Saturday, 28 October 2017

एक पहाट रायगडावर...

दिवाळीच्या एक महिन्यापूर्वीच दिवाळीत रायगडावर जायचं ठरलं होतं. 'एक पहाट रायगडावर' म्हणून कार्यक्रम आहे, दिवाळी पहाट जल्लोषात साजरी होते वगैरे बरंच ऐकलं होतं. पण माझ्या डोळस मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. मला रात्रीचा रायगड पहायचा होता. रात्री दिवे-मशालींनी नव्हे, तर चांदणभरल्या आभाळाने सजलेला रायगड पहायचा होता. महिन्यांपूर्वी ठरवलेला बेत दिवाळी आली तसा काहीसा डळमळीत होऊ लागला. काम आहे, सुट्टी नाही, आई सणाला घरी एकटी राहणार... बरंच काही होतं. पण रायगड एकीकडे आणि बाकी सारी दुनिया एकीकडे. घरात दिवाळीची तयारी करून रायगडावर, महाराजांच्या घरच्या दिवाळीची तयारी करायला गेले. एक दिवस सुट्टी टाकली, ऑफिसला फाट्यावर  मारून...

नेहमीप्रमाणे रात्री निघाले, पहाटे पोहोचले. सकाळी सूर्यदेवाने पूर्ण रायगड परिसराच्या शेतमळ्यांवर आपल्या किरणांची मायाळू झालर पांघरलेली पाहिली. कुडकुडणाऱ्या थंडीपासून हि मायेची ऊबच आता या शिवारांना वाचवत होती. ती ऊबही सूर्यदेव, बापदेव देत होता हे थोरच!



सकाळी नाश्ता करून मशाली घेऊन वर गेले. तेव्हा पहिल्यांदाच मशाल पाहिली. भले आता ती आधुनिक झाली असेल, निदान तिचं स्वरूप पाहता आलं, हाताळता आलं. पूर्वी अंधारात गडाचं रक्षण करणारी, मावळ्यांना वाट दाखवणारी तीच तर होती. गडागडांच्या भिंतींवर, देवड्यांवर तिच्या खुणा आढळतात. त्या देवड्यांत मला मशाली दिसतात, आणि त्यांच्या प्रकाशात नजर मालवु न देता, पहारा देणारे मावळेही दिसतात.

दुपारभर अशा अनेक विचारांसोबत उनाडल्यावर विश्रांती घेते न घेते तोवर लोक जमू लागले. दिवसभराच्या शांततेचं काही मिनिटांतच घरभरल्या अंगणात रूपांतर झालं. महाराष्ट्राभरातून लोक आले होते. मुंबईतल्या लोकलच्या अनोळख्या गर्दीतली मी, या रायगडावरच्या आपुलकीच्या माणसांत माझी मला केव्हा सापडले कळलंच नाही. इथे कोणीच कोणाला ओळखत नव्हतं, कोणीच कोणाच्या जवळचं नव्हतं, पण या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा होता तो 'रायगड'. या रायगडाच्या अंगाखांद्यांवर खेळलेले सगळे आज अंधारातल्या रायगडाला मशालींनी उजळायला आले होते.

संध्याकाळी रायगडाची प्रत्येक वास्तू फुलांनी सजवायला सुरुवात झाली. फुलांचे हार, तोरण, फुलांच्याच रांगोळ्या... आणि त्या रांगोळ्यांमध्ये लहानशा पणत्या. घरी करू अशी सजावट लाडक्या रायगडावर केली. घरच ते. घराची सजावट घरची माणसं नाही करणार तर कोण करणार? आणि आता तर पूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं.

सजावट करून जेवून थोडा आराम झाला. प्रचंड माहितीपूर्ण व्याख्यान झालं. आणि रात्री 2 वाजता दिपोत्सवाची तयारी सुरु झाली. अंघोळ तर करता आली नाही, पण दिवाळीच्या पहाटे लहानपणी फटाके लावायला ज्या उत्सुकतेने नवनवीन कपडे घालायचे ना तेवढ्याच उत्सुकतेने आज मशाली लावण्यासाठी सगळे तयार झाले होते. तयारी आटोपून अंधाऱ्या रायगडावर चालू लागलो, जगदीश्वरकडे. महाराजांना आशीर्वाद देणाऱ्या त्या जगदीश्वराला अभिषेक घालून आम्हीही हा अवघा सह्याद्री आणि त्या सह्याद्रीची राजधानी असलेला रायगड असाच चिरकाल पाहण्यासाठी त्याच्यासारखंच आम्हालाही दिर्घायुष्य लाभुदे अशी प्रार्थना केली. पहाटेची काकड आरतीच ती. जगदीश्वरात त्याच्या आरतीचा नाद घुमला. जगदीश्वराला सूर्यदेव यायच्या अगोदर पूजलं गेलं. रायगडाचं आद्यदैवत म्हणून पूजलं गेलं...



त्यानंतर महाराजांच्या समाधीजवळ महाराजांना वंदन करून मशाली घेऊन सिंहसनाच्या जागेकडे जायला निघालो. जगदीश्वरातून बाहेर निघाल्यावर मशालींच्या प्रकाशाने जसा रायगड उजळला होता, त्याचं वर्णन शब्दांत सांगता येत नाहीये मला अजूनही. त्या पहाटेच्या काळोख्या थंडीत प्रकाशमय ऊब रायगडावरच मिळू शकते. शंभरहून अधिक मशाली एका रांगेने पुढे सरकतायत, आणि आजूबाजूचा सारा परिसर आपल्या तेजाने उजळून टाकतायत. श्या... अजूनही जमत नाहीये. मला मरीन ड्राईव्हच्या रात्रीच्या दृश्याचं खूप आकर्षण होतं. क्वीन्स नेकलेसचं विहंगम दृश्य वगैरे आज रायगडावरच्या या जिवंत नजाऱ्याने ते सारं साफ पुसून टाकलंय डोळ्यासमोरून. आताही, बाजारपेठेजवळून मशाली घेऊन जाणारे मावळेच दिसतायत...

हे मावळे आता आले ते गडदेवतेला अंधारातून दूर करायला. शिरकाई देवीच्या लहानश्या मंदिरात दीपोत्सव करून, देवीची आरती करून होळीच्या माळावर महाराजांच्या स्मारकापाशी आलो. तिथेही पणती, दिवे लावले गेले, फुलांचे हार घातले गेले. मानवंदना दिली गेली, आणि राजदरबारात, दस्तुरखुद्द महाराज जिथे विराजमान होत तिथे त्यांना हि मशालींची मानवंदना द्यायला चालू लागलो. अजूनही तसा काळोखच. सूर्यदेव काही या मशालींच्या उजेडापुढे यायला मागत नव्हते. कदाचित त्यांनाही या शूर वीराला त्यांच्याच काळात नेऊन, त्यांच्याच काळातील हि पेटत्या मशालींची दिवाळी भेट द्यायची असणार...

सिंहसनाकडे या मशाली वळल्या आणि राजांचं सिंहासन सोन्याहून पिवळं असल्याचा भास झाला मला. भास कसला, ते होतंच मुळात सुर्याहून सोनेरी. तेही फक्त या एकवटलेल्या मावळ्यांमुळे...

'आस्ते कदम' म्हणत सूर्यदेव आपल्या येण्याची घोषणा करत होते. ढगांवर किरणांची भगवी गुलाबी छटा सोडत होते. स्वतः मात्र येत नव्हते. मागे राजदरबारात चालणारं जोशपूर्ण भाषण ऐकत मी बाहेर पूर्वेला चाललेली सूर्यदेवांची रणनीती पाहत बसले होते. सूर्याने आपल्या किरणांची सेना सर्वात आधी ढगांवर चढवली. त्यांना केशरी, मग लाल, मग गुलाबी रंग दिला. मी आत्ता सूर्य येणार म्हणून मोबाईलवर टाईम लॅप्स लावून उभी राहिले. पण गुलाबी झालेलं आभाळ आता फिकं होत पांढरं झालं. फसवलंच की. मी म्हटलं एवढ्यात काही येत नाही आता हा. म्हणून टाईम लॅप्स बंद करून बसून राहिले. चांगली १० मिनिटं गेली. ढग नुसतेच इथून तिथून पळत होते. अन् अंदाज लावते न लावते तोच सूर्यदेव हजर. सूर्याला नारायण का म्हणतात ते त्या क्षणी कळलं.
रायगडावर उगवणारा सूर्यसुद्धा फक्त महाराजांना वंदन करायला प्रत्येक दिवशी आपली आभाळ सजवण्याची शैली दाखवत असतो. तोसुद्धा रणनीती वापरतो, अगदी राजांसारखी...

एक नारायण दुसऱ्या नारायणाला वंदन करतो ना तेव्हाचा क्षण पाहिलाय मी.. या पहाटेच्या रायगडावर...


