपची अधिकृत भूमिका ही काँग्रेसमुक्त भारत आणि विकसित भारत ही होती, तर मग २०१८ मध्ये लोकांकडूनच हिंदूराष्ट्र वगैरेची अपेक्षा ठेवणं, नक्की काय भानगड आहे?

याची सुरुवात होते २०१४ च्या प्रचारामध्ये पाकीस्तानला सडेतोड उत्तर देऊ, दहशतवादाला आळा घालू वगैरे विधानांपासून. आपल्याकडे देशप्रेम दाखवण्याचा हा एकमेव मार्ग आहे, शहीद सैनिकांचा बदला घेण्यासाठी पाकीस्तानला शिव्या घालणे, आणि शांततेच्या गोष्टी करणाऱ्यांना पाकीस्तानात जायला सांगणे. तर यात सैनिक आले, पाकिस्तान आला, दहशतवादी आले, आणि दहशतवादाला जोडून आणलेला त्यांचा धर्म आला.

एप्रिल २०१४ ते २०१७ यादरम्यान एकूण १६ दहशतवादी हल्ले झाले. ज्यातील गुरदासपूर, पठाणकोट आणि उरी येथील हल्ले मोठे आहेत. आणि यातून शहीद सैनिकांच्या बदल्याची भावना निर्माण झाली. सर्जिकल स्ट्राइकसारखे लष्करी शब्द मोठे करण्यात आले. त्यात आपली भूमिका मोठी करून पंतप्रधानांना महत्त्व दिलं गेलं. आम्ही आता ऐकणार नाही, शांत बसणार नाही वगैरे बोलून संपूर्ण लक्ष सीमेवर, तिथल्या जवानांवर केंद्रीत करण्यात आलं. पण याआधी आपल्यात पाकिस्तान-द्वेष, दहशतवादाचा द्वेष नव्हता का? होताच. मग ही गोष्ट आत्ताच का आणि कशी इतकी संवेदनशील होत आहे? इथे भूमिका येते कन्टेन्टची. आपल्या सर्वांच्याच मनात देशप्रेम असतं. सर्वांनाच वाटतं, की देशासाठी एकदा काहीतरी करायला हवं. लहानपणापासूनची एक सुप्त इच्छा असते, की आपण सैनिक व्हावं, देशासाठी लढावं. तशी आपली घडणच झालीये, ज्यात काहीच वाईट नाही. २०१४ नंतर लोकांची हीच नाडी घेऊन भाजपच्या प्रचारातील भाषणांपासून ते आयटी सेलच्या कमेन्ट्स पर्यंत आणि विविध योजनांपासून ते अगदी नेत्यांच्या जीवनचरित्रांपर्यंत ‘राष्ट्रप्रेमा’ची व्याख्या नव्याने निर्माण करण्यात आली. कशी? तर इथेही समोरच्याचा द्वेष करून. जे खरं तर खूप सोपं झालं आहे. लोकांच्या पोस्टवर कमेंट करून देशप्रेमाचे धडे शिकवणं काही कठीण काम नाही. राष्ट्रप्रेम रुजवताना पहिले देशद्रोह ही संकल्पना रुजवली गेली.

  •  सरकारला त्यांच्या दहशतवादाविषयी प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • भारत असहिष्णु होत चालला आहे म्हणणारे – देशद्रोही
  •  JNU मधली मुलं – देशद्रोही
  • भारत सरकारने दिलेले पुरस्कार परत करणारे – देशद्रोही
  • नोटबंदीला विरोध करणारे – देशद्रोही
  • जीएसटीला विरोध करणारे – देशद्रोही
  • तीन तलाकविरोधी बिलला विरोध करणारे - देशद्रोही
  • पाकिस्तानी कलेचं आणि कलाकारांचं कौतूक करणारे – देशद्रोही
  • पंतप्रधानांना त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • कॅबिनेटमधील, पक्षामधील नेत्यांवर प्रश्न विचारणारे – देशद्रोही
  • वाढत्या गुन्हेगारीवर, मॉब लिंचिंगवर बोलणारे – देशद्रोही
  • काश्मीरच्या सामान्य जनतेवर पॅलेट गनचा मारा करण्याविरुद्ध बोलणारे – देशद्रोही


‘अमुक तमुक देशप्रेम नाही’ हे वाक्य सोडता, कधी कोणी विचार केला का, की नक्की देशप्रेम म्हणजे काय आहे? आता करणार असाल तर, खरं तर तो विचार करायची गरजच नाही. प्रेमाला कधीच व्याख्या नसते. पण आता बनलेल्या व्याख्येचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. कारण कुणाचा तरी द्वेष करून प्रेम केलं जात नाही. आणि हा द्वेष इतका पसरलाय की आता आपण मस्करीमध्येही एकमेकांना देशद्रोही आणि भक्त वगैरे बोलू लागलोयत.

बरं हे झालं राष्ट्रप्रेम, देशद्रोह वगैरे. तरीही प्रश्न येतोच, की हिंदुराष्ट्र ही संकल्पना कुठून आली? ती आजपर्यंत फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेबसाईटवर दिसते. पण याशिवाय भाजप नेत्यांच्या तोंडून ही संकल्पना येते. आणि या काळात ती जास्त गडद झाली, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत. योगी आदित्यनाथ, ज्यांच्यावर कित्येक hate speech च्या केसेस होत्या, ज्या हल्लीच त्यांनी स्वतःच clean केल्यात, असे योगी आदित्यनाथ भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आले, आणि मुख्यमंत्री झालेही. या निवडणूकीत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा राम मंदिर, बाबरी मसजीद, हिंदु राष्ट्र या गोष्टी आल्या. त्याचाच ट्रेण्ड म्हणजे ‘मंदिर वहीं बनाएंगे’. हा ट्रेण्ड अर्थात फक्त उत्तर प्रदेशात कसा राहील, तो संपूर्ण भारतात पसरणार होताच, पसरला. याचाच परिणाम म्हणजे, विकासाचे मुद्दे सोडून फक्त धर्माच्या, द्वेषाच्या आधारावर निवडणूक आणि राजकारण सुरु झालं. परिणामी समाजकारणही याच गोष्टीभोवती फिरू लागलं. राष्ट्रप्रेम तर भिनवलं होतंच, त्याला धर्माची जोड मिळाली. ती इतकी की अल्पसंख्यांकांना देशात घाबरून राहावं लागत आहे. मॉब लिंचिंगच्या कित्येक बातम्या आपण पाहतो, कित्येक आपल्यापर्यंत पोहचवल्या जात नाहीत. मॉब लिंचिंगच्या केसमधील कोणी दोषीही ठरत नाही. अर्थात हा कन्टेन्ट तुम्हाला कधीच मोदींकडून मिळणार नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, आणि पंतप्रधान कोणत्या एका धर्मासाठी नसतो. भाजप आपला कन्टेन्ट सोयीस्कररित्या, आयटी सेलमधून, स्थानिक नेत्यांकडून वगैरे पोहोचवतं, आणि तो आपण आत्मासातही करतो.

आता थोडं थांबून विचार करायची गरज आहे. २०१४ ला आपण विकासाच्या मुद्द्यांवर मोदींना मत दिलं, मग २०१९ ला पूर्ण झालेल्या कामांवर मत का दिलं नाही? शहीद जवानांच्या नावावर मत का दिलं?

Monday, 19 August 2019

राजकारणाचा बाजार - भाजपचा कन्टेन्ट २०१४




२०१४ च्या निवडणूकीत भाजपचा main content खूप सामान्य होता.  १५ वर्षे तेच सरकार आणि तेच लोक पाहून जनतेत असं वातावरण निर्माण झालं की काहीतरी फॅन्टॅसी हवी, मोठं हवं. २००९ मध्ये राम मंदिराचा मुद्दा पुन्हा घेतल्याने तो तसाही फेल झालेला, आणि त्यात ग्राउंडवर भक्कम संघटनही नव्हतं, ते तर २०१४ मध्येही नव्हतं. पण २०१४ मध्ये भाजपकडून मार्केटिंगसाठी प्रचंड गुंतवणूक करण्यात आली, हे कोणीच नाकारू शकत नाही. तसे आपल्याकडे आकडे सुद्ध आहेत. तर मार्केटिंग कोणत्या कन्टेन्टने झाली? सर्वांत पहिले काँग्रेसविषयी द्वेष निर्माण करण्यात आला. अर्थात बऱ्याच अनधिकृत पेजेसवरून काँग्रेसविरुद्ध बऱ्याच पोस्ट, व्हिडीओ, मीम्स शेअर होत होते. ते तसेही अनपेड पेजेस वरूनही होत होतेच. कारण खरंच लोक कंटाळले होते. सो पहिले विरोधकांविषयी द्वेष निर्माण झाला, काहीच प्रगती झाली नाही वगैरे पेरलं गेलं. पण मग काँग्रेस नाही, तर आम्हाला वाली कोण? हा प्रश्न यायच्या आतच नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करण्यात आला. गुजरात मॉडेल म्हणवून कित्येक फोटो आणि व्हिडीओ वायरल झाले. लोक गुजरातची तुलना इतर विकसित देशांसोबत करू लागले, ते करण्यासाठी पुरेपुर खाद्य पुरवलं गेलं. पण तेव्हा गुजरातची तुलना महाराष्ट्रासोबत, किंवा भारतातील इतर राज्यांसोबत सकारात्मकतेने झालीच नाही. बरं त्याच काळात अमिताभ बच्चनची गुजरात टुरीजमची जाहिरात सुद्धा बरीच गाजत होती. त्यामुळे गुजरातबद्दल प्रचंड कौतुक सुरु होतं. मग ओघाने नरेंद्र मोदी हा दुसरा कन्टेन्ट बनले. तऱ्हेतऱ्हेचे लेख, फोटो, व्हिडीओ आले. सलमान खानसोबत मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवतानाचा व्हिडीओ तर बेस्ट होता. हा झाला सोशल मीडियाचा वायरल कन्टेन्ट.

भाजपकडून बरेच स्लोगन आले – ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘सबका साथ सबका विकास, चलो चले मोदी के साथ’, ‘अच्छे दिन आने वाले है’. यातील ‘अब की बार..’ हा स्लोगन ‘अब की बारी अटल बिहारी’ वरून ‘प्रेरित’ होता.

नरेंद्र मोदी जेव्हा प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा जो कन्टेन्ट आला तो अजून इंटरेस्टिंग आहे. तेव्हा ते प्रत्येक ठिकाणची टोपी, तिथल्या भाषेतील पहिलं एक वाक्य, तिथल्या देवी-देवता किंवा इतर आदर्श नेत्यांविषयी बोलून माहोल बनवायचे. मग काँग्रेसविरुद्ध वातावरण बनवलं जायचं, की गेल्या ६० वर्षांमध्ये काहीच झालं नाही वगैरे. आणि मग विकासाचा मुद्दा यायचा, वेगवेगळी आश्वासनं वगैरे. याने सकारात्मकता दिली जायची. त्या सकारात्मकतेचा कन्टेन्ट म्हणजे ‘अच्छे दिन आनेवाले है’. जोडीला आकर्षक भाषणशैली होतीच. सामान्य माणूस मोदींच्या त्या भन्नाट वक्तृत्वाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहिला नाही. बरं अनेक भाषणात काही वेगळं द्यायचा प्रयत्न होता. म्हणजे लोकांना नक्की काय आवडतंय, हे तपासणं सुद्धा चालू होतं. जसं की एका भाषणात ‘Yes, we can’ हा स्लोगन म्हटला गेला. जे खरं तर बराक ओबामांचं कॅम्पेन होतं. यातून कन्टेन्टचा प्रयोग होत होता असं म्हणणंही चुकीचं होणार नाही.