Tuesday, 26 September 2017

नदी प्रवाही राहण्यासाठीचा संघर्ष



आशयघन सिनेमा, आशयघन  सिनेमा, अशा बोंबा आजकाल ऐकू येत आहेत. 'अमुक तमुक चित्रपटानंतर मराठी सिनेमाने कात टाकली' असे लेखही प्रसिद्ध होत आहेत. पण खरं तर वर्षाच्या ३६५ दिवसांत दोन-चार सिनेमे लक्षात राहण्यासारखे बनतात, त्यातील किती सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालतात, आणि चालणारे खरंच तेवढ्या लायकीचे असतात का हा प्रश्न वेगळा. पण या गर्दीत पून्हा एकदा संदीप सावंत खऱ्या अर्थाने संजीवनी घेऊन आले आहेत, ते 'नदी वाहते'च्या रूपाने.

'श्वास'नंतर जवळपास दहा वर्षे संदीप सावंत यांनी वाट पाहायला लावली, हि जरी तक्रार असली तरी त्यांचा नवीन सिनेमा 'नदी वाहते' सारखा असेल तर त्यांना तेही माफ. कारण खरंच, या सिनेमाची नितांत गरज आज महाराष्ट्राला आहे. आज कित्येक शेतकरी पाण्याची व्यवस्था नसल्याने शेती करू शकत नाहीयेत, जे करतायत ते सावकाराच्या ओझ्याखाली दाबले गेले आहेत, आणि जे पर्याय शोधू शकत नाहीत, ते शेवटी आत्महत्या करत आहेत. पण आपल्या संकटांवर आपणच मार्ग काढावा लागतो असं म्हणतात. शेतीही अशा मार्गांनीच पुढे जाते. त्यामुळे इथे कोणतंच 'काम थांबवण्याचं' आंदोलन नाही. इथे आहे तो प्रयत्न, नदीला वाचवण्याचा... नदीला वाहतं ठेवण्याचा... या प्रयत्नात मलाही हात द्यावासा वाटतो. मलाही नदीचं पाणी तिच्या आजूबाजूच्या मातीत, झाडांत जिरवावंसं वाटतं. प्रचंड आत्मविश्वास देणारा हा सिनेमा प्रत्येक माणसाने पाहावा असं मला वाटतं.

संदीप सावंत यांनी पुन्हा एकदा वास्तववादी चित्रण केल्याने कुठेच आव आणलेला दिसत नाही. नाहीतर अशा विषयांच्या चित्रपटांत उसन्या अवसनाची प्रचंड भर असते. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी समजून उमजून अभिनय केला आहे.

पण या सगळ्यात लक्षात राहते ती नदी. ती ज्या ज्या सिनमध्ये येते, ती प्रत्येक फ्रेम सुंदर होते. याचं श्रेय नक्कीच cinematographer ला आहे. नदी आणि तिच्या आसपासच्या परिसराचा, कोकणातील त्या गावाचा सुंदर देखावाच कॅमेरातून मांडला आहे. सोबत या नदीला जिवंत केलंय ते तिच्या आवाजाने.. खरं तर खळखळाट दिला म्हणजे नदी ऐकू आली असं आपल्याला वाटतं. पण नदीच्या तवंगांना दिलेल्या आवाजातून काहीतरी वेगळंच मिळून जातं. तो नदीचा आवाज असतो, आतला आवाज. तिच्या वाट्याला किती पूर आले असावे, किती वेळा ती कोरडी पडली असावी, पण तरीही न हरता ती अजूनही वाहते आहे.. या वाहण्याचा खळखळाट काही निराळाच... जमिनीवरची माणसं आपल्यासोबत काय करतायत ते तिला कळत असावं. पण तरीही ती शांतच आहे.. ती वाहतेच आहे.. तिलाही ठाऊक असावं, तिचा कोणीतरी कुठेतरी वापर नक्कीच करत आहे, त्यांच्यासाठी ती वाहते आहे.

नदीच्या पाण्याचा वापर कसा, किती करावा हे सगळं शिकण्याची आता वेळ आली आहे. आणि हे सगळं शिक्षण घेण्याची प्रेरणा आपल्याला 'नदी वाहते' मधून मिळते. म्हणूनच प्रचंड गरज आहे या चित्रपटाची. सिनेमागृहातून बाहेर आले तेव्हा मला गो. नि. दांडेकरांची 'लक्ष्मीसेतू' हि दीर्घकथा आठवली. अगदी असेच, शेतीसाठी, नदीच्या प्रवाहासाठी धडपडणारे लोक डोळ्यांसमोर आले होते. आणि त्यात मीही एक असावी असंही वाटत होतं. कारण हा मानवाच्या जगण्याचा संघर्ष आहे, जो युगानुयुगे चालत आला आहे. बदलत्या परिस्थितीमुळे तो माणसाला कळत नसला तरी निसर्गाला ते कळतं, पण आता निसर्गाच्या हातातही काही उरलं नाहीये असं दिसतंय. त्यामुळे माणसानेच पाऊल उचलायला हवं असा संदेश देणारा 'नदी वाहते' नक्की पहा.

Wednesday, 30 August 2017

गणपती आणि भाऊ कदम

             आमच्या परिसरातील एका इमारतीतले बौद्ध धर्मातील लोकही त्यांच्या इमारतीत गणपती बसवतात. नवरात्रीत गरबा, दांडियासुद्धा असतोच. मीही जाते तिथे खेळायला. होळी साजरी होते. बिल्डरने संपूर्ण इमारत फक्त बौद्ध बांधवांसाठी बांधलीय. त्यामुळे अर्थात सगळेच बौद्ध आहेत. मग त्यांच्यावर हिंदू धर्मीयांचा त्रास असणं, किंवा गणपती जबरदस्ती बसवला गेलाय असंही नाही. बरं इतर सर्व इमारतींत गणपती मंडळ आहेत असंही नाही. त्यामुळे हिंदू धर्माशी सांगड घालण्यासाठी किंवा इतरांत मिसफिट वाटू नये यासाठीही ते करत नाहीयेत. ते इतरांप्रमाणे मध्यमवर्गीय आहेत, किंवा आम्ही सारेच मध्यमवर्गीय आहोत. त्यांना आवडतं, म्हणून ते करतायत. इथे कोणी अडवलंही नाहीये त्यांना. उलट इतर इमारतीतले, इतर जातिधर्मातली मुलंही त्यात उत्साहाने सामील असतात. बरं बुद्ध जयंती, आंबेडकर जयंतीही आमच्याकडे दिमाखात साजरी करतात. त्याचा कोणीच त्रास करून नाही घेतला कधी. उलट सकाळ सकाळ गणपतीत जशी गाणी ऐकू येतात आणि प्रसन्न वाटतं, तसंच काहीसं आम्हालाही वाटतं. सकाळी लवकर उठून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला अभिवादन करण्यासाठी त्यांचे पाहूणेही येतात, आमच्याकडे गणपतीला येतात, अगदी तसेच... आमच्या इमारतीत नसलं तरी आम्ही वर्गणी देतोच सगळ्या सणांसाठी.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवस पाहतेय, घरी गणपती बसवला म्हणून भाऊ कदमवर फेसबुकच्या माध्यमातून प्रचंड टोकाची टीका होतेय. मी याआधी जाती धर्मावर फार लिहलं नाहीये. कारण त्यात कधी पडावसंच वाटलं नाही मला, आणि अर्थात माझ्या आडनावावरूनही नको ते वाद होतील. पण आता काही दिवसात जे दिसण्यात आलं ते भयावह आहे. भाऊ कदम हे उत्कृष्ट कलाकार आहेत, घराघरांत लोकप्रिय आहेत. आता त्यांची श्रद्धा असावी गणपतीवर, देवावर, म्हणून बसवला गणपती. हे करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. ह्यात त्यांची जात कुठे आली हा प्रश्न पडला मला सुरुवातीला. पण नंतर आकलन झालं, की जात भाऊ कदमची नव्हे तर जातीयवाद्यांची मधे आली. प्रत्येक धर्म, जात यांचा प्रचार करण्याची मानसिकता एकच असते, ती कमी होण्याची, त्याची लोकप्रियता कमी होण्याची भीती. मग त्यासाठी टोकाची भूमिका ही मंडळी घेतात. देव ह्यांचा लाडका. देवाच्या नावावर नको ते खपवतात. सनातन संस्था ही त्यातील एक आहे हे आपल्याला माहित आहेच. पण स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणवणाऱ्यांचं काय? खरं तर त्यांना बुद्ध कळाले असते तर ती टीका केलीच नसती त्यांनी. बरं मूर्तीपूजन करणाऱ्यांवरच इतकी आगपाखड का? हिंदू धर्मीयांनी बौद्ध धर्म आचरण केलं तर योग्य ठरतं, पण बौद्धांनी मूर्तिपूजा केली तर धर्म कळला नाही असा आरोप करवा? 'आमची ती अस्मिता, तुमची ती सनातनी वृत्ती' असाच आशय निर्माण होतो यातून. व्यक्ति स्वातंत्र्य जसं मूर्तीपूजनावर बहिष्कार टाकण्यात आहे तसं ते मूर्तीपूजन करण्यातही आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

आज भाऊ कदम लोकप्रिय आहे म्हणून त्याच्यावर इतक्या त्वेषाने टीका करतायत. तितक्याच त्वेषाने आमच्या परिसरात येऊन त्या बौद्ध बांधवांचा विरोध करतील का? नाही ते शक्य नाही. कारण त्यामुळे प्रसिद्धी तर मिळणार नाहीच, उलट 'आपल्यापैकी' म्हणून जी माणसं आहेत, तीही तुटतील. कोणत्याही जातीधर्माला माणसं एवढी उपयोगी असतील तर ती त्यांना आलेल्या शहाणपणातून उभी करावी, तेव्हा त्या जातिधर्माला अर्थ आहे. माथी भडकवून, ब्रेन वॉश करून फक्त दहशतवादी निर्माण होतात, मानवतावादी नाही.