स्थानिक स्तरावर काहीच संघटन नसताना, प्रत्येक लोकसभेत मजबूत उमेदवार नसताना फक्त भाषण आणि सोशल मीडियाच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. त्यामुळे संघटनासाठी अजून एक कन्टेन्ट आणला. तो म्हणजे ‘चाय पे चर्चा’ आणि ‘Nation with NaMo’. हे ग्राउंड प्रोजेक्ट्स होते. ज्यात चर्चा तर व्हायचीच, सोबत टेम्पररी कार्यकर्ते सुद्धा मिळायचे. या तरुण कार्यकर्त्यांना सोशल मीडिया आणि ग्राउंडवर प्रचारासाठी, डेटा कलेक्शन, सर्वेक्षण आणि मतदानाच्या दिवशी बूथवर लोकांना घेऊन जाणे, बूथवर किती टक्के मतदान झालंय यावर लक्ष ठेवणे अशा मायक्रो लेव्हलचे काम सुद्धा करून घेता येत होतं. बूथ लेव्हल मॅनेजमेंट याआधी गुजरातमध्ये खूप यशस्वीरित्या झालं होतं. या दोन्ही उपक्रमांचा कन्टेन्ट पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि विकास हाच होता. याने तरुण जास्त प्रभावित झाले, आणि खरंच काहीतरी प्रोडक्टिव्ह करत असल्याचं त्यांना वाटलं.
आता या सगळ्यात आपली mainstream मीडिया कुठे होती? मीडिया तेव्हाही सोशल मीडिया अॅडीक्ट होती. त्यामुळे सगळे मोदीच्या मार्केटिंगमध्ये बिझी होते. मीडियालाही काँग्रेसविरुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट मिळालेली. बरीच माध्यमं गुजरात मॉडेलसोबतच गोधरा फाइल्ससुद्धा दाखवत होते, हे महत्त्वाचं. आता किती चॅनल्स गोधराबद्दल बोलतील ही शंकाच आहे. असो. तर कदाचित लोकसभेचा शेवटचा टप्पा ज्या दिवशी संपला, त्यादिवशी संध्याकाळी आयबीएन लोकमतवर अलका धुपकरने गुजरातमधील काही गावांमध्ये जाऊन लोकांचे बाईट्स घेतले होते, ते आठवतायंत. गोधराबद्दल ते लोक प्रचंड हळहळून बोलत होते. पण अर्थात मतदान झालं होतं, वेळ गेली होती.

२०१४ च्या लोकसभेत एनडीएला बहुमत मिळालं. त्या बहुमताचाच पुढे कन्टेन्ट बनला. तेव्हा एक कॉमन टॅगलाइन होती – ‘सबका साथ सबका विकास, चलो चले मोदी के साथ’. या टॅगलाइनला घेऊन राज्याराज्यांत वेगवेगळ्या टॅगलाइन बनल्या. महाराष्ट्राच्या लोकांसाठी विशेष टॅगलाइन होती – ‘शिवछत्रपती का आशिर्वाद, चलो चले मोदी के साथ’. कारण सांगायची गरज नाही. महाराजांचं नाव घेतलं की आम्हाला कोणीही महान वाटतो. जम्मू-काश्मीरात मुद्दाम नेहमीच्या स्थितीवर भाष्य करणारी टॅगलाइन – ‘जम्मू-काश्मीर के बदले हालात, चलो चलें मोदी के साथ’. झारखंड – ‘कमज़ोर सरकार बिगड़ते हालात, चलो चलें मोदी के साथ’. अजून एक टॅगलाइन होती, जी मला प्रचंड आवडली – ‘क्यों बैठे युवा बेकार? चलो चलें मोदी के साथ’. ही २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरसाठी वापरलेली दिसली. पण खरं तर आता वेळ अशी आहे की ही टॅगलाइन भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात वापरू शकतो. असो.

तर अशा प्रकारे लोकसभा असो, किंवा विधानसभा, कन्टेन्ट मोदीच होते. म्हणजे भाजपाकडून खासदार किंवा आमदार पदासाठी निवडणूक नव्हती. पंतप्रधानपदासाठीच निवडणूक असल्याचं चांगलंच भासवलं. लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं, की आपला खासदार हा आपल्यासाठी लोकसभेत बिल घेऊन जातो, तो आपल्याला देशासमोर रिप्रेजेंट करतो. पंतप्रधान हे आपण निवडून दिलेल्या खासदारांकडून निवडून दिले जातात. त्यामुळे हा भ्रम सोडून द्या, की आपण पंतप्रधान निवडतो. अगदी तसंच विधानसभेच्या निवडणूकीत लागू होतं. आपण आमदार निवडून देतो, मुख्यमंत्री नाही. बेसिक निवडणूकीचं ज्ञान आपल्याकडून हिरावून भलतंच डोक्यात शिरवण्याचा हा कन्टेन्ट आहे, पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावरून मत मागणे.