Sunday, 27 August 2017

स्व

'माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्लिज हसू नकोस. हा prank नाहिये, किंवा तू केलेल्या prankचा revenge पण नाहिये. मी खरंच सांगतेय. I really like you. खूप विचित्र आहे हे माहितेय मला...'

मी हसल्यावर तिला रडू आवरेना झालं.

'मीही खरंच असा विचार केला नव्हता कधी.. पण..'

आता मला ते ऐकवेना. ती प्रचंड दीनवाण्या चेहर्याने बघत बोलतच होती. रडतच होती. काही काही ऐकू आलं नाही मला... डोळ्यांत तिचे अश्रू आणि भुरकट दिसणारी ती... केशरी ड्रेस आणि पिवळी ओढणी.. अगदी डोळ्यांत बसणारे रंग.. डोळ्यांत बसणारी ती... तेवढ्यात कोणीतरी students' room चा दरवाजा वाजवला. तोच काय तो कानात शिरला अन् मी भानावर आले. तिच्याकडे न बघताच बाहेर निघाले. चालताना पाय भासत नव्हते... जणू चालूच नये... थांबून राहावं काही क्षण... पण तरी मी चालत राहिले.. पाय आपोआप गच्चीकडे गेले.. सवय असते कदाचित मेंदूलाही.. हृदय कुठेही असो, मेंदू भानावर असतो, आपल्याला योग्य ठिकाणी पोहचवण्याचं कामच असतं त्याचं.

गच्चीवर आले मनात प्रश्नांचं ओझं घेऊन... तिला आठवून... ती.. साधी सरळ वगैरे. बीएमएम मधली अभ्यासु मुलगी वगैरे. कॉलेज फेस्टीवलच्या तयारीसाठी याच वर्षी creativeला आलेली. मीच इंटरव्ह्यु घेतलेला. विचार आलेला, दोन वर्ष आधीच आली असती तर कॉलेजचं नाव काढलं असतं, एवढी चांगली कला आहे पोरीच्या हातात. पण या वर्षी आली तेच खूप होतं. घरी ओरडा खाऊन सुद्धा रात्रीपर्यंत थांबायची. आमच्यात तीच एकटी सकाळी लेक्चरला बसून यायची, इथेच गच्चीवर. माझ्याच वर्गात होती तशी. पण मी काही फार वर्गात गेले नाही. First yearला सुरुवातीला गेले. तेव्हाच मित्रांसोबत मिळून prank केलेला. तिला प्रपोज करून किस करण्याचा तो prank होता. अर्थात किस नाही केला, पण त्याबदल्यात जोरात कानफटात खाल्लेली. कोणत्याही मुलीला त्या prankचा राग नक्कीच येणार. म्हणून मीही तिच्या त्या reaction ला फार मनावर घेतलं नाही. त्या prank नंतर खरं तर मला टॉम बॉयचा टॅग लागला. भले माझे तेव्हा दोन चार मुलांसोबत अफेअर्स सुद्धा झाले. पण तरीही माझे तोकडे केस, मुलांसोबत राहणं, त्यांच्यासोबत दारु सिगरेट पिणं, फुटबॉल, बास्केटबॉल खेळणं यामुळे कॉलेजमध्ये मी टॉम बॉयच राहिले. मुलांसाठी आणि मुलींसाठीही. काही मैत्रिणी तर मस्करीत मलाच त्यांचा बॉयफ्रेंड म्हणवून घ्यायच्या. मीही मस्करीत त्यांना seduce वगैरे करायचे. कॉलेजमध्ये आतापर्यंत जे होत आलं ते सारं काही मस्करीतच. हवे तेवढे मित्र, हवे तेवढे बॉयफ्रेंड्स, हवा तेवढा सेक्स. पण फक्त मुलांसारखी राहते, मुलांसोबत राहते म्हणून मी मुलींना आवडावे, मुलींनी माझ्यावर प्रेम करावं, इतकी मी केव्हा पुरषाळले तेच कळत नाहीये. मी कधीच मुलींना आकर्षणाने पाहिलं नाही. एखादीवर तशी नजरही फिरवली  नाही. ती सोबत असतानाही कधीच तशी बॉंडिंग केली नाही. मग तिला गैरसमज तरी कसा होऊ शकतो? मला कधीच मी स्त्री असल्याचा गौरव वगैरे नव्हता, किंवा असला तर तो बोलून किंवा चेहरा रंगवून दाखवला नाही. तशी गरजच वाटली नाही कधी. मला केस फार मोठे आवडत नाहीत, दागिने आवडत नाहीत, कुर्ता पायजमा आवडत नाही. पण शेवटचं वर्ष म्हणून साडी डे ला आवर्जून साडी नेसली होती, तेव्हा सगळे 'मुलगी वाटतेयंस' असं म्हणून मोकळे झाले. काही आनंदानं, काही दुःखाने, काही चिडवायलाच म्हणून. मला तीन वर्षांपासून ह्याची सवय झालीय. काही फरक पाडून घेताच येत नाही. पण तिला मी स्त्री आहे, मला तिच्यासारखंच स्त्रीलिंग आहे आणि मला पुरुषांचंच आकर्षण आहे हे सिद्ध का करावं मी? मी स्त्री असण्याचा पुरावा द्यावा लागत असेल तर काय अर्थ आहे माझ्या स्वपणला?

Friday, 25 August 2017

डायरीतल्या गोष्टी #4

चाळीत असताना गणपती आजी-आजोबांकडे असायचा. अनंत चतुर्दशी पर्यंत. खुप लहान होते तेव्हा. त्यामुळे आठवणी फार पुसटशा आहेत. दहा दिवस चालणारे कार्यक्रम खुप आवडायचे. आरती, पाहुणे, मस्त जेवण... पत्ते खेळता येत नव्हते, कारण अर्थात कच्चा लिंबूच होते. पण भावांना फक्त पत्ते खेळताना पाहण्यासाठी मीही रात्री जागवल्याचं आठवतंय. त्रयोदशीचा कार्यक्रम तर भलताच आवडीचा होता. दुपारी कसली तरी पूजा असायची, त्यामुळे पाहुणे नेहमीपेक्षा जास्तच. संध्याकाळी बायकापोरी नऊवारी साडी नेसून, पोरं टोपी-रुमाल बांधून आत्याने शिकवलेल्या गाण्यांवर नाचायचो. मी फारच लहान असल्याने माझ्या मापाची नऊवारी तेव्हा मिळाली नसावी कदाचित. म्हणून मलाही रुमाल बांधून, टीशर्ट घालून, मिशी रंगवेलेली. एकदाच मला मी नऊवारी नेसल्याचं आठवतंय त्या कार्यक्रमात. भारी असायचा तो दिवस. आम्हाला तसंही नाचायची संधीच हवी असायची. सगळी आगरी गाणी आणि त्यांच्या स्टेप्स तोंडपाठ. पण सगळ्यांचं आवडतं गाणं 'गण बाय मोगरा'.. अगदी loop वर असायचं ते गाणं. आजीच्या घरासमोरच्या मिळेल त्या जागेत गोल करून त्या आवडत्या 'गण बाय मोगरा'च्या स्टेपवर थकेपर्यंत नाचायचो. त्यात आजीचा सहभाग आजही विशेष असतो. एवढं काय ते माझं मला आठवतंय. पण मागे एक भारी गोष्ट बहिणीने सांगितली. गणपतीच्या मखराची सजावट म्हणजे वेगळीच होती आमची. कुटूंबच तसं जुगाडू म्हणून ओळखलं जातं, त्यामुळेच असावं कदाचित. तर गणपतीच्या समोर तिन्ही बाजुला समुद्रावरची वाळू आणून पसरवत. अन् त्यात गणपती बसायच्या आधी मेथी पेरत. अनंत चतुर्दशीपर्यंत त्यात मेथी उगवायची सुद्धा. मग त्या दिवशी त्याच मेथीची भाजी असायची ताटात. किती भारीय हे... आता थर्मोकॉल आणि प्लॅस्टिकच्या वेलींची वगैरे सजावट होते. पण बाप्पाच्या पुढ्यात उगवलेल्या भाजीची चव निराळीच. अक्कल नसताना का असेना, मी ती चव घेतली हेच खुप आहे माझ्यासाठी.

Monday, 7 August 2017

राखी

     दरवर्षीसारखी आजची राखीपौर्णिमा जराशी वेगळी होती. यावेळी ती आईसोबत राखी आणायला बाजारात गेली नव्हती. बहिणींसोबत गेलं की आपल्याला नेहमीच सगळ्यात वाईट राखी मिळते असं तिला वाटायचं. तसं होतंही. बहिणी आपापल्या आवडीच्या राख्या उचलायच्या. आणि आई घेईल ती राखी तिला बांधायला लागायची. म्हणून यावर्षी तिने ठरवलं, आपणच राखी घ्यायची. यंदाच मोठ्या कॉलेजात जायला लागल्याने कॉलेजचा आणि त्या परिसराचा टेंभाही मिरवायचा होताच. म्हणून तिने कॉलेजजवळच्या बाजारात जाऊन सुंदर राखी खरेदी केली. आवडता रंग, त्यावर खोट्याच सही, पण मोत्यांची सजावट, लोकरीतच केलेली नक्षी... प्रवासासाठी मिळालेल्या पैशांत तिने ती राखी खरेदी केली. पहिल्यांदाच आपल्या आवडीची राखी मिळाल्याने तिला धावत्या ट्रेनमध्येही आभाळात गेल्यासारखं वाटत होतं. बॅग उघडून सतत नजरेत ठेवत होती तिला.., मग भावाला ती बांधल्यावर काय करणार होती कुणास ठाऊक.

     सकाळ झाली. तिने गणपतीत घालायला घेतलेला पंजाबी ड्रेस आजच घातला. त्यावर आईचा आणि बहिणीचा ओरडाही नाश्ट्यासकट खाल्ला. बहिणींनी पाटाभोवती रांगोळी काढून, ओवाळणीचं ताट सजवून घरपण आणलं. दादाही नवीन कपडे घालून तयार झाला. पाटावर बसल्यावर आई, बाबा, बहिणी, सगळ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. ती सर्वांत लहान म्हणून तिचा ओवाळणीचा नंबरही नेहमीप्रमाणे शेवटचाच. मोठ्या बहिणीने ओवाळलं, राखी बांघली, पेढा खाऊ घातला, दादा पाया पडला. दुसरीने ओवाळलं, राखी बांघली, आणि पेढा खात खात दादा पाटावरून उठून, 'झालं' म्हणून निघून गेला. ती बघतच राहिली. खुप प्रश्न होते डोळ्यांत. पण ओठांतून शब्द फुटले नाहीत. फुटणारही नव्हते. काय विचारणार होती ती? एका पुरुषावर प्रेम केलं म्हणून दुसरा पुरुष राखी न बांधता निघून का जातो, हे विचारणार होती? कि, एका पुरुषाच्या राखीसाठी दुसर्‍या पुरुषाचं प्रेम का त्यगावं, हे विचारणार होती? तिच्या आयुष्यात तीनच पुरुष होते. दादा, बाबा आणि मित्र. त्यातले दोन आता वजा झाले होते. ती तिघांशीही प्रमाणिक होती. परिस्थीती तेवढी कपटाने वागली.

     त्या दोन पुरुषांसारखंच व्यक्तिमत्व, त्यांचा रुबाब, स्वाभिमान, बंडखोर वृत्ती घेऊन तिने तिसर्‍यावर प्रेम केलं. त्या दोघांच्या वृत्तीहून एकच काय ती वेगळी गोष्ट केली होती तिने. मित्रावर प्रेम. त्याला मग स्वाभिमान आणि बंडखोरीची जोड लाभली. ना आर्जव केला, ना प्रतारणा. ते स्वभावात बसतच नव्हतं कुणाच्याच. ती वाहत होती, तशीच वाहत गेली. पण प्रवाह तिचा तिने ठरवलेला... आता दरवर्षी तिला आठवते ती राखी. तिच्या आवडीने घेतलेली. पण कोणत्याच हातावर न बांधलेली. म्हटलं तर कमनशिबी, म्हटलं तर सर्वांत सुखी. निदान तिच्या आयुष्यात तरी दोन जीवांना बंधनात, एकमेकांच्या रक्षणार्थ वगैरे अडकवण्याचा त्रास नाही आला.

Friday, 28 July 2017

चेहरा

तुझ्या शहरात येते,
खूप खूप नट्टापट्टा करून
लिपस्टिक, काजळ, झुमके...
रिक्षात बसले की स्कार्फ गुंडाळते तोंडाला
गॉगल लावते डोळ्यांना
इमारतीखाली रिटायर्ड म्हातारे बसलेले असतात
गॉगलमधूनच पाहते त्यांना,
मला वरून खालून ताडताना
एखादी बाई येते समोरून बघत बघतच
स्कार्फच्या आतला चेहरा पाहायचा असतो तिला
मी मात्र रोजचीच वाट असल्यागत चालते नाकासमोर
उगाच मोबाइल कानाला लावते
आवाज तेवढा काढत नाही
प्रत्येक मजल्यावर
दरवाजे बंद असल्याचं बघून घेते पटकन
तू दरवाजा उघडाच ठेवलेला असतोस
माझी वाट बघत
काही बोलण्याआधी येऊन दरवाजा लावून घेतोस
मीही शांत बसते मोठमोठे श्वास घेत
पाणी आणतोस काही न विचारता
मी स्कार्फ, गॉगल काढून
तुझ्या मिठीत पुन्हा चेहरा लपवते
जणू दाखवायचाच नसतोे आता तो कोणाला...

Thursday, 27 July 2017

बुरख्यातील लिपस्टिक वाली स्वप्नं

     काल Lipstick Under My Burkha पाहिला. अजुनही डोळ्यासमोर आहे तोच सिनेमा. काही केल्या जात नाहिये. म्हणून सांगावंसं वाटतंय काहीतरी.

     कसं होतं ना, गरजा अगदी थोड्या थोडक्या असतात. एक गरज पूर्ण झाली की दुसरी डोकावते खरी. पण एखादी गरज पूर्ण होतच नसेल, तर त्या गरजेचं रुपांतर स्वप्नात होतं. प्रेम, सहवास ही गरज आहे, हे न कळलेल्या किंवा ते विसरलेल्या आपल्या समाजाला आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. प्रेम जशी भावनिक गरज आहे, तसा सहवासही गरजेचा आहेच. तो पुरुषाला हवासा वाटो वा स्त्रीला, तो विदुरांना वाटो वा विधवेला. तो कपडे न काढता नुसतं intercourse पुरता मर्यादित नसून एकमेकांविषयी आदराचा, प्रेमाचा विषय आहे. तो फक्त समवयीन नव्हे, तर पौगंडावस्थेपासून वृद्धापकालापर्यंत हवाहवासा वाटणारा विषय आहे. सहवास हवासा वाटणं नैसर्गिक आहे. या अगदी साध्या विषयावर बोलणं सुद्धा आजकाल sensitive वगैरे झालंय, हीच खरी खंत आहे. आणि ही खंत दिग्दर्शिका अलंक्रीता श्रीवास्तवने अगदी योग्यरित्या मांडली आहे. चित्रपटाचा बोलपट होऊ न देता, बाळबोध होऊ न देता कथा सांगितली आहे. त्यामुळे ती Convincing the convinced वाटत नाही. उलट आपल्यात असलेला राक्षसी समाजच आपल्याला जाणवतो, आणि आपण त्यावर विचार करतो.

     सगळ्या पुरुषांनी पाहावा असा सिनेमा आहे वगैरे समीक्षक म्हणतायंत खरं. पण मी theater मध्ये पाहिलेलं दृश्य फार वेगळं होतं. सगळ्या couplesनी रिकामा theater पाहून कोपरे गाठले होते. काय बोलणार आता. असो. या सिनेमाची गरज होती खरी. पण कोण पाहिल, कोणाला कळेल आणि मुळात कोणाला पचनी पडेल कुणास ठाऊक. पण माझ्या मैत्रिणींनी नक्की पाहा हा सिनेमा.. आपल्या बुरख्यातील लिपस्टिक वाली स्वप्नं घेऊन.