तर हा झाला २०१४ चा कन्टेन्ट.
१. विरोधकांविषयी द्वेष पेरणे.
२. चेहरा निर्माण करणे.
३. विकासाचे आश्वासन.

यानंतर भाजपचा कन्टेन्ट कसा बदलत गेला, आणि अजूनही कसा बदलत आहे, त्याबद्दल पुढचा लेख नक्की लिहीन.

Friday, 2 August 2019

राजकारणाचा बाजार - ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि कन्टेन्टचा संबंध


कोणतंही मार्केट analyse करण्यासाठी पहिल्यांदा त्याचे की पॉईंट्स काढले जातात, की ते मार्केट कोणत्या बेसवर कार्यरत आहे, ग्राहक कोण, ग्राहकांना कोणतं प्रोडक्ट आवडतंय, याआधी तो ग्राहक कोणतं प्रोडक्ट वापरायचा. अशा अनेक बेस पॉईंट्सवर ग्राहकांचे वर्गीकरणही होते. अगदी हीच गोष्ट आता राजकारणाच्या मार्केटिंगमध्ये होतेय. इतकंच की हे राजकारण असल्याने प्रचंड मायक्रो लेव्हल मार्केट analysis होतं.

पॉलिटिकल मार्केटिंग मध्येही इतर प्रोडक्ट्स प्रमाणे ग्राऊंड analysis होतो, ग्राऊंड नॉलेज मिळवलं जातं. ते कसं, तर अनेक ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि बऱ्याच सब्जेक्टिव्ह सर्वेक्षणांतून ग्राऊंड नॉलेज मिळवता येतं. इतंकच की फार कोणी सब्जेक्टिव्ह सर्वे करत नाही. कारण लवकरात लवकर analysis आणि रिपोर्ट हवा असतो. त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह डेटा आणि ऑब्जेक्टिव्ह सर्वे यातून तथाकथित ग्राऊंड नॉलेज मिळवलं जातं.

आता ऑब्जेक्टिव्ह डेटा म्हणजे काय. हा डेटा स्थानिक प्रशासन, निवडणूक आयोग अशा ठिकाणांहून सहज मिळतो. फक्त बॅकींग हवी. या डेटामध्ये विभागनिहाय, अगदी बूथनिहाय तुमचे निवासी पत्ते, फोन नंबर, वय, नाव, नाव आणि क्षेत्रावरून जात, धर्म. सर्वेमधून तुमचा व्यवसाय आणि राजकीय कल जाणून घेतला जातो, जो खरं तर प्रचंड ढोबळ असतो. त्यात नेहमीच accuracy असेल असं नाही. दुसरा महत्त्वाचा डेटा म्हणजे याआधी तुमच्या मतदारसंघात कोणाकोणाची सत्ता होती, आता कोणाची आहे, विरोधकांचे वोटशेअर याचं गणित लावून डेटा बनवला जातो.

सर्वेमधून तुमचा सध्याचा कल समजला. तुमचा मतदारसंघ, बूथ, फोन नंबर, जात असा डेटा असेल तर त्याला तुमच्या आताच्या राजकीय विचाराची जोड मिळाली. पण हा तर आर्टिफिअल इंटलिजन्सने काढलेला डेटा आहे. या डेटाचं काय करायचं? तर माझा आताचा कल विरोधी पक्ष किंवा विरोधी उमेदवाराकडे असेल, तर तो वळवायचा. कसा? उत्तर आहे कन्टेन्ट. आर्टिफिशिअल इंटलिजन्सने काढलेला डेटा जेव्हा कन्टेन्ट रूपाने तुम्हाला भिडतो तेव्हा तो आर्टिफिशिअल राहत नाही, तर एक प्रोपागंडा बनून तुम्हाला तुमचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत असतो.

तुमच्या फोनवर राजकीय संदर्भांचे एसएमएस येतात, फोन येतात. तुमचा फोन नंबर फेसबूक आणि इतर अॅप्सना लिंक्ड असेल तर अनेक अॅड तुम्हाला फीड केल्या जातात. विरोधी उमेदवार सत्तेत असेल तर शासनाविषयी द्वेष पसरवला जातो, आणि उमेदवारच स्वतः सत्तेत असेल तर योजना आणि त्यांच्या न्युमरीक्सचा भडीमार केला जातो. द्वेष असो वा विकासकार्य, तुम्हाला तुमच्या व्यवसाय, जात, धर्म, लिंग, विभाग यांनुसार कन्टेन्ट पुरवला जातो. जसं की तुम्ही नोकरदार असाल तर गृहकर्ज, वेहिकल लोन, इन्कम टॅक्स यांविषयी कन्टेन्ट असू शकतो. फरक इतकाच राहील की सत्ताधारी स्वतःचं कौतुक सांगेल, आणि विरोधक तुमची लुटमार कशी होतेय, हे पटवून देण्याचा प्रयत्न करील.

सध्याचे सत्ताधारी हा सगळा डेटा मिळवत आहेत खरे, पण त्याचा वापर नक्की कशासाठी करत आहेत यात शंका आहे. कारण त्यांचा कन्टेन्ट मात्र वेगळा आहे हे प्रकर्षाने दिसून येतं. त्यांच्या कन्टेन्ट आणि त्याच्या वेगळेपणाविषयी पुढचा लेख नक्की लिहीन. आता इतकंच लक्षात ठेवा, कोणत्याही जाहीरातबाजीला बळी पडू नका, कोणत्याही नंबर्सला बळी पडू नका. गुगल आहे, योग्य माहितीनिशी थोडासा रिसर्च करा. थोडंसं कष्ट लागेल, पण तुम्हालाच फायदा होईल.