Sunday, 23 July 2017

नशा

     'दिग्या दारू पितो, दिग्या सिगरेट ओढतो, दिग्या मारामारी करतो, पण दिग्या नीच नाहीये रे' या डायलॉगला साजेसा मी. प्रचंड दुष्कर्मी, पण तुम्हाला आवडतोच. कारण तुमची शासकीय, राजकीय कामं करून देणारा, तुम्हाला भाव देणारा एकमेव माणूस मी. मागून कितीही व्यसनी, आईचे पैसे खाणारा वगैरे म्हणाल, पण मागूनच. अन् तेवढंच. हो मी प्रचंड व्यसनी आहे. दारू, सिगारेट, चरस, गांजा, नाव घ्याल ती नशा केलीय, करतोय. नुसती नशा नाही. मुंबईत जेवढे ड्रग्सचे अड्डे आहेत, सगळे माहितेयत मला. त्यांचे भाव, त्यांच्याशी कसा भाव करायचा, सगळं असं सहज येतं मला. या नशेसाठी नोकरीवर जगलो नाही. आईचा एकुलता मुलगा मी. परिस्थिती सुद्धा तशी चांगलीच. माझ्यासाठीच राखून ठेवलेलं सगळं. वापरले ते पैसे. त्यात काय. लोकांच्या घरात जाऊन चोरी तर करत नाही. स्वतःच्या पैशाने नशा करतो. जुगार खेळतो. जगण्याला डावात लावतो. नशा हवीच जगायला. लोकांना पैशाची, स्टेटसची असते, मला जगण्याची नशा आहे. नाही हे सगळं नैराश्यातून किंवा प्रेमभंगातून वगैरे आलं नाहीये. मी असाच आहे. खुप मुली फिरवल्या. मुंबईतून आणि अंगावरून सुद्धा. पण कधी प्रेम ओवाळून टाकणारीला हात सुद्धा लावला नाही. का लावायचा? इथे जगणं committed नाही. मुलींना कुठून commitment द्यायची? अंग चोळून घेण्यासाठी ज्या आल्या त्यांना तेवढं अंगावर घेतलं. इतकं माहित असूनही माझ्या बहिणींनी कधी बाईलवेडा म्हणून दूर नाही केलं. परपुरुषासारखी वागणूक नाही दिली. त्याही सख्ख्या नव्हे, इतर नात्यातल्याच. त्यांनाही माझी मुलींची कन्सेप्ट कळली असावी. आईला तेवढी ती समजली नाही. तिने 'लफडं' असणाऱ्या सगळ्या पोरींना लग्नासाठी विचारलं. सगळ्या 'तसं काही नाही' म्हणून अपेक्षेप्रमाणे मोकळ्या झाल्या. मोकळ्याच व्हायला यायच्या त्या माझ्याकडे. असो.  शेवटी एक गावची मुलगी बांधलीच गळ्यात. पण एका शरीराशिवाय काहीच मिळालं नाही. ना मला, ना तिला. काही दिवसांपूर्वी ती काही महिन्यांची प्रेग्नंन्ट असताना त्रास झाला. रक्ताळलेल्या मांसाचा गोळा हातात घेतला डॉक्टरने. घाण. घाण नुसती. रक्त. ती कशीबशी वाचली. ते माझं दुर्दैव पाहिल्यानंतर एक घोट जात नव्हता घशात. आजही वचार करतो या नशेचा. आपलाही असा चेंदामेंदा तर होणार नाही ना? श्या. हवेशिवाय काही जात नाही नाकात.

     सगळे म्हणतात, 'बापावर गेलायंस'. मला आता आठवतही नाहीये तो. पण वाटतं, मी जन्मलो ते बरंच झालं. सुखासुखी गेला तो त्याच्या नशेत. हा जीवनाचा चेंदामेंदा घेऊन कुठे जाणार होता तो तरी?

Friday, 21 July 2017

कोथळीगड (Kothaligad)

     कोथळीगड हा शिवकालीन किल्ला कर्जतपासून साधारण २१ किलोमीटरवर, पेठ या गावात आहे. पेठ गावामुळे त्याला 'पेठचा किल्ला' असेही म्हटले जाते. गावापाशी गेल्यावर खरं तर तो दिसतही नाही. त्यासाठी सुमारे १५०० फूट डोंगर चढावा लागतो. पण एकदा का त्याचं दर्शन झालं, की त्याचा सुळका सतत खुणावत राहतो.

     कोथळीगडाच्या  पायथ्यापासून ते अगदी शिखरापर्यंत माणसाच्या बुद्धीची, कल्पकतेची आणि कलेची आपण साक्ष घेतो. पायथ्याच्या गावातल्या घरांपासूनच याची सुरुवात होते. पायथ्याच्या गावात लाल विटांची, मातीने चोपून तयार केलेली घरे, त्याच्या आडोशाला ठेवलेली मोठाली चाकं, अंगणात खेळणारी मुलं आणि दारातून आपल्याला पाहून 'लिंबूपाणी, पोहे, काही घेणार का ताई?' म्हणून विचारणाऱ्या मावशी. हे असं दृश्य डोळ्यांत तरळत राहतं नुसतं. इथल्या एका तरी मावशीच्या घरी लिंबूपाणी, चहा, पोहे, अशी न्याहारी नक्की करावी. पुढे गड चढायला घ्यावा. एकावर एक आलेले दगड पायऱ्याच बनवून देतात. एका ठिकाणी तर मोठ्या, तिरप्या दगडावर लहानशा पायऱ्या कोरलेल्या दिसतात. सुळक्यावरच्या पायऱ्यांचा हा नमुनाच जणु!


     यामुळे सुळक्याकडे जाण्याचं आकर्षण तीव्र होतं आणि त्या पाषाणयुगातून जायची मजा वाढते. शेवटी एकदाचा सुळका येतो आणि गुहेच्या पोटातल्या भल्यामोठ्या पायऱ्या दिसतात. पायऱ्यांवाटे शिखरावर जाण्याआधी सुळक्याचा भोवतालचा परिसरही पाहून घ्यावा. सुळक्याच्या खाली डावीकडे दोन मोठमोठी कोठारे आहेत. या दगडात कोरलेली ही धान्य कोठारे किंवा त्यातलं एखादं दारू कोठार असावं. सुळक्याच्या उजवीकडेही असेच, पण बंदिस्त अशी कोठारे आहेत. यातील पहिलं पाण्याचं टाकं असावं. पुढच्या दोन कोठारांत बंदुखा, बाण, होक ठेवत असावेत. शेवटची कोठारे सर्वांत मोठी आणि इतरांपासून दूर आहेत. त्यात दारूगोळा ठेवत असावेत. या कोठारांतील भिंतींना आणि तळालाही चुना थोपलेला आहे. तो आजही सक्षम आहे. रामचंद्रपंत अमात्य लिखित 'आज्ञापत्रात' असल्याप्रमाणे तळघरात, म्हणजे जास्तीत जास्त खोल खणलेल्या आणि किल्ल्याच्या इतर इमारतींपासून दूरच्या कोठारात दारूगोळा ठेवणे योग्य आहे. तसेच, बाण, होक अशी हत्यारे मध्यघरात ठेवावी. या शास्त्राप्रमाणेच बनवलेली ही शस्त्रकोठारे आहेत. बरं ह्यातलं एखादं कोठार वगळता सगळी कोठारे सुरक्षित आहेत. यावरून कोथळीगडाच्या सुरक्षिततेचा अंदाज येतो.


     पण उजवीकडच्या कोठारांकडे जाणारी वाट फार चिंचोळी असल्याने तिथून हत्यारे कसे नेत असावेत हा प्रश्न पडतो. कारण त्या चिंचोळ्या वाटेने दोन्ही किंवा एका हातातही अवजड सामान नेणं जिकीरीचं आहे. कदाचित तिथली जमीन, कडा खचून कोसळला असावा. जाणकारांनी पाहून याचा निष्कर्ष काढावा.