Wednesday, 26 June 2019

Rebel With No Cause


कबीर सिंग चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. ट्रेलर पाहिला. नेहमीच्या टिपिकल बॉलीवुड मुव्हीसारखा वाटला, फक्त टेक्निकली चांगला. स्टोरी आणि त्याच्या प्रेसेंटेशनवर प्रश्न होतायंत सगळीकडून, म्हणून म्हटलं याचा ओरिजिनल सिनेमा पाहू. तसंही दोन्हींचा दिग्दर्शक एकच आहे. सो, अर्जुन रेड्डी पाहिला.

अर्जुन रेड्डीबद्दल बोलण्याआधी सिनेमा या माध्यमाबद्दल बोलेन. एक तर सिनेमा हे माध्यम वास्तवाशी निगडीत असतं हे मान्य करावंच लागेल. परिणामी वास्तवाचा माध्यमांवर, आणि माध्यमांचा लोकांवर प्रभाव पडतो. कोणतंही माध्यम जे तुम्हाला एखादी कथा सांगण्याचं प्रयत्न करतं ते काल्पनिक असूच शकत नाही. तुम्ही कथा बनवता ते वास्तव पाहून, मग त्याला मोल्ड करणं वगैरे नंतरची बाजू. पुस्तक असू द्या, चित्रपट असू द्या, कार्टून्स किंवा अगदी जाहिराती. तुम्ही एक तर सत्य सांगता, किंवा आपलं खोटं कन्विन्स करण्याचा प्रयत्न करता. आणि हे कन्विन्स करणंच आता बहुतेक सिनेमांत दिसतंय. अर्जुन रेड्डीचा दिग्दर्शक स्वतः म्हणतो, की ही माझी कथा आहे! मग अर्थात ही कथा, हा चित्रपट त्याची बाजू कन्विन्स करण्यासाठी बनवला आहे, असंच समजावं लागेल. असो. मी चित्रपट पाहिला, ते इतका गोंधळ का सुरु आहे हे पाहण्यासाठी.

चित्रपटाची सुरुवातच अर्जुनच्या प्रचंड रागात होते. रागामुळे माफी न मागता अगदी कॉलेजसुद्धा सोडण्याचा हट्ट त्याच्या वृत्तीची पहिली खूण. पुढे घडतं ते म्हणजे मुलगी दिसली, तिला आपली मानली. पूर्ण कॉलेजला सांगितलं, तिच्याकडे ढुंकून बघायचं नाही. यात तिचा कन्सेन्ट कुठेय? त्याची तिच्याविषयी प्रचंड काळजी वगैरे दाखवलीय. अगदी लहान लहान गोष्टी. ही अशी काळजी आपल्याकडे आता १४-१५ वर्षांचे शेमडे पोरं करतात. यात वाईट काहीच नाही. पण एमबीबीएस करणाऱ्या एलिट क्लासच्या २२-२३ वर्षांच्या मुलांचा हा बालिशपणा वाटतो. बरं दिग्दर्शक हे सगळं त्याचं प्रेम आहे हे दाखवायला म्हणून करतोय. आणि कहर तेव्हा होतो जेव्हा तो होळीच्या दिवशी रंग लावून तिला हरॅस करणाऱ्याला मारल्यावर हा रडतो. म्हणजे काय चाललंय? नक्की कोणत्या प्रकारचं प्रेम दाखवताय? एकमेकांसाठी रडलं म्हणजे प्रेम होतं? एकाही दिवसाचा दुरावा सहन न होणं म्हणजे प्रेम असतं? आपण किती वेळा सेक्स केलाय हे मोजून ठेवणं प्रेम असतं? एकमेकांत इतकं बुडतो की अपघात झाल्यावर काही लागलंय खुपलंय की नाही हे न पाहता तितक्याच अग्रेशनने किस करत पुन्हा एकमेकांत बुडतो? हसू येतं अशा बालिश सिन्सवर. प्रेमाची व्याख्या बनवण्यात आजवर चित्रपटांनी नेहमीच मदत केलीय. म्हणूनच आपल्याकडे प्रेमाचा प्रचंड गोंधळ आहे. मुलीला तिच्या कन्सेन्ट शिवाय गालावर किस केल्यावर तिने कानफडात न मारता खाली मान घालून उभं राहणं सुद्धा अर्जुन रेड्डीच्या दिग्दर्शकाला प्रेमच वाटतं.

बरं हे सगळं झालं त्याचं प्रेम आहे आणि ते किती आहे वगैरे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न. तिचंसुद्धा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो तिच्या वडिलांना भेटायला जातो, तिला लग्नासाठी मागणी घालायला जातो. म्हटलं ग्रेट, आता काहीतरी बरं बघायला मिळेल. तिचे वडील त्याच्याच अग्रेशनने नकार देतात. हा काही वेळ समजवायचा प्रयत्न करतो. घराबाहेर काढलं जातं, आणि त्याचा रागही बाहेर येतो. यात त्याच्या बोलण्यातून जात, क्लासचा उल्लेख होतो. पण राग संपत नाही. ती समजवायचा प्रयत्न करते, तो ऐकत नाही. आणि स्वतःच्याच बापाला समजवायला तो तिला ६ तासांची मुदत देतो. तिच्याकडून तेव्हा ना होकार येत, ना नकार. तो तटस्थपणाही त्याला आवडत नाही. हा सिन लोकांना विद्रोही वगैरे वाटतोय. खरंच? कोणत्या हक्काने तो तिला ६ तास देत होता? कोणत्या हक्काने त्याने तिला कानफडवलं? मुळात त्याला तिच्या बापाचा नकार आवडला नाही. आणि नकार पचवताच न येणाऱ्यांना विद्रोही नाही, माजलेले भांडवलशाही म्हणतात. अर्जुन रेड्डी त्याच भांडवलशाही व्यवस्थेचा पुरस्कर्ता आहे ज्याला समाजाशी काही घेणं देणं नाही. सारं काही मिळालं आहे, मग ते आयतं असो वा मेहनतीने. पण त्यात कधीच नकार मिळाला नाही. त्याने तिला बघताच तिला गृहीत धरलं हे नक्की, तेच तिला आवडलं होतं, आणि तेच त्या दोघांना एकमेकांपासून दूर घेऊन गेलं. ग्रेट.



सहा तासांमध्ये तिचा कॉल आला नाही म्हणून पुन्हा एकदा गृहीत धरून स्वतःचं जे करायचं ते करतो. छान! म्हणजे समोरच्याची परिस्थिती न बघता स्वतःला सिम्पथी द्या. का? कारण मी वेड्यासारखं प्रेम करतो. इतकं वेड्यासारखं की तिचं काय होतंय ते बघण्याची एकदाही जाणीव होऊ नये, आणि स्वतःला गोंजारावं. तिचं लग्न झाल्यावर तो स्वतःचं जे काही करतो ते किती विकृत आहे हे सांगण्याची गरज नाही. ते मुळात विकृत आहे, वाईट आहे, त्याचे परिणाम वाईट आहेत, हे सांगण्याची जास्त गरज आहे. जी पूर्ण सिनेमामध्ये एकाही ठिकाणी दिसत नाही. मुलींना सेक्ससाठी विचारतो. एखादी मुलगी आपल्याकडे बघतेय, म्हणजे ती आपल्यासोबत सेक्स करेलच, हा विचार करणंसुद्धा विकृतीच आहे. जी हातात असते तिला सेक्ससाठी सुरीचा धाक दाखवतो. ‘नाही’ म्हणजे ‘नाही’ हे समजत नसेल, आणि तरी हवं ते करण्याचा प्रयत्न हासुद्धा गुन्हाच. पण या गुन्ह्याचा परिणाम काय? तर त्याला सेक्स मिळत नाही! बरं ते ऑपरेशनवेळी अल्कोहोल पिऊन होता म्हणून जी केस झाली, त्यात ह्याने स्वतःची चूक मान्य करून असं काय मिळवलं कळलं नाही. कारण ते मान्य केल्याचा विशेष परिणाम तरी काय झाला? फक्त त्याची इमेज पुन्हा सावरण्याचा प्रयत्न. झालं. आता शेवट जवळ आला म्हणून त्याला पुन्हा सोबर बनवायला परदेशात वेकेशनवर जाणं गरजेचं. मग आल्यावर तिचं भेटणं. आणि एकूण ५ मिनिटसुद्धा नसलेल्या सिनमध्ये ते दोघं पुन्हा एकत्र होतात. हुह. काय तर ती लग्नानंतर ३ दिवसांनी पळून येते, कुठेतरी राहते, तिला त्याचं कोणासोबत तरी अफेअर असल्याचं कळतं, तिच्या मनात राग असतो, असं बरंच काही बोलते. शेवटी काय, तर “मी नवऱ्याला हातसुद्धा लावायला दिला नाही. हे पोटातलं मुल तुझं आहे!” आणि त्याला कोण विचारणार, की त्याने इतके महिने काय केलं? जे केलं ते का केलं? बरं स्वतःहून त्या सगळ्याचा गिल्ट सुद्धा नाही त्याला. वाह. निष्कर्ष काय, तर पुरुष कितीही नालायक वागला तरी शेवटी त्याला हवं ते मिळतं. त्यासाठी काय करावं, तर हे असं वेड्यासारखं प्रेम करावं. आणि हे प्रेम करताना अर्जुन स्वतःला Rebel with a cause म्हणतो. मुळात रिबेल म्हणजे प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध बंड करणारा. पण इथे वर्षानुवर्षे स्त्रियांना गृहीत धरून वागणारी जी पितृसत्ताक व्यवस्था आहे, म्हणजे आक्रमक आततायी वृत्ती. तीच वृत्ती तर अर्जुनमध्ये दिसून येते. तो कुठेही तिला समान वागवण्याचा सोडा, तिच्या भावनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न करत नाही. हेच विद्रोही असेल तर आज बरेच जण या जगात Rebel with a cause असतील.

बरं आता म्हणाल की ठिके ना, चित्रपट आहे, मनोरंजन म्हणून बघ आणि सोडून दे. शिवाजी महाराजांच्या, आणि अनेक मोठ्या नेतृत्वाच्या, देवांच्या वगैरे कथांवर आधारित चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये इतिहासाची हेळसांड करतात, तेव्हा बोलता का? तेव्हा तर इतिहास आणि संस्कृतीची रक्षा करायला तोंड उघडताच ना? बरं ते फॅक्च्युल आहे म्हणून विरोध करता. ठीके. आर्टिकल १५ वर ‘ब्राम्हण जातीबद्दल लोकांचे मत कलुशित करायचा प्रयत्न सुरु आहे’, असं म्हणणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल मग? तोही चित्रपट मनोरंजन म्हणून बघायचा का? चित्रपट काय, तुम्हाला चित्र पटत नाहीत, तुमच्याच पूर्वजांनीच कोरलेले शिल्प पटत नाहीत, तुम्ही काय चित्रपटांना मनोरंजन म्हणून बघा सांगताय? चित्रपट सुद्धा फक्त मनोरंजन असतं तर ‘धूम’ आल्यावर लोकांना स्पोर्ट्सबाईकचं वेड नसतं लागलं, ‘एक दुजे के लिए’नंतर प्रेमी जोडप्यांचं एकत्र आत्महत्यांची प्रकरणं आली नसती. चित्रपट पाहून एकावर जरी परिणाम झाला असेल, तरीही चित्रपट प्रभावी आहे हेच मान्य करावं लागतं. आणि म्हणूनच ‘लक्ष्य’, ‘शोले’, ‘बॉबी’, ‘सैराट’ हे सिनेमे प्रभावी आहेत.