     गुहेच्या डावीकडे एक लेणी आहे. ही नक्कीच शिवपूर्वकालीन असावी. लेणीत मुख्य अशा चार खोल्या आहेत. पण शेवटच्या दोन खोल्यांत वटवाघुळांनी आपले घर केल्याने तेथे जाता येत नाही. बाहेरच्या मुख्य खोलीत आधारासाठी चार खांब आहेत. यांवर कलात्मक अशी चित्रे कोरली आहेत. पण बाजुच्या खिडक्यांतून येणारा पाऊसवारा सहन करून ती भग्न झाली आहेत. खांबाच्या सर्वांत वर दक्षिण भारतातील राक्षसाच्या मुखवट्यासारखा चेहरा चितारला आहे. याचा हेतू नक्कीच वाईट नजरेपासून सुरक्षा मिळावी हा आहे. त्याखालील सुंदर रेखीव नक्षी आगीच्या ज्वालांसारखी वाटते मला. त्याखाली भग्नावस्थेतील एक चित्र आहे. त्यात दोन नर्तकी आणि दोन वादक असावेत असं वाटतं. त्यातल्या एका वादकाच्या हातात ढोलकी तर एकाच्या हातात डफली असावी. या चित्राला लागूनच खांबाच्या कोपऱ्यातील रचनेत दोन्हीकडे एक-एक नर्तिका आहेत. त्याखाली मोरासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याची लहानशी नक्षी आहे. त्याखाली एक नर्तिका असावी अशा महिलेची भग्न झालेली, पण आकाराने मोठी कलाकृती आहे. प्रत्येक खांबावर अशी सारखीच चित्रे व नक्षी आहे. आणि यावरून इथे राहणाऱ्या लोकांत संगीत व नृत्यास महत्वाचं स्थान असावं असं वाटतं. हा त्यांचा व्यवसायही असू शकेल. प्रवेशद्वरावर मध्यभागी एक चित्र आहे, पण ते इतकं भग्न झालंय, की ते चित्र नक्की कोणाचं, कसलं आहे याचा अंदाजही येत नाही. उजवीकडे मोठा कठडा असून त्याच्या भिंतीवर काही चौकोनी खिडक्या दिसतात. ती माळ्यासारखी सामान ठेवण्यापुरती जागा असावी असं वाटतं. पण त्यातही वटवाघुळ असल्याने, ऑक्सिजन कमी असल्याने आत जाणं टाळलंच जातं. खांबांकडची, बाहेरची भिंत ही विटांची आहे. ती कदाचित लेणी बांधल्या नंतर, किंवा शिवकाळात बांधली असावी. पाऊसवारा आत येऊ नये व खांबांतील चित्रांच्या सुरक्षेसाठी ती बांधली गेली असावी. पण तीही आता काहीशी ढासळली आहे.


     लेण्याच्या आत जाण्याआधी  एक ग्रामदेवतेचं किंवा कदाचित विठ्ठल रखुमाईचं लहानसं मंदिर आहे. मुर्ती पाहून वाटते, की त्या काळात कादाचित देवांची संकल्पना फार खोलवर रुजली नसावी. पण एकविसाव्या शतकातल्या माणसाने मंदिराबाहेर 'महिलांनी आत प्रवेश करू नये' असं का लिहलं असावं, याचं उत्तर काही मिळत नाही.

     लेणी पाहून मग पायऱ्या चढायला घ्याव्या. मोठमोठ्या पायऱ्या प्रचंड थकवतात. एक पायरी दिड फूट तरी असावी. गुहेत उजवीकडेही लहान पायऱ्या आहेत. पण त्या सरळ कड्यावर आणून सोडतात. त्यामुळे तिथल्या तुटलेल्या दगडांना पाहून तिथे काहीतरी असावं असं राहून राहून वाटतं. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आलं की उसंत मिळते. या प्रवेशद्वाराबाहेर शरभ या प्राण्याचं चित्रं दगडात कोरलं आहे. बाजुलाच गजमुखही आहे. प्रवेशद्वारात दोन्ही बाजुला एक-एक आडव्या, मोठ्या खोबणी आहेत. त्यांचा रक्षकांना तलवारी, बाण ठेवायला वापर होत असावा. 

     पुढच्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण शिखरावर पोहोचतो. समोरच लहान झाडाझुडपांच्या सावलीत असलेलं पाण्याचं टाकं दिसतं. पाणी आजही पिण्यायोग्य आहे हे महत्वाचं. पुढे कडेला गेल्यावर डावीकडे एक दगड ठेवला आहे. कदाचित तटबंदीचा किंवा इतर बांधकामातला हा उरलेला एकमेव दगड असावा. तिथून खाली पाहिलं तर एक वाट समोरच्या डोंगराला, किंबहूना डोंगररांगेला जाऊन मिळते. या डोंगररांगेच्या डावीकडे गेल्यास वाजंत्री घाट आणि  पुढे भीमाशंकर डोंगररांग मिळते. बरं त्याच रांगेत पुढे गेल्यास पदरगड दिसतो आणि पलीकडे भीमाशंकरचा डोंगर. याच वाटेने कोथळीगड या समृद्ध शस्त्रागावरून शस्त्रसाठ्याची ने-आण कशी होत असावी, हे प्रत्यक्ष अनुभवण्यास ही भटकंती खरंच रोमांचकारी असेल. हा साराच रोमांच मनात साठवून, इथे निवांत बसल्यावर गवताच्या पात्यांवरून भिरभिरणारे बहुरंगी, बहुप्रकारचे फुलपाखरू पाहिले ना, की या जागेची, इथल्या पराक्रमाची साक्ष मिळते. तुफानी वाऱ्यातही जगणारे हे फुलपाखरू आपल्यालाही तुफानात जगायला शिकवतात.

Thursday, 20 July 2017

रायगडावरील स्तंभ

रायगडावर राजवाड्याच्या बाजूला अंगणाएवढी जागा सोडून तीन मजली निमुळत्या खिडक्यांचा एक स्तंभ आहे. पुढे बालेकिल्ल्याच्या भिंतीला टेकून अजून दोन स्तंभ आहेत. त्यांच्या दगड आणि नक्षीकामावरून ते शिवपूर्वकलीन असल्याचं दर्शवतात. स्तंभाच्या मधोमध कारंजे असण्याचीही खूण मिळते.

संध्याकाळी गडाचा लवाजमा आटोपून वृंदावनजवळ दिवा ठेवून महाराणीसाहेब याच प्रांगणात आपल्या सहचारिणींसमवेत शतपावली करत असाव्यात. मग केव्हातरी या अष्टकोनी स्तंभावर जात असाव्यात. तिथली कारंजं खोबणीतल्या दिव्यांच्या प्रकाशात मिणमिणत असावीत. एका खिडकीचा पडदा सारून त्या निवांत बसून मनाचे पडदे उघडत असाव्यात.

संध्याकाळच्या सूर्यकिरण आणि मेघांच्या खेळात त्यांना आपलं खेळकर बालपण आठवत असावं. कधी आई आठवत असावी, वडील आठवत असावे, तर कधी लग्नानंतरची माँसाहेबांची प्रेमळ माया आठवत असावी. लग्न झाल्यावर आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेसारखीच ढगांनी भरलेल्या आभाळाची जाणीव होत असावी. कधी मोहिमेवर गेलेल्या स्वारींची वाट पाहणारी सांज कोरडी होत असावी. कधी या रायगडासारख्या अभेद्य सम्राज्यावर सावटाचं आभाळ असावं, तर कधी लढाई जिंकून आलेल्या राजांचं स्वागतोत्सुक आभाळ असावं. बाळराजेंना खेळवणारं, खळाळणारं आभाळ असावं, तर कधी मुलांना लढाईचे धडे घेताना पाहणारं लढाऊ आभाळ असावं. राज्याभिषेकाला वैभवाचं, स्वातंत्र्याचं, मोकळं आभाळ असावं, तर नजरकैदेत असताना आभाळालाच कैद करावंसं वाटलं असावं. असे एक ना अनेक आभाळ नजरेवरून फिरवून, गंगासागर तलावातील सौम्य तवंगांना पाहत मनातील तवंग रिझवून त्या राजवाड्यात जात असाव्यात,
उद्याच्या आभाळात लढण्यासाठी...

फोटो - सौमित्र सुनिल देसाई

आभाळ

मातीच्या गल्ल्यात साठवलेल्या
हजारोच्या नोटा,
भरपूर वाटणारी चिल्लर,
दोन-तीन विद्रोही वगैरे कवितांची पुस्तकं,
एक पाण्याची बाटली, चप्पल, ब्रश
एका बॅगेत.

दहा वर्ष,
दहा महिने,
दहा दिवस,
किंवा
दहा तासच पुरेल इतका राग,
अपमान, चेष्टा
आणि
आयुष्यभर पुरतील इतके विचार, घुसमट.

हवी नको ती नाती,
त्यांच्यातलं राजकारण
त्यांच्यातला समाज
समाजाचं सुख
समाजाचं दुःख
समाजाचा मान
समाजाचा राग
समाजाची कीव
समाजाची येडझवी रीत
सगळं घेऊनही हिशोब लागत नाहीये,
काहीतरी राहतंय.

घर वाटणाऱ्या त्या भिंती,
त्या भिंतींमधून दिसणारं,
खेचणारं ते आभाळ...

ना वाट दिसतेय ना शेवटचं शिखर..
पुनवेच्या रात्रीही किर्र अंधार येतो समोर..
आभाळात शिरायचंय तर
आभाळही दिसत नाहीये आता...

Friday, 2 June 2017

स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून

स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून...

सध्या सरकार हेच करतंय. नाही मुळात त्यांना सरकार म्हणणंच चुकीचंय. हे अजूनही अभ्यास करणारे आमदार आणि खासदरच वाटतात. मंत्रिपद वगैरे झेपणारे हे लोक नाहीत. हे भारतीय जनता पक्षाचे नुसते राजकारणी आहेत. म्हणजे एकीकडे चर्चा करूनही त्यातून काहीच फळ काढत नाहीत. आणि उलट संप केल्यावर शेतकाऱ्यांविरुद्ध भडकवायचा प्रयत्न. त्यांचा मतदार आहे शहरी आणि निमशहरी. सोशल मिडियावर ह्यांना जास्त विश्वास. आणि ब्रॉडकास्ट मीडिया तर 3 वर्षांपूर्वीच विकला गेलाय. त्याला टी आर पी महत्वाचा. या दोन्ही भक्तांना जे दिसेल ते दाखवायची सवय. डोकं लावायचं ह्यांचं काम नाही.

कोणती आई आपल्या प्रेमाने वाढवलेल्या मुलाला मारेल? बरं त्यांनी टाकला भाजीपाला रस्त्यावर. कोणाचा होता? त्यांचाच ना? तुम्ही काही इन्वेस्ट केलेलं का त्यात? नाही ना. निदान त्यांनी स्वतःची मालमत्ता टाकली रस्त्यावर. इतरांसारखं सामाजिक मालमत्तेचं नुकसान नाही केलं. दंगल नाही घडवली.

या शहरी भक्तांना भाजपची एक भावनिक शब्दखेळीच पुरेशी होते, हे नेहमीच दिसत आलंय. कोणत्याही मुद्द्याला भावनिक हात घालून मुद्दा बाजूला सारून स्वतःकडे कॅमेरे वळवायचे. ह्यावेळी शेतकऱ्यांची बाजूच ह्यांनी हिरावली. तसंही आपल्याकडे आत्महत्त्या वगैरे होतच असतात. शेतकऱ्यांचं नुकसान झालं यापेक्षा शेतकऱ्यांनी नुकसान केलं हा विषय वेगळा वाटला आमच्या लोकशाहीच्या एका आधारस्तंभाला आणि कांदे 10 चे 12 रुपये किलो झाले म्हणून रडणाऱ्या जनतेलासुद्धा.

पंधरा वर्षांत तसं बरंच राजकारण शिकलेत ते. मराठा मोर्चा दाबण्यासाठीच काय ते जलपूजन केलं, उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून चिथवलं. एका कधी बनेल न बनणाऱ्या पुतळ्यासाठी ते मोर्चातले सो कॉल्ड शिवभक्त नमलेसुद्धा हे विशेष.

असो. कर्जमाफी हवीच, पण हक्काचा हमीभाव हा मिळायलाच हवा. आणि याला पाठिंबा देता येत नसेल तर त्यांना विरोध देखील करू नका. आणि हो, कांदे 12 चे 10 वर कधी येतील याची वाट बघा.

Thursday, 11 May 2017

गॉडफादर

     मारियो पुझो यांची रवींद्र गुर्जर अनुवादित 'गॉडफादर' ही कादंबरी न्यूयॉर्कमधील माफिया गँगच्या एका नेत्यावर आधारित आहे. त्या नेत्याचं नाव आहे, 'व्हिटो कॉर्लिऑन', ज्याला 'डॉन कॉर्लिऑन' म्हणूनही ओळखलं जातं. या कादंबरीची सुरुवात डॉनच्या मुलीच्या लग्नसोहळ्यापासून होते. त्यात म्हातारा होत चाललेला डॉन काहीसा हतबल दिसतो. कारण, त्याला त्याच्या फॅमिलीचा, उद्योगाचा उत्तराधिकारी अजुन आपल्या तीनही मुलांत सापडला नाहीये. अशा थकलेल्या, पण अनुभवी व्यक्तीच्या हालचाली अचूक टिपून लेखकाने सुरुवातीला निराश न करता गॉडफादर समोर आणला आहे. त्यामुळे कोणत्याही कामगिरीशिवायही हा डॉन ताकदवान वाटतो. हळूहळू त्याचे अनुभव लेखक सांगत जातो, तसतसा डॉन अजुन आकर्षक वाटतो.
     बरं आता तुम्ही म्हणाल की माफिया गँगच्या नेत्याला 'गॉडफादर'सारखी पदवी का? तर ते लेखक सुरुवातीला सुचवतोच. अनेक दुर्बल, दुर्लभ लोकांना मदत आणि मैत्रीचं आश्वासन दिल्याने त्याला लोक 'गॉडफादर' म्हणवू लागले होते. पण सोबतच, लेखक असंही सांगतो, की 'माफिया' या शब्दाचा मूळ अर्थ 'आश्रयस्थान' असा आहे. शेकडो वर्षे इटली देशातील जनतेला भरडणाऱ्या जुलमी राज्यकर्त्यांविरुद्ध लढा देण्यासाठी निर्माण झालेल्या गुप्त संघटनेला ते नाव पडलं. आणि गंमत म्हणजे इथे डॉन कॉर्लिऑन हा इटालियन आहे.
 न्यूयॉर्कमधील पाचही माफिया फॅमिलीज् या इटालियन आहेत हे विशेष. पण गॉडफादर नेहमीच 'माफिया' या नावाला जागतो. इटलीत या माफियांनाच त्या वेळी गॉडफादर म्हटलं गेलं होतं. राज्यकर्त्यांचे सगळेच शासन या गॉडफादरला मान्य नाहीत. कोणाला गरज पडल्यास तो शासनातही हस्तक्षेप करतो. या मदतीच्या मोबदल्यात त्याला फक्त मैत्रीची अपेक्षा असते. त्याच्या मते, माणसाने नेहमीच एकमेकांच्या मदतीत, मैत्रीत राहायला हवे. उद्योग वाढवल्याने वेळोवेळी या मैत्रीचा फायदाही तो करून घेत होता. स्वार्थ असणं तेवढं वाईट नव्हतं.
     शांत, समर्पक असं हे व्यक्तीमत्व जेव्हा अडचणीत येतं, तेव्हा त्याच्या क्लृप्त्या, युक्तीवाद आणि शांत वाटाघाटीतलं त्याचं संभाषण कौशल्य अप्रतिम आहे. मोजकंच, मुद्द्याचं पण समोरच्याला प्रभावित करूनच सोडेल असं त्याचं बोलणं आहे. ते वाचतानाही मनात गुंजतं. सोबतच, त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या मुलाकडे सत्ता आल्यावर संतापाच्या भरात सुरु झालेलं युद्ध चित्तवेधक आहे. कारण आपण हत्ती, घोडे, तोफा आणि तलवारींचं युद्ध नेहमीच वाचतो. पण माफियांच्या उद्योगधंद्यांतील युक्तीने आणि लहान पिस्तुलांनी झालेलं युद्ध फारच कमी वाचायला मिळतात. त्या उद्योगांत जुगार आणि तेल उद्योग महत्त्वाचे. ते दोन्ही बंद पाडायला किंवा आक्रमण करायला युक्तीचीच जास्त गरज भासते. ते वीसाव्या शतकातील युद्ध असल्याने दोन्ही महायुद्धांचा यावर परिणाम आहे. पोलिसांची भीती आहे. कायद्याचा कचाटा आहे. या सगळ्यातून मार्ग काढून आणि कधी कधी मार्ग तुडवून युद्धात लढलं जातं, समोरच्याला खेळवलं जातं. पैसे किंवा उद्योगांसाठी नव्हे, तर सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी हे युद्ध. मायकेल कॉर्लिऑनच्या मते, बिझनेस हेच एक कारण नसतं युद्धाचं. युद्ध ही नेहमीच व्यक्तीगत असतात. हे वेळोवेळी कळतंच.
     काम कोणतंही असो, माणूस जपणं ही परंपरा सगळ्याच क्षेत्रात उपयोगी ठरते. म्हणूनच कादंबरीत गॉडफादरच्या सामर्थ्याचं जेवढं कौतुक केलंय, तेवढीच त्याच्या अवतीभवतीच्या माणसांची काळजी घेतली गेलीय. त्या माणसाने गॉडफादरच्या आयुष्यात येण्याआधीचा आणि नंतरचा काळ, स्वभाव लेखकाने योग्य वेळी सांगितला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आणि त्या परिस्थितीलाही योग्य न्याय मिळाला आहे. तसेच, एक सामान्य, शांत व्यक्ती व्हिटो कॉर्लिऑन हा डॉन कॉर्लिऑन कसा झाला, हा त्याचा प्रवासही इटलीच्या माफियांना शोभेल असाच झाला आहे. पण त्या प्रवासाचं आश्चर्य न मानता तो निर्वकारपणे पुढे जात राहिला आहे.
     कालांतराने अमेरिकेच्या चित्रपटसृष्टीत माफियांचा झालेला हस्तक्षेपही दिसतो. त्यात गॉडफादर निश्चित कारणास्तव डोकं खुपसतो इतकंच. बरं चित्रपट क्षेत्राची पार्श्वभूमी दाखवताना त्यातील अंतर्गत राजकारण आणि ग्लॅमरला भूललेले लोक, हे सारं आलंच. पण यात कथेची चित्रपटासारखी मांडणी इकडे तिकडे केल्याने जरा भटकायला होतं. मागचं आठवणीत असेल तर पुढची कथा कळते.
     पण खंत एकाच गोष्टीची वाटते, तिथल्या परंपरेनुसार सगळ्याच क्षेत्रात वासनेला दिलेलं एवढं महत्व आणि तेवढ्यापुरताच महिलांचा केलेला वापर! अर्थात वीसाव्या शतकात अमेरिकेतही पुरुषप्रधान संस्कृती होती. तीही इतकी बळकट की लेखकही त्यातून सुटू शकले नाही.
     एकंदरीत, अमेरिकेमधील एकोणीस आणि वीसाव्या शतकातील माफिया आणि उद्योगधंद्यांच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी ही कादंबरी नक्कीच उपयोगी ठरते. प्रत्येक पुस्तक जसं काही ना काही देत असतं, तसंच गॉडफादरचं संभाषण कौशल्य, नीतीमत्ता आणि युक्तीवाद नक्कीच शिकण्यासारखा आहे.