बरं आता एक उत्तर त्यांच्यासाठी ज्यांना ‘गली बॉय’मधली सफीना आणि अर्जुन रेड्डी यांच्यात फरक दिसत नाहीत. सफीना जेलस होते, ती मुलींना मारते, आणि तिला त्याचे परिणामही भोगावे लागतात. पहिलं म्हणजे तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं, घरचे तिच्यावर विश्वास ठेवणं बंद करतात, आणि बॉयफ्रेन्ड सुद्धा दुरावतो. अर्जुनचं काय होतं? त्याच्या वागण्याचं स्वतःकडून फक्त आणि फक्त समर्थन होतं. का समर्थन होतं? कारण विरोध करायला कोणीच नसतं. विरोधी पक्षच सक्रीय नसेल तर समोरचा किती फोफावतो ते तर पूर्ण देश बघतोय. हीच गोष्ट माणसाच्या वागण्यातही लागू होते हे मान्य करावं, आणि वाईट प्रवृत्तींना विरोध करावा. कारण एकच, आपण विरोध केला नाही, तर समोर येईल ते भोगावं लागतं. विचार करा आणि व्यक्त व्हा.

Wednesday, 6 March 2019

रिक्षा, ती आणि तिचा orgasm

काही दिवसांपासून रिक्षातला 'तो' व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यावर प्रचंड विनोद, टिका आणि मीम्स सुरु आहेत. 'चार भिंतींमध्ये करण्याच्या गोष्टी' किंवा त्यांनी रिक्षात केलेलं ते चूक कि बरोबर यात मला शिरायचंच नाहीये. उलट यातून वेगळाच विषय समोर आणण्याचा प्रयत्न आहे. तो म्हणजे, 'तिचा orgasm', Female Orgasm!




स्त्रियांचा परमोच्च बिंदू (female orgasm) म्हणजे काय?


मूळात सेक्स म्हणजे काय? प्रणयक्रीडा (fore play) आणि संभोग (intercourse) यांची मिळून बनलेली साधी व्याख्या म्हणजे सेक्स. मराठीत याला प्रणय म्हणतात. या प्रणयात संभोग (intercourse) जितका महत्त्वाचा, तितकीच   प्रणयक्रीडा सुद्धा (fore play) महत्त्वाची असते. कारण सेक्सची सुरुवात  प्रणयक्रीडेने (fore play) झाली तर तो सेक्स अधिक आरोग्यदायी आणि जास्तीत जास्त आनंद देणारा होतो. आणि याच प्रक्रियेने पुरुष आणि स्त्री दोघांनाही परमोच्च बिंदू सापडते, orgasm मिळतो. परमोच्च बिंदू (orgasm) म्हणजे सेक्समधून मिळणारा सर्वोत्तम आनंद. हा आनंद घेण्यासाठी दोघांच्याही शरीरात pleasure points आहेत. पुरुषांचा pleasure point हा संभोग करताना उद्युक्त होतो, आणि तेव्हा त्यांना पुरेपुर आनंद घेताही येऊ शकतो. पण स्त्रियांचा pleasure point हा संभोग करताना फार कमी वेळा उद्युक्त होतो. कारण संभोग (intercourse) हा त्या pleasure point च्या मार्गात येत नाही.


अनेक सर्वेक्षणांनुसार, भारतातील सेक्स करणाऱ्या पुरुषांपैकी तीन चतुर्थांश पुरुषांना संभोगातून orgasm मिळतो, आणि हाच आकडा स्त्रियांच्या बाबतीत एक चतुर्थांश इतकाच राहतो. या एक चतुर्थांश स्त्रियांना orgasm कसा मिळतो? तर संभोगाच्या वेळी किंवा fore play च्या वेळी योनी उत्तेजित करून म्हणजे clitoris stimulation ने स्त्रिया परमोच्च बिंदू orgasm मिळवतात, आणि काहीवेळा त्या orgasm च्या शेवटच्या टप्प्यापर्यंतही पोहचू शकतात. आता योनी उत्तेजित करणे (clitoris stimulation) म्हणजे काय? तर तुम्ही रिक्षातल्या व्हिडीओमध्ये पाहिलं तेच!


स्त्रियांचा pleasure point हा संभोगाने (intercourse) उद्युक्त होत नसतो. त्यासाठी nipple stimulation किंवा clitoris stimulation ची गरज असते. ते स्वतः स्त्री सुद्धा करू शकते. इतकंच काय, स्त्रियांच्या या सुखामध्ये प्रजननाचाही प्रश्न येत नाही. पण आपल्याकडे मूळात प्रश्नच हा आहे, की "बाईने सेक्सचा आनंद का घ्यावा?" याचं उत्तर आहे, गरज म्हणून. आणि ही गरज जोडीदाराने घुसून केलेल्या संभोगाने (intercourse) पूर्ण होत नसते, त्यासाठी प्रेमाने केलेल्या fore play ची, nipple stimulation, clitoris stimulation ची गरज असते. स्त्रियांची ही गरज किती पुरुष जोडीदारांना माहित असते? किती पुरुष जोडीदार आपल्या स्त्री जोडीदाराला शरीरसुख उपभोगू देतात? आणि किती जोडीदारांना त्यांच्या जोडीदाराचं pleasure point सापडतं? इतकंच काय, किती स्त्रियांना आपली ही गरज माहित असते? किती स्त्रियांना ती भागवता येते? त्यासाठी ते जोडीदाराची मदत घेतात कि कृत्रिम उपकरणांची? अनेक फाटे आहेत, आणि गरज एक, जी पुरवणे आवश्यक आहे.


रिक्षातल्या त्या व्हिडीओवर अनेकांनी टीका करताना विचारलं, "यह रंडीखाना है क्या?" बाबांनो, मला सांगा, कोणत्या रंडीखान्यात लोक त्या बायांना झुलवायला जातात? कोण तिथे त्यांना शरीरसुख द्यायला जातं? पुरुष जातात ते स्वतःची गरज भागवायला. त्यातून त्या बाईला वापरण्यासारखे फक्त पैसे मिळतात.


बहुतेक स्त्रिया या फक्त आपलं नवऱ्याप्रती असलेलं दायित्व अन् कर्तव्य वगैरे म्हणून संभोग सहन करतात. Enjoy करणाऱ्यांना त्यातून समाधान मिळतंच असं नाही. ही व्यथा नेहमी सेक्स करणाऱ्यांची. मग पहिल्यांदा करणाऱ्या कित्येक पोरी आहेत, त्यांच्या न मिळालेल्या orgasm वर काय बोलावं?


हे का होतं? बहुतेक स्त्रिया orgasm पर्यंत का पोहचत नाहीत?


कारण आपल्याकडे स्त्रीने अंगाखाली आणि पुरुषाने नेहमीच 'वर' राहण्याची सवय आहे. हो मी या गोष्टीला सवयच म्हणीन. कारण पूर्वीची संस्कृती काही वेगळं दर्शवते. पूर्वीच्या भारतातील संस्कृतीत माणसाच्या surviving needs मध्ये शरीरसुख ही सुद्धा एक गोष्ट होतीच. कदाचित म्हणूनच 'कामसूत्र' सारखा ग्रंथ इथे लिहिला गेला. कित्येक मंदिरांमध्ये, लेणींमध्ये राजाचे, देवाचे मैथून चितारले आणि कोरले गेले आहेत. अनेक ठिकाणी प्रणयात स्त्रियांनी वर्चस्व केल्याचेही शिल्प आढळतात. पूर्वी ज्याला 'प्रणयक्रीडा' म्हणत, प्रणय खेळले जात, ते सेक्स आता भारतात 'taboo' झालं आहे. आणि पुरुषप्रधान होत गेलेल्या या संस्कृतीमुळे स्त्रियांचा शरीरसुख घेण्याचा अधिकारही हिरावला गेला आहे. कारण योनी हा अवयव मासिक पाळी येण्याचा आणि पुरुषाने प्रणयात वापरायचा, इतकीच धारणा झाली आहे. खाज आल्यावर योनी खाजवूही शकत नाही इतकं अज्ञान त्याभोवती पसरलंय.


शरीरसुख न मिळाल्याने जसे पुरुष चिडचिडे होतात, इतर मार्ग शोधतात, तशा स्त्रियाही चिडचिड्या होतात, नैराश्य येतं. पण त्यांना dildo किंवा vibrators ची कितपत माहिती असते? माहिती असली तरी ते वापरण्याची किती भीती असते? आणि मूळात कायद्यानुसार या सेक्स टॉईजवर बंदी आहे, अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अर्थात कोणत्याही नात्यात, रोजच्या घुसोफाय सेक्समध्ये त्यांना रस राहत नाही. सेक्स एकतर्फी होतात. मला भीती याची वाटते की, तीन चतुर्थांश स्त्रिया या orgasm न मिळवताच आयुष्य संपवतात. म्हणजे सेक्स करूनही त्याचा परमोच्च आनंद न मिळवताच त्या जग सोडतात. प्राथमिक गरजांनतर ही एक मानसिक व शारीरिक गरज भागवणे आवश्यक आहे. ती प्रत्येक स्त्रीने आणि तिच्या जोडीदाराने सामंजस्याने, प्रेमाने भागवणे गरजेचे आहे.


Forced sex हा विषय वेगळा, पण आपल्या संमतीने संभोग होत असला तरी आपल्याला त्यातून खरंच समाधान मिळतंय का? हा प्रश्न स्त्रियांनीच स्वतःला विचारायला हवा. प्रश्न विचारणं आणि त्याचं समाधान मिळवणं गरजेचं आहे. नाहीतर आपणही त्या तीन चतुर्थांश स्त्रियांमधील एक राहू, ज्यांनी सेक्स करूनही कधीच शरीरसुख मिळालं नाहीये. आणि पुरुषांनो, तुम्हीही स्वतःला विचारा, "आपल्या एका तरी संभोगाने तिला आनंद मिळाला आहे का?" उत्तर 'नाही' आलं तर निदान एकदा तरी तिचा विचार करा, प्रयत्न करा. कदाचित तिची एकदा तरी गरज भागवल्याचा आनंद तुम्हाला नक्की होईल.


हाच आनंद रिक्षातला ' तो ' तिला देत होता.


शेवटी, आपण आनंद देण्या-घेण्यासाठी जन्माला आलोत. आपल्या जोडीदाराला आनंद द्या.