Sunday, 23 April 2017

डायरीतल्या गोष्टी #3

     आज जागतिक पुस्तकदिन आहे. पुस्तक, साहित्य वगैरे दहावी-बारावी पर्यंत माहितही नव्हतं. कदाचित कळतच नव्हतं. मराठीच्या पुस्तकातले ते धडे मी कधीच गोष्टींसारखे वाचले नाही. परीक्षा आली की गाईड घेऊन बासायचं आणि उत्तरं पाठ करायची. गोष्टी नुसत्याच प्रश्नोत्तरांसारख्या. आणि कविता तर विमानासारख्या दूरूनच ऊडून जायच्या. त्या न कळणारे शब्द आणि न कळणारा काहीतरी विचित्र, परग्रहासारखा प्रकार वाटायचा.
दहावीत असताना एक स्थूलवाचन आवडलं होतं. म्हणजे स्वतःच वाचून स्वतःच अभ्यास करायचा त्यावर. पण क्लासमध्ये करायचं म्हणून किंवा 'तुम्ही काय वाचणार नाही घरी!' म्हणून टीचरने तो फक्त वाचला. 'भूक' नावाचा तो धडा होता. फार साधी गोष्ट होती. एका आईची आणि तिच्या दोन मुलांची. मुलांना भूक लागलेली असताना टोळ पकडून, शिजवून खाऊ घातलेलं तिने आणि नंतर तो टोळ मासा विषारी साप होता की काय, या फक्त कल्पनेनेच तिचं काळीज फुटतं. अशी साधारण कथा होती. लेखकांच्या वर्णनाने सारं काही कसं डोळ्यांसमोर दिसत होतं. त्यात टीचर वाचतही अगदी सहज होत्या. अगदी कथाकथनच. पहिल्यांदा क्लासमध्ये पूर्ण वेळ शांतता होती. आम्ही ऐकतच होतो. ती पहिली कथा, जेव्हा मला कथांबद्दल, गोष्टींबद्दल आकर्षण वाटू लागलं असावं. नंतर दहावीच्या सुट्टीत वेळ जावा म्हणून लायब्ररी सुरु केली. तेव्हा कोणीच माहित नव्हतं. म्हणून तिकडच्या लायब्ररीयनलाच सांगितलं कोणतं तरी पुस्तक द्यायला. त्या बाईंनी जरा गमतीनेच दिलं ते. तेव्हा वाटलं काय असावं जे एवढी मस्करी करतेय ही... घ्यायचं म्हणून घेतलं मी. पुं. लं. चं फुलराणी होतं ते आणि सोबतीला एक गृहशोभिका. मासिकेमुळे लघुकथा कळल्या. एवढंच की आता त्यांचं हसू येतं. 'मला एवढ्या इमोशनल वगैरे कथा कशा आवडल्या?' कारण अर्थातच त्या स्त्रीप्रधान आणि अतिशय ड्रॅमॅटिक होत्या. सुरुवातीला तसं सगळंच आवडतं.

     नंतर अकरावी बारावी पुन्हा पुस्तकांपासून दूर झाले. अभ्यास आणि अभ्यास. अगदी कधीतरी लायब्ररीत पैसे भरायचे म्हणून आणायचे एखादं पुस्तक. पण वाचायचे कधीतरीच. त्यात वपु, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर, अनिल अवचट यांची पुस्तकं वाचली. बारावीत तर काहीच वाचलं नाही. त्यामुळे आईने लायब्ररी बंदच केली. आणि मग मला पुन्हा लावताही आली नाही. बी.एम.एम. घ्यायचं म्हणून पेपर सुरु केला. सकाळ आवडता होता, कारण त्यातलं रविवारचं 'सप्तरंग' आवडीचं होतं. शेजार्यांकडे लोकमत यायचं. त्यातली ऑक्सिजन पुरवणी आवडीची झाली.

     बी.एम.एम. च्या पहिल्या वर्षात star-pro हातात आला. त्यात मग वॉट्स अॅप, फेसबुकवरच्या कविता, लेख, वायरल गोष्टी सतत नजरेत आल्या. आणि खरं सांगू का.. तेव्हा ते सगळं आवडलंही खूप. सुरवातीला सगळंच आवडतं, हेच खरं. त्यातच मैत्रिणींनी सांगितलेले इ-बुक्स. बी.एम.एम. मध्ये अभ्यास फार मनावर न घेतल्याने इ-बुक्स वाचायला लागले. त्यात नको तेवढं सर्फ केल्यावर चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळ्या सापडल्या आणि तुकारामांचे काही अभंगही. एकाने तर चक्क भगवद्गीता दिली वाचायला. वाचून काही दिवस शांत वाटलं. नंतर पुन्हा गोंधळ सुरुच राहिला. ती तशीही सगळ्या वयांत वाचावी. पुन्हा पुन्हा नवीन अर्थ सापडतो. हा सध्याचा निष्कर्ष.

     नवीन माणसांत आलो की नवीन गोष्टी सापडतात. तसंच मला पुस्तकं सापडली. मग ती कॉलेजच्या लायब्ररीत असो किंवा ठाण्याच्या स्काय वॉकवरची हाफ रेटमधली पुस्तकं असो, मी वाचतच राहिले. भले ते टिपिकल का असेनात. वाचणं महत्वाचं. वाचण्यात वाहून घेतलं नाही इतकंच. मी अजुनही जास्त वाचायाचं टाळते, आणि काही गॅपने, पुन्हा प्रेमात पडते पुस्तकांच्या. एकदाच वाहून घेण्यापेक्षा पुन्हा पुन्हा प्रेमात पडणं केव्हाही छानच.

Monday, 10 April 2017

आत्महत्येऐवजी

आत्महत्येऐवजी               
मी वेचीन प्राजक्त झाडावरचा
कोवळा, सुगंधित
आणि माळीन केसांत
त्यानेही केसांतच वाळण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी वाळूचं बनवेन एक घर
सुरेख, कुंपणासहित
आणि जाईन निघून ते सोडून
कोणीतरी येऊन तुडवण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी वाढवीन एक बोन्साय
लहानशा कुंडीत
आणि दाखविन त्याला त्याचं मूळ झाड
त्यानेही खंगून जाण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी काढेन एक चित्र
आखिव रेखीव
आणि रंगहीन ठेवीन तसंच
अश्वत्थाम्यासारखं वाट पाहण्यासाठी

आत्महत्येऐवजी
मी पडेन पुन्हा प्रेमात
तशाही स्थितीत
आणि ओघाने बाहेरही येईनच
पुन्हा कविता लिहिण्यासाठी

Friday, 13 January 2017

कठपुतली

ती राग आणि दुःख एकत्र करत
हुंदके देत उठली
साडीत लपवलेलं मंगळसूत्र नाल्यात फेकायला
हात वर गेला,
पण मंगळसूत्र हातातच राहिलं
सुटला तो तिचाच तोल
तिला रोखलं नव्हतं नवऱ्याने
तिला रोखलं नव्हतं समाजाने
तिला रोखलं तोल गेलेल्या मनाने
संसार करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या
तिच्या असूनही नसलेल्या अस्तित्वाने.
नवऱ्याने घराबाहेर काढलं
अन् त्याच्याच मित्राने बाजारात आणलं
बाजारातही किंमत मिळेना
ती रस्त्यावर आली
वासल्या नजरांना नजर द्यायला
थोडी नशा केली
थोडी स्वतःतच रमली,
पण अचानक आलेला ट्रेनचा आवाज
तिच्या कानात तापलेल्या शिसेचा रस ओतून गेला
आणि पुन्हा एकदा मन सुन्न झालं
कदाचित नियतीलाही तिच्यावर
आपला दाब दाखवायचा होता
त्याने तिचा हात पकडला
तशी ती कठपुतलीसारखी उठली
आणि चालू लागली,
पुन्हा एकदा
आपले तुटलेले धागे बांधून घ्यायला...